मार्क्सवाद संपला... तथ्य की कथ्य?

विवेक मराठी    15-May-2026   
Total Views |
जंगलातील हिंसक नक्षलवादाचा अंत आणि केरळमधील सत्तांतरानंतर मार्क्सवाद संपल्याचे चित्र दिसत असले, तरी वास्तव त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहे. हिंसक माओवादाची जागा आता ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’ने घेतली असून, तो शिक्षण आणि सर्व प्रकारच्या माध्यमांमधून आपल्या संस्कृतीवर छुप्या पद्धतीने प्रहार करत आहे. हा प्रहार नेमका कसा ओळखायचा आणि तो भारतासाठी कशा प्रकारे धोकादायक आहे, याचे सडेतोड विश्लेषण..

communist party of india
 
गेल्या दोन-तीन महिन्यांत भारताच्या राजकीय पटलावर काही अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या. 1967मध्ये उत्तर बंगालमधील नक्षलबारी येथे सुरू झालेली नक्षलवादी चळवळ अल्पावधीतच पशुपती ते तिरुपती या जंगलांच्या पट्ट्यात पसरली. या पट्ट्यातील बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांमधील 140हून अधिक जिल्हे या चळवळीच्या दहशतीखाली जगत होते. आदिवासींच्या हक्कासाठी लढत असल्याचा मुखवटा नक्षलवाद्यांनी चढवला असला तरी त्यामागे, हे भारतीय प्रजासत्ताकाविरुद्ध पुकारलेले सशस्त्र युद्ध होते. यांची विचारधारा हिंसेवर आधारित होती आणि या हिंसेचे बळी गरीब, असहाय्य आदिवासीच ठरत होते.
 
 
मनमोहन सिंह यांच्या सरकारनेदेखील नक्षलवादी चळवळ हा भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी असलेला सगळ्यात मोठा धोका असल्याचे म्हटले होते. पण या चळवळीला मुळापासून संपविण्याची राजकीय इच्छाशक्ती आधीच्या सरकारांनी न दाखवल्यामुळे ही दहशत वाढतच गेली. मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र या दहशतीचा मुळापासून अंत करण्यासाठी कालबद्ध योजना आखली आणि सुरक्षा दलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना योग्य ती कारवाई करण्याची मुभा दिली. 31 मार्च 2026पर्यंत ही चळवळ संपवण्याची जाहीर हमीच गृहमंत्र्यांनी दिली होती. धडक कारवाईचा बडगा सतत कायम ठेवल्यामुळे नक्षलवाद्यांनी मोठ्या संख्येने सुरक्षादलांसमोर शरणागती पत्करली आणि जंगलातला हा हिंसक नक्षलवाद 31 मार्च 2026 या अंतिम मुदतीच्या आत पूर्णपणे संपुष्टात आला.
 

communist party of india 
 
 
दुसरी महत्त्वाची घटना होती ती, केरळ विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल. 1957साली केरळमध्ये जगातले पहिले लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार सत्तारूढ झाले. त्यानंतर बंगाल आणि त्रिपुरा येथेही मार्क्सवादी सरकारे सत्तारूढ झाली. तेव्हापासून आजवर भारतातल्या कुठल्या ना कुठल्या राज्यात मार्क्सवादी नेहमीच सत्तेत राहिले. यावेळी केरळात मार्क्सवादी आघाडीचा पराभव झाल्यानंतर 1957पासून पहिल्यांदाच अशी वेळ आली जेव्हा भारतातील कुठल्याच राज्यात मार्क्सवादी सरकार अस्तित्वात नाही. आणखी एक निवडणूक निकालही लक्षवेधी आहे. बंगालच्या निवडणुकांमध्ये नक्षलबारीची जागा, भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करून जिंकली. तिथल्या मार्क्सवादी पक्षाच्या उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली.
 
 
या महत्त्वाच्या घटनांमुळे अनेकांचा असा समज झाला की, भारतातून आता मार्क्सवाद कायमचा नामशेष झाला आहे. मात्र असा समज करून घेणे ही अत्यंत मोठी आणि गंभीर चूक ठरेल हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. मार्क्सवादाचा आजवरचा इतिहास हा केवळ अपयश आणि पराभवांचाच इतिहास आहे, याची आपण प्रथम थोडक्यात माहिती करून घेऊया.
 

communist party of india 
 
कार्ल मार्क्स याने असे भाकीत केले होते की, देशादेशांमधल्या सीमा कोसळून पडतील, सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि बंदुकीच्या नळीतून येणार्‍या रक्तरंजित क्रांतीद्वारे भांडवलशाही नष्ट करतील. त्याने हेदेखील सांगितले होते की कामगारांची ही क्रांती जिथे सर्वाधिक औद्योगिकीकरण झाले आहे अशा इंग्लंड आणि जर्मनी या देशांमध्ये होईल. यातली एकही गोष्ट घडली नाही. देशादेशांमधल्या सीमा कोसळून कामगार एक झाले नाहीत, तर पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात ते आपल्या देशासाठी लढले व त्यांनी प्रसंगी आपले प्राणही अर्पण केले. जिथे जास्त औद्योगिकीकरण झाले होते त्या ब्रिटन, जर्मनी व इतर पाश्चात्य देशातील कामगारांनी कम्युनिस्ट क्रांतीकडे पाठच फिरवली आणि ते भांडवलशाहीतून येणार्‍या समृद्धीत आनंदाने सहभागी झाले. हा होता मार्क्सवादाचा पहिला पराभव.
 
 
मार्क्सवादी शासन पहिल्यांदा आले ते औद्योगिकीकरणाचा स्पर्शही न झालेल्या, जमीनदारी अर्थव्यवस्था असलेल्या रशियात. तिथे लेनिनने मार्क्सच्या शिकवणुकीनुसार अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल केले. खासगी मालकीवर बंदी आणली गेली. शेतकर्‍यांचे उत्पन्न, कामगारांचे पगार हे कार्यक्षमता व उत्पादकता यावर नाही, तर शासनाच्या निर्णयानुसार ठरवले जाऊ लागले. त्यामुळे उत्पादकता कोसळली आणि अर्थव्यवस्था ठप्प होऊन मोठे आर्थिक संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत 1922साली आलेल्या दुष्काळात लोक मोठ्या प्रमाणात उपासमारीने मृत्युमुखी पडू लागल्यावर अमेरिकन नागरिकांनी पैसे जमवून रशियातील भुकेल्या लोकांना अन्नधान्याची मदत केली. ज्या अमेरिकन भांडवलशाहीचा द्वेष केला त्यांच्याकडूनच अखेर मदत घ्यावी लागली. हा होता मार्क्सवादाचा दुसरा पराभव.
 
 
यावेळी असे सांगण्यात आले की, आर्थिक घडी बसायला वेळ लागत असला तरी समता, बंधुता, न्याय, मानवता याबाबतीत मात्र साम्यवादाचा विचार भांडवलशाहीपेक्षा श्रेष्ठ आहे; पण 1956 साली रशियाचा प्रमुख ख्रुश्चेव्ह याने जगासमोर जाहीर कबुली दिली की, ’स्टॅलिनच्या राजवटीत सोव्हिएत युनियनच्या जनतेला अनन्वित अत्याचार, जुलूम आणि दडपशाही यांचा सामना करावा लागला. आपली जमीन सरकारजमा करून सामूहिक शेतीसाठी तयार नसलेल्या शेतकर्‍यांच्या सामूहिक कत्तली करण्यात आल्या. अशा प्रकारे, कम्युनिस्ट राजवट नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचा दावाही खोटा ठरला. हा होता मार्क्सवादाचा तिसरा मोठा पराभव.
 
तोवर सोव्हिएत युनियनचे गुण गाणारे डावे आता चीनमधील माओ आणि व्हिएतनामचा हो चि मिन्ह याला रोमँटिसाईझ करू लागले. पण 1978साली डेंग झिआओ पिंग यांनी चीनमध्ये कम्युनिझम केवळ राजकीय हुकूमशाहीपुरता जिवंत ठेवला आणि भांडवलशाही आर्थिक धोरणे राबवायला सुरुवात केली. हो चि मिन्ह यांनी अमेरिकन वर्चस्ववादाविरुद्ध दिलेला लढा प्रेरणादायी असला तरी व्हिएतनामनेदेखील खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि वेगवान आर्थिक प्रगती करायला सुरुवात केली. हा होता मार्क्सवादाचा चौथा पराभव.
 
 
‘आपली विचारधारा चुकीची नाही; पण यावेळी त्याची अंमलबजावणी चुकली. यापुढे आपण यात सुधारणा करू आणि मग समता आणि समृद्धी यांचे आदर्श राज्य अवतरेल’, अशी स्वप्ने दाखवत मार्गक्रमण करण्याची मर्यादा अखेर संपली आणि 1989 ते 90-91मध्ये बर्लिनची भिंत, सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोपातल्या कम्युनिस्ट राजवटी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. हा होता मार्क्सवादाचा पाचवा आणि सगळ्यात मोठा पराभव.
 
 
याशिवाय कंबोडिया, आफ्रिकेतील अनेक देश क्युबा, व्हेनेझुएला येथेही मार्क्सवादाच्या प्रयोगातून अराजक, हिंसा, गरिबी यापलीकडे काहीही निष्पन्न झाले नाही. काही महिन्यांपूर्वी झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड झाली; त्यावेळी त्यांनी मोठा गाजावाजा करून आपण समाजवादी धोरणे राबविणार असल्याचे सांगितले होते आणि जगभरातल्या समाजवाद्यांना आनंदाचे भरते आले होते. पण आल्पावधीतच त्यांना, आपण जाहीर केलेली धोरणे राबवणे सध्या शक्य नसल्याचा सूर आळवावा लागला.
 

communist party of india
 
अशा प्रकारे वारंवार अपयश आणि पराभव पदरी येऊनही मार्क्सवाद कधीही संपत नाही, हे या विचारधारेचे वैशिष्ट्य आहे. या विचारात फक्त परिणामांवर भर दिला जातो. मार्क्सवादी व्यवस्थेतून समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समृद्धी, संपन्नता निर्माण होईल हे मार्क्ससह बाकी सर्व कम्युनिस्टांनी सांगितले होते. पण ते का, कसे, कुठल्या प्रक्रियेतून निर्माण होईल, या निर्मितीचे टप्पे काय असतील याबद्दल मात्र कोणीही, काहीही सांगत नाही. मार्क्सवादाचे अभ्यासक W. Cleon Skousen मार्क्सविषयी लिहितात, - - He wanted to live in a classless, stateless, non-competitive society where there would be such lavish production of everything that men, by simply producing according to their ability would automatically receive super abundance of all material needs. म्हणजे ’समृद्धी आणि संपन्नता ही मार्क्सवादी व्यवस्थेत ’आपोआप’ निर्माण होईल असा मार्क्सवादाचा दावा आहे. मार्क्सवाद ज्या समता, समृद्धी यासारख्या परिणामांचा दावा करतो, ते अत्यंत आकर्षक आणि हवेहवेसे असल्यामुळे आदर्शवादी, भावनाशील लोकांना ते पटकन आकर्षित करतात. त्यामुळेच भावनांच्या विश्वात जगणारे कलाक्षेत्रातले लोक जगात सर्वत्र, मार्क्सवादाकडे आकर्षित झालेले दिसतात. या परिणामांचे आकर्षण इतके तीव्र असते की त्यांना बुद्धी आणि तर्क यांचा काही आधार आहे का, हे पारखून बघण्याचे भानही उरत नाही, आणि तसा काही आधार नसल्याचे जाणवतही नाही.
 
 
मार्क्सवाद वारंवार अपयशी ठरूनही त्याला समर्थक मिळतच राहतात याचे रहस्य मार्क्सवादाच्या विशिष्ट मानसिकतेतही आहे. 1871 साली झालेल्या ’पॅरिस कम्युन’ या चळवळीत संपूर्ण पॅरिस शहर दोन महिने वामपंथी गटांच्या ताब्यात होते. त्यावेळी त्यांनी अराजक, हिंसा, विद्ध्वंस याचे जे थैमान घातले ते पाहून हादरून गेलेल्या काही मानसशास्त्रज्ञांनी वामपंथी मानसिकतेचा अभ्यास केला. यात असे आढळले की नाराजी, राग, असूया आणि द्वेष या भावना म्हणजे वामपंथी मानसिकतेचा गाभा आहे. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल म्हणतात, "ज्या तत्त्वज्ञानात सद्भावना असेल तेच आनंदाची निर्मिती करू शकतं. सद्भावना ही मार्क्सची प्रेरणा कधीच नव्हती. त्याला शोषितांचा आनंद हवा असल्याचं तो वरवर दाखवत असला तरी त्याला प्रत्यक्षात मध्यमवर्गाचं ( बूर्झ्वा ) दुःख हवं होतं. या द्वेषभावनेमुळेच त्याच्या तत्त्वज्ञानातून केवळ अनर्थ निर्माण झाला." हे केवळ इतरांनी केलेले विश्लेषण नाही, तर अनेक मार्क्सवाद्यांनी स्वतः हे स्पष्टपणे सांगितले आहे.
 
 
अशा शेकडो उदाहरणांपैकी केवळ तीन उदाहरणे आपण बघूया. द्वेष हा वामपंथी विचारसरणीचा गाभा आहे हे समजून घेण्यासाठी रशियातील कम्युनिझमचा प्रणेता लेनिन याचे हे उद्गार महत्त्वाचे आहेत,‘आपण द्वेष केलाच पाहिजे. द्वेष हा कम्युनिझमचा पाया आहे. जर पालक कम्युनिस्ट नसतील तर मुलांना त्यांचा द्वेष करायला शिकवले पाहिजे.’ चीनच्या माओ त्से तुंगने लिहिले होते, ‘वयाच्या आठव्या वर्षापासून मी कन्फ्युशिअसचा (प्राचीन चिनी तत्त्वज्ञ) द्वेष करायचो. आमच्या गावात कन्फ्युशिअसचं एक मंदिर होतं. माझी मनापासून एकच इच्छा होती - ते मुळापासून उखडून टाकावं.’ वयाच्या आठव्या वर्षी इतका टोकाचा द्वेष आणि विद्ध्वंसाची इतकी तीव्र उर्मी असणे हे मानसिक आजाराचे आणि विकृतीचेच लक्षण नाही का? चे गेवाराचा टी शर्ट घालायची एक फॅशन आहे. हा चे गेवारा काय म्हणतो बघा,‘द्वेष हा लढाईचा एक घटक आहे. शत्रूविरुद्ध दयामाया नसलेला द्वेष, जो क्रांतिकारकाला नैसर्गिक आणि मानवी मर्यादांच्या पलीकडे जायला मदत करतो. आणि त्याला एक विद्ध्वंसक, शांत, हिशोबी, थंड असे हत्येचे मशीन बनवतो.’ अशी टोकाची विकृत, द्वेषपूर्ण, हिंसक मानसिकता वामपंथी विचारांच्या मुळाशी असते. म्हणूनच अधिकाधिक गटांच्या मनात बळीची मानसिकता(Victimhood) निर्माण करून त्यांच्यात नाराजी, राग, असूया आणि द्वेष या भावना रुजवण्याचे काम मार्क्सवादी सतत करत असल्याचे आपल्याला आढळते. जोपर्यंत ही मानसिकता जगात आहे, तोपर्यंत मार्क्सवाद संपणार नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
 
 
अशा प्रकारे, मार्क्सवादाच्या परिणामस्वरूप समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होतो, ही भाबडी भावना असो की नाराजी, राग, असूया, विद्वेष या टोकाच्या नकारात्मक भावना असोत, तर्कशुद्ध विचार नव्हे तर तीव्र भावना हाच मार्क्सवादाचा आधार असतो. तरुण वयात माणूस अधिक भावनाप्रधान असतो आणि त्यामुळे मार्क्सवादाकडे अधिक आकर्षित होतो. तर वाढत्या वयाबरोबर जशी तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती वाढत जाते तसा मार्क्सवादाचा प्रभाव कमी होत जातो. यामुळेच म्हटले जाते, तारुण्यात जर तुम्ही मार्क्सवादी नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि तिशीनंतरही जर तुम्ही मार्क्सवादी असाल तर तुम्हाला मेंदू नाही.
 
 
सुप्रसिद्ध सोशल सायकॉलॉजिस्ट जोनाथन हाईट (Jonathan Haidt) म्हणतात,”माणूस बहुतेक सर्व निर्णय भावनेच्या आधारावर घेतो आणि नंतर त्या निर्णयाचे समर्थन करणारा तर्काधारित युक्तिवाद तयार करतो. म्हणजे एखाद्या विषयाची माहिती घेऊन, त्या माहितीचे बुद्धी आणि तर्क यांच्या आधारे विश्लेषण करून निर्णयापर्यंत पोचण्याची प्रक्रिया घडतच नाही. तर भावनेच्या आधारे निर्णय घेतला जातो आणि आणि नंतर त्यासाठी आवश्यक तर्क निर्माण केला जातो. अशा प्रकारे घेतलेला आपला निर्णय चुकला हे जाणवल्यानंतर कधीतरी तो मागेही घेतला जातो.”
 
 
पण मानसशास्त्र हेदेखील सांगते की, निर्णय चुकला हे दाखवणारे अनेक पुरावे असले तरी मन हे मान्य करायला तयार होत नाही आणि आपल्या निर्णयाचे/निवडीचे समर्थन करण्यासाठी नवे-नवे तर्क शोधू लागते. उदाहरणार्थ, मार्क्सवादाचा स्वीकार न करणार्‍या पाश्चात्य जगताविषयी असलेल्या विद्वेषाच्या भावनेचे समर्थन करण्यासाठी मार्क्सवादाने असा युक्तिवाद केला होता की, भांडवलशाहीतील समृद्धी, कामगारांच्या शोषणातून निर्माण होते. पण हे चुकीचे आहे. पाश्चात्य जगतातले कामगार भरपूर पैसे कमावून समृद्ध होत आहेत हे लक्षात आल्यावर, त्यांनी एक नवा तर्क निर्माण केला-भांडवलशाहीतून चंगळवाद निर्माण होतो. हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले तर नवीन काहीतरी कारण शोधले जाईल, पण भांडवलशाही आणि पाश्चात्य जगताविषयी असलेला विद्वेष मार्क्सवादी कधीच सोडणार नाहीत. अशा प्रकारे, मार्क्सवाद कधीही यशस्वी होऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले, तरी या विचाराचा स्वीकार तीव्र भावनांवर आधारलेला असल्यामुळे त्यांना ’जस्टिफाय’ करण्यासाठी नवे-नवे तर्क शोधले जातात आणि मार्क्सवाद कधीच संपत नाही.
 
 
भारतात एका वेगळ्या रूपातला मार्क्सवाद केवळ अस्तित्वातच नाही, तर अत्यंत प्रभावी आहे. त्याची आता माहिती करून घेऊया. आपण याआधी पाहिले त्यानुसार मार्क्सवादाचा वारंवार पराभव होत असल्यामुळे त्यांच्या गटात मोठे विचारमंथन सुरू झाले, ज्यातून एक नवा सिद्धांत मांडला गेला. यानुसार पश्चिमेतील लोकशाही देशांमधले शोषित लोक कम्युनिस्ट क्रांतीकडे पाठ फिरवतात कारण ते पाश्चात्य संस्कृतीला आपली संस्कृती मानतात. यामुळे जोपर्यंत आपण ही संस्कृती नष्ट करत नाही तोपर्यंत पाश्चात्य जग मार्क्सवादाचा स्वीकार करणार नाही. यासाठी त्यांनी मार्क्सवादाला अभिप्रेत असलेला शोषक-शोषित हा संघर्ष भांडवलशहा विरुद्ध कामगार अशा आर्थिक आधारावर नाही, तर वंश, लिंग, भाषा, धर्म या संस्कृतीच्या विविध पैलूंवर भडकवायला सुरुवात केली. म्हणजे गरीब विरुद्ध श्रीमंत या एका आर्थिक संघर्षबिंदूऐवजी अनेक संघर्षबिंदू निर्माण झाले, ज्यांचा आधार संस्कृती हा होता. म्हणूनच मार्क्सवादाच्या या अवताराला सांस्कृतिक मार्क्सवाद असे म्हटले गेले. या सिद्धांताच्या प्रवर्तकांनी हेदेखील सांगितले की, ही बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती नसेल तर आम्ही संस्कृतीला बळ देणार्‍या विविध संस्थांमध्ये प्रवेश करू आणि त्यांना आतून इतके पोखरून टाकू की त्या एक दिवस कोसळून पडतील आणि त्यांच्याबरोबर पाश्चात्य संस्कृतीही नष्ट होईल. याला त्यांनी नाव दिले, 'Long march through the institutions.'
 
 
या संस्थांची त्यांनी दोन गटात विभागणी केली. पहिल्या गटात त्यांनी मानवी मनावर प्रभाव टाकणार्‍या शिक्षण, मीडिया, करमणूक या संस्थांना स्थान देऊन त्या ताब्यात घेण्याची योजना आखली. ती किती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली हे आपल्याला पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणेच भारतातही आढळते. दुसर्‍या गटात त्यांनी देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकणार्‍या संस्थांचा समावेश केला. त्यांनी ठरवले की मार्क्सवादी पक्ष म्हणून कोणी आपल्याकडे आकर्षित होणार नाही. म्हणून प्रत्येक देशातल्या किमान एका प्रमुख राजकीय पक्षावर आपले प्रभुत्व असले पाहिजे.
 
 
आज आपण बघतो की अमेरिकेतला डेमोक्रॅटिक पक्ष किंवा भारतातला काँग्रेस पक्ष हे जवळपास मार्क्सवादी पक्षाचीच भाषा बोलतात. या गटातल्या इतर संस्था म्हणजे नोकरशाही आणि कायदा क्षेत्र. आज UPSC परीक्षांचे प्रशिक्षण देणार्‍या लोकप्रिय प्रशिक्षकांचे व्हिडिओ युट्यूबवर पाहिले तर लक्षात येते की ते परीक्षार्थींच्या मनात मार्क्सवादी विचारांचीच पेरणी करत असतात. अशा प्रकारे, मार्क्सवादी सत्तेत नसले तरी देशाच्या विचारप्रवाहावर त्यांचेच आधिपत्य निर्माण होते आणि त्यांना हवी ती धोरणेच राबविली जातात. हे सगळे करून साध्य काय करायचे तर संस्कृतीला बळ देणार्‍या कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम यांचा विद्ध्वंस. यातही कुटुंबव्यवस्था संपविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. कारण कुटुंबात संस्कार घडतात, संस्कारातून संस्कृती टिकते आणि संस्कृतीमुळे राष्ट्राला बळ प्राप्त होते. या विचारधारेवर आधारित कार्यशैलीचा वापर करून त्यांनी आज पाश्चात्य सभ्यतेला विद्ध्वंसाच्या टोकावर आणून उभे केले आहे.
 
 
आणि यापुढचे लक्ष्य भारत हे आहे. किंबहुना सांस्कृतिक मार्क्सवादाचा हाच घातक विचार आणि संस्थांना आतून पोखरण्याची हीच कार्यशैली भारताविरुद्धही अत्यंत प्रभावीपणे वापरली जात आहे. भारतात ज्यांना ’अर्बन नक्षल्स’ म्हणून ओळखले जाते ते या सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा वोकिझमच्या विचारधारेचेच पाईक आहेत. जंगलातील नक्षलवादी हे बंदुकीच्या नळीतून येणार्‍या रक्तरंजित क्रांतीचे शिलेदार होते. त्यांची पिछेहाट झाली असली तरी शरण आलेल्या माओवाद्यांवरही नजर ठेवावी लागेल. आपण पाहिले त्यानुसार तीव्र नकारात्मक भावना मनात असलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत. प्रत्यक्ष वास्तव काहीही असले तरी आपल्या नकारात्मकतेला समर्थन देणारे नवे-नवे तर्क ते शोधत राहतात. सध्या ’स्लीपर सेल्स’ म्हणून ते शांत राहतील आणि योग्य संधी आल्यास पुन्हा उचल खातील ही शक्यता गृहीत धरूनच चालावे लागेल. आणि आपली सुरक्षादले हेच करतील. पण सध्यातरी हा ’माओवाद’ संपला आहे. त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणार्‍या ’अर्बन नक्षल्स’चा प्रभाव मात्र अजूनही तसाच आहे. तो आटोक्यात आणण्याची जबाबदारी सुरक्षा दलांची नाही तर समाजाची आहे. म्हणून त्यांनी नीट समजून घ्यायला हवे.
 
 शिक्षण, मीडिया, बॉलीवूड, साहित्य क्षेत्र, काँग्रेस पक्ष, नोकरशाही कायद्याचे क्षेत्र... यावर ताबा मिळवला आहे. मीडियामधून भारतविरोधी प्रचाराला कशी प्रसिद्धी दिली जाते, दहशतवाद्यांसाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे मध्यरात्रीदेखील कसे उघडले जातात, हिंसेचे थैमान घालणार्‍या नक्षलवाद्यांचे ’गांधियन्स विथ गन’ म्हणून कसे उदात्तीकरण केले गेले

communist party of india 
 
त्यांनी शिक्षण, मीडिया, बॉलीवूड, साहित्य क्षेत्र, काँग्रेस पक्ष, नोकरशाही कायद्याचे क्षेत्र... यावर ताबा मिळवला आहे. मीडियामधून भारतविरोधी प्रचाराला कशी प्रसिद्धी दिली जाते, दहशतवाद्यांसाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे मध्यरात्रीदेखील कसे उघडले जातात, हिंसेचे थैमान घालणार्‍या नक्षलवाद्यांचे ’गांधियन्स विथ गन’ म्हणून कसे उदात्तीकरण केले गेले अशी असंख्य उदाहरणे आपण पाहिली. या मागे हीच विचारधारा होती आणि ती संपलेली तर नाहीच पण अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांना हे कळून चुकले आहे की निवडणुकांच्या सनदशीर मार्गाने त्यांना सत्ता मिळणे शक्य नाही. यासाठी त्यांनी ’अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स’ ही संकल्पना निर्माण केली आहे.
 
 
यानुसार देशात संघर्ष, रक्तपात, अराजक, हिंसा भडकवण्याचे काम राजकीय पक्षांकडे नाही तर ’एनजीओज्,’ ’अ‍ॅक्टिव्हिस्ट्स’ या गटांकडे सोपविण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या असंवैधानिक ’नॅशनल अ‍ॅडव्हायजरी कौन्सिल’चे एक सदस्य हर्ष मंदेर यांनी सीएए आंदोलनाच्या वेळी जमावासमोर ’अब कोर्ट में नही रास्तों पर न्याय होगा’ असे चिथावणीखोर उद्गार काढले होते. हीच यांची अराजकतावादी मानसिकता आहे. वेगवेगळे विषय हाती घ्यायचे, समाजात ज्यांच्याविषयी सहज सहानुभूती निर्माण होईल अशा गटांना पुढे करायचे आणि त्यांच्या आडून अराजक माजविण्याचा प्रयत्न करायचा ही यांची कार्यपद्धती आहे. म्हणूनच शाहीन बाग आंदोलनाच्या वेळी वृद्ध स्त्रिया आणि लहान मुलांना तर किसान आंदोलनाच्या वेळी शेतकर्‍यांना दिल्लीच्या थंडीत रस्त्यावर बसविण्यात आले, तर नुकत्याच झालेल्या आंदोलनामध्ये गिग वर्कर्सना (स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटमध्ये वाटपाचे काम करणारे) हाताशी धरण्यात आले. या गटांच्या मनात नाराजी, राग, असूया आणि द्वेष या भावना भडकवायच्या आणि त्याद्वारे अराजक माजविण्याचा प्रयत्न करायचा ही मार्क्सवादी कार्यशैलीच यामागे आहे.
 
 2022 साली अमेरिकेत अनेक नामवंत विद्यापीठांचा सहभाग असलेली Dismantling Global Hindutva ही परिषद झाली
communist party of india
 
 

communist party of india 

वैचारिक विद्ध्वंसाचा उघड प्रयत्न : अझीम प्रेमजी विद्यापीठातील ’'Annihilate Hinduism'’ सारखे सेमिनार, जे भारतीय संस्कृतीच्या मुळांवर घाला घालण्याचे काम करत आहेत.
 
ज्या देशाचा विद्ध्वंस करायचा आहे त्याच्या प्रमुख सांस्कृतिक प्रवाहाला लक्ष्य करण्याची यांची पद्धत असते कारण त्या देशाला मार्क्सवादी विचारांच्या पंजाखाली आणण्यासाठी त्याची संस्कृती नष्ट करणे आवश्यक असते. त्यानुसार पाश्चात्य जगतात त्यांनी तेथील प्रमुख सांस्कृतिक प्रवाह असलेल्या ख्रिश्चॅनिटीला लक्ष्य केले. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतले 95 टक्के लोक कुठल्या ना कुठल्या चर्चचे सदस्य होते. आज ही संख्या 25 टक्क्यांच्या खाली गेली आहे. भारतात हेच हिंदू धर्माच्या बाबतीत घडविण्याची यांची योजना आहे. कारण भारताचा प्रमुख सांस्कृतिक प्रवाह हा हिंदू धर्मच आहे. म्हणूनच 2022 साली अमेरिकेत अनेक नामवंत विद्यापीठांचा सहभाग असलेली Dismantling Global Hindutva ही परिषद झाली, तर 2024मध्ये भारतातील अझीम प्रेमजी विद्यापीठात ’'Annihilate Hinduism’ (हिंदू धर्माचा समूळ उच्छेद करा) हा सेमिनार झाला.
 
 
तसेच द्रमुकचे उदयनिधी स्टॅलिन वारंवार म्हणतात, ‘सनातन धर्म मुळापासून संपवायला हवा.’ हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा, भक्ती याविषयी भ्रम निर्माण करणे, शंका आणि प्रश्न उभे करणे याद्वारे लोकांच्या मनात असणारी आपला धर्म आणि संस्कृती याविषयीची आस्था आणि आपुलकी नष्ट करण्याचा सतत प्रयत्न केला जातो. काही ना काही सबब काढून हिंदू सणांना बदनाम केले जाते. प्रभू श्रीरामाने सीतेचा त्याग केला. अशा पुरुषसत्तावादी श्रीरामाची पूजा का करायची? कालीमाता, श्रीराम हे परदेशातून आलेल्या आर्यांचे प्रतिनिधी आहेत, तर रावण आणि महिषासुर हे मूलनिवासी आहेत... अशी असत्य आणि कुठलाही आधार नसलेली विधाने करून हिंदू परंपरांविषयी मनात गोंधळ निर्माण केला जातो. ’दलित, आदिवासी, लिंगायत हे हिंदू नाहीतच’ असे म्हणून अधिकाधिक गटांना हिंदू धर्मापासून अलग करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय संस्कृतीतील नृत्य, संगीत, शिल्पकला या सगळ्या कलाप्रकारांना भक्तीचे आणि अध्यात्माचे अधिष्ठान आहे. ते नष्ट करून या कला ’सेक्युलर’ ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. योगाची लोकप्रियता थांबवता येत नाही म्हणून योग ही सेक्युलर पद्धत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही असा धादांत खोटा प्रचार केला जातो. भारतीयांना आपल्या संस्कृतीच्या मुळांपासून तोडून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदू धर्मावरील हे सर्वंकष आक्रमण हा सांस्कृतिक मार्क्सवादाचा प्रकल्प आहे, ज्यात त्यांनी इतर अनेक गटांना व भारतविरोधी शक्तींना हाताशी धरले आहे.
 
 
महत्त्वाची गोष्ट ही, की ते या कारवाया मार्क्सवादी म्हणून नव्हे तर समता, सामाजिक न्याय, स्त्रियांचे हक्क, पर्यावरणाचे संरक्षण, सर्वसमावेशकता अशा आकर्षक मुखवट्यांमागे करतात. कॉपारेट क्षेत्रातही त्यांनी ऊएख (DEI (Diversiry, Equity, Inclusion ) ) ऑडिटच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. नुकताच नाशिकला टीसीएसमध्ये झालेला प्रकार या Diversityच्या मुखवट्यामागेच झाला आहे. या आकर्षक चेहर्‍यांमागे लपलेले अराजकतावादी, विद्ध्वंसक चेहरे ओळखणे खूपच अवघड असते. म्हणूनच ’मार्क्सवाद संपला’ या भाबड्या समजुतीला थारा न देता आपल्या भोवती नेमके काय घडते आहे, याविषयी सजग राहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अभिजित जोग

हे नामवंत लेखक असून भारताच्या इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण याविषयीचे 'असत्यमेव जयते?' हे त्यांचे पुस्तक खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या इंग्रजी, हिंदी व गुजराती आवृत्त्याही उपलब्ध आहेत. डाव्या विचारसरणीविषयी त्यांनी लिहिलेल्या 'जगाला पोखरणारी डावी वाळवी' या विषयाला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी 'हेरिटेज फर्स्ट' या समाजमाध्यमांवरील पेजचे ते लेखन करतात. ते विख्यात ब्रँड कन्सल्टंट, जाहिराततज्ज्ञ व काॅपीरायटर असून त्यांचे 'ब्रँडनामा' हे ब्रँडिंगवरील मराठीतले पहिले पुस्तकही खूप वाचकप्रिय आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण, ब्रँडिंग व भूराजकीय डावपेच हे त्यांचे आवडते विषय आहेत. या विषयांवर ते विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच समाजमाध्यमांवर नियमित लेखन करतात, तसेच विविध व्यासपीठांवर व्याख्याने देतात.