रवी पंडित - कर्तृत्वसंपन्न, प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

विवेक मराठी    15-May-2026   
Total Views |
@विवेक गिरिधारी
पुण्यातील किर्तने आणि पंडित समूहाचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा विशेष श्रद्धांजली लेख.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश अशा ‘केपीआयटी’चे संस्थापक अध्यक्ष रवी पंडित यांनी स्वतःच्या उदाहरणातून मराठी तरुणांसमोर यशस्वी उद्योजकतेचा मानदंड नव्वदीच्या दशकात उभा केला. देशातील वाहन सॉफ्टवेअर क्षेत्राला आकार देण्यात त्यांचे मोलाचे पायाभूत योगदान होते. पुण्याला पर्यायाने भारतीय उद्योगाला जागतिक नकाशावर दखलपात्र स्थान प्राप्त करून देण्याची त्यांची कामगिरी अतुलनीय होती. पर्यावरणाप्रती कृतीशील आणि ग्रामीण व उपेक्षितांसाठी संवेदनशील हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनोखा पैलू होता.
 

kpt 
 
पुण्यात शिक्षण
 
रवी पंडित यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. असे असले तरी ते इस्लामपूर परिसरातून पुण्याला शिकायला आले व वयाच्या 40व्या वर्षी सनदी लेखापाल(सी.ए.)झाले. रवी पंडित यांचे शालेय शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमधून मराठी माध्यमातून झाले. शाळेतील जावडेकर नावाचे शिक्षक त्यांना शाळेबाहेर प्राणी, वनस्पती व पक्षी दाखवायला आवर्जून घेऊन जात असत. यातून त्यांना लागलेली निसर्गाची गोडी व पर्यावरण प्रेम आयुष्यभर पुरले. अकरावीला ते गुणवत्ता यादीत म्हणजे पहिल्या तिसात आले होते. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेत अवांतर मिळणार्‍या वेळाचे त्यांनी चीज केले. ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ पुस्तक वाचले व त्याने ते प्रभावित झाले. मार्क ट्वेन व बर्नाड रसेलही वाचले. रीडर्स डायजेस्टचे नियमित वाचन केले. याचा परिणाम इंग्रजी सुधारण्यासाठीही झाला. गांधीजींचे लेखन वाचले व त्यांच्या व्यक्तिमत्त्वानेही ते प्रभावित झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तेही 1973 मध्ये सनदी लेखापाल(सी.ए.) झाले, ते ही सुवर्णपदकासह हे विशेष!
 
 
त्या काळात त्यांच्यावर तत्कालीन ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा मोठा प्रभाव होता. शंतनुरावांसारखे त्यांनीही परदेशी शिकायचे ठरविले. म्हणून त्यांनी अमेरिकेतील एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे वर्षभराचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. घरातील पैशांच्या अडचणींमुळे दोन वर्षांच्या एमबीए अभ्यासक्रमाऐवजी एका वर्षांचा एम.एस.(व्यवस्थापन) कोर्स निवडला. तेथील शैक्षणिक कर्ज फिटण्यासाठी व अनुभव पदरात पडावा यासाठी त्यांनी एक वर्ष अमेरिकेत काम केले. या दरम्यान त्यांची संगणकाशी झालेली तोंडओळख पुढे खूपच उपयुक्त ठरली. वडिलांच्या सनदी लेखापाल सेवा कंपनीचा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून ते भारतात 1976 मध्ये परतले. त्या काळी इतक्या उच्चशिक्षित व्यक्तीने अमेरिकेत काम करण्याचा मोह टाळून भारतात परतणे ही काही साधी बाब नव्हे! पुढे वडिलांच्या 1956 मध्ये स्थापन झालेल्या कीर्तने-पंडित चार्टर्ड अकौटंट(केपीसीए) फर्मची जबाबदारी दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी सांभाळली. आज देशातील सात राज्यांत या फर्मची कार्यालये असून त्यात बाराशेहून अधिक सदस्य कार्यरत आहेत. जगभरातील 15 देशांमध्येही ते सेवा पुरवत आहेत. केपीसीएचे अध्यक्षपदही रवी पंडित यांनी भूषविले आहे.
 

kpt 
 
केपीआयटीची स्थापना
 
 
देशात माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात होत असताना त्यातील भविष्याच्या संधी हेरत त्यांनी आयुष्यातील चाळीशीत असताना 1990मध्ये सहकारी किशोर पाटील यांच्यासह ‘केपीआयटी’ची स्थापना केली. आज केपीआयटी ही जगभरातील वाहन सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून तिचे जगभरातील 15 देशांमध्ये अस्तित्व आहे. स्वयंचलित वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि स्वच्छ इंधने याबाबत केपीआयटीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेत आज अमेरिका, युरोप आणि आशियातील लाखो वाहने रस्त्यावर धावत आहेत. केपीआयटीची जगभरातील कर्मचारी सदस्य संख्या सुमारे 13हजार इतकी आहे. यातील 2हजार विशेषज्ञ आहेत. या तंत्रज्ञानावर आधारित कंपनीमध्ये एकूण सदस्यांपैकी 30% महिला सदस्य आहेत हे विशेष नमूद करण्यासारखे!
 
रवी पंडित सरांशी प्रथम परिचय
 
आदरणीय रवी पंडित सरांची पहिली भेट मला आठवते ती पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामधील...अंदाजे 15 ते 18 वर्षांपूर्वीची. म्हणजे 2012च्या सुमारासची. उन्हाळ्यातील मे महिन्यातील सायंकाळच्या वसंत व्याख्यानमालेत सरांचे व्याख्यान होते. ‘भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण’ की अनुषंगिक असा काहीतरी विषय होता. उद्योग क्षेत्रातील म्हणजे टाय कोट घातलेली, कार्पोरेट चेहर्‍याची, गंभीर प्रकृतीची कुणी व्यक्ती असेल असे क्षणभर वाटून गेले. पण प्रत्यक्षात मात्र व्यासपीठावर उभी होती ती हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेली फिकट निळ्या पूर्ण बाह्याचे शर्ट घातलेली प्रसन्न मूर्ती. अत्यंत मुद्देसूद असे 35-40 मिनिटांचे भाषण करून त्यांनी आपले भाषण आटोपल्याने संयोजक काहीसे गडबडले. किमान तासभर भाषण झाल्यावरही आता आवरते घ्या, असे अनेक वक्त्यांना सांगायची पाळी येते तिथे सरांचे भाषण जवळपास निम्म्या वेळेतच संपले होते. मग सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. समारोप झाल्यावर सरांभोवती श्रोत्यांचे कोंडाळे तयार झाले होते ते वेगळेच! उद्योग व आर्थिक या विषयावरच्या अगदी सामान्य व प्राथमिक प्रश्नांना पंडित सर सोप्या भाषेत समजावून सांगत उत्तरे देत होते. माझा प्रश्न थोडा वेगळा होता. ‘सर, तुम्ही सीए आहात, वाणिज्य शाखेत शिक्षण झालेले आहे असे असताना एकदम सॉफ्टवेअरकडे कसे वळलात आणि त्यात प्रावीण्य कसे मिळविले?’ सरांनी त्यांच्या नेहमीच्या हसर्‍या शैलीत सांगतले की,‘सॉफ्टवेअर ही आता नवीन जगाची, उद्योगाची भाषा आहे. त्यात मोठ्या जागतिक संधी आहेत म्हणून आपण वेळीच त्याकडे वळलो पाहिजे असे मला 1990च्या सुमारास वाटले. म्हणून मी त्याकडे वळलो.’ ज्या विषयात शिक्षण घेतले त्यातच आपण काम केले पाहिजे असे नाही तर ज्यात संधी आहेत तेही आपण केले पाहिजे. तीव्र इच्छा व तळमळ असली की आपण कोणताही विषय आणि कितीही खोलीपर्यंत शिकू शकतो. त्यात अवघड असे काही नाही. आपल्याकडे पद्धत नाही, सहसा घडत नाही म्हणून वेगळे वाटते एवढेच. अन्यथा अशी अनेक उदाहरणे आहेत.
 
 
केपीआयटी सीएसआरशी संबंध
 
 
रवी पंडित यांची दोन्ही मुले चिन्मय व प्राची ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिकली आहेत. त्यामुळे मुलांचे पालक म्हणूनही त्यांचा प्रबोधिनीशी संबंध आला. 2013-14पासून केपीआयटी सीएसआरमधील प्रमुख तुषार जुवेकर यांच्या माध्यमातून संबंध येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावरील कामाला त्यांची मोठी सातत्यपूर्ण मदत झाली व होत आहे. अगदी अलीकडे सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील प्रबोधिनीच्या ग्रामीण भागातील कामांना सुरुवात होत असताना झालेली मदत खूप मोलाची होती. ‘फक्त केपीआयटीच्या निधीवर अवलंबून राहू नका. विविध देणगीदारांचे पर्याय शोधा’, असे पंडित सरांचे सांगणे असे. उर्त्स्फूतपणे स्वेच्छेने केलेले काम (Volunteering) याला त्यांच्या लेखी खूप महत्त्व होते. असे स्वयंसेवक म्हणून विविध समाजोपयोगी कामात भाग घेतलेल्या केपीआयटीमधील आय टी अभियंत्यांना सर वर्षातून एकदा स्वतःच्या घरी स्नेहभोजनाला सन्मानाने बोलवत असत. ज्या संस्थांमध्ये या स्वयंसेवकांनी काम केले अशा स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही ते बोलवत. अशा दोन कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी आम्हां प्रबोधिनीतील ग्रामीण कार्यकर्त्यांना मिळाली. एका कार्यक्रमात सरांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या कामास कशी सुरुवात झाली ते सांगितले. ‘कंपनी मोठी करत नेणे, मोठा नफा मिळवत रहाणे, विस्तारत राहणे हे स्वाभाविक आहे. हे क्षितिज सतत विस्तारणारे आहे. पण फक्त यात गुंतून पडता कामा नये. असे झाल्यास त्यास अंत नाही. ते जिवंतपणाचे लक्षण नाही. समाजाची सेवा, आर्थिक मदत, तज्ञसेवा या माध्यमातून परतफेड केली पाहिजे. समाजाची आजची स्थिती आहे त्यापेक्षा तो समाज अधिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी आपण सक्रियपणे योगदान दिले पाहिजे, असे मला उद्योगातील एका जाणत्या गुरुतुल्य जुन्या वयस्कर अधिकारी व्यक्तीने सांगितले. तेव्हापासून केपीआयटी म्हणून आम्ही याकडे गांभीर्याने वळलो!’
 

kpt 
 
सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेषपण
 
ज्ञान प्रबोधिनीचे रवी पंडित हे कार्याध्यक्ष असल्याने औपचारिक सभांना वर्षातून किमान दोन वेळा तरी ते उपस्थित राहत असत. त्यावेळी जुजबी भेट होत असे. त्यांचे प्रबोधिनीच्या कोणत्याही उपक्रमात तोटा होत नाही ना याकडे बारकाईने लक्ष असे. बजेट व आर्थिक लेखापरीक्षण याबाबतच्या सादरीकरणाची घडी विशेष लक्ष घालून त्यांनी बसवून दिली आहे. सरांचे अपारंपरिक ऊर्जेबाबतचे प्रयोग अनेकांना ज्ञात आहेत. त्यात सौर विषयातील काही प्रयोगांबाबत ग्रामीण भागात ते कितपत शक्य होतील याबाबत त्यांना अंदाज घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी 4/5 जणांना चर्चेसाठी बोलवले होते. त्यात मला बोलावल्याने मी प्रथमच केपीआयटी कंपनीमध्ये गेलो होतो. वैयक्तिक भेटीचाही हा पहिलाच प्रसंग !
 
 
रवी पंडित यांना जवळून बघायची संधी मिळत होती पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचे पैलू मात्र अज्ञात होते. अशा वेळेस मुळशी तालुक्यातील केपीआयटीने अर्थसहाय्य केलेल्या एका विहिरीच्या उद्घाटनास केपीआयटीमधील एक वरिष्ठ पण मध्यमवयीन अधिकारी आले होते. ते केपीआयटीमध्ये किमान 15 वर्षे काम करीत होते. त्यांना मी सरांच्या व्यक्तिमत्त्व व केपीआयटीच्या यशाचे रहस्य विचारले. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांनी सांगितले, ‘सरांची काम करण्याची क्षमता अफाट आहे. ते वेळ पडल्यास सलग 14 ते 16 तास वयाच्या सत्तरीतही काम करू शकतात हे आम्ही अनुभवले आहे. अनेकदा अमेरिकेतून आल्यावर ते ‘जेट लॅग’ वगैरे कारणे न देता कंपनीतील महत्त्वाच्या मिटींगला येत असत. ती झाल्यावर मगच प्रवासाची विश्रांती घ्यायला जात हे आम्ही पाहिले आहे. कोणत्याही विषयाचे अत्यंत सखोल अध्ययन हे सरांचे विशेष वेगळेपण! दिल्लीला संसदेत स्मार्ट इलेक्ट्रिक बसचे प्रात्यक्षिक डिसेंबर 2015 मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर रवी पंडितांनी हायड्रोजन इंधन घटावर(सेल)आधारित बस बनविण्याचे उद्दिष्ट केपीआयटी टीमपुढे ठेवले आणि सर स्वतःही त्यात विलक्षण झपाटून काम करू लागले. हायड्रोजन सेलवरील त्यांचे अध्ययन अत्यंत सखोल होते. सरांना हे अध्ययन चालू असताना येणार्‍या शंकांचे निरसन करण्यासाठी ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) मधील पीएचडीधारक संशोधकांना भेटत असत. त्यासाठी अनेक वेळा शनिवारची सकाळ त्यांनी या चर्चेसाठी राखून ठेवलेली असे. पीएचडीधारक अनुभवी संशोधकांसोबतच त्यांची फक्त चर्चा होऊ शके यावरून त्यांच्या स्वयंअध्ययनाची खोली लक्षात येईल. या त्यांच्या सखोल परिश्रमांचे फळ म्हणून ही बस तयार झाली व त्याचे उद्घाटन ऑगस्ट 2022मध्ये केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात झाले. भारत सरकारच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’चे ते एकमेव अशासकीय सन्माननीय सदस्य बनले.
 
 
केपीआयटीच्या यशाचे रहस्य सांगताना त्या अधिकार्‍याने सांगितले की,‘2018मध्ये केपीआयटीने धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे कंपनी विभाजनाचा. पूर्वीचे सर्वसाधारण आयटी सॉफ्टवेअरमधील सर्व काम हे ‘बिर्लासॉफ्ट’ या नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले. व्यावहारिक भाषेत आयटी सॉफ्टवेअरचा 65 टक्के व्यवसाय त्यांना विकला. हे मोठेच धाडस होते! कारण बहुतेक प्रथितयश कंपन्या करत होत्या त्याप्रमाणे केपीआयटीही आयटी सॉफ्टवेअर सेवा पुरविण्याचे काम करत होती. परंतु ‘ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर’ या नूतन तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर आघाडी घेण्यासाठी, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केपीआयटीने हा निर्णय घेतला. ज्ञानोद्योगावरील आपली मांड पक्की ठेवण्याची त्यांची ही दिशा होती. ‘लीपफ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकाचे रवी पंडित हे नुसते सहलेखक नव्हते तर ती त्यांच्या विचारांची आयुष्यभराची दिशा होती. या पुस्तकाचे लेखन त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासोबत केलेले आहे.
 
 
प्रबोधिनीच्या ग्रामीण कार्यास भेट
 
 
केपीआयटी सीएसआरमधून बांधलेल्या पाणीसाठवण टाकी व नळपाणी योजनेचे उद्घाटन करण्यासाठी भोर तालुक्यातील कांबरे बुद्रुक गावात 2019 मध्ये रवी पंडित स्वतः आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी निर्मलाताई याही सोबत होत्या. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर व भोजनानंतरही रवीसर व निर्मलाताई गावात निवांतपणे बराच वेळ ग्रामस्थांशी गप्पा मारत थांबलेही होते. या त्यांच्या भेटीतील साधेपणा व सहजपणा हा ग्रामस्थांसह आम्हा सर्वानांच भावणारा होता. फोर्ब्जच्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत नाव मिळविणारी मराठी व्यक्ती अशी ओळख असणार्‍यांची ही ‘वेगळी ओळख’ लोभस व अस्सल भारतीयत्वाची नाळ जपणारी होती!
 
 
मध्य भारतातील चार राज्यातील ग्रामीण भागात काम करणार्‍या आगाखान रुरल सपोर्ट प्रोग्राम या मोठ्या संस्थेच्या संचालक मंडळातही त्यांचा समवेश होता. एकीकडे शहरातील कचरा आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवर काम करणार्‍या ‘जनवाणी’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता तर दुसरीकडे ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’या प्रतिष्ठीत संस्थेचे ते सहसंस्थापक व मार्गदर्शक होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. सदैव हसतमुख असणार्‍या या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने काहीसा अचानक आपला जीवनप्रवास दुर्मीळ आजारामुळे वयाच्या 76व्या वर्षी 8 मे 2026 रोजी आटोपता घेतला. आपल्या कर्तृत्वसंपन्न आयुष्याचा वारसा व आदर्श ते मागे ठेवून गेले. KPITच्या जगभरातील 13 हजार कर्मचारी सदस्यांबरोबरच उद्योजक बनू पाहणार्‍या प्रत्येकासाठीच त्यांचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे व राहणार आहे !