हिंदू धर्मरक्षक - महाप्रतापी मल्हारराव होळकर

विवेक मराठी    16-May-2026
Total Views |
malhar rao holkar information in marathi
@श्रीराम मोतीराम पुंडे
9822041746
मल्हारराव होळकर महान राजनीतिज्ञ होते. त्यांची स्वामीनिष्ठा, संघटन कौशल्य, युद्धनीती, विश्वासार्हता, समयसूचकता अद्वितीय अशीच होती. जगाच्या इतिहासात त्याला तोड नाही. कुटुंब वत्सलता, कुलदैवतेवरील अपार श्रद्धा हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील विशेषत्व होते. असे हे पराक्रमी योद्ध्ये मल्हारराव 20 मे 1766 रोजी भारतमातेच्या चरणी लीन झाले. त्यांची यंदा 260वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करणारा लेख...
holkar
महाप्रतापी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे असे महान व्यक्तिमत्त्व होऊन गेले की ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. महापराक्रमी मल्हाररावांचे जीवन खडतर गेले. तरी स्वराज्याकरिता धर्माकरिता, अन्याय व अत्याचाराच्या विरोधात ते जीवनभर कधी स्वकीयांशी तर कधी परकीयांशी लढत राहिले. नैतिकता, स्वामीनिष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मल्हारराव होळकर होय.
 
 
जेजुरीजवळील होळ या गावी मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. वडील खंडोजी वीरकर यांचा ते लहान असतानाच मृत्यू झाला. कुणीही आधार नसल्यामुळे आई लहानग्या मल्हारला आपल्या भावाकडे खानदेशातील तळोदा येथे भोजराज बारगळ यांच्याकडे घेऊन गेली. त्यांचे मामा हे सरदार कदमबांडे यांच्या सैन्यात एका तुकडीचे शिलेदार होते. त्यामुळे मल्हारराव मोठे झाल्यानंतर आपल्या जागेवर त्यांनी मल्हाररावांची वर्णी लावली. त्यांच्या कामगिरीमुळे तळोदा परिसरामध्ये मल्हाररावांची कीर्ती पसरू लागली होती. वयाच्या 17व्या वर्षीच त्यांना पाचशे घोडेस्वारांचे प्रमुख बनवून मनसबदार केले. काही दिवसानंतर त्यांना बारा महालाची जहागीरदारीही मिळाली. त्यामुळे मोगलांना त्या परिसरामध्ये आपले हात पसरविता आले नाहीत. वयाच्या पंचविसाव्या वर्षी बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि खानदेशातील चौथाईचा अधिकार मल्हारराव होळकर यांना दिला. तरुण मल्हाररावांनी संधीचे सोने करावे हा मंत्र आपले मामा भोजराज बारगळ यांचेकडून घेतला होता.
 
 
पुस्तक खरेदी करा....
तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान
लेखक – मिलिंद पराडकर
‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
https://www.vivekprakashan.in/books/the-marathas-of-thanjavur/
 
धैर्य, कर्तबगारी, न्यायनीती, व्यवहार कुशलता, धर्मप्रेम, पेशव्यांवरील निष्ठा, प्रामाणिकता आदी गुणांमुळे मल्हारराव बृहन् महाराष्ट्राचे पहिले सुभेदार झाले. त्यांची स्वामिनिष्ठा पाहूनच छत्रपती शाहूराजे यांनी त्यांना महेश्वर दिले व त्या भागातील चौथाई कर व दहावा हिस्सासुद्धा मिळाला. मल्हारराव यांनी दूरदृष्टी व राजनीतीच्या बळावर आपला चांगला जम बसविला होता. परिसरातील राज्यांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जात होत. इसवी सन 1633मध्ये उधाजी पवार हे जयसिंग यांना मिळाल्याचे समजताच मल्हारराव यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. चिमाजी आप्पा यांच्या विरोधी डाव त्यांनी हाणून पाडले. त्या काळामध्ये मोगलांच्या विरोधात सर्व मराठे मल्हारराव यांच्यासोबत लढले होते आणि त्यामुळेच जयसिंग यांना तह करण्यास भाग पाडले. त्यात 28 परगणे व सहा लक्ष रुपये मल्हारराव होळकर यांना मिळाले.
 
 
जयपूरचे राजे जयसिंग यांचे पुत्र ईश्वरसिंग व माधवसिंग ह्या दोन्ही भावांमध्ये वेळोवेळी होणारी भांडणे हे हिंदू धर्माकरिता योग्य नाहीत म्हणून मल्हारराव यांनी मध्यस्थी करून त्यांना योग्य सल्ला दिला. दोघांमध्ये समन्वय घडवून आणला. परिणामतः जयपूरमधील कलह थांबला. त्याचा योग्य तो परिणाम जनतेवरसुद्धा झाला. दोन्ही भावांमध्ये शांतता राहावी म्हणून मल्हारराव हे पेशव्यांचे खास प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते व त्याच्या बदल्यात त्यांना दहा लाख रुपये भेट म्हणून मिळाले होते.
 
 
मल्हाररावांचा मोठेपणा, दूरदृष्टी आणि धर्माबद्दल असलेले त्यांचे प्रेम हे राजपूत लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नव्हता. त्यामुळेच ते मल्हारवांना मोठ्या सन्मानाची वागणूक देत होते. मल्हाररावांनी त्या काळामध्ये अनेक भागांवर विजय मिळविले होते. त्याचा परिणाम म्हणून पेशव्यांनी आपल्या खास दूताकरवी त्यांना एक पत्र पाठविले होते. ज्यामध्ये,’तुमचे साहस अजोड आणि अत्युच्च कोटीचे आहे. शौर्य तर अभिमानास्पदच आहे. तुम्ही हिंदू साम्राज्याचे आधारस्तंभ आहात. तुमची कीर्ती इराण व तुराण प्रदेशापलीकडे पोहोचली आहे. हिंदूधर्म आणि राज्याचे अनभिषिक्त सम्राट म्हणून दिगंतरी आपली कीर्ती पोहोचली आहे. त्याबद्दल सर्व मराठ्यांना आपला सार्थ अभिमान आहे,’ असा गुणगौरव केला होता.
 
 
अवध प्रांतातील व अलाहाबाद प्रांतातील पठाणांनी हिंदूंचा छळ सुरू केला होता. अनेक स्त्रियांना गुलाम बनविले होते. मल्हाररावांना हे समजतात आपला मोर्चा त्यांनी तिकडे वळविला व आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी पठाणाचा बीमोड केला. कित्येकांना त्यांनी तलवारीने कापून काढले तर कित्येकांना जाळून टाकले. कित्येक भीतीने गर्भगळीत झाले. अलाहाबाद व अवध प्रांतातील स्त्रियांची सुटका केली, त्यांना अभय दिले. मोगल बादशहा यांनी मल्हारराव यांचे कौतुक केले. पठाणाला अशा प्रकारे धडा शिकवल्यामुळे बादशहाने आपल्या मालकीचा माळवा प्रांतातील चांदवड परगणा खाजगी भेट म्हणून मल्हाररावांना दिला हे विशेष.
 
 
पुस्तक खरेदी करा....
तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान
लेखक – मिलिंद पराडकर
‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
https://www.vivekprakashan.in/books/the-marathas-of-thanjavur/
 
मल्हारराव होळकर यांनी त्याकाळी मुघलांच्या ताब्यातील मंदिरे मुक्त व्हावी याकरता खूप प्रयत्न केले. विशेषत: सफदर जंग याच्या ताब्यातील अयोध्या, काशी प्रयाग ही तीर्थक्षेत्रे हिंदूंच्या ताब्यात असावीत अशी त्यांची प्रबळ इच्छा होती, म्हणूनच मल्हारराव स्वतः अयोध्या येथे गेले. तेथील श्रीराम जन्मभूमीची अवस्था त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली. स्थानिक मठाधीशांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासमोर श्रीराम जन्मभूमी मुक्त व्हावी तसेच काशी विश्वनाथाचे मंदिर नवीन बांधावे याकरताही त्यांनी प्रयत्न केला, चर्चा केली. परंतु त्यांना त्याकाळी स्थानिक लोकांनीच मदत केली नाही. पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः काशीमध्ये जाऊन विश्वनाथाचे नवीन मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही ते मंदिर आपणास पहावयास मिळते.
 
 
मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमाचे पोवाडे संपूर्ण देशभर गायले जाऊ लागले होते देशाच्या दक्षिणेत असो वा उत्तरेत मल्हाररावांचा दरारा होता. शत्रू तर ‘आया मल्हार, आया मल्हार’ असे स्वप्नामध्ये बडबडत होते. अटकेपार भगवा झेंडा रोवण्यामध्ये मल्हारराव हेच अग्रेसर होते. पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिव भाऊ आणि विश्वासराव भाऊ पेशवे यांनी जर मल्हाररावांचा सल्ला ऐकला असता तर पानिपतची स्थिती फार वेगळी असती. शेवटी मल्हारराव होळकर यांच्यावर स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी दिली होती. ती त्यांनी पूर्ण केली आणि सर्व स्त्रियांना पुण्यामध्ये सुखरूप आणून पोहचविले होते. पानिपतच्या युद्धामध्ये पराभव झाल्यानंतरही मल्हारराव होळकर हे उत्तर भारतात ताठ मानेने फिरत होते. खालून आग, वरती आग चहू बाजूूंनी आग अशा बिकट परिस्थितीमध्येही मराठी सत्तेचा राजदंड मल्हारराव सांभाळला. पानिपतमध्ये खच्चीकरण झालेल्या मराठ्यांचा दरारा पुन्हा समर्थपणे दिल्लीपर्यंत पोहोचविला.
 
 
गोपिकाबाई पेशवे व अन्य पेशव्यांच्या घरातील भांडणे मल्हारराव यांच्यामुळेच मिटली. कुणाचेही न ऐकणारे पेशवे मल्हारराव यांचा शब्द मात्र खाली जाऊ देत नसत हे विशेष. ते महान राजनीतिज्ञ होते. त्यांची स्वामीनिष्ठा, संघटन कौशल्य, युद्धनीती, विश्वासार्हता, समयसूचकता अद्वितीय अशीच होती. जगाच्या इतिहासात त्याला तोड नाही. कुटुंब वत्सलता, कुलदैवतेवरील अपार श्रद्धा हे देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील विशेषत्व होते. 1715 ते 1765 या पन्नास वर्षांत मल्हारराव होळकर यांची तलवार ही तळपतच होती. आपल्या तलवारीने त्यांनी मोठमोठ्यांना पाणी पाजले. भारतमातेची त्यांनी जी जन्मभर सेवा केली त्यास तोड नाही. त्यांनी आपली इहलोकीची यात्रा 20 मे 1766 रोजी पूर्ण केली. अशा या महान योद्ध्याची यंदा 260वी पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.