आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तणाव आणि वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर, भारताचे बाह्य अर्थकारण संकटात आहे का, याचा केवळ राजकीय नव्हे तर शुद्ध आर्थिक चष्म्यातून घेतलेला हा एक अत्यंत अभ्यासपूर्ण वेध. पंतप्रधानांच्या 'सात आवाहनां’मागे लपलेला गंभीर संदेश आणि देशासाठी गरजेची असणारी वैयक्तिक आर्थिक शिस्त समजून घेण्यासाठी हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.
अर्थव्यवस्थेत काही धक्के बसताना मोठा आवाज होतो. शेअर बाजार कोसळतो, रुपया घसरतो, महागाई वाढते किंवा एखादा आकडा अचानक चर्चेत येतो, तेव्हा तो धक्का आपल्याला लगेच दिसतो आणि त्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होतो. पण काही धक्के शांतपणे आपल्या घरात बातमी म्हणून नव्हे, तर सवय म्हणून प्रवेश करतात.
आपण रोजचे निर्णय ज्या पद्धतीने घेतो, खर्चाला प्राधान्य कसे देतो, सोयीला किती महत्त्व देतो, स्थानिक आणि परकीय पर्यायांमध्ये काय निवडतो आणि संकटाच्या काळातही आपली जीवनशैली बदलण्यास तयार असतो की नाही या सगळ्या गोष्टी प्रथमदर्शनी वैयक्तिक वाटतात. पण अर्थशास्त्रात वैयक्तिक निर्णय कधीच पूर्णपणे वैयक्तिक राहत नाहीत. एक व्यक्ती काय खरेदी करते, कुठे प्रवास करते, किती ऊर्जा वापरते किंवा आपले उत्पन्न कोणत्या प्रकारच्या मालमत्तेत रूपांतरित करते, याचा राष्ट्रीय अर्थकारणावर स्वतंत्र परिणाम दिसणार नाही. पण कोट्यवधी नागरिकांनी एकाच दिशेने निर्णय घेतले, की त्या निर्णयांचे रूपांतर मागणीत होते; मागणीचे रूपांतर आयातीत होते; आयातीचे रूपांतर डॉलरच्या मागणीत होते आणि डॉलरच्या मागणीचे रूपांतर चालू खाते, रुपया, महागाई, व्याजदर आणि सरकारच्या वित्तीय अवकाशामध्ये दिसू लागते.
याच दृष्टीने पंतप्रधानांनी केलेली सात आवाहने वाचली पाहिजेत. हा लेख त्या आवाहनांकडे राजकीय प्रतिक्रिया म्हणून पाहत नाही. ती Modinomicsची हार आहे का, की राष्ट्रभक्तीची भाषा आहे, हा वाद बाजूला ठेवून या प्रश्नाकडे आपण आर्थिक चष्म्यातून पाहूया. कारण या आवाहनांच्या मागे नागरिकांच्या जीवनशैलीचा नव्हे, तर भारताच्या बाह्य अर्थकारणाचा, ऊर्जा परावलंबनाचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
हा लेख लिहीत असताना (15 मे 2026 रोजी) इंधनाच्या किमतीत सरासरी तीन रुपये प्रति लीटर वाढ झालेली आहे आणि हजारो किलोमीटर दूर असलेले युद्ध; जे आतापर्यंत दारावर टकटक करत उभे होते, आता घरात प्रवेश करते झाले आहे.
मोठी अर्थव्यवस्था, पण बाह्य मर्यादांपासून मुक्त नाही
भारताची अर्थव्यवस्था आज नाजूक आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. भारत हा आता लहान किंवा बाह्य धक्क्यांनी लगेच अस्थिर होणारा देश नाही. IMFच्या April 2026 World Economic Outlook नुसार भारताचे current-price GDP सुमारे 4.15 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके आहे. म्हणजे भारत ही जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. सेवा क्षेत्र मजबूत आहे, देशांतर्गत बाजार प्रचंड आहे आणि वाढीचा वेग इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत लक्षणीय आहे.
भारताची एक मोठी ताकद म्हणजे देशांतर्गत मागणी. 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात देशांतर्गत मागणीचा वाटा 61.5 टक्के आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत त्यात 7 टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजे भारताची वाढ केवळ निर्यातीवर उभी नाही; ती भारतीय कुटुंबांच्या, मध्यमवर्गाच्या, ग्रामीण मागणीच्या आणि देशांतर्गत खर्चाच्या आधारावरही उभी आहे. भारतीय रिजर्व बँकेच्या आकडेवारीनुसार 1 मे 2026 रोजी भारताचा परकीय चलन साठा सुमारे 690.69 अब्ज डॉलर्स होता.
म्हणून पंतप्रधानांच्या आवाहनांकडे अर्थव्यवस्था कोसळत आहे अशी कबुली म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. पण मोठी अर्थव्यवस्था असली म्हणजे ती बाह्य धक्क्यांपासून सुरक्षित झाली, असेही नाही. साठा हा विम्यासारखा असतो; तो उत्पन्नाचा कायम स्रोत नसतो. मोठे घर असले, उत्पन्न चांगले असले, बचतही असली, तरी रोज लागणारा गॅस, इंधन, काही अन्न घटक आणि जीवनावश्यक वस्तू बाहेरून घ्याव्या लागत असतील, तर बाहेरच्या किमतींचा परिणाम घरावर होतोच. भारताचा प्रश्न यापेक्षा वेगळा नाही. अर्थव्यवस्था मोठी आहे; पण ऊर्जा, कच्चे तेल, खाद्यतेल, खते, सोने आणि काही प्रमाणातील उपभोग यासाठी परकीय स्रोतांवर अवलंबित्व मोठे आहे ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही.
होर्मुझ - समुद्री मार्ग दूरचा, पण समस्या मात्र जवळची
होर्मुझची सामुद्रधुनी अनेकांसाठी नकाशावरील एक समुद्री मार्ग असेल; पण ऊर्जा अर्थशास्त्रात ती जागतिक तेल पुरवठ्याची महत्त्वाची रक्तवाहिनी आहे. त्या भागात तणाव वाढला की जहाजे प्रत्यक्ष अडकतात की नाही, हा नंतरचा प्रश्न असतो. बाजार आधीच अस्वस्थ होतो. कच्चे तेल महागते, मालवाहतूक खर्च वाढतो, विमा वाढतो, डॉलरची मागणी वाढते आणि ऊर्जा-आयातदार देशांवर दबाव येतो. हा धक्का भारताच्या खिशात नक्की कुठे बसतो, हे समजून घेण्यासाठी एक मूलभूत संकल्पना लक्षात घ्यायला हवी.
भारताचा खरा प्रश्न-बाहेर जाणारे डॉलर
Current Account Deficit म्हणजेच चालू खात्यावरील तूट ही संज्ञा तांत्रिक वाटते, पण तिचा अर्थ साधा आहे. देशाने जगाकडून काय विकत घेतले आणि जगाला काय विकले, याचा हा हिशोब आहे. भारत तेल, सोने, खाद्यतेल, खते, इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान आणि अनेक वस्तू आयात करतो. त्यासाठी परकीय चलन द्यावे लागते. दुसरीकडे भारत सॉफ्टवेअर सेवा आणि वस्तूंची निर्यात, परदेशात राहणार्या भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे, पर्यटन आणि इतर मार्गांनी परकीय चलन कमावतो. बाहेर जाणारे परकीय चलन आणि आत येणारे परकीय चलन यांच्यातील तफावत म्हणजेच चालू खात्यावरील तूट. उदाहरणार्थ भारताने एखाद्या कालावधीमध्ये 100 अब्ज डॉलर्स कमावले आणि 105 अब्ज डॉलर्स भारतातून बाहेर गेले तर या पाच अब्ज डॉलर्सच्या तफावतीला अर्थशास्त्राच्या भाषेत चालू खात्यावरील तूट असे म्हटले जाते.
भारताच्या बाबतीत हा प्रश्न अधिक गंभीर आहे. PRSच्या Petroleum and Natural Gasवरील विश्लेषणानुसार भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के भागासाठी आयातीवर अवलंबून आहे. 2023मध्ये भारत चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार होता, असेही त्यात नमूद केले आहे. ICRAच्या अंदाजानुसार क्रूड ऑईलमध्ये प्रति बॅरल 10 डॉलर्सने वाढ झाली; तर भारताचा खनिज तेल आयात खर्च 13 ते 14 अब्ज डॉलर्सने वाढतो आणि चालू खाते तूट GDPच्या 0.3 टक्क्यांनी विस्तारते. 70 डॉलर्सवरून 126 डॉलर्सपर्यंतच्या वाढीचा एकत्रित परिणाम 70 ते 80 अब्ज डॉलर्स अतिरिक्त आयात खर्च इतका होऊ शकतो. शिवाय पश्चिम आशियातील तणावामुळे तिथल्या भारतीय कामगारांच्या रोजगारावर आणि पगारावर परिणाम होतो, आणि पर्यायाने भारतात येणार्या पाठवणीवर (remittances)जो परकीय चलन देशात येण्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. म्हणजे होर्मुझ संकटाने चालू खात्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी प्रहार केला आहे. बाहेर जाणारे परकीय चलन वाढले आणि आत येणारे अनिश्चित झाले.
सात आवाहनांचा एकच आर्थिक धागा
इंधन बचत, work from home, सार्वजनिक वाहतूक, सोने खरेदी टाळणे, परदेश प्रवास कमी करणे, स्वदेशी उत्पादने वापरणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे आणि नैसर्गिक शेतीकडे वळणे ही पंतप्रधानांनी केलेली आवाहने वेगवेगळी दिसत असली तरी या सर्वांचा आर्थिक धागा समान आहे - भारतातून परकीय चलन बाहेर जाण्याचा वेग कमी करणे, आयात केलेल्या वस्तूंच्या उपभोगाची दिशा बदलणे आणि ऊर्जा परावलंबनामुळे निर्माण होणारा तात्कालिक दबाव मर्यादित ठेवणे. 2026 या आर्थिक वर्षातील खनिज तेल आयात 174.9 अब्ज डॉलर्स, सोने 72 अब्ज डॉलर्स, खाद्यतेल 19.5 अब्ज डॉलर्स आणि खते 14.5 अब्ज डॉलर्स-हे चार घटक एकूण आयातीचा एक तृतीयांशहून अधिक भार वाहतात. सात आवाहनांची दिशा नेमकी याच श्रेणींकडे आहे.
ही आवाहने संपूर्ण समस्या सोडवत नाहीत. इंधन बचत केली म्हणून भारत लगेच ऊर्जा-स्वावलंबी होणार नाही. सोने खरेदी कमी केली म्हणून घरगुती बचतीचे स्वरूप एका रात्रीत बदलणार नाही. सार्वजनिक वाहतूक वापरा असे म्हटले म्हणून शहर रचना ताबडतोब सुधारणार नाही. पण संकटकाळात या सवयी अर्थव्यवस्थेला थोडा वेळ देऊ शकतात. यालाच वर्तनातून निर्माण होणारा तात्पुरता आधार म्हणता येईल. म्हणजे संरचनात्मक सुधारणेला पर्याय नव्हे, पण त्याचा परिणाम देईपर्यंतचा तात्पुरता आधार.
इंधन बचत-पेट्रोल पंपापासून व्याजदरापर्यंत
इंधन बचतीचे आवाहन सर्वात थेट आर्थिक आवाहन आहे. भारताची कच्च्या तेलाची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने पेट्रोल-डिझेलचा वापर हा केवळ वैयक्तिक प्रवासाचा प्रश्न राहत नाही. तो आयात खर्च, डॉलरची मागणी, चालू खाते तूट आणि रुपयावरील दबावाशी जोडला जातो. एका व्यक्तीने आठवड्यातून एकदा गाडी कमी वापरली, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत फरक पडणार नाही. पण कोट्यवधी लोकांचा इंधन वापर कमी झाला, तर एकत्रित परिणाम निर्माण होऊ शकतो.
इंधनाचा परिणाम फक्त पेट्रोल पंपावर थांबत नाही. इंधन महागले की वाहतूक खर्च वाढतो. शेतमाल, बांधकाम साहित्य, औद्योगिक कच्चा माल, उपभोग्य वस्तू, किराणा - जवळपास प्रत्येक पुरवठा साखळीत इंधनाचा काहीतरी हिस्सा असतो. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्यास अर्थव्यवस्थेत महागाई (cost-push inflation) निर्माण होते. महागाई वाढली की भारतीय रिजर्व बँकेला व्याजदर कमी करण्यासाठीचा वाव कमी होतो; काही परिस्थितीत दर वाढवावे लागतात. व्याजदर जास्त राहिले की गृहकर्ज, वाहनकर्ज, MSME कर्ज, उद्योगांचे खेळते भांडवल महाग होते. म्हणजे खनिज तेल-धक्क्याचा प्रवास असा होतो -
भारतामध्ये या प्रक्रियेला आणखी एक स्तर आहे. आपल्याकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती पूर्णपणे मुक्त बाजार दराप्रमाणे बदलत नाहीत. त्या किमती ठरवण्यात काही प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असतो. फेब्रुवारीमध्ये जेव्हा आखाती युद्धाला सुरुवात झाली आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकायला सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारने excise duty कमी करून भाववाढ आपल्या पोटात घेतली. कररचना आणि तेल कंपन्यांच्या ताळेबंदातून काही काळ धक्का शोषण्यात आला असला आणि पेट्रोल पंपावर दरवाढ दिसली नसली, तरीही सरकार आणि तेल कंपन्या नुकसान सोसतच होत्या; हा नुकसानाचा आकडा प्रतिदिन साधारण एक हजार कोटी रूपये इतका आहे. आखाती तणाव काही दिवसात नाहीसा होईल या अपेक्षेने सुरुवातीला दरवाढ नको अशीही भूमिका सरकारने घेतलेली असू शकते. परंतु आज लागू करण्यात आलेली दरवाढ बघता ही युद्धजन्य परिस्थिती आणखी लांबते आहे का अशा शंकेला वाव निर्माण होतो आणि मग इंधन दरवाढ अजून जास्त होईल का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून इंधन बचत हे फक्त वैयक्तिक बचतीचे आवाहन नाही. ते महागाई व्यवस्थापन, चलनविषयक धोरणातील लवचिकता आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीशी जोडलेले आहे.
सोने खरेदी टाळणे
परंपरा, गुंतवणूक आणि डॉलर यांच्यातील ताण
भारतीय कुटुंबासाठी सोने म्हणजे फक्त धातू नाही. ती संस्कृती आहे, परंपरा आहे, सामाजिक सुरक्षिततेची भावना आहे आणि अनेक घरांसाठी संकटातील सहज विकता येणारी मालमत्ता आहे. पण राष्ट्राच्या बाह्य खात्याच्या दृष्टीने सोने वेगवेगळ्या पद्धतीने दिसते. सोने मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. त्यासाठी डॉलर बाहेर जातात. आणि सोन्याच्या खरेदीतून देशाच्या उत्पादनक्षम क्षमतेत थेट वाढ होत नाही.
इथे एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्यावा लागेल. भारतात सोन्याची मागणी परंपरेने दागिन्यांवर आधारित मानली जात होती. पण अलीकडील आकडेवारी दाखवते की सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याचे प्रमाण वाढत आहे. World Gold Councilच्या 2026च्या पहिल्या तिमाहीच्या India Focus अहवालानुसार या कालावधीत भारताची एकूण सोन्याची मागणी 151 टन होती. त्यात दागिन्यांसाठीची मागणी 66 टन होती, तर गुंतवणुकीसाठी मागणी 82 टन होती. म्हणजे त्या तिमाहीत गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी दागिन्यांच्या मागणीपेक्षा जास्त झाली.
सोन्यासाठी गेलेला डॉलर मशिनरी आणत नाही, कारखाना उभा करत नाही, कल्पकता/कौशल्य वाढवत नाही, रोजगार निर्माण करत नाही आणि निर्यात क्षमता वाढवत नाही. तो घराच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये बंद होतो. घरासाठी सोने सुरक्षितता असू शकते; पण देशासाठी मोठ्या प्रमाणातील सोन्याची आयात चालू खात्यावर ताण असू शकते. म्हणून सोने खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन हे परकीय चलनाचे संरक्षण आणि सोन्याकडे जाणारी घरगुती बचत उत्पादनक्षम मालमत्तांकडे वळवणे या दोन्ही चौकटीत वाचले पाहिजे.
संरचनात्मक प्रश्नांना भावनिक आव्हान का?
भारताचे ऊर्जा परावलंबित्व ही काही आज उघडकीस आलेली गोष्ट नाही आणि ते कमी करण्याचे प्रयत्नही थांबलेले नाहीत. इथेनॉल मिश्रण वाढवणे, सौरऊर्जा क्षमता उभारणे, कच्च्या तेलाच्या स्रोतांचे विविधीकरण करणे, धोरणात्मक तेल साठे मजबूत करणे या आघाड्यांवर काम सुरू आहे आणि त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. पण ऊर्जा संक्रमण हे दशकांचे काम असते; होर्मुझ संकट मात्र आठवड्यात उभे राहिले. हा धक्का इतक्या लवकर येईल आणि इतका मोठा असेल, हे अपेक्षित नव्हते. आणि नेमक्या त्याच क्षणी आपली संरचनात्मक मर्यादा उघड झाली; जी ओळखीची होती, पण ज्याची तीव्रता अनपेक्षित होती.
येथे अर्थतज्ज्ञांचा एक आक्षेप दुर्लक्षित करता येत नाही. ऊर्जा परावलंबन, खाद्यतेल आयात, सोने खरेदीकडे असलेला कल, सार्वजनिक वाहतुकीची कमतरता, स्वदेशी उत्पादनांची गुणवत्ता आणि शेतीतील बाह्य घटकांवरील अवलंबित्व हे सर्व मुळात संरचनात्मक प्रश्न आहेत. ते केवळ आवाहनांनी सुटत नाहीत.
मग प्रश्न उरतो; संरचनात्मक प्रश्नांना भावनिक आवाहन का? याचे उत्तर timelineमध्ये आहे. संरचनात्मक सुधारणा वेळ घेतात; पण बाह्य धक्का तात्काळ बसतो. कच्चे तेल आज महागते पण ऊर्जा संक्रमण उद्या पूर्ण होत नाही. सार्वजनिक वाहतूक आज अपुरी असते; पण या रचना एका रात्रीत बदलत नाहीत. अशा काळात सरकार नागरिकांच्या वर्तनातून तात्पुरता आधार शोधते. त्यामुळे आवाहन हा अंतिम उपाय नाही; ते उपाय तयार होईपर्यंत अर्थव्यवस्थेला वेळ देण्याचा प्रयत्न आहे.
म्हणून या आवाहनांमागची भूमिका समजून घेताना त्यांच्या मर्यादा मान्य करणेही आवश्यक आहे. भावनिक आवाहन संरचनात्मक धोरणाची जागा घेऊ शकत नाही. पण ते त्या धोरणाला सामाजिक सहमती आणि वर्तनात्मक पाठबळ मात्र नक्की देऊ शकते. या दोन्हीची सांगड घातली, तर ते आर्थिक राष्ट्रहित ठरते; नाहीतर ते केवळ भाषणात अडकते.
Opportunity Cost - संकटाची अदृश्य किंमत
प्रत्येक बाह्य धक्क्याचा एक भाग दिसणार्या खर्चाचा असतो - कच्च्या तेलाची आयात वाढते, रुपया दबावात येतो, तेल कंपन्यांचे तोटे वाढतात, चालू खात्यावरील तूट वाढते. पण त्याहून महत्त्वाची असते अदृश्य किंमत म्हणजेच Opportunity Cost
जर सरकारची तिजोरी तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यात, महागाई रोखण्यात किंवा रुपया सावरण्यात खर्च झाली, तर तीच क्षमता पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण आधुनिकीकरण, अपारंपरिक ऊर्जा, संशोधन आणि विकास किंवा सार्वजनिक वाहतूक यांसाठी कमी पडू शकते. म्हणजे बाह्य धक्का केवळ आजचा खर्च वाढवत नाही; तो उद्याच्या विकासाची संधी कमी करतो.
हीच खरी सावध घंटा आहे. संकटाचे सर्वांत मोठे नुकसान अनेकदा बातम्यांच्या मथळ्यामध्ये दिसत नाही; तर ते वेळेत पूर्ण न होणार्या रस्त्यामध्ये, सुधारणा न होणार्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये, निधी कमी पडलेल्या संशोधन प्रकल्पामध्ये किंवा महाग कर्जामुळे शक्य न ठरणार्या उद्योगातील गुंतवणुकीमध्ये दिसते.
ही तात्पुरती तडजोड नाही
होर्मुझचे संकट एक आठवड्यात संपेल किंवा वर्षभर टिकेल - हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट सांगता येते: हे पहिले संकट नाही आणि शेवटचेही नसेल. जोपर्यंत भारताचे ऊर्जा अवलंबित्व कमी होत नाही, तोपर्यंत जगाचा प्रत्येक भू-राजकीय धक्का भारताच्या खिशात येणारच. म्हणून इंधनाचे काटेकोर व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि आयात केलेल्या वस्तूंच्या उपभोगाबद्दल आर्थिक भान-ही केवळ संकट काळातील काटकसर नाही; ती कायमस्वरूपी जीवनशैली असायला हवी. इंधनाचे व्यवस्थापन, बचतीची सवय आणि स्वदेशी उत्पादनांवरील विश्वास या गोष्टी आता भारतीयांनी एक नवीन आणि कायमस्वरूपी आर्थिक शिस्त म्हणून पाळणे गरजेचे आहे.
सावध घंटा, पराभवाची कबुली नव्हे
पंतप्रधानांची सात आवाहने आर्थिक पराभवाची कबुली नाहीत. पण ती भारताच्या विकासकथेतील बाह्य मर्यादेची जाणीव नक्की करून देतात. कुठलीही अर्थव्यवस्था मजबूत असली तरी ती बाह्य धक्क्यांपासून पूर्णपणे मुक्त नसते. मोठा परकीय चलन साठा असला तरी आयात अवलंबित्व दुर्लक्षित करता येत नाही. देशांतर्गत मागणी ही ताकद असली तरी त्या मागणीची दिशा महत्त्वाची असते. म्हणूनच हे Modinomicsचे अपयश नाही; हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा संरचनेचे वास्तव आहे.
या आवाहनांचा अर्थ असा अजिबात नाही की नागरिकांनी सर्व समस्या सोडवायच्या; तसे शक्यही नाही. ऊर्जा स्वायत्तता, अपारंपरिक ऊर्जेकडे संक्रमण, धोरणात्मक तेल साठे, सक्षम सार्वजनिक वाहतूक, स्पर्धात्मक देशांतर्गत उत्पादन क्षमता, तेलबिया उत्पादकता आणि घरगुती बचतीचे उत्पादनक्षम आर्थिक साधनांकडे वळणे अशा संरचनात्मक सुधारणा घडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. नागरिकांची जबाबदारी यापेक्षा वेगळी आहे - आयात केलेल्या वस्तूंचा अनावश्यक उपभोग किंवा इंधनाचा अतिरेकी वापर टाळणे, सोन्याकडे अंध गुंतवणूक म्हणून न पाहणे आणि परकीय खर्चाबद्दल आर्थिक भान ठेवणे.
संकटे येतील जातील, तेलाचे दर बदलतील, होर्मुझमधील तणावही कधीतरी कमी होईल. पण जर भारताने ऊर्जा परावलंबन, आयात अवलंबित्व आणि उपभोगाच्या दिशेचा मूलभूत प्रश्न सोडवला नाही, तर पुढचे संकट पुन्हा हेच प्रश्न उभे करेल. म्हणून ही सात आवाहने तात्पुरती काटकसर म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक शिस्त आणि आर्थिक सार्वभौमत्वाच्या दिशेने प्रवासाची सुरुवात म्हणून वाचली पाहिजेत. बाह्य अर्थकारण कधीच पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसते; पण आपल्या नागरिक-निर्णयांची शिस्त मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास हा देश आपला आहे. संकटाच्या काळात त्याला साथ देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. साथ देण्यासाठी सीमेवर जायची गरज नाही; ही साथ आपण पेट्रोल पंपावर, सोन्याच्या दुकानात आणि रोजच्या खर्चाच्या निर्णयातून देखील देऊ शकतो.
(References)
* IMF - World Economic Outlook, -pril 2026
* Economic Survey 2025-26, Ministry of Finance, Government of India (January 2026)
* Reserve Bank of India - Weekly Foreign Exchange Reserves Data (May 1, 2026)
* PRS Legislative Research - Petroleum and Natural Gas -nalysis (2026-27)
* ICR- Limited - Research note on India's C-D sensitivity to crude oil prices (June 2025)
* World Gold Council - India Gold Demand, Q1 2026 Focus Report
* Ministry of Petroleum and Natural Gas - Statements on OMC under-recoveries (May 2026)
* Ministry of Commerce and Industry - Foreign Trade Statistics FY26
* Reuters - Coverage of PM² Modi's seven appeals (May 10-13, 2026)