चीनमधला बांबू प्राथमिक प्रक्रिया उद्योग

विवेक मराठी    21-May-2026
Total Views |
@डॉ. हेमंत बेडेकर
9767200905

बांबू उद्योगाचा पाया मजबूत करायचा असेल, तर मुख्य कारखान्याआधी कच्च्या मालाच्या स्त्रोताजवळच ‘प्राथमिक प्रक्रिया केंद्र’ सक्षम असणे गरजेचे आहे; हे चीनने ओळखले. बांबूच्या शेंड्यापासून ते कंदापर्यंतच्या प्रत्येक भागाचा 100 टक्के वापर करून त्यांनी ग्रामीण रोजगार आणि पुरवठा साखळीचा समतोल कसा साधला? बांबू उद्योगातील चीनच्या कार्यक्षमता आणि शाश्वततेचा हा प्रेरणादायी प्रवास...

bamboo
यापूर्वीच्या लेखात आपण बांबूच्या औद्योगिक पुरवठा साखळीचे महत्त्व आणि ती सुरळीत राहण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या अखंडित पुरवठ्याकरिता चीनने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. यातील स्थानिक पातळीवर, म्हणजेच थेट बांबू उत्पादन क्षेत्राजवळच तो गोळा करून त्यावर प्राथमिक प्रक्रिया करणे आणि आवश्यक तो कच्चा माल मुख्य उद्योगाला पुरवणे हा कळीचा मुद्दा आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे हे चक्र सुरळीत राहिले, तर मुख्य बांबू उत्पादनाचा कारखाना आपोआपच अखंडित उत्पादन करू शकतो. तसेच या योग्य अशा कच्च्या मालाच्या निर्मिती प्रक्रियेतील उरलेला भुसा, तुकडे, पेरे इत्यादी पदार्थ जाळून विल्हेवाट लावण्याऐवजी त्याचा वापर करणार्‍या कारखान्यांना आवश्यकतेप्रमाणे पुरवणे हे एकत्रितरीत्या केल्यास उद्योग म्हणून परवडते आणि त्यामधून बांबूचा 100 टक्के वापर हे धोरण साध्य होते.
 
 
बांबू उद्योगाला उपयुक्त व सुयोग्य असा कच्चा माल तयार करून देणे आणि वाया जाणार्‍या बांबूच्या भागांचा अनुरूप अशा उद्योगासाठी पुरवठा करणे हे प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रियेमध्ये केले जाते. यालाच चीन ’िीश-िीेलशीीळपस’ (पूर्व प्रक्रिया) म्हणतो.
बांबू प्रक्रिया कशी घडते?
 
बांबूकडे आपण त्याच्या विविध भागांच्या उपयोगाच्या दृष्टीने पाहिले तर असे लक्षात येते की, जमिनीखालील खोडे, आपण वापरतो तो बांबू, त्याची पाने, फांद्या आणि नवीन येणारे कोंब या सर्वांचा उद्योगात वेगवेगळा वापर होतो.
 
 
प्राथमिक प्रक्रिया केंद्रांचे जाळे आणि कार्यपद्धती
 
साधारणपणे दर 35 ते 50 वर्ग किलोमीटर परिसरात खेडे स्तरावर(स्थानिक पातळीवर, म्हणजेच थेट बांबू उत्पादन क्षेत्राजवळच) असे प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारली जातात. बांबू लागवडीतील तयार बांबू तोडल्यानंतर 24 तासांच्या आत त्याची वाहतूक ट्रकने या प्राथमिक प्रक्रिया केंद्रावर केली जाते. त्याचे वजन करून तो बांबू या परिसरात उतरवला जातो. त्यानंतर एकेका बांबूच्या सर्व भागांचा अंदाज घेऊन तुकडे केले जातात. यामध्ये खालील दोन ते तीन वाकडी पेरे बाजूला काढली जातात. ती वेगळी साठवली जातात. त्याचवेळी उरलेल्या बांबूपैकी जमिनीलगतच्या खालील भागाची एकसारख्या जाडीची व सरळ पेरे निवडून मुख्य कारखान्याच्या गरजेप्रमाणे पाच ते सहा ़फुटांचे उभे तुकडे केले जातात. ‘मोसो’ बांबूच्या बाबतीत जमिनीलगत असलेल्या भागाचे बहुधा दोन ते तीन तुकडे होतात. ते एकेका हातगाडीवर लादून बांबू उभे तुकडे करणार्‍या मशीनकडे पाठवले जातात. मशीनमध्ये बांबू उभा कापून त्याचे दोन, चार आणि सहा फुटांचे तुकडे केले जातात. याच्या उभ्या जाड पट्ट्या तयार होतात.
 
 
त्यानंतर दुसर्‍या एका मशीनमधून त्याची दोन्ही बाजूंची पेरे साफ केली जातात. या सर्व जाडीच्या पट्ट्या एका मशीनमधून काढून त्याचे ठरावीक जाडीच्या व रुंदीच्या पट्ट्या केल्या जातात. जर पडद्यांसाठी कमी रुंदीच्या सळ्या करायच्या असतील तर योग्य मशीनमधून सळ्या केल्या जातात. अशा प्रकारे प्लायवूड, चटया किंवा पडद्यांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल तयार होतो.
रासायनिक प्रक्रियेचे गणित आणि पुरवठा साखळी
 
हा कच्चा माल पुढे हायड्रोजन पेरॉक्साइडच्या द्रावणात उकळला जातो आणि नंतर सूर्यप्रकाशामध्ये वाळवला जातो. दोन ते तीन दिवसांच्या वाळवणानंतर त्याची योग्य ती छाननी करून त्याचे ठरावीक वजनाचे गठ्ठे बांधले जातात. मुख्य कारखान्याच्या मागणीप्रमाणे हा कच्चा माल पुरवला जातो. मागणीप्रमाणे किती कच्च्या मालासाठी किती बांबू लागतो, याची नीट आकडेमोड केली जाते. त्याप्रमाणे बांबू त्या स्थानिक प्रक्रिया केंद्रावर आणला जातो. नियमित पुरवठ्यासाठी हे नियोजन असल्यामुळे वेळच्यावेळी हा योग्य असा प्राथमिक प्रक्रिया केलेला कच्चा माल पुरवठा साखळी सुरक्षित राहील, या हिशोबाने हे सर्व समन्वयाने आखले जाते.
 

bamboo 
आधी कापलेली जमिनीलगतची निघालेली वाकडी पेरे कापून त्यांच्यापासून समान लांबीच्या काड्यांची जोडी म्हणजेच चॉपस्टीक तयार करण्यासाठी ती कारखान्याला पुरविली जातात. त्यानंतर बांबूच्या वरच्या भागाचा वापर हा याच पद्धतीने वर्गवारी करून त्या त्या मागणीनुसार तयार करून मुख्य कारखान्याला पाठवला जातो. शेंड्याकडील निमुळता भाग हा भाजीपाला उत्पादकांना पुरवला जातो किंवा कोळसा तयार करण्यासाठी बारीक तुकडे करून पाठवला जातो. याचबरोबर प्रक्रियेदरम्यान शिल्लक राहणारा भुसा, साली, तुकडे, पाने व फांद्या यांची वर्गवारी करून ते विविध पूरक उद्योगांना आवश्यक त्या स्वरूपात पाठवले जातात. यात बांबूच्या भुशाचे प्रचंड उपयोग आहेत. या भुशाचा वापर पार्टिकल बोर्ड, इंधन पॅलेट्स, बायो-सीएनजी, अल्कोहोल निर्मिती आणि सक्रिय कोळसा अशा अनेक मौल्यवान पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो.
 
 
बांबूच्या कोंबांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशी गरज आहे, हे पाहून त्यावर प्रक्रिया होते. या कोंबांपासून सुकवलेले, खारवून जतन केलेले तसेच लोणच्यामध्ये रूपांतरित केलेले विविध खाद्यप्रकार तयार केले जातात; जे मागणीनुसार डबाबंद किंवा आकर्षक वेष्टनात बाजारात उपलब्ध असतात. डबाबंद कोंबाचा सर्वात मोठा ग्राहक हा जपान देश आहे. भारतासह इतर देशातही त्या त्या देशांच्या गरजेनुसार व प्रकारांनुसार प्रक्रिया केली जाते. हे कोंब वर्षभर उपलब्ध व्हावेत म्हणून चीनने योग्य असे तंत्रज्ञान शोधले आहे. यात बांबूचे कोंब व बांबू दोन्ही निर्माण केले जातात.
 
 
बांबूच्या वेगवेगळ्या भागांवर प्राथमिक प्रक्रिया करताना, त्याचा सुयोग्य कच्चा माल म्हणून कसा वापर करता येईल, याच्या विशिष्ट पद्धती शोधण्यात आल्या आहेत. कोणत्या कारखान्यासाठी कोणता सुयोग्य कच्चा माल हवा, हे खूप अचूकपणे ठरवून त्याची अखंडित पुरवठा साखळी तयार करण्याचे तंत्र चीनमधील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी विकसित केले आहे. उदाहरणादाखल, जर चटई तयार करण्याचा कारखाना असेल, तर त्यासाठी बांबूच्या योग्य भागाचा वापर करून योग्य लांबी, जाडी आणि रुंदीच्या पट्ट्या काढल्या तरच त्यापासून उत्तम आकाराच्या चटया तयार करता येतील. प्रक्रियेत शिल्लक राहणार्‍या पदार्थांचे प्रमाण नगण्य ठेवणे आणि त्याचेही इतर उद्योगांसाठीच्या कच्च्या मालात रूपांतर करणे, यामुळेच जवळपास बांबूचा 100 टक्के वापर करणे चीनला शक्य झाले आहे.
 
 
बांबूचा औद्योगिक वापर करताना पुन्हा एकदा पूर्ण बांबूकडे पाहावे लागेल. बांबूच्या प्रत्येक भागाचा औद्योगिकदृष्ट्या वेगवेगळा उपयोग होऊ शकतो. प्रत्येक भाग हा विविध वस्तूच्या उत्पादनासाठी कसा उपयोगी पडतो याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.


bamboo 
 
बांबू कोंबाचे मूल्यवर्धन
 
बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याचा कंद, विशिष्ट उंचीवरील पेरे आणि खोडाचे विविध भाग या सर्वांचा वापर विविध उत्पादनांसाठी स्वतंत्रपणे केला जातो. अगदी पाने, फांद्या, शेंडे या सगळ्यांचे वेगवेगळे उपयोग होतात. नवीन येणारे कोंब काही दिवसांतच वापरावे लागतात. बांबू तोडल्यानंतर जमिनीत असणारे त्याचे निर्जीव कंद प्रामुख्याने आकर्षक कलाकृती आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी, म्हणजेच हस्तकला उद्योगासाठी वापरले जातात
 
 
त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की, साधारणपणे पहिला बांबू तोडल्यानंतर हे कंद दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षी नवीन बांबू कोंबांना जन्म देत नाहीत. हे निर्मितीक्षमता संपलेले कंद जमिनीतच पडून राहिले, तर नव्याने येणार्‍या कोंबांना वाढण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि तिथे खूप दाटीवाटी होते. म्हणूनच जमिनीतील असे निरुपयोगी कंद विशिष्ट अवजारांच्या साहाय्याने बाहेर काढले जातात.
 
 
भारतात मात्र असे कंद जमिनीतून बाहेर काढले जात नाहीत; याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, भारतात बेटाने वाढणार्‍या बांबूच्या जाती जास्त आहेत, ज्यांचे नवीन कंद अगदी एकमेकांना लागून अत्यंत जवळ येतात. याउलट, चीनमध्ये एकपाद बांबूचे प्रमाण अधिक असल्याने, तिथले नवीन कोंब एका रेषेत आणि कमी दाटीवाटीने वाढतात. दुसरे कारण असे की, आपल्याकडील बांबूच्या कंदांचा आकार लहान असल्याने, त्यापासून हस्तकलेच्या वस्तू बनवण्याची पद्धत फारशी ऐकिवात नाही. याउलट, चीनमध्ये याच कंदांचा कल्पकतेने वापर करून अप्रतिम कलाकृती तयार केल्या जातात, ज्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाटा अत्यंत लक्षणीय आहे.
 
 
बांबू तोडल्यानंतर राहणार्‍या फांद्या आणि पाने हे सर्व भाग जैवभाराचे मोठे स्रोत आहेत. याचे वजनही भरपूर असते. त्याचा वापर विविध प्रकारची औषधी रसायने, झाडू अशा अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी उपयोगी पडतात.
 
 
पक्व बांबूचे वर्गीकरण आणि निर्जंतुकीकरण
 
बांबू निसर्गात ज्या अवस्थेत मिळतो, अगदी त्याच स्वरूपात त्याचा थेट औद्योगिक वापर करता येत नाही, हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. बांबूची शेतातून तोड करताना, तो पूर्णपणे वाढलेला आणि पक्व झालेला असणे आवश्यक असते. अशा पक्व बांबूचे नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, जमिनीत असणारी त्याची खालची एक-दोन पेरे थोडी वाकडी आणि जास्त जाडीची असतात. त्यानंतरची 10 ते 20 पेरे, त्या त्या बांबूच्या जातीनुसार साधारणपणे एकाच जाडीची आणि सरळ असतात. तर त्यापुढील शेंड्याकडची 10 ते 20 पेरे निमुळती होत जातात आणि त्यांची जाडी कमी-कमी होत जाते.
 
 
बांबूची तोडणी करताना फांद्या, पाने आणि शेंड्याकडील अगदी टोकाचा भाग यांच्या वापराचाही विचार करावा लागतो. या सर्व भागांचे वजन आणि त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन, संबंधित उद्योगाच्या गरजेनुसार त्यावर प्रक्रिया करावी लागते. उदाहरणार्थ, कापणीनंतर खालची एक-दोन वाकडी पेरे बाजूला काढावी लागतात; तर त्यापुढील 10 ते 20 सारख्या जाडीची व पक्वतेची पेरे सर्वात जास्त उपयोगी ठरत असल्याने, त्यांचे पाच ते सहा फुटांचे तुकडे करणे सोयीचे होते.
 
 
बांबूचे तुकडे करून त्याचे विविध भागांत वर्गीकरण केल्यानंतर, या प्राथमिक प्रक्रियेत पुढील ’हायड्रोजन पॅरॉक्साईड’ प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते; कारण यामुळे बांबूवर पुढील प्रक्रिया करताना रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका खूप कमी होतो. संपूर्ण बांबूवर एकदम प्रक्रिया करण्यापेक्षा, आधी गरजेनुसार त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात रूपांतर केल्यामुळे हे निर्जंतुकीकरण अगदी खोलवर आणि प्रभावीपणे होते.
 
 
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणि उद्योगाला स्थैर्य
 
या संपूर्ण नियोजनातून अनेक गोष्टी साध्य करता येतात. पहिली गोष्ट म्हणजे, पूर्ण बांबूची वाहतूक ही प्राथमिक प्रक्रिया कारखान्याच्या 50 चौरस किलोमीटर परिसरापुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे मुख्य कारखान्यासाठी आवश्यक तेवढाच कच्चा माल पुढे पाठवला जातो आणि अनावश्यक वाहतुकीचा मोठा खर्च वाचतो. टाकाऊ किंवा वाया जाणारे पदार्थ प्राथमिक केंद्रावरच राहत असल्याने, मुख्य कारखान्यावरील त्यांची वाहतूक आणि विल्हेवाटीचा ताण कमी होऊन अंतिम उत्पादन खर्च आटोक्यात येतो. परिणामी, मुख्य कारखान्याची उत्पादन क्षमता पूर्ण क्षमतेने वापरली जाते आणि कच्च्या मालासाठी लागणार्‍या बांबूच्या उपलब्धतेवर योग्य नियंत्रण ठेवणे सोपे होते.
 
 
ही प्राथमिक प्रक्रिया ग्रामीण किंवा खेडे स्तरावर होत असल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात. तसेच, आपल्या बांबूला निश्चित हक्काची बाजारपेठ मिळणार असल्याची खात्री मिळाल्यामुळे शेतकरीही अधिक आत्मविश्वासाने आणि नेटाने बांबू शेतीकडे वळतात. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी तर मिळतेच, शिवाय देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही मोलाची भर पडते.
 
 
या सर्व बाबींचा पुरवठा साखळीवर परिणाम होऊन ती प्रचंड सुधारते. नियमित व वर्षभर कच्चा माल उपलब्ध झाल्यामुळे नियमित उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो. याचे अनेक फायदे होतात. एक म्हणजे 30 ते 50 टक्केऐवजी 100 टक्के बांबू उपयोगात येतो. दुसरे म्हणजे ज्या उद्योगाला ज्या प्रकारचा, ज्या प्रतीचा कच्चा माल हवा आहे, प्रमाणे तो तयार करून घेता येतो. याचा परिणाम उत्पादनाच्या प्रतीवर आपोआपच होतो. तिसरा महत्त्वाचा फायदा असा की विविध बांबू उद्योगाला आपल्याला योग्य कच्चा माल मिळण्याची हमी मिळते. साहजिकच उत्पादन प्रक्रिया वर्षभर चालू ठेवता येते. तसेच वाया जाणार्‍या पदार्थांची विल्हेवाट लावण्याची काळजी मिटते. चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे मुख्य उद्योगासाठी लागणार्‍या कच्च्या मालाबरोबरच वेस्ट मटेरियल किंवा वाया जाणारे पदार्थ जे इतर उद्योगाचे कच्चा माल या स्वरूपात आवश्यक असतात ते एकाच ठिकाणी अपेक्षित वजनामध्ये किंवा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे त्या उद्योगांसाठीसुद्धा कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा होतो. पाचवा महत्त्वाचा भाग म्हणजे प्राथमिक प्रक्रिया केंद्र मुख्य उद्योगांची पुरवठा साखळी जोपासणारी केंद्रे बनतात. यामुळे स्पर्धेपेक्षा एकमेकांना पूरक असे वातावरण निर्माण होते. या सर्व प्राथमिक प्रक्रियेत साधारणपणे पाच ते सहा टक्के वजन हे पाण्याचे बाष्प व हवेत उडणारे सुके कण या स्वरूपात वजनात घट होते. हे सव प्राथमिक प्रक्रियेवेळी होते.
 
 
एक पूर्ण वाढीचा बांबू जर आपण घेतला तर त्यापासून विविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा 25 ते 30 टक्के तयार होतो. भुसा आणि इतर साली वगैरे 50 टक्के असतात. शेंडे 12 ते15 टक्के असतात. सर्वात खालचे वाकडी पेरे आठ टक्के असतात. याचा अर्थ असा की मुख्य उत्पादनाबरोबर भुसा, साली हा अनेक इतर उत्पादनांचा व्यवसायही चांगला करता येतो. चीन दरवर्षी बांबूपासून चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी उत्पादनाच्या विक्रीतून चांगले परकीय चलन मिळवतो. एवढेच काय, पण युरोप आणि अमेरिकेतील लोकांना हिवाळ्यात घरे उबदार ठेवण्यासाठी लागणार्‍या बांबूच्या पर्यावरणपूरक इंधन कांड्या (पेलेट्स) पुरवून, उत्तम परकीय चलन मिळवतो.
 
 
हे सर्व सुमारे 40 वर्षांपूर्वी शोधलेले बांबू प्राथमिक प्रक्रिया तंत्रज्ञान हे आजही प्रभावीपणे उपयोगात आणले जाते. चीनने हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी आणि प्लास्टिकच्या अतिवापरापासून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षात बांबूचा कुशलतेने वापर करून मार्ग काढण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याबद्दल पुढील लेखात पाहूया.
 
- संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.
venu.vedh25@gmail.com