@ सुधाकर पोटे
पुण्यातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि ‘गो विज्ञान संशोधन संस्थे’चे कार्यवाह बापूराव कुलकर्णी यांचे 11 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या प्रेरक स्मृतींना आणि अलौकिक संघजीवनाला वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली.
सोमवार, दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 11.00 वाजता मोबाईलची रिंग वाजली. पलीकडून योगेश सांगू लागला,“सुधाकर काका, बापू काका आत्ताच गेला.“
बापू काका म्हणजे, पुण्यातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि ’गो विज्ञान संशोधन संस्था, पुणे’चे कार्यवाह सुधाकर मार्तंड कुलकर्णी! सर्वांचे ‘बापूराव कुलकर्णी‘. वय वर्षे 87. सर्वांसाठी ते बापूराव असले तरी माझ्यासाठी मात्र बापू. इतका आमचा जिव्हळ्याचा संबंध. त्याच्या जाण्याने धक्का बसला नसला तरी, मन-हृदय सैरभैर झालं! आई-वडीलांनंतर पुन्हा एकदा आपण अगदी निराधार, पोरके झाल्याची जाणीव झाली.
65 वर्षे सतत बापूच्या सान्निध्यात, सहवासात वावरलो! सावलीसारखा बरोबर असे! आज माझा प्रकाश गेला उरली मागे ती छाया’ हृदय विदीर्ण करणारी.
माझ्या व्यक्तिगत जीवनावर प्रभाव टाकणारे चार बापू. एक माझे आजोबा-बापू, दुसरे बापू म्हणजे ज्येष्ठ संपादक चं.प. भिशीकर, तिसरे बापू-बापूराव लेले, चौथे बापू अर्थातच बापूराव कुलकर्णी. बापूच्या सहवासात माझी साडेसहा दशके गेली. आज मी जो काही आहे ते सारे श्रेय त्याचे आहे.
त्याचे आणि माझे नातेसंबंध काहीच नाही. संघ स्वयंसेवकत्व हा आमच्यातला समान धागा. तथापि, संघ आणि संघ परिवारात मला त्यांचा धाकटा भाऊ समजतात. स्व. तात्याराव बापट आमच्या नात्याची भलावण ’एक प्राण, दो कडी’ करीत! अशा बापूरावांचे नसणे माझ्यासाठी किती क्लेशकारक आहे, हे शब्दात सांगणे कठीण आहे. मला दु:ख व्यक्त करण्याचीही बापूरावांनी मनाई करून ठेवली आहे. बापूराव यांचे ज्येष्ठ बंधू चिमा तथा अण्णा यांच्या निधनासमयी हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघे त्यांच्याजवळच होतो. खोली बाहेर आल्यावर बापू मला म्हणाला, ”सुधाकर!
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः।
नित्यं संनिहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः॥
जोवरी दृढ शरीर। संघमार्गे रहाटावे”
सख्खा भाऊ निवर्तल्यावर संयमाने ’संघ स्वयंसेवकाला’ शोक करावयाला वेळच नाही,’ असे सांगणार्या बापूचा माझ्यावरचा प्रभाव केवळ अलौकिक आहे. बापूचीच आज्ञा शिरसावंद्य मानून, त्याच्या नसण्यामुळे जाणवणारी विषण्णता दूर करण्याचा मार्ग म्हणजे त्याच्या सहवासातील स्मृतींचे स्मरण करणे. त्यानेच मन शांत होईल.
गेल्या 65 वर्षांतील असंख्य व्यक्तिगत वा संघकामातील प्रसंग, आठवणी मनात रुंजी घालताहेत. मनात आले की, बापूचे सारे जीवन म्हणजे संघजीवन गाथा! त्यांचेच स्मृतिकण वेचावेत! संघकामाचा आधार म्हणजे संघाची शाखा! राजाराम शाखेचा (पुणे) मुख्य शिक्षक म्हणून बापूला जवळून अनुभवले! बापूसाठी शाखा म्हणजे केवळ व्यक्ती निर्माण करणारे केंद्र नव्हते, तर शाखा म्हणजे ‘समाजाचे सृजन करणारे केंद्र आहे,‘ अशी त्याची पक्की धारणा होती. हे कार्य समृद्ध, प्रभावशाली करावयाचे तर शाखेत येणार्या प्रत्येक स्वयंसेवकाशी निखळ प्रेमाचे नाते निर्माण करावे लागते. सतत विविधांगी उपक्रमातून स्वयंसेवकांच्या हृदयात स्थान निर्माण करावे लागते. इतकेच नाही, तर स्वयंसेवकाच्या घरातसुद्धा आपलेपणाचा दृढ भाव निर्माण करावा लागतो. या खटपटीतूनच नेतृत्व करणारे स्वयंसेवक उभे राहतात. बापूरावांनी हयातभर हेच काम केले. उदाहरणार्थ, आज बापूराव यांच्या सहवासात तयार झालेले अनेक जण प्रांत स्तरावर कार्यरत आहेत हे आपण पाहतोय.
बापू आम्हास कृतीत घडवित असत. शाखेतून असा स्वयंसेवक घडवायचा की, जो स्वयंप्रेरणेने आपल्या जीवनात आवश्यक ते परिवर्तन घडवून समाजात नेतृत्वासाठी उभा राहतो. स्वयंसेकांशी व्यक्तिगत संपर्क, गृहसंपर्क, कार्यकर्त्यांशी आपुलकीने बोलणे, त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्या सोडविणे, संघ कार्यकर्ता ’संस्थात्मक’ न होता तो ’संघटनात्मक’ व्हावा, कार्यकर्ता, निर्मितीसाठी हृदयस्पर्शी व्हावे लागते. कार्यकर्त्यांच्या घरी बसणे, त्यांच्या घरातलेच सदस्य आहोत असे वाटणे ही खरी कार्यपद्धती आहे, असे ते मानत आणि त्याप्रमाणेच त्यांचे वर्तन असे. या बहुपेडी गुणवैशिष्ट्यामुळे त्यांचे सर्वदूर ’हृदयबंध’ होते आणि म्हणूनच आम्हाला आज पित्याचे निधन झाल्याचे दु:ख आहे.
बापूराव यांचा लोकसंग्रह व संपर्क अफाट होता. स्व. मोरोपंत पिंगळे यांच्या सूचनेवरून पुण्यात देशी गो वंश संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ’गो विज्ञान संशोधन संस्थे’ची स्थापना 2002 साली करण्यात आली. बापूराव संस्थापक कार्यवाह आणि राजेंद्र लुंकड हे अध्यक्ष. गेल्या 25 वर्षांत अतिशय परिश्रम करून ’गो विज्ञान सशोधन संस्थे’ला समाजात अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिलेले आहे. संस्थेचे अन्य विविध उपक्रम सातत्याने चालत असतात. या सर्व वाटचालीत बापूराव यांचा सिंहाचा वाटा आहे!
बापूराव पुण्याच्या पूर्व भागात संघ काम करीत. हा भाग संघबंदीपूर्वी संघ शाखांनी आणि नामांकित संघ कार्यकर्ते यांनी समृद्ध होता! कालौघात हे सर्व कार्यकर्ते विविध भागात विखुरले गेले. मात्र, स्व. अरविंदराव मराठे आणि. स्व. मधुकरराव रिसवडकर यांनी सूचना केली की, जुन्या सर्व कार्यकर्त्यांची यादी करू. यातून पू. श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षापासून आनंद मेळाव्याला प्रारंभ झाला. हा उपक्रम घडवून आणण्यामागे बापूराव यांची प्रचंड धडपड मी पाहिली आहे. दहा वर्षे हा आनंददायी उपक्रम चालला. या माध्यमातून सुमारे 30 लाखांचे आर्थिक साहाय्य संघ संचालित संस्थांना उपलब्ध करून दिले.
बापूराव यांचा आणखी एक मोलाचा सहभाग संघाचे वैचारिक अधिष्ठान प्रसारित करण्यात होता. साप्ताहिक/ ग्रंथ प्रकाशने, ‘सा. विवेक‘, संघ शताब्दी निमित्त विवेक प्रकाशित ग्रंथ, ‘एकता‘ मासिक आणि ‘सांस्कृतिक वार्तापत्र‘ (पाक्षिक) या सर्व प्रकाशनांचे वर्गणीदार असोत वा ग्रंथ नोंदणी; यासाठी आपल्या अफाट लोकसंपर्काचा उपयोग करून दिला. ‘सा. विवेक‘चे पुण्यातील वर्गणी विभाग प्रमुख धनाजी जाधव भावूक होऊन मला सांगत होते, “बापूंचे खुब्याचे ऑपरेशन झाल्यानंतर वॉकर धरून अनेक व्यक्तींना आम्ही भेटलोे. ‘सा. विवेक‘ची वर्गणीदार व ग्रंथ नोंदणी केली. ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर‘ ग्रंथाची 176 नोंदणी केली, तर ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार‘ या विशेषांकाची 2500 नोंदणी, ‘राष्ट्रोत्थान‘ ग्रंथाची 100 प्रतींची नोंदणी, आणि ‘संघ शताब्दी‘ ग्रंथाची 200 प्रतींची नोंदणी बापूरावांनी केली. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे शिवसृष्टीवर आधारित ‘सा. विवेक‘ने केलेल्या ‘शिवऋषी आणि शिवसृष्टी‘ अंकाचे 25 प्रकाशन कार्यक्रम बापूंच्या मदतीने केले. ‘सा.विवेक‘च्या गेली पाच वर्षे विविध अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बापूंनी स्वतः कष्ट घेऊन अंक नोंदणींसाठी प्रयत्न करत असत. ‘सा.विवेक‘चे ते प्रतिनिधी या भूमिकेतून न राहता पालक या नात्याने काम करत होते. त्यांच्या इच्छाशक्तीला आणि संघशरण वृत्तीला शतशः नमन!”
केशवमात्रा घेतलेल्या व्यक्तीच्या गृहिणीच्या वाट्याला सुखावह प्रपंच येतोच असे नाही. तिला अनेकदा तडजोड करावी लागते; मात्र बापूराव यांना अपर्णा वहिनी, मुलगा सुधांशु आणि सून अनुजा यांची मनस्वी साथ लाभली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांची प्रकृती सारखी बिघडत असे. वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत असे, ही सर्व परिस्थिती वहिनींनी पत्नी म्हणून धीराने सांंभाळली, त्याबद्दल त्या माऊलीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
बापूराव यांचे सर्व जीवनच म्हणजे ’संघगाथा’ आहे! पार्थिव शरीर नाहिसे झाले असले तरी शब्द मात्र अमर आहेत. मी त्यांना अभिवचन देतो की,‘माझ्या अंतरातील तेवत असलेला संघदीप मालवणार नाही, कधीच मालवणार नाही....’