...चांदणे तुझ्या स्मरणाचे

विवेक मराठी    21-May-2026
Total Views |
@ डॉ. अद्वैत पाध्ये
9373722000
 
Dr. Anand Nadkarni
मानसोपचार क्षेत्राला समाजाभिमुख करणारे द्रष्टे नेतृत्व डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 15 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि मनआरोग्य चळवळीतील भगीरथ कार्याचा आलेख मांडणारी ही स्मरणगाथा... त्यांच्याच एका मानसोपचारतज्ज्ञ शिष्याने वाहिलेली ही कृतज्ञतापूर्वक आदरांजली.
शुक्रवार, दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी व्हॉट्सअ‍ॅप उघडले आणि डॉ. ओंकार जोशीचा मॅसेज वाचून धक्का, दु:ख, बेचैनी अशा सर्व भावना एकदमच दाटून आल्या...सर्जरीनंतर सर बरे होत आहेत, हे त्यांनीच आम्हाला पाठवलेल्या रूममधल्या फोटोतून कळले होते. त्यामुळे आता लवकरच सर्व सुरळीत होईल, अशी धारणा झाली असताना नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते... अजून सर्वांना हवे असताना मन आरोग्यामधील अनेक कार्यक्रम त्यांची वाट पाहात असताना सरांची - डॉ. आनंद नाडकर्णी सर यांची झालेली अचानक एक्झिट खूपच हूरहूर लावून गेली, जी अजून संपतच नाही आहे.
 
 
मला आठवते आहे...सरांची नि माझी पहिली प्रत्यक्ष भेट ’केईएम हॉस्पिटल’मध्ये. मनोविकारशास्त्रात एम.डी. करत असताना आमच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सरांना (जे केईएमचेच माजी विद्यार्थी आहेत), आम्हा सर्व निवासी डॉक्टरांशी भेटायला बोलावले होते. तेव्हा त्यांनी अर्थातच ‘आयपीएच’ सुरू करून सहा-सात वर्षे झाली होती. सरांनी आम्हाला त्यांची ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ या टॅगलाईनसह सुरू केलेल्या या संस्थेच्या कार्याची, त्यांच्या इतर कामाचीही माहिती दिली होती. अर्थातच मी त्याने खूप प्रभावित झालो. सरांना तसाही आधीपासून ‘वाचत’ होतोच. ‘गद्धेपंचविशी’ या ‘महानगर’मधल्या लेखनातून! त्याचा प्रभाव होताच; पण या सत्रानंतर तर आपणही यांच्यासारखेच करायला हवे हे जाणवले. त्यामुळे सत्रानंतर सरांना भेटलो तेव्हा म्हणाले, “एम.डी. झालास की नक्की भेट.” खूप प्रेमाने, आपुलकीने बोलत होते. ओळख नसतानाही!
 
 
एमडीनंतर सरांच्या ‘मानस क्लिनिक’मध्ये जायला लागलो. ‘आयपीएच’मधले (तेव्हा आपटे रुग्णालयात होते, ‘आयपीएच’!) वर्कशॉप्समध्येही सहभागी झालो. सरांच्या बाजूला बसून फक्त निरिक्षणातून किती शिकायला मिळाले. समर्थांनी जसे ‘शिवरायांचे कैसे बोलणे...’ असे लिहिले आहे; तसेच सरांचे रुग्णांशी संवाद साधणे, औषध योजना, नातेवाइकांशी साधत असलेला संवाद ...सगळे काही ‘सुंदर अनुभूती’ देणारे होते. या सगळ्या निरीक्षणातून शिकायला मिळालेच, पण त्याचबरोबर हे सर्व करत असताना ‘आयपीएच’च्या विविध कार्यक्रमांची आखणी, नियोजन ते कागदावर करत असायचे. त्यांचे ते ‘मल्टी टास्किंग’ सगळेच शिकण्यासारखे होते. त्यांच्याबरोबर केलेला ‘मुक्तांगणाचा’ दौरा. डॉ. अनिल अवचट यांच्या घरी त्या दोघांची रंगलेली मैफील अनुभवायला मिळाली. सरांचे ‘बहुआयामी’ व्यक्तिमत्त्व, असे समोर येतच गेले.
 
 
नंतरही स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केल्यावर मिळत राहिलेले (अगदी आतापर्यंत) मार्गदर्शन, आश्वासक शब्दांसह, सहवास मिळत राहिला. ‘डोंबिवलीतही कार्यकर्त्यांची कमी नाही. तेव्हा तूपण तिकडे स्वमदत गट व इतर मनआरोग्यविषयक कार्य करू शकशील’ या दिलेल्या विश्वासामुळे माझा ‘मानस’ ते ‘मनोदय’ हा प्रवास झाला. जो अजून चालूच आहे. ‘मनोदय‘ व ‘मानस‘च्या वर्धापनदिनानिमित्त सरांच्याच ‘जन्मरहस्य’ नाटकावर ते, कुमार सोहनी सर, इला भाटे, अमिता खोपकर या कलाकारांसह झालेला कार्यक्रम अविस्मरणीय होता. माझ्या या मनोदय कामात पुस्तक लेखनाला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. माझ्या ‘तितिक्षा’ पुस्तकाचे कोवीडकाळत त्यांच्याच हस्ते प्रकाशनही झाले आहे. तेव्हाच त्यांनी सांगितले होते, ’आतापर्यंतची पुस्तके हे लेखांचे (वृत्तपत्र, मासिकात मी लिहिलेल्या) संग्रह आहेत; आता तू एखाद्या विषयावर अभ्यास करून पुढचे पुस्तक लिही.’ त्याप्रमाणे नुकतेच मनाच्या श्लोकांवर अभ्यास करून लिहिलेले माझे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. यामागे सरांचेच आशीर्वाद आहेत.
 
 
असेच अनुभव सरांच्या इतरही अनेक ‘शिष्यांना’ नक्कीच आले असणार. नुसतेच शिकणारे नाही तर आपल्या कृती, बोलण्यातून शिकणारे ‘गुरू’ होते ते, आमच्या कुटुंबियांबरोबरही ‘जिव्हाळ्या’चे नाते होते सरांचे! माझा मुलगा लहान असताना सर, पत्नी डॉ. सवितासह घरी आले होते. जेवायला. तेव्हा माझ्या मुलाबरोबर पण छान ‘त्या हृदयीचा’ संवाद साधला होता त्यांनी!
 
 
मनआरोग्याच्या या ‘हेटाळणी लाभलेल्या’ वा ‘दुर्लक्षित’ क्षेत्राला समाजाभिमुख करण्याचे, ‘वेड्यांच्या डॉक्टरला शहाण्यांचा सायकीयाट्रीस्ट’ करण्याचे मूलभूत व पराकोटीचे महत्त्वाचे कार्य सरांनी ‘आयपीएच’ संस्थेमार्फत केले आहे. ‘कर्ता शेतकरी’ तसेच ‘सर्च’ बरोबरच्या प्रकल्पातून तर हा प्रवास शहरी मध्यमवर्गाबरोबरच ग्रामीण शेतकरी आदीवासींपर्यंत पोहोचला. ‘वेध’मधून विद्यार्थ्यांना ते ‘सप्तसोपान’मधून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मनआरोग्याच्या चळवळीच्या प्रवाहात आणणारे ते खर्‍या अर्थाने ‘भगीरथ’ म्हणायला हवेत. आपल्या अंगी असणार्‍या अनेकविध कलांचा त्यांनी ही मनआरोग्याची चळवळ सर्वतोपरी करण्यासाठी उपयोग केला. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होत असताना सरांनी अचानक एक्झिट घेतली. पण सरांच्या एका ‘डॉक्टर’च्या अंत्यदर्शनाला अभिजनांपासून, सामान्यजनांपर्यंत सर्वांनी केलेली गर्दी हे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचेच द्योतक म्हणायला हवे. रुग्णांपासून, नातेवाइकांपर्यंत, समाजातील सर्वांपर्यंत त्यांची ही तळमळ, त्यांची आस्थेने पाठीवर हात ठेवण्याची वृत्ती, त्यांची सहज संवाद साधण्याच्या कलेतून झालेली ‘जोडणी’ याचेच ते द्योतक होते.
 
 
त्यांचे ‘वैद्यकसत्ता’पासून ‘उब व उमेद’पर्यंतचे सर्व लेखन, गौतमबुद्ध, विनोबा, गांधी, टिळक, विवेकानंद, शिवाजी महाराज, वेदांत, संतसाहित्य आदी विविध व्यक्तिमत्त्वे व विषयांचा त्यांचा व्यासंगी अभ्यास व त्या सर्वांची मनोविज्ञानाशी सांगड घालणारी मांडणी सर्व थक्क करणारे आहे. ‘सरस्वती’चा त्यांच्या वाणीवर वरदहस्तच होता! रुग्णांसाठी ‘शुभार्थी’ व नातेवाइकांसाठी ‘शुभंकर’ या निर्मिलेल्या संज्ञा, विविध त्यांच्या कार्यक्रमांचे केलेले नामकरण ‘द्विज पुरस्कार’, ‘बहुरंगी बहर’ वगैरे वैशिष्ट्यपूर्ण नावांची यादी हीच ‘शब्दांवरची’ समर्थ पकड दाखवते. ‘वेध’च्या अनेक सूत्रगीतांना त्यांनीच दिलेले संगीत, तबलावादन, रेखाचित्रे, असंख्य कविता हे सगळे पाहिले की ‘पुलं’चा वारसाच आनंद नाडकर्णी सर समर्थपणे चालवत होते, असे म्हणता येईल.
 
काळाबरोबर व काळाच्याही पुढे चालणारे, विचार करणारे होते सर. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत मदत करणारी ‘मैत्र हेल्पलाईन’ अनेक खेळाडूंचे मनोबळ वाढवण्यासाठी असलेला ‘मिशन एक्सलन्स’ प्रकल्प, अनेकविध विषयांवरचे पॉडकास्टस व त्यासाठीचे ‘आवाहन’, युट्यूब चॅनेल, विद्यार्थ्यांपासून सर्वांच्या मनाचा वेध घेणारा ‘वेध’ परिवार व आता काळानुरूप सुरू केलेला ‘डिजिटल वेध’ हीं सर्व एका द्रष्ट्या नेतृत्वाची लक्षणे होती.
 
 
आयुष्यातील बाक्या प्रसंगानंतर शिकलेली ‘विवेकनिष्ठ’ उपचारपद्धती तर त्यांच्या ‘मनआरोग्य चळवळीचा’ गाभाच बनली. REBTचा पुरस्कार, प्रचार व प्रसार आपल्या लेखनातून, कार्यशाळांतून, व्याख्यानांतून करणारे, ती लोकप्रिय करणारे, ते खर्‍या अर्थाने ‘विवेकनिष्ठ’ होते. कर्करोगाचे निदान झाल्यावर ‘आपल्या हातात काय’ याचा विचार करून त्याप्रमाणे सर्व नियोजन त्यांनी केले होते. सर्जरीच्या एक आठवडा आधीपर्यंत पॉडकास्ट शुटिंग, वेदांत व्याख्यान यात ते कार्यरत होते.
 
 
किती लिहू तेवढे थोडेच आहे सरांविषयी! ‘देण्यातला आनंद’ घेत शेवटपर्यंत अविरत कार्यरत राहायला शिकवले आहे, सरांनी कृतीतून. ‘बोले तैसा चाले’प्रमाणे सरांनी आरंभलेली ‘मन आरोग्याची’ समाजाभिमुख चळवळ अधिक जोमाने पुढे नेणे, माणसांना जोडत पुढे जाणे, डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णातला ‘माणूस’ जपणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
डॉ. नाडकर्णी सरांची ही स्मरणयात्रा लिहिताना चांदण्याचा शीतल अनुभवच देते आहे; पण ही आठवणींची, शिकवणुकीची स्मरणयात्रा चालूच राहणार आहे. ग्रेसने म्हटल्याप्रमाणे...
 
‘हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे’
 
लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.