केंद्र प्रबळ तर राज्य सुरक्षित

विवेक मराठी    21-May-2026   
Total Views |
मुसोलिनी, हिटलर, लेनिन आणि स्टॅलिन भारतात होणे अशक्य आहे. कारण ही आध्यात्मिक भूमी आहे, पवित्र गंगामातेची भूमी आहे. देवात्मा हिमालयाची भूमी आहे. रामायण आणि महाभारताने ती संस्कारित झाली आहे. भगवान गौतम बुद्ध आणि महावीरांच्या तपस्येने पुनीत झालेली आहे. या भूमीत असे नरराक्षस निर्माण करण्याची क्षमता नाही. त्यामुळे एकपक्षीय राजवट धोकादायक आहे वगैरे हे कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्याच केडरला सांगावे. लेनिन-स्टॅलिनच्या दहशतीच्या कथा सांगाव्यात. ही चांगली सेवा होईल.
 
bjp
 
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ‘गंगोत्री ते गंगासागर’ भगवामय झाला आहे, असे वृत्तवाहिन्यांवरून सांगितले गेले, ते अनेकजणांनी ऐकले असेल. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आोरिसा, आसाम, इत्यादी राज्यांत भाजपाचे शासन आहे. दक्षिणेतील काही राज्यांत भाजपा सत्तेवर नाही. भाजपाचे हे यश अनेकांच्या डोळ्यात खुपते आणि ते स्वाभाविक आहे. त्यांचे रडगाणे असते की, भाजपामुळे आम्हाला सत्ता प्राप्त होत नाही.
 
 
या विरोधी पक्षांची डोकी प्रामुख्याने डावे कम्युनिस्ट लोक असतात किंवा डावी विचारसरणी प्रमाण मानणारे असतात. त्यांनी दोन घटनात्मक मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली आहे. पहिला मुद्दा आहे, देशात एकपक्षीय हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका वाढत चाललेला आहे. असे झाले तर (म्हणजे भाजपाची सत्ता सर्व देशभर झाली तर) लोकशाही धोक्यात येईल. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येईल, अल्पसंख्याकांचे संरक्षण धोक्यात येईल, परिणामी राज्यघटना धोक्यात येईल.
 
 
दुसरा मुद्दा भारतीय संघ राज्यदेखील धोक्यात येईल. त्यांचे म्हणणे असे की, भारत हे संघराज्य आहे. प्रत्येक राज्याला स्वायत्तता आहे. राज्यांच्या राज्यकारभारात केंद्र सरकार वेगवेगळ्या मार्गाने ढवळाढवळ करीत आहे. मतदारसंघांची लोकसंख्येच्या आधारावर पुनर्रचना, जीएसटी करप्रणाली, नवीन शैक्षणिक धोरण, हिंदी भाषेची लादवणूक, केंद्र सरकारच्या योजना राज्यांवर थोपवणे इत्यादी कारणांमुळे राज्याची स्वायत्तता धोक्यात येत चाललेली आहे. विरोधी पक्षांच्या राज्यांत केंद्र सरकारनियुक्त राज्यपाल नको तेवढा हस्तक्षेप करतात. राज्य सरकारपुढे अडचणी निर्माण करतात.
 
 
यातील पहिल्या आरोपाचा विचार करूया. देशात भारतीय जनता पार्टीची एकपक्षीय सत्ता येत चालली आहे. तिला थांबविण्याचे सामर्थ्य आज असलेल्या राजकीय पक्षांत नाही आणि राजकीय नेतृत्वातदेखील नाही. 2024 साली इंडीचा प्रयोग झाला. त्याचा आज बोजवारा वाजला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विजयाची कारणे अशी आहेत. 1) प्रखर राष्ट्रवाद, 2) हिंदुत्वाशी बांधिलकी, 3) कोणत्याही अल्पसंख्याकाचे लांगूलचालन नाही, 4) दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स (शून्य सहनशीलता), 5) विकासावर भर, 6) महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, 7) आंतरराष्ट्रीय जगतात भारताच्या प्रतिष्ठेत वाढ, 8) सामान्य माणसाला सक्षम करण्याच्या विविध योजना, 9) पक्षाशी बांधिलकी असणार्‍या समर्पित कार्यकर्त्यांचा देशव्यापी संच. या कारणांमुळे जनता भाजपाला मत देते.
एकपक्षीय राजवट लोक आणत चालली आहेत. ही राजवट नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे सहकारी यांच्यामुळे येत चालली आहे असे राजकीय नेते म्हणू शकतात, पण ते खरे नाही. जनता मतदानाद्वारे आपले सार्वभौमत्व प्रकट करते. जनतेच्या इच्छेला डावी डोकी नाकारू शकतात. कारण विकृती हा त्यांचा मेंदूधर्म आहे. जनतेचा मेंदूधर्म सारासार विचार करण्याचा आहे.
 
 
stalin and marxism
 
जगात एकपक्षीय राजवटीचे कालखंड येऊन गेले. इटलीत फॅसिझम, जर्मनीत नाझिझम आणि रशियात कम्युनिझम. फॅसिझमच्या नायकाचे नाव आहे, मुसोलिनी. नाझिझमच्या नायकाचे नाव आहे, हिटलर आणि कम्युनिझमच्या नायकांची नावे आहेत, लेनिन आणि स्टॅलिन (यावरील माझे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल.) या तिन्ही राजवटींनी माणूस राज्यशक्तीच्या द्वारे कसा चिरडून टाकायचा, याचे राक्षसी आदर्श ठेवले आहेत. तिन्ही राजवटींनी राजकीय विरोधकांना केवळ बंदिवान केले नाही तर येशूच्या स्वर्गात पाठविले. लेनिन आणि स्टॅलिन यांनी रशियात दोन कोटींहून अधिक माणसे मारली. हिटलरने 60 लाख ज्यू मारले आणि कैक लाख जर्मन विरोधक मारले. मुसोलिनीचाही माणसे मारण्याचा आकडा असाच भयानक आहे. जे एकपक्षीय राजवटीचा डंका पिटत आहेत, त्यांनी अगोदर या तिघांचा अभ्यास केला पाहिजे.
 
 
अशा प्रकारचा मुसोलिनी, हिटलर आणि लेनिन-स्टॅलिन भारतात होणे अशक्य आहे. कारण ही आध्यात्मिक भूमी आहे, पवित्र गंगामातेची भूमी आहे. देवात्मा हिमालयाची भूमी आहे. रामायण आणि महाभारताने ती संस्कारित झाली आहे. भगवान गौतम बुद्ध आणि महावीरांच्या तपस्येने पुनित झालेली आहे. या भूमीत असे नरराक्षस निर्माण करण्याची क्षमता नाही. आणीबाणीत इंदिरा गांधींनी लाखो लोकांना तुरुंगात डांबून स्वातंत्र्य हिरावून घेतले (तुरुंगात मीही होतो); परंतु इंदिरा गांधी यांनी आम्हा मिसाबंदींना रांगेत उभे करून गोळ्या घातल्या नाहीत. याचे कारण असे की, ही भारतीय मनोवृत्ती नाही. त्यामुळे एकपक्षीय राजवट धोकादायक आहे वगैरे हे कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्याच केडरला सांगावे. लेनिन-स्टॅलिनच्या दहशतीच्या कथा सांगाव्यात. ही चांगली सेवा होईल.
 
 
भारत हे संघराज्य (फेडरल स्टेट) आहे काय?, त्याचे स्वच्छ उत्तर असे की, भारत संघराज्य(फेडरल स्टेट) नाही. भारतीय राज्यघटनेत संघराज्य हा शब्ददेखील नाही. राज्यघटनेचे कलम 1 ‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल’, असे सांगते. हे कलम असे म्हणत नाही की, ‘भारत हे संघराज्य ‘फेडरल स्टेट’ असेल’. या कलमावर घटनासमितीत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान एका सभासदाने दुरुस्ती सुचविली की, भारत हे संघराज्य असेल, ते समाजवादी, सेक्युलर राज्य असेल. त्यांनी शब्दप्रयोग केला,‘युनायटेड स्टेट ऑफ इंडिया.’
 
बाबासाहेब म्हणतात,“मला मजबूत केंद्र सरकार आवडते. 1935च्या भारत सरकार कायद्याने निर्माण केलेल्या केंद्र सरकारपेक्षाही अधिक मजबूत केंद्र सरकर मला हवे आहे...या देशात 150 वर्षांच्या प्रशासकीय व्यवस्थेतून निर्माण झालेले मजबूत केंद्र सरकार जे माझ्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद, आदरयुक्त व आश्रयस्थान होते.” थोडक्यात प्रबळ केंद्रसत्ता भारताला हवी आहे, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. 
 
भाारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासहेबांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले की,‘भारताचे नाव राज्य एकत्रित करून निश्चित करता येणार नाही, भारत हे प्राचीन नाव आहे. भारताला तुकड्यातुकड्यात विभागून त्या तुकड्यांचा गटजोड म्हणजे भारत अशी भारताची संकल्पना होऊ शकत नाही. भारत ही अविच्छेदनीय संकल्पना आहे.’ दुसर्‍या भाषेत एकात्मिक भारत हीच भारताची ओळख आहे. भारतात अनेक राज्ये आहेत. त्याची कारणे वेगळी आहेत. त्याचा विचार करूया.
 
 
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात एकसारखा निसर्ग नाही. बर्फाळ प्रदेश आहे आणि वाळवंटही आहे. घनदाट अरण्ये आहेत आणि सपाट माळरानही आहे. सर्व दिशांना वाहणार्‍या नद्याही आहेत आणि तिन्ही बाजूंनी समुद्रही आहे. दमट, उष्ण आणि थंड असे तीन हवामानाचे प्रदेश भारतात आहेत. भारतात राहणार्‍या लोकांच्या कातडीचे रंग वेगवेगळे आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत. प्रदेशाप्रमाणे पोशाख आहेत आणि आहारांची विविधता तर विचारायला नको. भारतात एकसारखेपणाची लादवणूक कुणीही करू शकत नाही.
 
 
अशा विविधतापूर्ण प्रदेशांना त्यांच्या त्यांच्या भाषेप्रमाणे राज्य बनवू दिले पाहिजे आणि राज्य चालविण्याची पुरेशी स्वायत्तता दिली पाहिजे. पू. डॉ. बाबासाहेबांनी हे काम घटनेद्वारे केले. ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ या प्रबंधात भाषावार प्रांतरचना आणि तिचे फायदे याचे सुंदर विवेचन बाबासाहेबांनी केलेले आहे. प्रत्येक भाषिक राज्याला आपल्या भाषेचा विकास करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या प्रादेशिक संस्कृतीचे जतन करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षण, कर आकारणी, कृषी विकास, जल विकास, ऊर्जा असे असंख्य विषय राज्यांकडे येतात. भारतातील प्रत्येक राज्य हे त्याच्या ओळखीने स्वतंत्र आहे, पण त्याच वेळी ते भारताचे एक अंग आहे.
 
 
पू. डॉ. बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिली, त्या राज्यघटनेने केंद्राला अधिक सशक्त केलेले आहे. केंद्र का सशक्त असले पाहिजे, याबाबतीत डॉ. बाबासाहेबांचे विचार ठाम होते. 17 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीत उद्देशक ठरावावर भाषण करताना राज्यांना प्रमाणाबाहेर स्वायत्तता देण्याच्या नेहरूंच्या सूचनेवर त्यांनी फार मोठे आक्षेप घेतले. बाबासाहेब म्हणतात,“मला मजबूत केंद्र सरकार आवडते. 1935च्या भारत सरकार कायद्याने निर्माण केलेल्या केंद्र सरकारपेक्षाही अधिक मजबूत केंद्र सरकर मला हवे आहे...या देशात 150 वर्षांच्या प्रशासकीय व्यवस्थेतून निर्माण झालेले मजबूत केंद्र सरकार जे माझ्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद, आदरयुक्त व आश्रयस्थान होते.” थोडक्यात प्रबळ केंद्रसत्ता भारताला हवी आहे, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले.
 
 
जागतिक सत्ताकारणाकडे लक्ष टाकले तर असे दिसून येईल की, सर्व प्रमुख राष्ट्रे आता केंद्रवर्ती सत्तेला अधिक बलशाली करण्याच्या दिशेनेच वाटचाल करताना दिसतात. अमेरिका संघराज्य आहे. प्रत्येक राज्याची राज्यघटना वेगवेगळी आहे. राज्यांची न्यायव्यवस्था वेगळी आहे. तरीही केंद्र सरकार प्रबळ होण्याच्या वाटचालीला तेथे कोणी रोखू शकत नाही, कारण ती काळाची गरज आहे. ‘केंद्र प्रबळ तर राज्य सुरक्षित’ हा जागतिक मंत्र आहे. पू. बाबासाहेबांनी हे दूरदृष्टीने जाणले होते. म्हणून भारतात केंद्र सरकार प्रबळ होत असेल तर त्याची चिंता करण्याचे कारण नाही.
 
 
राज्याच्या स्वायत्ततेवर मर्यादा असूनही ममता बॅनर्जीसारखी एखादी मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या जनहिताच्या ऐंशी योजना दाबून टाकण्याचे धाडस करू शकते. बंगालमधील ममता बॅनर्जीचे सत्ताकारण देशाची एकता आणि एकात्मता दुर्बळ करणारे होते. राज्यघटनेची उद्देशिका देशाची एकता आणि एकात्मतेला समर्पित आहे. बंगाली भाषेचा अभिमान असणे गैर नाही. मराठीचा अभिमान असण्यातही गैर नाही, त्यामुळे हिंदीचा द्वेष करण्याचे कारण काय? असा द्वेष करून आपल्या भाषा समृद्ध होत नाहीत. भाषिक भावना पेटविणे देशाच्या दृष्टीने हिताचे नाही. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या भारतीय राज्याची रचना अतिशय वेगळ्या पद्धतीने करून दिली. केंद्र सरकारला अधिक शक्ती दिली. राज्यांना मर्यादित शक्ती दिली. भाजपाने हा विषय परस्पर सहकार्याची राज्ये आणि परस्पर स्पर्धा करणारी राज्ये या प्रकारे पुढे नेला आहे.
 
 
आपल्या देशात एकपक्षीय हुकूमशाही निर्माण होणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे फुटीरतेला प्रोत्साहन देणारे फेडरल राज्य म्हणजे संघीय राज्यदेखील आपल्याला नको आहे. बाबासाहेबांनी-ज्याचा आत्मा केंद्रीभूत सत्तेत आहे आणि राज्याची रचना मर्यादित स्वायत्त रचनेची आहे, अशा प्रकारची एक रचना आपल्यासमोर ठेवली आहे. भारत हा मर्यादित स्वायत्त राज्यांचा आणि शक्तिशाली केंद्र शासनाचा देश आहे. तिचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे डाव्या डोक्यांच्या फुसक्या मेंदूतून निघालेल्या भन्नाट कल्पनांना सडेतोड उत्तर देणे शक्य होईल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.