शतायू संघ आणि महिला सहभागितामातृशक्ती आणि राष्ट्रचेतनेवर सारगर्भित चर्चा

विवेक मराठी    23-May-2026
Total Views |

rss 
मुंबई : महिलांच्या योगदानाशिवाय कुटुंब, समाज आणि राष्ट्राची निर्मिती शक्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिति अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाद्वारे राष्ट्रनिर्माणाचे कार्य करत आहेत आणि भारताच्या सर्वोच्च उत्कर्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत कार्यरत आहेत,” असे प्रतिपादन प्रख्यात लेखिका आणि समाजसेविका डॉ. शोभा विजेंद्र यांनी केले. 7 मे 2026 रोजी मुंबईत नेहरू सेंटर येथील ’हॉल ऑफ हार्मनी’ येथे कमला ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित ’शतायू संघ आणि महिला सहभागिता’ या पुस्तकावर आधारित विशेष चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या चर्चासत्राचे अध्यक्षपद वर्षा तावडे आणि निदर्शना गोवानी यांनी भूषविले.
 
 
वर्षा तावडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ’संघ ही स्त्री विरुद्ध पुरुष असा भेदभाव मानणारी संस्था नसून, दोन्ही शक्ती एकमेकांना पूरक आहेत असे मानणारी संघटना आहे.’ निदर्शना गोवानी यांनी ’घर आणि संस्थात्मक कार्य या दोन्ही आघाड्यांवर महिला कशा प्रकारे समर्थपणे जबाबदारी पेलतात’ यावर प्रकाश टाकला.
 
 
रा.स्व. संघाच्या समिती प्रचारिका आणि ’महिला समन्वय’च्या अखिल भारतीय सह-संयोजिका भाग्यश्री (चंदा) साठये यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्ष आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा उल्लेख करत महिलांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची गरज व्यक्त केली. तर प्रमुख अतिथी प्रदीप जोशी यांनी मातृशक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.’
 
 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीताताई गुंडे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ’महिला आज उच्च पदांवर पोहोचत आहेत; मात्र राजकारण आणि धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची संख्या आणि प्रभाव वाढणे आवश्यक आहे,’ असे मत गीताताई गुंडे व्यक्त केले. ’केवळ पद मिळवणे पुरेसे नसून महिलांनी आपली निर्णयक्षमता सिद्ध करावी,’ असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन आणि वंदे मातरम्ने झाला, तर सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आणि संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.