परदेशीयांच्या नजरेतून भारत आणि आपले आदर्श

विवेक मराठी    30-May-2026
Total Views |
 
ahilyabai
 
भारतीय इतिहास, संस्कृती आणि शिक्षणव्यवस्था यांचा विचार करताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, की एखाद्या राष्ट्राची ओळख ही केवळ त्याच्या भौगोलिक सीमांमध्ये नसून त्याच्या ज्ञानपरंपरेत, मूल्यव्यवस्थेत आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीत असते. भारताची ही ओळख हजारो वर्षांच्या अखंड परंपरेतून घडलेली आहे. मूळ भारतीय शिक्षणपद्धती ही अत्यंत समृद्ध, जीवनकेंद्रित आणि मूल्याधिष्ठित होती. गुरुकुल प्रणालीमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान दिले जात नव्हते, तर जीवन जगण्याची कला शिकवली जात होती. विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आत्मिक, बौद्धिक आणि नैतिक विकास साधत होते. वेद, उपनिषदे, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताने जगाला दिशा दिली होती. नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या विद्यापीठांनी जागतिक कीर्ती मिळवली होती. ही शिक्षणपद्धती भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या ‘सर्वांगीण विकासा’वर आधारित होती.
 
मात्र, 1835 साली लॉर्ड मॅकॉलेने आपले प्रसिद्ध "मिनिट ऑन एज्युकेशन" सादर केले आणि भारतीय शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडून आले. मॅकॉलेचा उद्देश स्पष्ट होता—“असे भारतीय तयार करणे जे रक्ताने आणि रंगाने भारतीय असतील, पण विचारांनी आणि अभिरुचीने इंग्रज असतील.” या शिक्षणपद्धतीने भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या परंपरेपासून दूर नेण्याचे काम केले. इंग्रजी भाषा, पाश्चिमात्य इतिहास आणि विचार यांना प्राधान्य देण्यात आले, तर भारतीय ज्ञानपरंपरेला दुय्यम स्थान दिले गेले. Thomas Babington Macaulay यांनी मांडलेलं “Minute on Education” हे केवळ शैक्षणिक धोरण नव्हतं, तर एक सांस्कृतिक विधान होतं. मॅकॉलेचं उद्दिष्ट स्पष्ट होतं, “भारतीयांना इंग्रजी विचारसरणीत घडवणं.” या शिक्षणपद्धतीने, भारतीय ग्रंथ, वेद, उपनिषदं यांना दुय्यम स्थान दिलं, भारतीय इतिहासाची मांडणी युरोपीय निकषांनुसार केली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतीयांच्या मनात स्वतःच्या परंपरेबद्दल संशय निर्माण केला. याच पार्श्वभूमीवर भारताबद्दल लिहिणारे पाश्चात्य लेखक, कवी आणि प्रवासी भारताकडे स्वतःच्या चौकटीतून पाहू लागले.
 
पाश्चिमात्य लेखकांनी भारताचा इतिहास त्यांच्या दृष्टिकोनातून लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, जेम्स मिल याने आपल्या “हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया” या ग्रंथामध्ये भारताला मागासलेला, अंधश्रद्धाळू आणि असंघटित देश म्हणून दाखवले. थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेने भारतीय साहित्य आणि ज्ञानपरंपरेला “एका शेल्फवरील इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेतही कमी” असे संबोधले. चार्ल्स ग्रँटसारख्या लेखकांनी भारतीय समाजाला नैतिकदृष्ट्या अध:पतन झालेला म्हणून मांडले. या सर्व उदाहरणांतून एक गोष्ट स्पष्ट होते, भारताला समजून घेण्याऐवजी त्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती प्रबळ होती. याचा परिणाम असा झाला की, भारतीयांनी स्वतःकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.
 
याच पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य लेखकांनी भारतीय व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेल्या साहित्याकडे पाहिले, तर त्यातही हीच विकृत दृष्टी दिसून येते. भारतीय इतिहास, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्वांचा विचार करताना एक गोष्ट वारंवार लक्षात येते, आपल्या स्वतःच्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तींचं चित्रण अनेकदा बाहेरच्या नजरेतून घडलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांसारख्या अद्वितीय राज्यकर्तीबद्दल लिहिलेली जॉअना बैली यांची कविता हा त्याचाच एक नमुना आहे. ही कविता ज्या काळात लिहिली गेली, तो काळ होता भारतात ब्रिटिश शिक्षणपद्धती रुजण्याचा, आणि भारतीय ज्ञानपरंपरेचं पुनर्मूल्यांकन नव्हे तर पुनर्व्याख्या (reinterpretation) होण्याचा. जॉअना बैलीसारख्या कवींच्या लेखनात एक विरोधाभास दिसतो, एकीकडे भारताबद्दल आकर्षण, गूढता, अध्यात्म, दुसरीकडे अज्ञान, पूर्वग्रह आणि सांस्कृतिक अंतर, या कवितेतही आपण तेच पाहू शकतो.
 
“Sinai पर्वत”, “यहूदी परंपरा” यांसारख्या संदर्भांनी सुरुवात, भारतीय वास्तवाऐवजी बायबलिक चौकटीतून कथा सांगण्याचा प्रयत्न, यामुळे झालं काय, अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्त्व भारतीय संदर्भात न उभं राहता, ते एका पाश्चात्य धार्मिक प्रतीकात बसवलं जातं. अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महान आणि दूरदर्शी शासक स्त्रीचे वर्णन करताना त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रशासनकौशल्याचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा योग्य गौरव करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अपूर्ण आणि चुकीचे चित्रण केले गेले आहे.
 
अहिल्याबाई होळकर म्हणजे, न्यायप्रिय, दूरदर्शी राज्यकर्ती, प्रजेची “आई” तसेच धर्मनिरपेक्ष आणि व्यावहारिक नेतृत्व होत्या. पण या कवितेत, धार्मिक संदर्भांचा चुकीचा वापर दिसून येतो. अहिल्याबाईंचं जीवन हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित होतं, पण कवितेत त्यांना अब्राहमिक (बायबलिक) चौकटीत बसवलं गेलं, त्यामुळे झालं असं की त्यांच्या आध्यात्मिकतेचा मूळ अर्थ हरवतो.
 
कवितेत एका ठिकाणी ती “अंधारात वाढलेली” किंवा “भ्रामक शिकवणींनी ग्रासलेली” अशी प्रतिमा दिसते. हे विधान पूर्णपणे पाश्चात्य श्रेष्ठत्वाच्या भावनेतून आलेलं आहे. वास्तविक पाहता, अहिल्याबाई अत्यंत सुशिक्षित आणि तत्त्वनिष्ठ होत्या. त्यांनी धर्म, न्याय आणि प्रशासन यांचा सुंदर समतोल राखला. पुत्रवियोग आणि मुलीचे सती जाणे अर्थात पुत्रीवियोग दाखवतांना दुःख, आक्रोश यावर अतिशय नाट्यमय भर दिला गेला, पण त्यांच्या राजकीय निर्णयक्षमतेचा आणि प्रशासन कौशल्याचा तुलनेने कमी उल्लेख ह्या कवितेत आढळतो. यामुळे त्यांची प्रतिमा “दुःखी स्त्री” म्हणून जास्त दिसते, आणि “सशक्त शासक” म्हणून कमी.
अहिल्याबाई होळकर या केवळ एका राज्याच्या राणी नव्हत्या,
 
त्या भारतीय संस्कृतीच्या जिवंत मूल्यांचा अविष्कार होत्या, त्यांना समजून घेण्यासाठी, आपल्याला पाश्चात्य काव्याची नव्हे,
तर भारतीय अनुभवाची भाषा वापरावी लागेल.
 
अहिल्यादेवी या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा उभारल्या, प्रजेच्या कल्याणासाठी काम केले आणि प्रशासनात आदर्श निर्माण केला. मात्र, जोआना बैली ह्यांच्या कवितेमध्ये अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे चित्रण केले गेले आहे, ते बहुतेक ठिकाणी त्यांच्या वास्तविक कार्याशी विसंगत आहे. त्यांच्या महानतेची खरी झलक कवितेच्या शेवटच्या काही परिच्छेदांमध्ये दिसते, जिथे त्यांच्या कार्याचा थोडाफार योग्य उल्लेख केला आहे. पण त्याआधीच्या वर्णनात त्यांचे व्यक्तिमत्त्व मर्यादित, कधीकधी चुकीच्या संदर्भात आणि पाश्चिमात्य दृष्टीकोनातून पाहिले गेलेले दिसते.
 
शेवटच्या काही परिच्छेदांमध्ये मात्र कवी वास्तवाच्या जवळ येतांना दिसते, प्रजेबद्दलचं मातृत्व, न्यायासनावर बसलेली अहिल्याबाई, दानशूरता आणि लोककल्याण, हे वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या अधिक अचूक आहे. कारण, इथे कवीने कल्पनाविलास सोडून वास्तवाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
 
ही विसंगती केवळ एका कवितेपुरती मर्यादित नाही, तर ती त्या काळातील व्यापक मानसिकतेचे प्रतीक आहे. मॅकॉलेनंतरच्या शिक्षणपद्धतीमुळे भारतीयांमध्ये स्वतःच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड निर्माण झाला, तर पाश्चिमात्य लेखकांनी भारताला त्यांच्या चौकटीत बसवून समजून घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी, भारताची खरी ओळख अनेकदा धूसर झाली.
 
इतिहास कोण सांगतोय हे महत्त्वाचं ठरतं. इतिहास फक्त घटना नसते, तर ती घटना कोण सांगतंय यावरही अवलंबून असतो. पाश्चात्य लेखकांनी, भारताकडे केवळ “अभ्यासाचा विषय” म्हणून बघितलं नाहीतर एका विशिष्ट चष्म्यातून बघितलं, पण भारतीयांसाठी तो “जगण्याचा अनुभव” आहे. या दोन दृष्टिकोनांमध्ये मूलभूत फरक आहे.
 
आज या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. भारतीय शिक्षणपद्धतीचा पुनरुज्जीवन, आपल्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन आणि आपल्या महान व्यक्तिमत्त्वांचे योग्य मूल्यमापन हे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यादेवींसारख्या व्यक्तींचा गौरव करताना त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्यांना योग्य न्याय देणे ही आपली जबाबदारी आहे.
 
जॉअना बैली यांच्या कवितेचे विवेचन करताना आपण केवळ त्या कवितेतील त्रुटी दाखवून देत नाही, तर त्या मागील ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीही समजून घेतो. आणि तेव्हाच आपल्याला कळते की, एखाद्या साहित्यकृतीचे मूल्यांकन करताना तिच्या निर्मितीच्या काळाचा आणि परिस्थितीचा विचार करणे किती आवश्यक आहे. जॉअना बैलींची कविता ही पूर्णपणे नाकारण्यासारखी नाही, पण ती अंतिम सत्य म्हणून स्वीकारणंही चुकीचं आहे. तिचा जर नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या इतिहासाकडे स्वतःच्या नजरेतून पाहण्याची गरज आहे, शिक्षणव्यवस्थेच्या प्रभावाची जाणीव ठेवून इतिहास परत लिहिण्याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या महान व्यक्तिमत्त्वांचं, आपल्या आदर्शांचे स्वतःच्या भाषेत आणि संस्कृतीतून पूर्णलिखाण अत्यावश्यक आहे.
 
अहिल्यादेवींवर खरंतर कविता कदाचित अशी लिहिली जाऊ शकते.
 
“अहिल्या : एक दिव्य राज्यसंस्कृती”
 
माळव्याच्या मृदुल मातीमध्ये जेव्हा प्रकटली ती प्रभा,
जणू नर्मदेच्या लहरींनी साकारली एक तेजस्वी आभा।
ना केवळ राजसत्ता, ना केवळ वैभवाचा तो सोहळा,
ती होती धर्म, करुणा, न्याय यांचा साक्षात् जिवंत महोत्सव भोळा॥
 
भारतभूमी ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेली,
वेदांच्या स्वरांनी निनादलेली, संस्कृतीने समृद्ध झालेली।
ही नव्हती रणधुमाळीची रक्तरंजित कहाणी,
ही होती शांततेच्या शाश्वत दीपाची अखंड ज्योती दिव्य वाणी॥
 
परकीयांच्या लोभी नजरा जेव्हा या भूमीवर पडल्या,
तेव्हा तलवारींच्या सावल्या संस्कृतीवर जडल्या।
पण भारत कधीच नव्हता आक्रमणाचा वेडा,
तो होता सहिष्णुतेचा, समन्वयाचा, सत्याचा घडा॥
 
अशा या काळोख्या वादळात उभी राहिली ती दीपशिखा,
अहिल्या न्यायाची आराधिका, जनतेची जीवनदीपिका।
तिच्या नजरेत सत्ता नव्हती, होती सेवा एक साधना,
प्रजेच्या सुखातच तिने शोधली राजधर्माची साधना॥
 
“सात-बारा”च्या निर्णयात दडलेला होता श्रमांचा सन्मान,
शेतकऱ्याच्या घामाला दिला तिने जीवनाचा खरा मान।
सात झाडं त्याची त्याच्या कष्टांची पावन कमाई,
पाच झाडं राज्याला न्याय आणि समतोलाची साक्षी जणू आई॥
 
ना तिने जनतेवर टाकला कर्तव्याचा भार,
स्वखर्चातून उभारले तिने धर्मकार्य अपार।
विहिरींच्या जलधारांतून तिची करुणा वाहत राहिली,
घाटांच्या शिल्पांतून तिची भक्ती साकारत राहिली॥
 
काशीच्या घाटांवरून ते रामेश्वराच्या लाटांवर,
तिच्या कार्याची छाया उमटली भारताच्या प्रत्येक वाटांवर।
मंदिरांचे जीर्णोद्धार केवळ दगडांचे नव्हते पुनर्जन्म,
तो होता संस्कृतीच्या आत्म्याचा पुनःप्रकाशित धर्म॥
 
भिलकवडी करातही होती जनकल्याणाची छटा,
प्रशासनात तिच्या उमटली दूरदृष्टीची दिव्य वाटा।
न्याय तिचा वज्रासारखा, पण अंतःकरण होते कमलासारखे,
कठोर निर्णयांतही उमटत असे प्रेमाचे स्नेहधागे॥
 
राणीपण तिचे नव्हते दिमाखात, नव्हते दिखाव्यात,
ते होते साधेपणात, सेवेत, आणि जनतेच्या भावविश्वात।
तिच्या वाणीतील मधुरता, तिच्या कृतीतील तेज,
तिनेच घडवला राज्यकारभाराचा एक नवा सेतू, एक नवा मेज॥
 
परकीय लेखणीने रंगवले जेव्हा भारताचे चित्र,
तेव्हा अंधार, दारिद्र्य, आणि अज्ञानाचे केले त्यांनी उदात्त।
दुग्धशर्करासम समृद्धी त्यांनी पाहिलीच नाही,
ज्ञान, विज्ञान, संस्कृती यांची गाथा त्यांनी लिहिलीच नाही॥
 
अहिल्येचे रूपही त्यांनी कधी दीनतेत रंगवले,
तिच्या सामर्थ्याचे तेज त्यांनी कधी पूर्ण जाणलेच नाही।
शब्दांच्या आड दडलेले सत्य त्यांनी हरवले,
इतिहासाच्या आरशात त्यांनी धूसर प्रतिबिंबच उभे केले॥
 
पण सत्य हे सदैव तेजस्वी ते लपवता येत नाही,
अहिल्येच्या कार्याचा प्रकाश काळोखात हरवत नाही।
ती होती एक युगप्रवर्तक, एक संस्कृतीची वाहक,
सुशासनाची मूर्ती, जनतेच्या आशेची दीपवाहक॥
 
आजही नर्मदेच्या लाटांत तिचे स्मरण गाजते,
घाटांच्या प्रत्येक शिळेत तिचे कर्तृत्व जागते।
अहिल्या म्हणजे केवळ इतिहासातील एक नाव नाही,
ती आहे भारताच्या आत्म्याची अखंड वाहणारी गाथा काही॥
 
आजही काळाच्या प्रवाहात तिचा दीप उजळतो,
अन्यायाच्या अंधारात तिचा मार्गच दिसतो।
सत्ता नव्हे सेवा हा संदेश तिचा जिवंत,
अहिल्या शिकवते आजही सुशासनाचा मंत्र दिव्य अनंत॥
 
नव्या युगाच्या धावण्यात हरवतो जेव्हा माणूस,
स्वार्थाच्या गर्तेत बुडतो जेव्हा समाजाचा श्वास।
तेव्हा तिच्या कर्तृत्वाची आठवण देई दिशा,
धर्म, न्याय, करुणा यातच आहे खरी प्रगतीची भाषा॥
 
स्त्रीशक्तीच्या आकाशात ती आजही ध्रुवतारा,
साहस, संयम, कर्तव्य यांचा तीच आधार सारा।
भारतीयांच्या अंतःकरणी तिचं स्थान अढळ,
अहिल्याबाई म्हणजे प्रेरणेचा अखंड, अमर झरा निर्मळ॥
 
-सोनाली तेलंग