सिंहस्थाच्या मुहूर्तावर बुद्धिभेदाला जोर

विवेक मराठी    05-May-2026
Total Views |
Simhastha Kumbh Mela in Nashik 
 
@ जयंत देशपांडे
9422203097
 
kumbhmela 
सिंहस्थ कुंभमेळा ही एक महत्त्वाची अध्यात्मिक पर्वणी आहे, मात्र याच काळात काही मंडळी संत वचनांचा विपर्यास करून वारकरी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न करताना दिसतात. विशेषतः संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची मोडतोड करून ‘वारकरी संप्रदायाचा सिंहस्थाशी संबंध नाही’ अशी चुकीची मांडणी केली जात आहे. वारकरी परंपरा आणि सनातन धर्म यांच्यातील अभेद्य नाते स्पष्ट करणारा, तसेच बुद्धिभेद करणार्‍यांचा कावा उघड करणारा हा सडेतोड ‘शब्द प्रपंच’ प्रत्येक धर्मप्रेमी वाचकाने आवर्जून समजून घ्यायला हवा.
भारतीय हिंदू धार्मिक समाजासाठी सिंहस्थ आणि तत्सम धार्मिक उत्सव पुण्य संपादन करण्याचे आणि त्या निमित्ताने होणार्‍या धार्मिक चिंतनातून स्वत:ला समृद्ध करून घेण्याचे निमित्त असते. तथापि, आपल्याकडे अशा धार्मिक उत्सव आणि सोहळ्याकडे काही टोळ्या बुद्धिभेदाच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करण्याची संधी म्हणूनदेखील पाहतात. आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने या बुुद्धिभेदाच्या नित्य कर्माची सुरुवात झाली आहे. त्यातल्या त्यात अशा प्रसंगात महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आणि बहुजनांच्या घराघरात पोहोचलेला वारकरी संप्रदाय आणि त्याच्या अनुयायांना संभ्रमित केल्या जाते हा नेहमीचा अनुभव आहे. याही वेळी हेच होताना दिसत आहे.
 
 
वारकरी समाजाची संत वचनासंबंधीची निष्ठा लक्षात घेऊन बुद्धिभेद करणार्‍या या टोळ्या जाणीवपूर्वक संत वचनांचा खुबीने आधार घेऊन संभ्रमाला जन्म देणार्‍या विचारांची पेरणी करतात. या संभ्रम निर्माण करणार्‍या टोळ्या सामान्य पापभिरू समाज, त्यातील जातीव्यवस्थेचे स्वरूप, तात्कालिक संदर्भ या संबंधीचा असणारा त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या पूर्वसुरींच्या भूमिका याच्या आधारे आपल्या मोहिमेची पद्धतशीर आखणी करतात. त्यांच्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि तुकाराम महाराज यांच्यातील मानव कल्याणासंबंधीची आणि त्यासाठीच्या मार्गासंबंधीची एकवाक्यता महत्त्वाची नसते. त्यांना महत्त्वाची असते, ती या संतांनी कायम गौणत्व दिलेली त्यांची जात.
 
 
याच पार्श्वभूमीवर, या टोळ्या बहुजन समाजातील संतांच्या साहित्यातील तथ्यांची मोडतोड करून प्रसंगी सोयीचा अर्थ काढून समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी संत वचनांचा दुरूपयोग करतात. या एकूणच समाजाला मागे घेऊन जाणार्‍या आणि विविध उपासना पंथात कलह निर्माण करणार्‍या मोहिमेत सर्वात जास्त संदर्भ कुणाचे वापरले जात असतील, तर ते संत तुकारामांचे. यामागे या टोळ्यांच्या मनातील जातीचा विचार नक्कीच आहे. त्याशिवाय संत तुकारामांची थेट भाषा हेही एक कारण आहे. संत तुकारामांच्या गाथेतील अभंगात भोंदू, पाखंडी, भट, ब्राम्हण, ज्योतिषी ही नावे आणि अंगारे, धुपारे, नवस, सायास, यज्ञ, याग, तीर्थयात्रा असे शब्द दिसले की, या टोळीला भांडवल सापडल्याचा आनंद होतो. कर्म आणि ज्ञान मार्गाचे कुठे गौणत्व मांडलेले दिसले की, यांच्या मनात उकळ्या फुटतात.
 
kumbhmela 
 
पुढे अशी त्यांना सोयीची वाटणारी वचने प्रसंगी मोड-तोड करून संदर्भासाठी वापरली जातात. आपला हेतू साध्य करताना या टोळ्या त्या शब्दांच्या पलीकडचा संत तुकारामांचा किंवा अन्य संतांचा हेतू समजून घेत नाही. हेतू समजला तरी परवडणारा नसला की, लक्षात घेत नाहीत. मुळात यांचा हेतूच संभ्रम निर्माण करण्याचा असल्यामुळे मूळ रचनेच्या प्रयोजनाशी यांचे काहीच घेणे-देणे नसते. अनुयायी समाजात फूट पाडणे, विशिष्ट जाती आणि विशिष्ट उपासना पद्धतीसंबंधी द्वेष निर्माण करणे, मूळ तत्त्वज्ञानापासून अनुयायांना दूर घेऊन जाणे आणि भोळ्या जीवांच्या श्रद्धेची चेष्टा करून समाज अधिकाधिक अश्रद्ध कसा होईल यावरच लक्ष देणे हेच या टोळ्यांचे ध्येय असल्याचे दिसते. समाजाचे भले करणे यांच्यासाठी बहुतेक वेळा गौण तर कित्येकदा ते या टोळ्याच्या गावीही नसते असा अनुभव आहे. संप्रदायाचे, धर्माचे मूळ तत्त्वज्ञान आणि त्यात कालानुरूप आलेली विसंगती यात फरक न करता ही विसंगती मूळ तत्त्वज्ञानाला चिटकवून या टोळ्याधर्माला आणि त्याच्या तत्त्वज्ञानाला धोपटण्यात पुरुषार्थाचा प्रत्यय घेतात.
 
 
मुळात संत रचना अर्थात संतांचे अभंग समजून घेणे (त्या प्रक्रियेला संप्रदाय अभंग सोडवणे असे म्हणतो) इतके सहज आणि सोपे नसते. अभंगातील एक चरण इतर चरणांना जोडून वाचावे लागते. अभंगाच्या टीकेचा रोख कुठे आहे, हे तपासून चरणाचा अर्थ लावावा लागतो. अनेकदा अभंगातील टीका आणि चरणांचा समन्वय साधून लावलेला अर्थदेखील अपूर्ण ठरतो. कारण त्या अभंगाचा अन्य अभंगातील भूमिकेशी संबंधी असतो. कधी वेद विचाराचा, कधी शास्त्रांचा, तर कधी पौराणिक संदर्भ असतो. कधी कधी तर अभंग सोडवण्याची ही सगळी प्रक्रिया पार पडूनदेखील अभंगाच्या अंतरंगाचा ठाव लागत नाही. अशा वेळी वारकरी त्या-त्या संताना शरण जाऊन अर्थदृष्टीसाठी साकडे घालतो आणि मग त्याला तो अर्थ गवसतो. थोडक्यात असे सगळे संदर्भ तपासल्याशिवाय अभंगाचा अर्थ लावणे व्यापक अर्थाने संप्रदायाच्या प्रती अपराध आहे. दुर्दैवाने, या टोळ्यांना संप्रदाय संबंधी काही देणे घेणे नसल्यामुळे अर्थदृष्टी संबंधीचा हा विचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा असत नाही. परिणामी, या टोळीच्या सो कॉल्ड प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण होतो.
 
 
याच पार्श्वभूमीवर, आता सिंहस्थाच्या निमित्ताने या टोळ्यांनी सक्रिय होऊन बुद्धिभेदाचा जागर सुरू केला आहे. वारकरी संप्रदायात सिंहस्थ पर्वणीचे काहीच महत्त्व नाही हे सांगायला सुरुवात केली आहे. सिंहस्थ ही वारकरी संप्रदायाची परंपरा नाही. पुढे जाऊन सिंहस्थ सनातन धर्माच्या उत्सवाचा भाग आहे. सनातन धर्माहून वारकरी संप्रदाय भिन्न आहे. एकूणच वारकरी संतांनी अशा तीर्थयात्रांचा कायम निषेध केला आहे, अशी मांडणी करण्यासाठी या टोळ्या विविध संतांच्या गाथा धुंडाळतील. त्यातही आपली भूमिका स्थापित करण्यासाठी संतांच्या जातीचा संदर्भ घेऊन त्या त्या संतांच्या गाथा प्राधान्याने शोधतील.
 
 
आणखी महत्त्वाचे म्हणजे हे अप्रस्तुत विचार मांडताना या टोळ्यातील काहीजण आपणही वारकरी असल्याचे सांगतील. आपल्या घरात शंभर दीडशे वर्षांची परंपरा असल्याचे सांगतील. हे स्वाभाविक आहे. मराठी समाजातील क्वचितच एखादे घर असेल ज्या घराचा संप्रदायाशी मागच्या पाच ते सहा पिढ्यांत कुठेही संबंध आला नसेल. संप्रदायाच्या व्यापकतेची आणि स्वीकारार्हतेची तीच तर खूण आहे. प्रश्न हा पिढ्यांचा वारसा सांगणारे आज वारकरी आहेत का, हा आहे. आपल्या समाजात विशिष्ट कारणासाठी, सोयीसाठी पिढ्या तोडण्याची आणि दत्तक जाण्याची परंपरा आहे. अशा पिढ्या तोडल्या आणि दत्तक गेले की, मूळ घराच्या परंपरा त्याच्यावर बंधनकारक असत नाहीत. त्याचा तसा त्या कुटुंबाच्या परंपरांचा संबंध संपुष्टात येतो, अशी प्रथा आहे. हा संदर्भ घेतला तर आज वारकरी नसणारे आणि पिढ्यांचे संदर्भ देणारे हे लोक वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पिढ्या तोडलेले किंवा दत्तक गेलेले आहेत. त्यांना या संप्रदाय परंपरांच्या संदर्भात वारकरी म्हणून अनुभवसिद्ध भाष्य करण्याचा अधिकार उरत नाही. त्यांचे आषाढी कार्तिकीला बाह्यांगाने मिरवणे पाखंड ठरते.
 
 
आता सिंहस्थाच्या निमित्ताने या टोळ्या संत साहित्यातील जे संदर्भ शोधतील त्या संबंधी बघू. मुळात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगगाथेत सिंहस्थाचा फारसा संदर्भ येत नाही. जो संदर्भ येतो तो तीर्थयात्रा, व्रत वैकल्ये या अनुषंगाने. त्यातल्या त्यात संत तुकारामांचा एक अभंग आहे. ज्यात सिंहस्थाचा स्पष्ट उल्लेख आहे. या टोळीतील तथाकथित अभ्यासक नेमका हाच अभंग उचलतील. त्याच्या पहिल्या चरणातील सोयीचे शब्द पाठ करतील आणि संभ्रम पेरायला सुरुवात करतील. आणखी काही संदर्भ सापडले तर त्याचाही असाच अप्रस्तुत उपयोग करतील. संत तुकारामांच्या या अभंगाचा आधार घेऊन वारकरी संप्रदाय सिंहस्थ मानत नाही, ती त्यांची परंपरा नाही असे सांगून ही पर्वणी म्हणजे काही मोजक्यांची सोय असल्याची भूमिका या टोळीतील तथाकथित अभ्यासक मांडतील. त्यांच्या या मांडणीतील फोलपणा स्पष्ट होण्यासाठी हा अभंग आणि त्याचा संप्रदायाने केलेला अर्थ समजून घेऊ...
 
 
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा झाली धणी ।अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरी बोडी डोई दाढी ।
 
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ।पाप गेल्याची खूण । नाहीं पालटलें अवगुण ।
 
भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ।
 
 
अर्थ : आता कुंभमेळा आला आहे. त्यामुळे न्हावी आणि भटजींची (पुजारी) चांगली चंगळ झाली आहे. अंतःकरणात पापांचे कोट्यवधी साठे आहेत; पण वरवर केवळ मुंडण केले जात आहे. मुंडण केल्याने केवळ केस गेले, पण अंतःकरणातील विकार पालटले का? पाप गेल्याची कोणती खूण आहे? कारण माणसाचे अवगुण तर तसेच राहिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “भक्तीभावाशिवाय केलेले हे सर्व बाह्य सोपस्कार केवळ व्यर्थ आणि कष्ट देणारेच आहेत.“
 
 
वारकरी परंपरेनुसार वरील अभंग सोडवला आहे. हा अभंग सोडवताना वै. शंकर महाराज खंदारकर यांच्या श्रीतुकाराम गाथा भाष्य या ग्रंथाचा आधार घेतला आहे. (संप्रदायात वै. कंधारकर महाराजांच्या चिंतनाला महत्त्व असून त्यांनी गाथेतील सर्व अभंगांचा भावार्थ प्रतिपादित करण्याचे मोठे काम केले आहे.) त्यासोबतच अन्य संतांची तीर्थयात्रेसंबंधी भूमिका आणि त्या दरम्यान त्यांचा अंतरंग शुद्धीचा अट्टहास लक्षात घेतला आहे. संबंधित अभंगाचा हा संप्रदाय अभिप्रेत अर्थ लक्षात घेतला तर यात कुठेही सिहंस्थ पर्वणी संबंधी नकारात्मक भाव दिसून येत नाही. याउलट आग्रह आहे तो अशा पर्वणीच्या माध्यमातून पुण्यसंचय करायचा आणि त्यासाठीची पात्रता प्राप्त करून घेण्याचा. अंतरंग शुद्धी शिवाय बाह्य उपचार सफल होत नाहीत हे सांगण्याचा. आता अशी अंतरंग शुद्धी प्राप्त न करता घेतलेला सिंहस्थ सहभाग त्यातील अनेकांच्या अर्थकारणाला हातभार लावण्याशिवाय इतर कुठल्या उपयोगाचा असणार ही संत तुकारामांची या चिंतनाच्या मागची भूमिका आहे.
 
 
थोडक्यात, सिंहस्थ पर्वणी आहे; पण विकारांचा त्याग करून शुद्ध चित्ताने सहभागी होणार्‍यांसाठी. इतरांसाठी मात्र केवळ व्यर्थ कष्टच. थोडक्यात, या टोळ्या जो सोयीचा भाग या अभंगातून उचलतील त्या त्यांच्या भूमिकेला कुठलाच आधार असणार नाही. हे केवळ एक उदाहरण झाले. वारकरी संप्रदाय वेद प्रामाण्य मनात नाही आणि तो सनातन धर्मापासून वेगळा आहे, अशी मांडणी करण्यासाठीदेखील तुकारामादी संतांच्या अभंगाची अशीच मोडतोड या टोळ्या सातत्याने करत आलेल्या आहेत.
 
 
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी। हाही असाच एक या टोळ्यांनी शोधलेला अभंग. हा अभंग व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण म्हणून संप्रदायात अभ्यासला जातो. सज्जनांचे मोठेपण सांगण्यासाठी येथे व्यतिरेक अलंकार उपयोगात आणला आहे. याही अभंगाचा आधार घेत या टोळ्या मांडणी करतात. भाषेतील अलंकार, लक्षणार्थ, दृष्टांत, उपहास, अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, रूपक या साहित्य वैभावाशी आणि संदर्भाशी यांना काही देणे घेणे नसते. सापडला शब्द की वापरा हेच यांचे धोरण. वारकरी संप्रदाय अनुयायांनी यापुढे या टोळ्यांनी असे संदर्भ दिले की किमान एकदा तरी तो पूर्ण अभंग पारंपरिक पद्धतीने सोडवून पहिला पाहिजे. अन्यथा, या टोळ्यांचा समाजाला भ्रमित करण्याचा डाव त्या त्या प्रसंगात साधल्या जाईल.
 
 
वारकरी संप्रदाय सनातन धर्माचा एक पंथ आहे. संप्रदायाची सनातन धर्म तत्त्वज्ञान आणि परंपरांशी बांधिलकी आहे. सनातन धर्माने आत्म कल्याणासाठी ज्ञान, भक्ती आणि कर्म हे तीन मार्ग पुरस्कृत केले आहेत. यातील ज्ञान आणि कर्म हे दोन मार्ग तुलनेने कठीण असून सामन्यासाठी त्या मार्गाने प्रवास करणे कठीण असल्याची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर संप्रदायाने भक्ती मार्गाचा पुरस्कार केला आहे. अर्थात त्यासाठी सनातन धर्माच्या या संदर्भातील मार्गदर्शनाचाच आधार घेतला आहे. आता वारकरी संप्रदाय जर जाणीवपूर्वक भक्ती मार्गाचा पुरस्कार करणार असेल तर ओघानेच ज्ञान आणि कर्म या दोन मार्गासंबंधी त्यातील दुस्तरता प्रतिपादित करणार हे ओघाने आलेच. याच पार्श्वभूमीवर, वारकरी संत साहित्यात भक्तीची सुलभता आणि ज्ञान व कर्माची काठिण्यता विशद करण्यासाठी काही संदर्भ येतात, दृष्टांत येतात. या सगळ्यांचा अर्थ इतकाच की, वारकरी संतांना आपल्या अनुयायांना भक्तिमार्गप्रवण करायचे होते. याशिवाय दुसरा अर्थ काढणे, वारकरी संप्रदायाला सनातन धर्मापासून वेगळे समजणे किंवा स्वतंत्र धर्म समजणे म्हणजे निव्वळ अज्ञान म्हणावे लागेल किंवा मग असे समजणार्‍या विचारांच्या हेतूची शुद्धता तपासावी लागेल.
 
 
थोडक्यात वारकरी संप्रदाय सिंहस्थाचा विरोध करीत नाही. तीर्थयात्रा, कुंभमेळा, सिंहस्थ पर्वणी हे सनातन वैदिक धर्मातील विशेष योग असून ते सर्वांनी आचरण करावेत असे धर्माचे विधान आहे. वारकरी संप्रदाय या विधानाचा आदरच करतो. संप्रदायाच्या दृष्टीने सिंहस्थ सहभाग पुण्याचे काम आहे. तो व्रताचा भाग आहे. तीर्थयात्रेचा भाग आहे. वारकरी संतांनी तीर्थयात्रेचा आणि तेही पर्व काळातील तीर्थयात्रेचा नेहमीच पुरस्कार केलेला आहे. इतकेच काय पण सिंहस्थ पर्वणीत वारकरी सिंहस्थ परंपरेनुसार आखाडा स्वरूपात सहभागी होत असून त्याचा अधिकृत सहभाग सिंहस्थ व्यवस्थापन समिती गृहीत धरते आहे. वारकरी आणि सिंहस्थ यांचा परस्पर संबंध स्पष्ट होण्यासाठी याहून वेगळ्या प्रमाणाची गरज नाही. संदर्भासाठी घेतलेल्या अभंगाचा अर्थ शोधताना ज्या अन्य संतांच्या अभंगांचा संदर्भ घेतला आहे ते सर्व अभंग वारकर्‍यांसाठी तीर्थयात्रा आवश्यक, पुण्यफलदायी आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणार्‍या असल्याचेच प्रतिपादित करतात. संत एकनाथ त्यांच्या भारुडातून या तीर्थयात्रेच्या एका वेगळ्या लाभावर लक्ष केंद्रित करताना म्हणतात, ”तीर्थव्रते असोनी त्यागिली।म्हणोनी बहिरा झालो या जगी।. अर्थात, तीर्थयात्रा उत्तम श्रवणाची देतात. हे श्रवण साधकाला समृद्ध करते. म्हणून तीर्थयात्रा अट्टहासाने कराव्यात ही संत एकनाथांची भूमिका आहे.
तीर्थव्रती भाव धरीरे करुणा। शांती दया पाहूणा हरीकरी। असे संत ज्ञानेश्वर हरिपाठ ग्रंथात म्हणतात. संत तुकाराम तर तीर्थयात्रेसाठी आयुष्याच्या संध्याकाळची वाट पाहू नको असे सांगताना, ”जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जाय चुकों नको। असे म्हणतात. संत नामदेव तीर्थावळीच्या अभंगात वाचताना म्हणतात, “गंगा,गंगा।सकळ पापे जाती भंगा।दृष्टी पडता ब्रह्मगिरी।त्यासी नाही यमपुरी ।नामा म्हणे प्रदक्षिणा।त्याचे पुण्या नाही गणना।” वारकर्‍यांच्या नेमाची चर्चा करताना संत म्हणतात, ”पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम । हाचि आम्हा नेम सर्व काळ।”असे म्हणतात.
वारकरी संत तीर्थयात्रेचे केवळ महत्त्व सांगून थांबत नाहीत; तर स्वत: तीर्थयात्रा करण्यात पुढाकारदेखील घेतात. संत ज्ञानेश्वरांनी नामदेवादी संतांना आग्रह करून मोठी तीर्थयात्रा केली आणि सनातन धर्माच्या अनेक तीर्थस्थानावर विविध विधी केल्याचे दाखले तीर्थावळीच्या अभंगात आढळतात. संत एकनाथांनीदेखील काशीसह अनेक तीर्थांच्या यात्रा केल्याचे त्यांच्या चरित्रावरून स्पष्ट होते. ज्यांना या तीर्थयात्रा अनेक कारणांनी शक्य होत नाहीत त्यांच्यासाठी सकळही तीर्थे घडती एक वेळा । चंद्रभागा डोळा देखियेले । असे सांगून त्यांच्या मनातील तीर्थयात्रा राहिल्याची सल काढून टाकतात. अशांसाठी तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल; असा सल्ला संत देत नाहीत याचाच अर्थ वारकरी संत तीर्थयात्रेला आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्वाचे साधन मानतात हे स्पष्ट होते.
थोडक्यात, वारकरी संप्रदाय हा सनातन धर्माचाच एक पंथ असून या संप्रदायाला सनातन परंपरा आणि सिंहस्थ इत्यादी व्रत वैकल्ये या संबंधी कुठलाही आक्षेप नाही. संप्रदाय संतांचा आग्रह आहे तो बाह्य उपचाराहून अंतरंग शुद्धीचा. चित्त शुद्ध नसेल तर कुठलीच साधना फलद्रूप होत नाही ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. अर्थात, या भूमिकेला सनातन धर्म कायमच पुरस्कृत करत आला आहे. असे असले तरी आता सिंहस्थाच्या निमित्ताने बुद्धिभेद करणारी, जातीपातीचे गणित मांडणारी आणि विश्व कल्याणाचा विचार देणार्‍या आध्यात्मिक परंपरेला बदनाम करण्याचे काम करणार्‍या या टोळ्या अधिक सक्रीय होतील. त्यांचा हा कावा सामान्य वारकर्‍यांच्या लक्षात यावा, म्हणून हा शब्द प्रपंच.
 
 
शेवटी या टोळ्या ज्यांचा बुद्धिभेद करायला जातील, त्या सर्वांना संतवचनांचा खरा अर्थ समजून घेण्याची प्रेरणा होवो. या टोळ्यांना संतांची वाणी समजो. त्यांच्या विघातक भूमिकांचा पुनर्विचार करण्याची बुद्धी लाभो. हीच श्रीपांडुरंग चरणी प्रार्थना !