केवळ निसर्ग दर्शन किंवा देवदर्शन एवढ्यापुरतेच आता पर्यटन मर्यादित राहिलेले नाही. मैदानातला खेळ आणि प्रवासाची ओढ जेव्हा एकत्र येते, तेव्हा जन्म होतो तो ‘स्पार्टस् टुरिझम’चा! आयपीएलची मॅच असो किंवा साहसी ट्रेकिंग, आजचा तरुण या खेळांच्या निमित्ताने जग पालथे घालतोय. केवळ छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता भविष्यातील एक महाकाय अर्थव्यवस्था आणि करिअरची मोठी संधी म्हणून आकाराला येतोय. येत्या काळात क्रीडा पर्यटनामुळे रोजगाराची कोणती नवी दालने उघडणार आहेत? याचा हा वेध...
उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे जसे मस्त फिरायला, पर्यटनासाठी योजना आखत असतात, तसेच आम्हीही एक वेगळी सफर ठरवली आहे - पण ही सफर आहे, क्रीडा पर्यटनाची!
खेळ, उत्साह आणि प्रवास यांचा संगम असलेल्या या अनोख्या क्षेत्राची ओळख करून घेण्यासाठी चला, एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया.
आजच्या वेगाने बदलणार्या जगात पर्यटन आणि क्रीडा या दोन क्षेत्रांचा संगम म्हणजे स्पोर्टस् टुरिझम (Sports Tourism). काही वर्षांपूर्वीपर्यंत हा विषय मर्यादित प्रमाणात चर्चेत होता; मात्र आज भारतात हे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि युवकांसाठी एक उज्ज्वल, आकर्षक आणि भविष्याभिमुख करिअर पर्याय म्हणून समोर येत आहे.
गेल्या दहा वर्षांत भारतात क्रीडा पर्यटन (Sports Tourism) हा पर्यटन क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारा घटक बनला आहे. खेळ पाहण्यासाठी किंवा खेळात सहभागी होण्यासाठी प्रवास करणे ही संकल्पना आता केवळ छंद राहिली नसून ती एक मोठी आर्थिक आणि व्यावसायिक संधी बनली आहे. IPL, मॅरेथॉन, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, कबड्डी लीग, अॅडव्हेंचर स्पोर्टस् यांमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कल्पना करा - एक विद्यार्थी क्रिकेटचा चाहता आहे. तो स्पोर्टस् टुरिझममध्ये शिक्षण घेतो आणि पुढे IPL टीम्ससाठी ट्रॅव्हल कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो.
- दुसरा विद्यार्थी अॅडव्हेंचर स्पोर्टस्मध्ये आवड ठेवतो आणि हिमालयात स्वतःची ट्रेकिंग कंपनी सुरू करतो.
* याचा अर्थ-स्पोर्टस् टुरिझम तुम्हाला नोकरीच नाही, तर स्वतःचा मार्ग तयार करण्याची संधी देते.
भारतामध्ये स्पोर्टस् टुरिझम वाढण्यामागे अनेक ठोस कारणे आहेत ः-
* मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन- IPL, प्रो-कबड्डी, ISL, मॅरेथॉन स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसामने या सर्वांमुळे देशभरातून आणि परदेशातून प्रेक्षक प्रवास करतात.
* अॅडव्हेंचर स्पोर्टस्ची वाढ - हिमालयीन ट्रेकिंग, ऋषिकेशमधील रिव्हर राफ्टिंग, बिर-बिलिंगमधील पॅराग्लायडिंग यांमुळे तरुणांमध्ये साहसी पर्यटनाची आवड वाढली आहे.
* फिटनेस आणि लाईफ स्टाईल ट्रेंड - आजचा युवक फिटनेसकडे अधिक लक्ष देतो. मॅरेथॉन, सायकलिंग इव्हेंट्स, योगा रिट्रीट्स यांमुळे स्पोर्टस् टुरिझमला चालना मिळते.
* क्रीडा प्रशिक्षण शिबिरे - क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसाठी विविध शहरांमध्ये आयोजित होणारे कॅम्प-विद्यार्थ्यांना आणि पालकांना आकर्षित करतात.
गेल्या दशकातील वाढ - डेटा आणि ट्रेंड
गेल्या 10 वर्षांत क्रीडा पर्यटनात झालेली वाढ पाहिली तर ती अत्यंत वेगवान आणि प्रभावी आहे.
* 2024 मध्ये भारतातील क्रीडा पर्यटन बाजारपेठ सुमारे USD 45 दशलक्ष होती आणि ती 2033 पर्यंत USD 275 दशलक्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
* या क्षेत्राचा वार्षिक वाढ दर (CAGR) सुमारे 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, जो अत्यंत उच्च मानला जातो.
* जागतिक स्तरावर क्रीडा पर्यटन बाजार 2023 मध्ये USD 564 अब्ज होता आणि दर वर्षी 10 टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढत आहे.
* भारतात गेल्या 5 वर्षांत क्रीडा प्रवास करणार्यांचे प्रमाण पाच ते सात टक्क्यांवरून 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
* 2024 मध्ये सुमारे 73 टक्के भारतीय प्रवासी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी प्रवास करण्यास उत्सुक होते.
यावरून स्पष्ट होते की क्रीडा पर्यटन हा केवळ ट्रेंड नसून भविष्यातील मोठा उद्योग आहे.
परंतु, या वाढत्या मागणीला पुरेसा प्रतिसाद देण्यासाठी भारताकडे आवश्यक पायाभूत सुविधा (Infrastructure) आहे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
होय, काही प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत.
भारताने गेल्या दशकात क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.
1. आधुनिक स्टेडियम आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्स
* नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद), वानखेडे (मुंबई), डी.वाय. पाटील स्टेडियम यांसारखी जागतिक दर्जाची स्टेडियम्स
* Khelo India यांसारख्या उपक्रमांमुळे नव्या सुविधांची उभारणी झाली.
2. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन
* IPL, Hockey World Cup, Pro Kabaddi League यांमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले.
ं* मोठ्या स्पर्धा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण बनतात आणि एकूण उत्पन्नात 58 टक्के हिस्सा देतात.
3. कनेक्टिव्हिटी आणि हॉस्पिटॅलिटी
* विमानतळ, हॉटेल्स, ट्रान्सपोर्टमध्ये सुधारणा.
* पर्यटन मंत्रालयाच्या 2024च्या सर्वेक्षण अहवालानुसार पर्यटनातून देशाला अंदाजे 35 अब्जांपेक्षा अधिक महसूल उत्पन्न झाला.
4. अॅडव्हेंचर आणि निसर्गाधारित क्रीडा
* हिमाचल, उत्तराखंड, गोवा येथे अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची वाढ
ं* IMARC ग्रुपच्या अहवालानुसार अॅडव्हेंचर पर्यटन क्षेत्र 17 टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढत आहे.
गेल्या दशकात क्रीडा पर्यटनाने भारतात जबरदस्त वाढ अनुभवली आहे. वाढते उत्पन्न, बदलती जीवनशैली, डिजिटल प्रभाव आणि मोठ्या क्रीडा स्पर्धांमुळे हे क्षेत्र वेगाने विस्तारत आहे.
भारतामध्ये क्रीडा पर्यटनासाठी मजबूत पाया तयार झाला आहे. पण तो अजून पूर्णपणे विकसित झालेला नाही. मोठ्या शहरांमध्ये सुविधा उपलब्ध असल्या तरी देशभर समान दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.
जर योग्य नियोजन, गुंतवणूक आणि कौशल्य विकासावर भर दिला, तर क्रीडा पर्यटन भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक प्रमुख स्तंभ ठरू शकतो.
भारताला क्रीडा पर्यटनात जागतिक नेतृत्व मिळवायचे असेल, तर काही विकास, सुविधा महत्त्वाच्या आहेत.
1) सर्व समावेशक पायाभूत सुविधा विकास
* टियर-2, टियर-3 शहरांमध्ये स्टेडियम, प्रशिक्षण केंद्रे.
* Sports Cities किंवा Sports Clusters विकसित करणे.
2) सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Public-Private Partnership)
* खाजगी गुंतवणूक वाढवून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे.
3) कौशल्य विकास (Skill Development)
* स्पोर्टस् टुरिझम, इव्हेंटमॅनेजमेंट, स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये अभ्यासक्रम.
* युवकांना रोजगारक्षम बनवणे.
4). जागतिक स्पर्धांचे आयोजन
* Olympic, Asian Games, World Cups यांसाठी प्रयत्न, यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक आकर्षित होतील
5) स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
* हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल.
* क्रीडा पर्यटनामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल.
हे क्षेत्र केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि युवा पिढीसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण करणारे एक शक्तिशाली माध्यम ठरत आहे.
खेळ आणि प्रवास यांचा संगम म्हणजेच क्रीडा पर्यटन - आणि भारत या क्षेत्रात आता नव्या उंचीवर पोहोचण्याच्या मार्गावर आहे
.
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.
(संदर्भ - काही जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त संशोधन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून डेटा पॉइंट्स घेतले आहेत.)