नसरापूर ते चाकण... विकृतीच्या उंबरठ्यावरचा समाज

विवेक मराठी    09-May-2026
Total Views |
@ डॉ. प्रिया प्रभू
women
 
नसरापूरची आणि चाकणमधील घटना मन सुन्न करणार्‍या आहेत. आपण कितीही प्रगत झालो, चंद्रावर गेलो, तरी आपल्या घरातली चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा जर सुरक्षित नसेल, तर ती प्रगती शून्य आहे. हा लढा फक्त पोलिसांचा किंवा कायद्याचा नाही. हा लढा आपल्या विचारधारेचा आहे. आपल्याला एक असा समाज घडवायचा आहे, जिथे पुरुषांमध्ये ‘संयम’ असेल आणि बालकांना ‘स्वातंत्र्य’. नसरापूरच्या त्या चिमुरडीला न्याय तेव्हाच मिळेल, जेव्हा आपण अशा नराधमांना पोसणारी मानसिकता मुळासकट उपटून फेकू.
 
 
नुकत्याच घडलेल्या काही घटनांनी महाराष्ट्राच्या मातीला काळिमा फासला आहे. नसरापूरमधील ती चार वर्षांची चिमुरडी आणि चाकणमधील तो तीन वर्षांचा कोवळा जीव... या एकापाठोपाठ घडलेल्या दोन घटना केवळ गुन्हे नाहीत, तर आपल्या सामाजिक आरोग्याचा खालावलेला स्तर दर्शवणारे ’अलार्म’ आहेत. जेव्हा 60 वर्षांचा माणूस चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतो आणि 16 वर्षांचा मुलगा तीन वर्षांच्या मुलाची अत्याचार करून हत्या करतो, तेव्हा प्रश्न फक्त कायद्याचा उरत नाही; तर तो प्रश्न येतो आपल्या संस्कारांचा, आपल्या मानसिकतेचा आणि आपण निर्माण केलेल्या या हिंसक वातावरणाचा.
 
 
नसरापूर आणि चाकण : दोन टोकांचं क्रौर्य
 
नसरापूरची घटना मन सुन्न करणारी आहे. 60 वर्षांचा एक नराधम, जो आधीच एका गुन्ह्यात ’पॅरोल’वर बाहेर होता, तो एका चार वर्षांच्या बालिकेला आपल्या वासनेचा बळी बनवतो. येथे व्यवस्थेचा पराभव स्पष्ट दिसतो. ज्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली, त्याने त्या संधीचा उपयोग पुन्हा एकदा क्रौर्य करण्यासाठी केला. दुसरीकडे, चाकणमधील घटना चिंतीत करणारी आहे. येथे पीडित तीन वर्षांचा मुलगा आहे आणि आरोपी अवघ्या 16 वर्षांचा किशोरवयीन मुलगा. ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तकेे आणि मैदानावर खेळ असायला हवेत, त्या वयात 16 वर्षांच्या मुलाच्या डोक्यात इतकी हिंसा आणि विकृती येते कुठून? हे दोन्ही गुन्हे सिद्ध करतात की, लैंगिक अत्याचार आणि हिंसा याला वयाचे बंधन राहिलेले नाही. पीडित असो वा आरोपी, वयाची गणिते आता कल्पनेपलीकडे चालली आहेत.
 
 
'गुड टच-बॅड टच’चा विरोधाभास
आपण कोणाला सुधारणा शिकवतोय?
 
आज प्रत्येक शाळेत आणि घरात आपण मुलांना ’गुड टच’ आणि ’बॅड टच’चे धडे देतो. पण यामागचा विदारक विरोधाभास कधी आपण लक्षात घेतला आहे का? ज्या मुलाला/मुलीला अजून जगाचे भान नाही, ज्याला नात्यातली गुंतागुंत कळत नाही, त्या तीन-चार वर्षांच्या मुलाला आपण ’स्वसंरक्षण’ शिकवतोय. हे म्हणजे सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला शस्त्र न देता, घरातल्या लहान मुलाला शत्रू आला तर कसे वाचायचे हे शिकवण्यासारखे आहे. खरा प्रश्न हा आहे की, आपण समाजातील पुरुषांना आणि तरुणांना ’नो टच’(No Touch) का शिकवत नाही? दुसर्‍याच्या संमतीशिवाय(Consent) त्यांच्या शरीराला स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार नाही, हे मोठ्या मुलांच्या आणि पुरुषांच्या मनावर का बिंबवले जात नाही? आपण जबाबदारीचे ओेझे या कोवळ्या पीडितेवर टाकत आहोत. तुला ओरडता आले पाहिजे, तुला पळता आले पाहिजे - पण त्या 60 वर्षांच्या राक्षसाला किंवा 16 वर्षांच्या
 
हिंसक मुलाला कोण थांबवणार?
पुरुषांची जबाबदारी 'Not All Men' च्या पलीकडे
 
जेव्हा अशी कोणतीही घटना घडते, तेव्हा सोशल मीडियावर लगेच एक गट सक्रिय होतो, जो म्हणतो, “सगळेच पुरुष सारखे नसतात.” हे खरे आहे, पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? आज पुरुषांनी हे मान्य करण्याची गरज आहे की, हा प्रश्न ’पुरुषांच्या मानसिकतेचा’आहे. स्त्रियांवर किंवा बालकांवर होणारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त अत्याचार हे ओळखीच्या पुरुषांकडून होतात. पुरुष म्हणून आपली जबाबदारी ही केवळ मी गुन्हा करत नाही, इथपर्यंत मर्यादित नाही. तर आपल्या मित्रमंडळात, आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये जेव्हा एखादा पुरुष स्त्रीबद्दल अपमानास्पद बोलतो, जेव्हा एखादा मुलगा अश्लील पॉर्नोग्राफी बघून त्याचे समर्थन करतो, तेव्हा त्याला तिथेच रोखणे ही प्रत्येक पुरुषाची सामाजिक जबाबदारी आहे. जोपर्यंत पुरुष समाज या गुन्हेगारांना ’आपला’ मानणे बंद करत नाही, तोपर्यंत हा लढा अर्धवट आहे.
 
 
विकृतीचे मूळ
पॉर्नोग्राफी आणि असमानता, असंवेदनशीलता
 
चाकणमधील 16 वर्षांच्या मुलाने 3 वर्षांच्या मुलावर अत्याचार का केला असावा? याचा विचार केला तर आपल्याला डिजिटल जगातील भीषणता लक्षात येईल. इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारी पॉर्नोग्राफी आणि हिंसक व्हिडिओ मुलांच्या मेंदूवर खोलवर परिणाम करत आहेत. त्यांच्यासाठी ’मैथुन’ आणि ’हिंसा’ यातील पुसट होत चाललेली रेषा हा चिंतेचा विषय आहे. संवादाचा अभाव आणि एकटेपणामुळे मुले अशा विकृत जगाकडे आकर्षित होत आहेत.
 
 
नसरापूरच्या 60 वर्षांच्या आरोपीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हा मानसिक विकृतीचा कळस आणि सत्तेचा (Power Dynamics) खेळ आहे. स्वतःला ’शक्तिशाली’ सिद्ध करण्यासाठी एका हतबल जीवावर लैंगिक अत्याचार करणे, ही अत्यंत भ्याड आणि विकृत मानसिकता आहे. तसेच, स्त्रियांना किंवा बालकांना ’वस्तू’ किंवा ’भोग्य’ समजण्याची ही जी समाजाची वर्षानुवर्षांची मानसिकता आहे, तिच या गुन्ह्याचे मूळ आहे. बलात्कार हा केवळ लैंगिक विषय नसून तो दुसर्‍यावर आपली सत्ता गाजवण्याचा आणि त्याला चिरडण्याचा प्रकार आहे हे आपण विसरता कामा नये.
 
नसरापूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘लैंगिक शोषण करणार्‍या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका’, असे निर्देश विधी व न्याय विभागाला नुकतेच दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. कायद्याचा धाक हे गुन्हे थोड्या प्रमाणात कमी करू शकतील. 
 
 
कायदेशीर पळवाटा आणि ’पॅरोल’चा प्रश्न
 
नसरापूरचा आरोपी पॅरोलवर बाहेर होता. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणार्‍या गुन्हेगारांना ’पॅरोल’ देताना त्याचे निकष काय असावेत? जर एखाद्याने बालकावर किंवा महिलेवर अत्याचार केला असेल, तर त्याला पुन्हा समाजात फिरण्याची संधी मिळणे हे पीडितेसाठी दुसरे मरण आहे. कायद्याचा धाक राहिला नाही, हेच या घटनांतून सिद्ध होतेय. सर्व प्रकारच्या बलात्काराच्या आरोपींना - मग ते कोणत्याही पदावरचे असोत वा कोणत्याही वयाचे - समान आणि कठोर शासन मिळणे ही काळाची गरज आहे. नसरापूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लैंगिक शोषण करणार्‍या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका’, असे निर्देश विधी व न्याय विभागाला नुकतेच दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. कायद्याचा धाक हे गुन्हे थोड्या प्रमाणात कमी करू शकतील. मात्र कायदा व्यक्तिपरत्वे बदलतो असे जाणवले तर या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते.
 
 
सोशल मीडिया आणि समाजाचे असंवेदनशील वागणे
 
आजकाल कोणतीही घटना घडली की आपल्याला ’व्हायरल’ होण्याची घाई असते. नसरापूरच्या घटनेनंतर पीडितेची ओळख पटेल असे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करणे, तिच्या वेदनेचे उदात्तीकरण करणे हे अत्यंत संतापजनक आहे. आपण एखाद्याच्या दुःखाचा ’तमाशा’ करतोय का? मीडियाने सुद्धा टीआरपीच्या शर्यतीत आपली नैतिकता गहाण ठेवली आहे का? भारतीय न्यायसंहितेनुसार पीडित व्यक्तीची ओळख कोणत्याही प्रकारे उघड करणे यासाठी देखील शिक्षेची तरतूद आहे. मात्र नकळत वा जाणूनबुजून ढठझसाठी आपण गोपनीयता पाळत नाही. एखादी घटना घडल्यावर फक्त मेणबत्त्या पेटवून आणि संताप व्यक्त करून आपण मोकळे होतो. पण पीडितेच्या कुटुंबाला ज्या सामाजिक बहिष्काराला किंवा नजरांना सामोरे जावे लागते, त्याचा विचार आपण करतो का? समाजाने पीडितेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, आरोपीला लपवण्यापेक्षा त्याला नाकारणे ही आपली सामूहिक नैतिकता असायला हवी. कारण शेवटी समाज म्हणजे आपणच.
 
 
महाराष्ट्र-सद्यस्थिती आणि उपाय
 
महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य मानले गेेले आहे. पण आज आपण ज्या वळणावर उभे आहोत, तिथे ही ओळख पुसली जाण्याची भीती वाटते. दररोज महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या बातम्या येतात. 2025मध्ये राज्यभरात POCSOअंतर्गत 10131 गुन्हे नोंदवले गेले. 2026मध्ये यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. कारण केवळ एप्रिल 2026 अखेर 3279 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे सध्या दर 53 मिनिटाला एक पुरुष एका बालिकेवर अत्याचार करत आहे. लक्षात घ्या, बदनामी होऊ नये म्हणून कितीतरी गुन्हे कधीच नोंदवले जात नाही. म्हणजे या गुन्ह्यांचे प्रमाण किती जास्त असेल. यावर उपाय काय? मूल्यशिक्षण (Power Dynamics): मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात ’लिंगभाव समानता’ (Gender Equality) हा विषय अनिवार्य असावा.
जेणेकरून हळूहळू पुढील पिढीमध्ये ही मूल्ये रुजू शकतील. सजग पालकत्व (Parenting) - पालकांनी आपल्या मुलांशी लैंगिकता, संमती (Consent) आणि भावनांचा आदर या विषयांवर मोकळेपणाने बोलायला हवे. तसेच पालकांच्या वागण्यातही हे दिसायला हवे. जलद न्याय (Fast Track Courts) - अशा गुन्ह्यांचा निकाल सहा महिन्यांच्या आत लागायला हवा, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. समुपदेशन सुविधा-किशोरवयीन मुलांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती रोखण्यासाठी मोफत समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.
 
आपल्या पाल्यांना कसे सुरक्षित ठेवायचे?
 
जोपर्यंत समाजामध्ये वरील उपायांनी काही बदल होत नाहीत तोवर आपण आपल्या मुलांना न घाबरवता ’जागृत’ करायला हवे.
विश्वासार्ह संवाद : आपल्या पाल्याला खात्री द्या की, जगात काहीही झालं तरी तो/ती तुमच्याकडे येऊन सांगू शकतात. त्यांनी काही सांगितले तर त्यांच्यावर ओरडू नका. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा.
 
शरीराचा आदर : मुलाला सांगा की, तुझ्या शरीराचा तू मालक आहेस. कोणीही तुला ’अनकम्फर्टेबल’ वाटेल असा स्पर्श करू शकत नाही, मग तो नातेवाईक का असेना. तसेच इतरांच्या शरीराला संमतीशिवाय स्पर्श करणे चुकीचे आहे.
 
सायबर सुरक्षा : मुले मोबाईलवर काय बघतात, त्यांचे मित्र कोण आहेत, यावर लक्ष ठेवा पण ’हेरगिरी’ न करता, ’मैत्री’च्या नात्याने.
 
भावनांची ओळख : मुलांना राग, भीती आणि दुःख योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा; जेणेकरून ते हिंसेपासून दूर राहतील.
एक साद माणुसकीला...
 
नसरापूर आणि चाकणच्या घटनांनी आपल्या समाजाच्या चेहर्‍यावरचा बुरखा फाडला आहे. आपण कितीही प्रगत झालो, चंद्रावर गेलो, तरी आपल्या घरातली चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा जर सुरक्षित नसेल, तर ती प्रगती शून्य आहे. हा लढा फक्त पोलिसांचा किंवा कायद्याचा नाही. हा लढा आपल्या विचारधारेचा आहे. आपल्याला एक असा समाज घडवायचा आहे, जिथे पुरुषांमध्ये ’संयम’ असेल आणि बालकांना ’स्वातंत्र्य’. नसरापूरच्या त्या चिमुरडीला न्याय तेव्हाच मिळेल, जेव्हा आपण अशा नराधमांना पोसणारी मानसिकता मुळासकट उपटून फेकू. चला, आज शपथ घेऊया- आपण फक्त ’बॅड टच’ शिकवणार नाही, तर आपण आपल्या घरातील मुलाला ’उत्तम माणूस’ बनवू आणि आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री आणि मुलाला सुरक्षिततेचा विश्वास देऊ!
लेखिका एम.डी. रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे कार्यरत आहेत.