विजयाच्या खर्या शिल्पकार ममता बॅनर्जी आहेत. म्हणून ममतादीदी, वंदे मातरम्! तुम्ही अगोदर बंगालमधून कम्युनिझम संपवला, काँग्रेसची घराणेशाही संपविली, दोन मोठे अडसर दूर केले, त्याबद्दल धन्यवाद आणि हिंदूवर प्रचंड अत्याचार करून त्याला असुरक्षित करून, महिलांना असुरक्षित करून हिंदूमध्ये असित्त्वरक्षणाची जागृती केलीत, त्याबद्दल धन्यवाद. विजय हा या असित्त्वरक्षणाचा आहे.
राष्ट्राच्या जीवनात काही क्षण असे असतात की, ज्यांचे वर्णन इतिहास घडविणारे क्षण या शब्दाने करावे लागते. 18 मे 2014 हा असा दिवस आहे, या दिवशी भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तास्थानी आली. ‘दि गार्डियन’ वर्तमानपत्र आपल्या संपादकीयत म्हणतो,“आज, 18 मे 2014 इतिहासात अशा प्रकारे नोंदविला जाईल की, हा दिवस ब्रिटीशांनी भारताला अंतिमतः सोडून देण्याचा दिवस नोंदविला जाईल.” हाच संदर्भ धरून असे म्हणता येईल,“4 मे 2026 या दिवसाची नोंद इतिहासात या प्रकारे केली जाईल की, या दिवशी भारतीय राजकारणात समाजवाद, साम्यवाद, सेक्युलरवाद, आणि तुष्टीकरणवाद हा गाडला गेला.” आसाम आणि पश्चिम बंगालमधील भाजपाचा विजय हा केवळ विधानसभेत बहुमत मिळविण्याचा विजय नाही, हा वैचारिक विजय आहे.
दर पाच वर्षांनी भारतातील राज्यात निवडणुका होतात, तो लोकशाहीचा उत्सव असतो. एखादा पक्ष जिंकतो आणि बाकीचे पक्ष हरतात किंवा कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. मग तीन-चार पक्ष एकत्र येतात आणि सत्ता ग्रहण करतात. ही सर्वसामान्य प्रक्रिया झाली. बंगालच्या निवडणुकीचा विषय करायचा तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हरली आणि भाजपाने सत्ता संपादन केली, एवढ्यापुरते हा विषय नाही. ममतादीदी हरल्या आणि भाजपा जिंकला, हे फार सोपे विश्लेषण झाले. ममतादीदी या कम्युनिझमचा हिंसाचार, काँग्रेसचा सेक्युलॅरिझम आणि टोकाचे मुस्लीम तुष्टीकरण राजनिती, गुंडशाही आणि राज्य दहशतवादाचे प्रतीक झाल्या होत्या. त्यांच्या पंधरा वर्षांच्या काळात शेकडो भाजपा कार्यकर्ते मारले गेले. त्यात मोठी संख्या संघ स्वयंसेवकांची आहे.
अत्यंत क्रूरपणे राज्य करण्याची जागतिक स्तरावरील महिलांची दोन उदाहरणे आहेत, पहिलीचे नाव आहे, कॅथेरीन डी मेडिसी, फ्रान्स (कालखंड 1547-1549) आणि दुसरीचे नाव आहे, कॅथेरीन दी ग्रेट, रशिया (कालखंड 1762-1796) या दोन महिला राज्यकर्त्यांनी आपापल्या राज्यांतील आपलेच नागरिक फार निदर्यपणे ठार मारले आहेत. कॅथेरीन मेडिसीने सेंट बार्थोलोम्यू दिवस (ख्रिश्चनांचा पवित्र दिवस पॅरिसमध्ये एक रात्रीत तीन हजार प्रोटेस्टंट कापून काढले.) कॅथेरीन दी ग्रेटने सत्ता बळकविण्यासाठी आपल्या नवर्यालाच येशूच्या स्वर्गात पाठवून दिले. त्याला साथ देणार्या सरदार घराण्याच्या कत्तली केल्या. एवढी भीषण क्रूरता ममतादीदीने केली नसली तरी राज्यकर्ती म्हणून क्रूरतेचा त्यांचा प्रवास या दोन कॅथेरीनची आठवण करून देणारा आहे.
कॅथेरीन डी मेडिसी (फ्रान्स) आणि कॅथेरीन दी ग्रेट (रशिया)
यांची आठवण होईल एवढ्या क्रूरपणे ममतादीदींनी राज्य केले.
ममतादीदी म्हणजे घमेंड, सत्तेचा माज, विरोधकांना दडपून टाकण्याची खुनशी मानसिकता आणि महात्मा गांधींनी केले नसेल एवढे मुस्लीम तुष्टीकरण याचे निंदनीय उदाहरण आहेत. या वर्षी सादर केलेल्या बजेटमध्ये त्यांनी मुस्लीम मदरसे आणि अजान सांगणारे मुल्लामौलवी यांच्यासाठी 70 हजार कोटींची तरतूद केली. अबब म्हणावी एवढी ही मोठी रक्कम आहे. बंगालमध्ये बाबरी मशीद उभे करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पश्चिम बंगालमधील टीएमसीची खासदार आणि अभिनेत्री सायोनी घोष यांच्या ‘हृदय मजे काबा, आखो मजे मदीना’ या गाण्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. सर्व बंगाल घुसखोर आणि स्थानिक मुस्लीमांच्या घशात घालणारे हे राजकारण अतिभयानक. देशाचा घात करणारे, सनातन धर्माला काळीमा फासणारे, आणि बंगालच्या उज्ज्वल परंपरेला मातीमोल करणारे होते. ममताचा पराभव या विचारधारेचा, या मानसिकतेचा, आणि अतिभयानक रावणी व दुर्योधनी प्रवृत्तीचा पराभव आहे. हा केवळ ममता बॅनर्जी नावाच्या एका राजनितिक नेत्याचा पराभव नाही, हा विचारधारेचा पराभव आहे. म्हणून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या विचारधारेचा पराभव हिंदुत्वाच्या विचारधारेने केला आहे. भाजपाचा विजय हा केवळ एका पक्षाचा विजय नाही, तर हा विजय एका विचारधारेचा विजय आहे. यातील गंमत अशी की, हिंदुत्वाच्या विचाराची जन्मभूमी बंगाल आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ संस्थापक डॉ. हेडगेवार ही सर्व नावे नंतरची आहेत. हिंदुत्व हा शब्द प्रथम चंद्रनाथ बसू यांनी 1892साली उपयोगात आणला आहे. हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी त्यांनी केली. बंगाली हिंदू अस्मिता त्यांनी प्रभावीपणे अधोरेखित केली, त्यांचा वारसा पुढे बंकीमचंद्र चॅटर्जी यांनी चालविला. वंदे मातरम् हे त्यांचे गीत मातृभूमीचे स्तवन हे स्वातंत्र्य आंदोलनाचा मंत्र झाला. या गीताची रचना 7 नोव्हेंबर 1875 साली झाली आणि 1882 साली ते प्रकाशित झाले. भारत ही केवळ भूमी नसून ही सचेतन आहे, जगतजननीचे रूप आहे. तीच दुर्गा आहे, तीच लक्ष्मी आहे आणि तीच सरस्वती आहे. कोटी कोटी हातांची ही भारतमाता सुजलाम्, सुफलाम्, शस्यश्यामलाम् असे हे भारतमातेचे रूप आहे. असे भावोत्कट वर्णन वंदे मातरम् या गीतात आहे.
बंगालचा विजय हा वंदे मातरम् भावनेचा विजय आहे. भारतातील मुस्लीम आक्रमणापासून हिंदू समाज हजारो कुंभकर्णांना लाजवील अशा झोपेत गेला. कितीही त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्या स्वार्थी कवचातून बाहेर आला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, तो सर्वांच्या लाथा खात बसला. हजारो मैलांवरून तुर्क आले, त्यांनी लाथा हाणल्या. अरबस्तानातून अरब आले, त्यांनी लाथा हाणल्या. मध्य आशियातून मोगल आले, त्यांनी देश तुडविला. जन्मस्थानावरील राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली. नंतर इंग्रज जळवा भारतातील हिंदू समाजाला लागल्या, त्यांनी हिंदू समाजाला अस्थिपंजर करून टाकले. त्याच्या मेंदूत देश बुडविणार्या कल्पना घुसविल्या. या सर्वांविषयीचा उद्रेक प्रथम बंगालमध्ये झालेला आहे. म्हणून बंगालविषयी म्हटले गेले की, बंगाल आज जो विचार करतो, तो विचार पन्नास वर्षांनंतर देश करायला लागतो. स्वदेशी चळवळ बंगालने केली, सशस्र क्रांतीकारी बंगालने दिले, सुभाषचंद्र बोस बंगालने दिलेे, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर बंगालने दिले. बंगाली चित्रशैली, बंगाली संगीत, आणि चित्रपटाने बंगालने दिलेला एक श्रेष्ठ दर्जा असा बंगाल मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वालामुखीने भारून गेला नाही.
तेथला हिंदू समाज सेक्युलॅरिझमची भांग पिऊन गुंगीत गेला. कम्युनिझमची दारू त्याला चढली. तिथले बुद्धिमान ज्यांना भद्र लोक असा शब्दप्रयोग केला जातो, ते हिंदुत्वाविषयी अभ्रद बोलू लागले. 47साली अर्धा बंगाल गेला, तो मुसलमान झाला आणि तेथून घुसखोरांच्या लाटामागून लाटा हिंदू बंगालमध्ये घुसू लागल्या. लोकसंख्येचे संतुलन बिघडत चालले. स्वातंत्र्यानंतर 77सालापर्यंत काँग्रेसचे राज्य होते. म्हणजे सेक्युलर भांगी आणि तुष्टीकरणाची नांगी यांचे राज्य सुरू झाले होते. 1977 ते 2011 विदेशी विचारांवर पोसलेले कम्युनिस्ट सत्तास्थानी आले. त्यांनी समांतर गुंडसेना निर्माण केली, त्याला पक्षाचे केडर म्हटले गेले. जो पक्षाला मत देणार नाही, विरोध करेल, त्याला सुखाने जगू द्यायचे नाही, अशी प्रचंड दहशत त्यांनी निर्माण केली. भारतातील तथाकथित मानवतावादी, संविधानवादी, मानवी हक्कवादी तोंडात बोळा घेऊन आणि डोळ्याला पट्टी बांधून बसले. द्रौपदीचे वस्त्रहरण चालू आहे आणि मख्खपणे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य पाहत बसले आहेत आणि त्यांनी आपल्या कर्माने आपले मरण जवळ आणले.
या हिंदू समाजाला त्याच्या मोहनिद्रेतून जागविण्याचा यज्ञ डॉ. हेडगेवारांनी सुरू केला. स्वतःच्या जीवनाची आहुती त्यात अर्पण केली. श्रीगुरूजींनीदेखील तेच केले. जोपर्यंत हा समाज जागा होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. सर्व काही सहन करायचे आणि मृत्यू आला तर तोही आनंदाने स्वीकारायचा. ‘माघार ना जन्मात ठाऊकही, होऊ देत आघात’ या ओळी जगणारे हिंदू उभे राहिले. याच संघविचाराधाचे पाईक असलेले विद्यमान सरकार डोळ्यांत तेल घालून बंगालच्या सुप्त हिंदुत्वासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होते. भाजपा पक्षश्रेष्ठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना संघ स्वयंसेवक आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी बहुमोल साथ दिली. त्याचा परिणाम म्हणून बंगालमधील झोपलेला हिंदू जागा झाला. या निवडणुकीत त्याने विक्रमी मतदान केले आणि त्याच्या विनाशाचे स्वप्न पाहणार्या सत्तेला सिंहासानावरून खाली खेचले. ही जागृती कायम ठेवावी लागेल. जागृतीची ज्योत निरंतर तेवत ठेवावी लागेल. अर्धा बंगाल सनातन विचारांच्या पंखात आला उरलेला अर्धा बंगाल भविष्यात सनातन पंखाखाली आणायचा आहे. म्हणून अखंड बंगालचा विषय बंगालनेच सुरू केला पाहिजे. अखंड भारताची ऊर्जा त्यातून निर्माण होईल, एवढे महत्त्व या बंगालच्या विजयाचे आहे.
शेवटी या विजयाच्या खर्या शिल्पकार ममता बॅनर्जी आहेत. म्हणून ममतादीदी, वंदे मातरम्! तुम्ही अगोदर बंगालमधून कम्युनिझम संपवला, काँग्रेसची घराणेशाही संपविली, दोन मोठे अडसर दूर केले, त्याबद्दल धन्यवाद आणि हिंदूवर प्रचंड अत्याचार करून त्याला असुरक्षित करून, महिलांना असुरक्षित करून हिंदूमध्ये असित्त्वरक्षणाची जागृती केलीत, त्याबद्दल धन्यवाद. विजय हा या असित्त्वरक्षणाचा आहे.