@प्रा. डॉ. संजय चाकणे
7020674545
महाराष्ट्रातील दुर्गम गड-किल्ले आणि कड्या-कपार्यांवर पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करणे अशक्य होते. अशा खडतर जागी घरातील टाकाऊ मातीच्या मडक्यांचा वापर करून ‘बीज मटका’ ही शून्य खर्चाची शास्त्रीय पद्धत शोधण्यात आली आहे. गेल्या 22 वर्षांत हजारो विद्यार्थ्यांच्या मदतीने सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत फेकलेल्या या मटक्यांतून आज हिरवीगार झाडी डोलत आहे. यंदाच्या पावसाळ्यात हाच ‘बीज मटका’ तयार करून निसर्गसेवेचा हा खारीचा वाटा आपणही कसा उचलणार, याविषयीचा हा विशेष लेख.
जुलै 2004. पावसाळ्याचे दिवस. आम्ही काही पर्यावरणप्रेमी शिक्षक व छडडच्या विद्यार्थ्यांनी एक ध्येय ठरवले -’मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायचे.’ पण पारंपरिक पद्धतीने खड्डे खणून रोपे लावणे आमच्या मनाला पटत नव्हते. कारण आमचे स्वप्न होते महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ले, टेकड्या व डोंगररांगा हिरव्यागार करण्याचे. समस्या अशी होती की यातील अनेक ठिकाणे इतकी दुर्गम, उभ्या कड्यांची व दर्याखोर्यांची आहेत की तिथे माणूसही पोहोचू शकत नाही, तर खड्डे खणून रोपे जगवणे तर दूरच.
या प्रश्नावर आमच्या अनेक बैठका झाल्या. खूप खल झाला. शेवटी ठरले की अशा उतारावर बीजारोपण हाच एकमेव मार्ग. पण नुसत्या बिया हवेत फेकल्या तर त्या वार्याने उडून जातील, पक्षी खातील, ऊन-पावसाने खराब होतील. हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे, हे मला माझ्या विद्यार्थ्यांना पटवून द्यावे लागले. मग विचारचक्र सुरू झाले आणि एक नवी कल्पना सुचली - ’बीज मटका पद्धत’.
ही कल्पना सुचण्याचे कारणही खास होते. आपल्या संस्कृतीत मातीच्या मडक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनातील बोळकी, संक्रांतीतील ओवसायची सुगडी, अक्षय तृतीयेचा कळसा व केळी - ही मडकी सण संपला की घरातील माजघरात, अडगळीत किंवा गच्चीवर वर्षानुवर्षे तशीच पडून असतात. तीच मडकी जर वृक्षारोपणासाठी वापरली तर? कचरा न होता ती पुन्हा निसर्गसेवेत रुजू होतील. यातूनच ’मटका बीज’चा जन्म झाला.
बीज मटका कसा तयार करायचा?
याचे शास्त्रही आम्ही ठरवले. आदल्या दिवशी निवडक देशी झाडांच्या बिया-जसे वड, पिंपळ, उंबर, करंज, बेल, चिंच, बाभूळ - कोमट पाण्यात तासभर भिजवायच्या. यामुळे बीजाची सुप्तावस्था संपून उगवण क्षमता वाढते. नंतर ती बी मातीत व उपलब्ध असल्यास शेणखतात एकजीव करून मातीच्या मडक्यात भरायची. मडक्याचे तोंड शेणाने किंवा ओल्या मातीने लिंपून टाकायचे. रात्रभर हे मडके तसेच ठेवल्याने आतील मिश्रण ‘मुरते’ आणि एक प्रकारची ‘मिनी नर्सरी’ तयार होते.
पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांतील छडड कार्यक्रमाधिकारी व प्रमुख विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. आमचा भर होता ‘काय करायचे’ यापेक्षा ‘कसे करायचे’ यावर. योग्य प्रशिक्षण मिळाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिशय सोपी झाली.
आणि आला तो दिवस,20 जुलै 2004. जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी व शिक्षकांनी एकाच वेळी मोहीम हाती घेतली. सप्तशृंगी गड, भीमाशंकर, कळसूबाई, सिंहगड, तिकोणा, लोहगड, शिवनेरी, राजगड, पुरंदर, विसापूर, जेजुरीचा कडेपठार, वज्रगड, कानिफनाथाचा डोंगर, दिवेघाट, तुकोबारायांचा भंडारा डोंगर, पुण्यातील पर्वती, विद्यापीठातील गणेशखिंडची टेकडी, चतु:शृंगी, पाषाण व हनुमान टेकडी अशा 25हून अधिक ठिकाणी आम्ही पोहोचलो. उंच कड्यावरून, दरीच्या टोकावरून शेकडो ‘मुरलेली बीज मटकी’ खोल दर्याखोर्यांत फेकली. पावसाचे पाणी मिळताच मडके भिजून हळूहळू फुटते, बी मातीसह जमिनीवर स्थिरावते आणि रुजून येते. नंतर निसर्गच त्याची काळजी घेतो.
आज 22 वर्षांनंतर जेव्हा मी त्या गड-किल्ल्यांवर जातो, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. जिथे कधी काळी उघडे-बोडके, रखरखीत डोंगर होते, तिथे आज हिरवीगार झाडी डोलताना दिसते. ती झाडे आमच्या विद्यार्थ्यांनी फेकलेल्या बीज मटक्यांतून आली आहेत. हीच आमची खरी कमाई. पर्यावरण संरक्षणासाठीचा हा आमचा ‘खारीचा वाटा’ नक्कीच मोलाचा ठरला आहे.
बीज मटका पद्धतीचे चार फायदे आहेत...
शून्य खर्च : घरातील टाकाऊ मडकी आणि सहज मिळणार्या देशी बियांचा वापर होत असल्यामुळे या पद्धतीला अजिबात खर्च येत नाही.
दुर्गम भागातही सहज शक्य : जिथे माणूस पोहोचू शकत नाही, अशा कड्या-कपार्यांवर हे मटके फेकता येत असल्यामुळे तिथे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत नाही.
बीजांचे उत्तम संरक्षण : मातीचे मडके बियांमधील ओलावा टिकवून धरते; तसेच वारा, ऊन आणि पक्ष्यांपासून बिया सुरक्षित राहतात.
100 टक्के नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक योजना : मडके आणि बिया दोन्ही पूर्णपणे नैसर्गिक असल्याने ही पद्धत पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता निसर्ग संवर्धन करते.
चला तर मग, यंदाच्या पावसाळ्यात आपणही घरातील जुनी मडकी शोधूयात. देशी बिया जमा करूयात. ‘बीज मटका’ तयार करून सह्याद्रीच्या कड्याकपारी पुन्हा हिरव्या करूयात. कारण एक झाड लावणे म्हणजे पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनचा कारखाना उभारणे होय.