आकाशवाणीची 90 वर्षे - नभातून नव्हे, जनमानसातून उमटलेला स्वर

विवेक मराठी    11-Jun-2026
Total Views |
 Akashvani , All India Radio
akashvani
 
 श्रीकांत तिजारे 
 9423383966
“नमस्कार, हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे...” किंवा “नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करीत आहोत..” रेडिओवरून येणारी ही साद ऐकली की आजही आकाशवाणीचा तो सुवर्णकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो. गेल्या 90 वर्षांपासून घराघरांमध्ये ऐकली जाणारी आपली ही लाडकी ‘आकाशवाणी’ केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी लोकांचा या माध्यमावर असलेला विश्वास आजही कायम आहे.
भारताच्या जनजीवनात काही संस्था अशा आहेत की, त्या लोकांच्या भावविश्वाचा भाग बनतात. ’आकाशवाणी’ ही त्यापैकीच एक. आज आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाकडे पाहताना हे स्पष्ट जाणवते की, हा केवळ प्रसारणाचा इतिहास नसून भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विकासाचा जिवंत दस्तावेज आहे.
 
 
’आकाशवाणी ही केवळ आकाशातून येणारी वाणी नाही, तर भारताच्या जनमानसातून उमटणारी सामूहिक चेतना आहे.’ हे विधान आकाशवाणीच्या कार्याचे अचूक वर्णन करते. आपल्या दिवसाची सुरुवात अनेक पिढ्यांनी आकाशवाणीच्या मंगल स्वरांनी केली. बातम्या, साहित्य, संगीत, नाट्य, लोककला आणि शैक्षणिक कार्यक्रमांमधून तिने समाजाला माहिती, संस्कार आणि मनोरंजनाचा अमूल्य ठेवा दिला.
 
 
मात्र आजची आकाशवाणी पूर्वीच्या आकाशवाणीपेक्षा अधिक व्यापक, अधिक संवादक्षम आणि अधिक आधुनिक झाली आहे. एकेकाळी श्रोत्यांची पत्रे येत असत; आज फोन-इन कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोते थेट कार्यक्रमात सहभागी होतात. प्रश्न विचारतात, अनुभव मांडतात आणि तज्ज्ञांशी संवाद साधतात. त्यामुळे आकाशवाणी केवळ बोलणारे माध्यम राहिले नसून संवाद साधणारे माध्यम बनले आहे.
 
विशेष म्हणजे ग्रामीण भारताला केंद्रस्थानी ठेवण्याचे कार्य आजही आकाशवाणी अत्यंत प्रभावीपणे करत आहे. दुर्गम गावांतील शेतकरी, युवा, महिला आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या समस्या, अनुभव आणि यशोगाथा देशासमोर आणल्या जातात. हीच आकाशवाणीची खरी ताकद आहे-ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते.
 
 
आज माहितीच्या महासागरात अनेक माध्यमे उपलब्ध असली तरी विश्वासार्हतेच्या बाबतीत आकाशवाणीचे स्थान अद्याप अढळ आहे. भाषेची शुद्धता, माहितीची खातरजमा आणि सामाजिक जबाबदारी ही तिची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच बदलत्या काळातही जनतेचा तिच्यावरील विश्वास कायम आहे.
 
akashvani 
 
डिजिटल युगाने आकाशवाणीसमोर नवी क्षितिजे खुली केली आहेत. आज आकाशवाणी केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही. ’इंटरनेट’, ’मोबाईल अ‍ॅप्स’, ’यूट्यूब’, ’फेसबुक’ आणि इतर सामाजिक माध्यमांमुळे तिचे कार्यक्रम जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहेत. थेट प्रसारण चुकले तरी कार्यक्रम नंतर ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी आकाशवाणीचे श्रोते आता केवळ भारतात नाहीत, तर जगभर विखुरलेले आहेत. विविध देशांतून येणारे फोन आणि प्रतिसाद हीच या डिजिटल क्रांतीची साक्ष देतात.
 
 
आज आकाशवाणीवर आरोग्य, गुंतवणूक, करिअर मार्गदर्शन, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि युवक विकास यांसारखे अत्याधुनिक विषय हाताळले जातात. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील आहे.
 
 
आकाशवाणीने भारतीय संगीत विश्वाला दिलेले योगदान तर अनन्यसाधारण आहे. विशेषतः शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी तिने केलेले कार्य अतुलनीय आहे. अनेक नामवंत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत भारतीय संगीत परंपरेचे जतन करण्याचे कार्य आकाशवाणीने केले आहे.
 
 
नागपूर आकाशवाणी केंद्रानेही अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. ’नागपुरातील रामजन्मोत्सव शोभायात्रेचे समालोचन’, ’एसएससी बोर्डाच्या निकालांचे प्रत्यक्ष स्थळावरून केलेले प्रसारण’, ’विद्यार्थी आणि पालकांच्या मुलाखती’, ’विद्यापीठ महोत्सव’, ’पुस्तक प्रदर्शनांचे थेट प्रसारण’ अशा अनेक उपक्रमांमुळे आकाशवाणी समाजाशी सतत जोडलेली राहिली आहे.
 
 
नुकत्याच झालेल्या G-20 परिषदेदरम्यान आयोजित ’संगीताची मैत्री’ या विशेष कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच आकाशवाणीच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ’स्वरसंधी’ या गीतांच्या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. नागपूरसह महाराष्ट्रातील विविध केंद्रांचे निवडक कार्यक्रम राज्यभर प्रसारित होत असल्याने कार्यक्रमांमध्ये विविधता आणि समृद्धी निर्माण होत आहे.
 
 
क्रिकेट समालोचनाचा विषय निघाला की आकाशवाणीची आठवण अपरिहार्य ठरते. दूरदर्शन सर्वत्र उपलब्ध होण्यापूर्वी लाखो भारतीयांनी क्रिकेटचा थरार आकाशवाणीच्या आवाजातून अनुभवला. 2011च्या विश्वचषकातील काही सामन्यांच्या समालोचनाची संधीही आकाशवाणीला मिळाली होती. प्रत्यक्ष मैदानावरील वातावरण श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची ही कला आकाशवाणीने जपली आहे.
 
 
2014पासून सुरू झालेला माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ’मन की बात’ हा कार्यक्रमदेखील आकाशवाणीच्या आधुनिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या कार्यक्रमाद्वारे देशाच्या कानाकोपर्‍यांतील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम निर्माण झाले आणि आकाशवाणीची लोकसंपर्कातील भूमिका अधिक बळकट झाली.
 
 
आकाशवाणीचे साहाय्यक केंद्र संचालक रजपूत यांनी व्यक्त केलेला संदेश विशेष महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते, ’युवकांनी रेडिओचे कार्यक्रम ऐकावेत, स्वतःला व्यक्त करण्याच्या संधींचा लाभ घ्यावा आणि लेखन, वक्तृत्व तसेच संवादकौशल्य विकसित करावे. आकाशवाणी हे केवळ प्रसारण माध्यम नसून ’व्यक्तिमत्त्व विकासा’चे एक प्रभावी व्यासपीठ आहे. बाल, तरुण, युवा आणि महिलांसाठी येथे असंख्य संधी उपलब्ध आहेत.
 
 
आज आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रवासाला अभिवादन करताना एक गोष्ट ठामपणे सांगता येते-
 
अनेकांनी ’भारत’ प्रथम पाहण्यापूर्वी ऐकला तो आकाशवाणीच्या स्वरांतून; आणि म्हणूनच ’आकाशवाणी’ हा भारताच्या आत्म्याचा आवाज आहे.
 
तंत्रज्ञान बदलत राहील, माध्यमे बदलतील, संवादाच्या पद्धती बदलतील; परंतु विश्वास, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा स्वर म्हणून आकाशवाणीचे स्थान सदैव अढळ राहील. म्हणूनच 90 वर्षांनंतरही आकाशवाणी ही केवळ एक माध्यम संस्था नाही, तर भारताच्या हृदयाची धडधड आहे.
 
स्वर जो भारताला जोडतो त्या आकाशवाणीचा 90 वर्षांचा गौरवशाली इतिहास अधिकाधिक वृद्धिंगत होत जावा, अशा आकाशवाणीला भरभरून शुभेच्छा!