@ काशीनाथ पवार
9423469329
महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक क्रांतीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजमन जागृत करण्यासाठी अपार कष्ट घेतले. ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना’, ‘सोलापूरचे पहिले विद्यार्थी वसतिगृह’ आणि निपाणी, मालवण, रहिमतपूर अशा गावोगावी झालेल्या परिषदा हा एक जिवंत इतिहास आहे. मृतप्राय झालेल्या बहुजन समाजाला स्वाभिमानाची संजीवनी देणारी बाबासाहेबांची अंगावर रोमांच फुलवणारी भाषणे याच काळात निर्माण झाली. चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याची वैचारिक पायाभरणी सांगणारेे हे महत्त्वपूर्ण विश्लेषण.
अस्पृश्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी 20 जुलै 1924 रोजी मुंबईत ’बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना झाली. या घटनेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका नव्या सामाजिक क्रांतीची दमदार सुरुवात तर केलीच होती. आता ’बहिष्कृत हितकारिणी सभे’ची माहिती आणि उद्देश समाजापर्यंत पाहोचवणे आवश्यक होते. त्यातूनच समाजाचा पाठिंबा सभेला मिळणार होता. समाजोद्धाराच्या दृष्टीने पाहता समाजाच्या पाठिंब्याशिवाय समाजात बदल घडवून आणणे अशक्य असते. त्यामुळे सभेला समाजाचा पाठिंबा मिळावा म्हणून योजना बनवण्याचे कार्य आता सुरू झाले आणि त्याबरोबरच बहिष्कृत हितकारिणी सभेचे सभासद कसे वाढतील याचेदेखील प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी प्रत्येक आठवड्यात शनिवार-रविवार या दोन दिवशी विविध ठिकाणी सभा ठरविण्यात येऊ लागल्या. फक्त चळवळीने अस्पृश्यांचा कार्यभाग साधणार नाही, त्यासाठी समाजाला ज्ञानार्जनाच्याही संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत याची जाणीव सभेच्या संस्थापकांना निश्चितच होती. म्हणूनच सभेने ज्ञानप्रसाराला प्राथमिकता देण्याचे ठरवले होते. पण त्यात असा एक अनुभव होता की,’शिक्षणासाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग पालक शिक्षणासाठी न करता ते पैसे संसारासाठी खर्च करून टाकतात’. हा विचार लक्षात घेऊन शिष्यवृत्ती देण्याऐवजी सभेने वसतिगृहे सुरू करून मुलांच्या राहण्या-जेवणासह शिक्षणाची सोय करण्याची योजना तयार केली आणि जानेवारी 1925ला सोलापूर येथे पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू झाले. या वसतिगृहासाठी शंकर परशा आणि सोलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. मुळे यांनी खूप मोलाची मदत केली. सोलापूर नगरपालिकेचे सभासद जीवाप्पा कांबळी यांची या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांकडूनच ‘सरस्वती विलास’ नावाचे हस्तलिखित मासिकही प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. होतकरू विद्यार्थ्यांना मदत आणि परितोषिके देण्याची प्रथाही सभेने सुरू केली. त्याबरोबरच रात्रीच्या शाळा आणि वाचनालये चालवायला सुरुवात केली, क्रीडामंडळेही स्थापन केली. आता तरुणांचा वेळ दारूच्या गुत्त्यांत, जुगाराच्या अड्ड्यांत आणि उनाडक्या करण्यात जाण्याऐवजी विद्यार्जनात जाऊ लागला. मैदानात जाऊ लागला. त्यांच्या जीवनाला आता योग्य तो आकार प्राप्त होऊ लागला.
चळवळही जोर धरायला लागली. सभासद संख्या चांगलीच वाढू लागली. सभेचा सर्व कारभार शिवतरकर अतिशय उत्तम रितीने पाहत होते. बाबासाहेबांच्या विचारांनी समाजासह कार्यकर्त्यांनाही हळूहळू चालना मिळायला लागली. नारायणराव काजरोळकर, सखारामबुवा काजरोळकर, बाळकृष्ण देवरूखकर, शिरसेकर, चांदोरकर, वनमाळी, बाळू बाबाजी पालवणकर, बोरधरकर या चर्मकार समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्ती बाबासाहेबांच्या ऑफिसात एकत्र येऊन बसत आणि विविध प्रश्नांवर चर्चा करत. ’मुंबईतील अस्पृश्यातील जातिभेद नष्ट करावा’, ’बहुजन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे सुरू करावीत’, ’लग्न समारंभ व सभा यांसाठी एक टोलेजंग हॉल बांधावा’, ’वर्तमानपत्र चालवावे’ अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आराखडे ही मंडळी बाबासाहेबांपुढे ठेवत आणि त्यावर चर्चा करत. ही सर्वच मंडळी बाबासाहेबांना जीवापेक्षा जास्त मानत, त्यांच्यावर निर्विकार प्रेम करत; पण शिवतरकरांवर मात्र काही कार्यकर्त्यांचा राग होता आणि त्याची काही खाजगी कारणेदेखील होती.
याविषयी एकदा बाबासाहेब असताना चर्चा झाली. त्यावर बाबासाहेब शिवतरकरांच्या विरोधकांना म्हणाले, “शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात राहतात. पडेल ती संस्थेची कामे करतात. तुम्ही त्यांना विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणाने काम करणारा आहे, त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही तर मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज दोघांचाही फायदा होईल. अस्पृश्य समाजाचे प्रश्न फार बिकट आहेत, हे सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु हे सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. आपापसात जर अशी तेढ पिकवीत राहिलात तर मग मलाच काय, पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही या बाबतीत काहीही करता येणार नाही.” साहेबांच्या या भाषणाचा सदस्यांवर चांगलाच परिणाम झाला आणि तेव्हापासून बाकीची मंडळी शिवतरकरांशी सहकार्याने वागू लागली.
हे असे सगळे वातावरण असतानाच ’बहिष्कृत हितकरिणी सभे’च्या प्रचाराची पहिली प्रकट सभा झाली; मात्र ती अस्पृश्य समाजाच्या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अगदी निराशाजनक अशी झाली. आजूबाजूच्या खोल्यांच्या उंबरठ्यावर वा पडवीत लोक चिलीम ओढीत बसले होते, चकाट्या पिटीत बसले होते; पण सभेकडे मात्र कुणाचेच पाय फिरकत नव्हते. वक्त्याच्या स्वगत भाषणातच सभा समाप्त झाली. वृत्तपत्राचे पाठबळ नाही, पैशाचे भांडवल नाही की आजूबाजूच्या जगाच्या सहानुभूतीची उब नाही, अशा बिकट परिस्थितीशी दोन हात करीत बाबासाहेब आजूबाजूच्या खेड्यांमध्ये, शहरांमध्ये फिरून समाजाला कटू शब्दात उपदेश करीत होते. समाजाच्या स्वाभिमानाला डिवचत त्याला जागा करण्याचा प्रयत्न करत होते. मृतप्राय झालेल्या मनांना स्वाभिमानाची संजीवनी देऊन त्यांना चेतवू पाहत होते. त्यांच्या उपदेशाची धार फार तिखट आणि तितकीच बोचरीही होती, ती दलितांच्या हृदयाचा नेमका ठाव घेणारी होती.
ते म्हणत, ”तुमची ही दीनवदने पाहून आणि करुणाजनक वाणी ऐकून माझे हृदय फाटते. युगानुयुगे तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत गंजत, कुजत, सडत पडला आहात. तरी तुमची भावना हीच आहे की, आपली ही दुर्दशा देवनिर्मित आहे. ईश्वरी संकेतानुसार आहे. तुम्ही गर्भात असतानाच का मेला नाही? जन्मास येऊन तुम्ही जगातील दु:ख, दारिद्य्र नि दास्य यांच्या अक्राळविक्राळ चित्राचा भेसूरपणा आपल्या अवनत नि अवमानित दु:खी जीवनाने वाढवीत आहात. जर तुमच्या जीवनाचे पुनरुज्जीवन होत नसेल, तर तुम्ही या जगातून नाहीसे होऊन दु:खाचे ओझे का कमी करीत नाही? तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वत:च्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवाशी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र, आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्ण जिणे जगायचे असेल तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग होय हे लक्षात ठेवा.” बाबासाहेबांच्या अशा चैतन्यपूर्ण प्रबोधनाने जागे झालेले कार्यकर्ते आता तालुका नि जिल्ह्यागणिक परिषदा भरवू लागले. निपाणी, मालवण या ठिकाणीही अशा परिषदा झाल्या.
मालवणच्या सभेनंतर बाबासाहेबांनी शिवतरकरांबरोबर गोव्याच्या काही गावांना भेटीही दिल्या. याच दरम्यान अस्पृशोद्धाराच्या कार्यप्रगतीच्या दृष्टीने एक सकारात्मक घटना घडली. जिचे पडसाद देशभर उमटले. त्रावणकोर संस्थानातील वायकोम या गावातील ज्या रस्त्यावर ब्राम्हणांची घरे होती, तो रस्ता अस्पृश्य बांधवास खुला व्हावा म्हणून मद्रासमधील एक ब्राह्मणेतर पुढारी रामस्वामी नायकर यांनी सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह ऊन, वारा, पाऊस या सगळ्यातून पार पडत काही दिवस तसाच चर्चेत राहिला आणि यशस्वीही झाला. या सत्याग्रहात आचार्य विनोबा भावे आणि कर्मवीर शिंदे यांचाही सहभाग होता. या घटनेचा उल्लेख बाबासाहेबांनी ’मुंबई इलाखा बहिष्कृत परिषदे’च्या तिसर्या अधिवेशनात भाषण करताना केला. हे अधिवेशन निपाणी, जिल्हा बेळगाव येथे दिनांक 10 व 11 एप्रिल 1925 रोजी झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. यावेळी झालेल्या भाषणात बाबासाहेबांनी, सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे. त्याचबरोबर अस्पृश्यांनीही आपल्यातील अनिष्ट रूढी, परंपरा मोडून आपल्या प्रगतीसाठी अंतर्गत सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली.
बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली ’बहिष्कृत हितकरिणी सभे’चे सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही आघाड्यांवर कार्य चालू होते. त्याबरोबर जिल्ह्याजिल्ह्यांत अस्पृश्यांच्या परिषदाही चालू होत्या. कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची एक बैठक मार्च 1926ला महाड येथे ’सि.प्रा. नाटक मंडळा’च्या नाटकगृहात पार पडली. त्यात अनेक प्रतिष्ठित मंडळी सहभागी होती; ज्यात गं.नि. सहस्रबुद्धे, अनंत चित्रे, सीताराम शिवतरकर, बाळराम आंबेडकर, पांडुरंग, नथुराम राजभोज, शांताराम उपशाम, रामचंद्र शिंदे, धोंडीराम गायकवाड, शिवराम जाधव, इत्यादी प्रमुख मंडळी होती. संध्याकाळी 5 वाजता परिषदेला सुरुवात झाली. परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून परिषद भरवण्याचा हेतू थोडक्यात सांगितला आणि मग बाबासाहेबांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाड आणि आजूबाजूच्या प्रदेशाबद्दल त्यांना वाटणारा अभिमान व्यक्त केला.
ते म्हणाले, ”माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परिस्थितीमुळे पाच ते सहा वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडल्यानंतर घाटमाथ्यावर माझे आजपर्यंतचे जीवित गेले. आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे. त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच होईल. मलाही आनंद होतो आहे; पण जितका आनंद होतो आहे तितकाच खेदही होतो आहे.” त्यांच्या बोलण्यातला सारांश असा होता की, कधी काळी स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या विकासाच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता, ज्याचे एक कारण लष्करी पेशा हे होते. कंपनीच्या आमदानीत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे होते, शिवाय जातीपरत्वे कोणताही भेदाभेद नव्हता त्यामुळे अस्पृश्य वर्गाचा फार मोठा फायदा झाला.
या भाषणात पुढे ते म्हणतात की,’‘या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह तयार झाला होता; तो अभिमान वाटावा असा होता. यावेळी अनेक अस्पृश्यांच्या संग्रहात मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती असायच्या, ज्ञानेश्वर महाराजांनी ‘पंचीकरण’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकिवातही नाही; पण हा ग्रंथ मी एका माझ्या आज दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिला होता. असाच एक राघवचित्तघन या कवीने लिहलेला ‘ज्ञानसुधा’ हा आज दुर्मीळ असलेला ग्रंथही माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या घरी आहे. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांस ज्या काळात विद्येची सर्व दारे बंद होती; त्या काळात असा ग्रंथ संग्रह करायला किती सायास पडले असतील, द्रव्याचा किती व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा, ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजात भूषणावह आहे, यात कोणाचे दुमत नाही,” असे मत यावेळी बाबासाहेबांनी नोंदवले आहे.
या नंतर मे 1926मध्ये सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, येथेही ’सातारा जिल्हा महार परिषदे’चे आधिवेशन भरले. या अधिवेशनासाठी बाबासाहेब मुंबईवरून रहिमतपूरला आले होते. या अधिवेशनाला शिवतरकर, वनमाळी, गायकवाड, खोलवडीकर, खंडकर, जावळे, ही मुंबईची मंडळी, कृष्णराव कदम, मा.सा. गायकवाड, जनार्दन रणपीस, धर्माजी सावंत, ही पुण्याची मंडळी, माधवराव अहिवले वगैरे सातारा, फलटण अशी अनेक ठिकाणांहून बरीच माणसे आलेली होती. अधिवेशनाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. यावेळी केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी तोपर्यंत झालेल्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळींचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा विस्तृत आढावा घेतला.
ते म्हणतात,“हल्ली अस्पृश्यांची जी चालक मंडळी आहेत, त्यात ‘नाम के वास्ते’ लोकांचाच जास्त भरणा आहे. अनेक मंडळीच्या चालकांचे म्हणणे असे आहे की अस्पृश्यांमध्ये जागृती ही आमच्यापासून सुरू झाली. पण जे लोक अशा तर्हेने ओढूनताणून मान मागतात त्यांना अस्पृश्योन्नतीच्या चळवळीचा खरा इतिहासच अवगत नाही असे म्हटले पाहिजे. मुंबई इलाख्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरता ज्या संस्था कालांतराने स्थापन झाल्या त्यात, ’अनार्य दोष परिहारक मंडळी’ ही पहिली संस्था आहे, असे संशोधनाअंती दिसून येईल. बाबासाहेब पुढे म्हणतात,”हे सर्व मी पुराव्यानिशी सांगू शकतो; कारण या संस्थेचे सर्व कागदपत्र हल्ली माझ्या ताब्यात आहेत. उघड आहे की अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरू केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या संस्थेस आणि या प्रांतास देणे प्राप्त आहे.” यावेळी बोलताना बाबासाहेबांनी दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख केला - एक म्हणजे महात्मा जोतिबा फुले आणि दुसरे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत.
भाषणाचा शेवट करताना बाबासाहेब म्हणतात,”मी आपणास इशारा देतो की, मी सांगतो त्या दिशेने जर तुम्ही प्रयत्न केला नाही; तर आज जी चतकोर भाकरी मिळत आहे; ती उद्या मिळणार देखील नाही.”
बाबासाहेबांनी ’बहिष्कृत हितकरिणी’च्या प्रत्येक सभेत असेच मनात क्रांतीची ठिणगी टाकणारे विचार मांडले. समाजाला सतत जागृत राहण्याचे आणि जोमाने चळवळीचे काम करण्याचे आवाहन केले. अस्पृश्य समाजात आलेली मरगळ आपल्या आवेशपूर्ण, अभ्यासू आणि भारावलेल्या भाषणांनी कुठेच्या कुठे पळवून लावली.
महाड येथे संघटनात्मक सत्याग्रहाचा लढा सुरू होण्याच्या आधीची ही पार्श्वभूमी आपसूकच तयार होता होती. ’बहिष्कृत हितकरिणी सभे’च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक अशा सर्वच आघाड्यावर जोरदार कार्य चालू होते. मुंबई इलाख्यातही काही काही जिल्ह्यांत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत वर्गाच्या परिषदा, अधिवेशने होत होती. अशा प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रबोधंनातून जातिव्यवस्थेविरोधात, वर्णव्यवस्थेविरोधात आपले विचार मांडत होते. समाजावर या व्यवस्थेने बळजबरीने लादलेल्या गुलामगिरीचे वास्तव समाजाला पटवून देत होते. त्याचबरोबर समाजातील समाजघातकी रूढी, परंपरा, चालीरिती यांच्या विरोधातही आपले परखड मत मांडत होते. जनजागृतीची ही मशाल अशीच पेटत ठेवण्यासाठी डोळ्यांत क्रांतीचे स्वप्न आणि पायाला भिंगरी लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई इलाख्यासह संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घालत होते.