Copyright, Patent, Trademark
डॉ. अपूर्वा विनायक फडके
रोजच्या जगण्यात घर, गाडी किंवा सोन्याची किंमत आपण सहज ठरवतो. पण, मनातून आलेल्या एखाद्या कल्पनेचं किंवा कलाकृतीचं मोल करायचं कसं? माणसाच्या याच विचारांना आणि प्रतिभेला कायद्याचं संरक्षण देणं खूप गरजेचं असतं. वाचकांना एका अनोख्या आणि महत्त्वाच्या कायद्याची ओळख करून देण्यासाठी ‘कल्पनेच्या कायद्याची गोष्ट’ हे नवीन सदर सुरू करत आहोत. ’कॉपीराईट’, ’पेटंट’ आणि ’ट्रेडमार्क’ या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याशी कशा जोडल्या आहेत, ते या पहिल्या लेखात सोदाहरण उलगडून दाखवले आहे.
सुट्टीत आठवड्याच्या मधल्या वारी दक्षिण मुंबईत फेरफटका मारणं हे माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे.
मरीन ड्राईव्ह, जहांगीर कलादालनात फेरफटका मारणं, उच्च न्यायालयाची देखणी इमारत पाहताना तिथलं प्रसिद्ध सँडविच खाणं आणि मग तिथल्या रस्त्यावरच्या पुस्तकांच्या दुकानात फिरून पुस्तकं घेऊन घरी येणं हे दर मोठ्या सुट्टीत एकदा व्हायचंच. तिथे पुस्तकं चांगलीच स्वस्त मिळायची. हार्डबाउंड प्रत न परवडण्याच्या दिवसात त्या दुकानांचा आधार होता. जेव्हा, OTT वाहिन्या फारशा रूळल्या नव्हत्या तेव्हा...
बेस्ट सेलर पुस्तकांच्या डुप्लिकेट प्रती घेऊन वाचणं, सुरुवातीला राईट केलेल्या सीडी, डीव्हीडी आणि नंतर पेनड्राईव्हवर घेतलेले चित्रपट हा कॉलेजच्या सुट्यांमधला मुख्य उद्योग असायचा.
सहा वर्षांपूर्वी कोव्हिड आला. त्या सक्तीच्या सुट्टीत बौद्धिक संपदा कायद्याशी ओळख झाली आणि मग सगळंच बदललं. आता अशा पायरेटेड कॉपीज घेताना मन अडखळायला लागलं.
शेवटी प्रकाशकाचे/निर्देशकाचे पैसे चुकवून, त्यांच्या परवानगीशिवाय बाजारात आल्यामुळेच अशा प्रती स्वस्त दरात मिळतात हे लक्षात आलं.
’बौद्धिक संपदा’ अर्थात, ’इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी’ हे नाव थोडं अवजड वाटत असेल तरी त्याचा संबंध, कळत नकळत आपल्या रोजच्या जगण्यात येत राहतो. आज आपण ह्या बौद्धिक संपदेशी ओळख करून घेणार आहोत.
घर, गाडी, सोनं नाणं ह्या मौल्यवान गोष्टी आहेत, त्यांना बाजारात किंमत आहे, ती ठरवण्यासाठी सर्वमान्य गृहितकं आहेत. अप्रिसिएशन/डिप्रिसिएशनची कोष्टकं आहेत. त्यामुळे एखाद्या गाडीची आताची किंमत ती पाच वर्षं वापरल्यावर कमी होते; पण घराबाबत, सोन्याबाबत मात्र उलट होतं, हे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांना माहिती असतं. ही गणितं थोडी किचकट असली तरीही ह्या गोष्टी स्थावर असल्याने ती समजून घेणं तुलनेनं सोपं आहे.
कल्पनेच्या कायद्याची गोष्ट
मात्र जेव्हा एखाद्या कल्पनेचं, गहन समस्या सोडवणार्या उपायाचं, मनानं घेतलेल्या सृजनशील भरारीचं मोल करण्याची वेळ येते तेव्हा यक्षप्रश्न उभा राहतो. हे करायचं कसं?
कारण ह्या गोष्टी हातात धरता येत नाहीत, त्यांचं ठोक भावानं मोजमाप करता येत नाही. पण म्हणून माणसाच्या कल्पनेतून, विचारांतून निर्माण झालेल्या गोष्टी कवडीमोलही मानता येत नाहीत.
पु.ल. देशपांडेंचे शब्द, पंडित भीमसेन जोशींचा स्वर, लताबाईंचा स्वर, राजा रवी वर्मांची चित्रकला, प्राचीन मंदिरांचं स्थापत्यशास्त्र ह्या गोष्टी अमूल्य आहेत. यातली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येण्यापूर्वी मानवी मेंदूतली अमूर्त कल्पना होती. जेव्हा या आणि अशा कल्पनांवर पुढे काम झालं तेव्हा साहित्य, कलाविष्कार, संशोधनं मूर्त स्वरूपात आलं.
हातात धरता येत नसल्या, मोजमाप करता येत नसलं म्हणून ह्या विचारांचं महत्त्व कमी होत नाही. उलट अशा निर्मितीला, तिच्या निर्मिकाला त्यांचं हक्काचं श्रेय आणि त्या अनुषंगाने येणारे भौतिक फायदे कायद्याने दिले जाणं अत्यंत जरुरीचं आहे. एखादा ’लेख’, ’कविता’, ’चित्र’, ’संशोधन’ आणि ’व्यापार’ हा त्याच्या निर्मिकाच्या नावानंच ओळखला जायला हवा आणि त्याची किंमत ठरवण्याचा हक्कही त्याचाच असायला हवा.
अमूर्त स्वरूपाच्या अशा निर्मितीला ’बौद्धिक संपदा’ असं म्हणतात. ह्या बौद्धिक संपदेचं नियमन करणारा कायदा म्हणजे ’बौद्धिक संपदा कायदा’ (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स).
या कायद्याची गरज का भासते?
जर निर्मिकाला त्याचं श्रेय मिळालं नाही तर नवनिर्मितीसाठी अत्यावश्यक असलेलं प्रोत्साहन आणि प्रेरणेच्या अभावातून नवीन निर्मिती होणं कमी होत जाईल, थांबेल. पण त्याच वेळी हे किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य अमर्याद, अनिर्बंध झालं तर तराजू दुसर्या टोकाला कलेल. जीवनावश्यक क्षेत्रांतील संशोधन, उपाय हे श्रीमंतांची मक्तेदारी होऊन बसतील. समाजातल्या इतर घटकांना त्यांचा लाभ मिळूच शकणार नाही.
अभ्यासक्रमातला एखादा संदर्भग्रंथ विकत घेणं परवडत नाही म्हणून ग्रंथालयातल्या प्रतीची छायाप्रत (फोटोकॉपी) करणारा विद्यार्थी प्रकाशकाचं, लेखकाचं श्रेय आणि पैसे बुडवतो असं म्हणणं योग्य होईल का? असं करायला गेलो तर त्याच्या शिक्षणात व्यत्यय येईल आणि हे सामाजिक न्यायाच्या विरुद्ध असेल. पण हीच गोष्ट चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीजबाबत मात्र जशीच्या तशी लागू होईल का? तिथे स्वतःच्या करमणुकीसाठी तिकिटाचे पैसे बुडवून अनाधिकृतरीत्या चित्रपट पाहणं चुकीचंच आहे. बौद्धिक संपदा हा विषय अशा अतिशय सूक्ष्म तपशिलांनी, वैविध्य आणि काही ठिकाणी वैचित्र्यानेही ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणूनच तो अतिशय रंजक, अर्थात इंटरेस्टिंग आहे.
बौद्धिक संपदेचे बरेच प्रकार आहेत. आणि ते आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहेत. लेखन, वैज्ञानिक संशोधन, ब्रँड्स, एखाद्या व्यापारातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, रचनात्मक कलाकृती, एखाद्या भागाची खासियत असलेली प्रसिद्ध उत्पादनं, इतकंच नव्हे तर नव्यानं तयार केलेलं बियाणंही ह्या बौद्धिक संपदेचाच एक प्रकार आहे.
प्रत्येक प्रकारासाठी, त्या निर्मितीचा प्रसार, यथायोग्य मोबदला आणि समाजाभिमुख विनिमय ह्याचा ताळमेळ साधणारे स्वतंत्र कायदे आणि नियम आहेत.
यात लेखन, कोणतीही कलाकृती, तिचं सादरीकरण अशा गोष्टींना ’कॉपीराईट’ बहाल केला जातो. जेणेकरून कलाकार, लेखक आणि निर्देशक ह्यांना त्यांचं काम सुरक्षित करता येतं. इतर कुणालाही त्या कामाची उचलेगिरी करण्यापासून थांबावता येतं. छोट्या गोलाच्या आत लिहिलेलं इंग्रजी द्घ हे अक्षर ही ’कॉपीराईट’ची खूण आहे. गंमत म्हणजे हा एकमेव असा अधिकार आहे की, ज्यासाठी अर्ज करावा लागत नाही. तो आपोआप मिळतो (right by default). म्हणजे सरकारदरबारी अर्ज केलेला नसेल तरीही अशी कलेची चोरी झाल्यास दाद मागता येते.
’पेटंट’ अर्थात ’एकस्व अधिकार’ हा बौद्धिक संपदेचा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनावर हा अधिकार प्रस्थापित करता येतो. अर्थात त्यासाठी ते संशोधन अनेक तांत्रिक कसोट्यांवर उतरावं लागतं. आणि सगळ्या कसोट्या पार करणार्या संशोधनाला पेटंट बहाल करण्यात येतं. असं पेटंट मिळाल्यावर ते संशोधन, त्यानिगडीत उत्पादन करण्याचा एकाधिकार त्या निर्मिकाला (पेटंट होल्डर/अॅप्लिकेंट) 20 वर्षांसाठी प्राप्त होतो. औषधनिर्माण, ऑटोमोबाईल, सॉफ्टवेअर, केमिकल क्षेत्रातले असंख्य शोध अशा पेटंट्सनी सुरक्षित केलेले असतात. औषध, गाड्या अशा महागड्या गोष्टींची किंमत ठरवण्यात पेटंट्सचा मोठा वाटा असतो. पेटंट्सचं विश्व अशा मोठ्या गोष्टींमध्ये सीमित नाहीये. घरी आपण जो पिझ्झा मागवतो तो सरळ राहावा, खोक्यात हलू नये म्हणून जी छोटी प्लास्टिकची तिपाई त्या पिझ्झावर खोचलेली असते, तिचंही एकेकाळी पेटंट घेतलेलं होतं.
’स्टारबक्स’चा मग, नायकेचं ’स्पोर्टस् वेअर’ किंवा आपल्या लाडक्या ’डेअरीमिल्क कॅडबरी’चा सुप्रसिद्ध जांभळा रंग आपण पाहताक्षणी नावानीशी ओळखतो. त्या नावाची ती ताकद असते, इतक्या वर्षांचं त्यांचं व्यापारातलं गुडविल त्या नावाशी, लोगोशी, प्रसंगी रंगाशीही जोडलेलं असतं. ’डेअरिमिल्क कॅडबरी’ हा तर जणू चॉकलेट बारचा समानार्थी शब्दच झालाय. ’किटकॅट’ किंवा ’मंच’ची कॅडबरी द्या असं प्रत्येकानं एकदातरी म्हटलेलं असतंच. आता त्याच जांभळ्या रंगात, तशाच वेष्टनात, जर एखाद्या नवख्या कंपनीनं नामसाधर्म्य असलेलं चॉकलेट बाजारात आणलं तर डेअरीमिल्कचं दुहेरी नुकसान होतं. एक म्हणजे त्यांचं समजून कुणीतरी हे दुसरं चॉकलेट घेतलं की त्यांचा धंदा बुडतोच आणि दुसरं म्हणजे त्याची चव तितकी चांगली नसेल तर वर्षानुवर्षं जोडलेला ग्राहक, त्याचा विश्वास गमावण्याची पाळी येते. हे टाळण्यासाठी व्यवसाय सुरू करतानाच त्याचं नाव, लोगो, शक्य असल्यास आणि योग्य वाटल्यास एखादा स्पेसिफिक रंग ह्यांवर कायद्याच्या कक्षेत हक्क प्रस्थापित करता येतो. बौद्धिक संपदेच्या ह्या प्रकाराला ’ट्रेडमार्क’ (™/ ®) असं म्हटलं जातं.
पावसाला सुरुवात झालेली असली तरी अजूनही बर्याच घरांमध्ये आंब्याची शेवटची पेटी सुरू आहे. अशा वेळी ’हापूस’ म्हणून जर कुणी दुसराच आंबा माथी मारला तर राग येतो ना? मग ’देवगड हापूस’ म्हणून भलताच आंबा विकला जाऊ नये, दार्जिलिंगचा चहा किंवा काश्मिरी केशराच्या नावाखाली भलतंच काहीतरी निकृष्ट दर्जाचं उत्पादन मिळू नये,
बनारसी आणि पैठणी साड्या घेताना नि:शंकपणे घेता याव्या ह्यासाठीही कायदेशीर तजवीज करायला हवीच ना! एखादं उत्पादन अशा भागात बनतं तेव्हा त्यात काहीतरी विशेष असतं. मग हे विशेषत्व ’चव’, ’रंग’, ’वास’, ’न्यूट्रिशनल कंटेंट’, ’आकार’, ’रेशमाचा पोत’ अशा कोणत्याही बाबतीतलं असू शकतं. अशा विशेष गोष्टींमुळेच बाजारात त्या वस्तूला मागणी असते. ह्या अशा एकेक शहरात किंवा भौगोलिक भागात बनणार्या उत्पादनांसाठी जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) ही बौद्धिक संपदा बहाल केली जाते.
कोणत्याही वस्तूची विशिष्ट रचना तिला सौंदर्य बहाल करते. अशा रचनात्मक सर्जनशीलतेसाठी ’डिझाईन राईट’ हा बौद्धिक संपदा हक्क असतो. दागिन्यांची डिझाईन्स, एखाद्या मूर्तीची रचना, एखादं वैशिष्ट्यपूर्ण वेष्टन (पॅकेजिंग) अशा गोष्टींच्या दृश्य अभिव्यक्तीची नक्कल केली जाऊ नये, यासाठी हा हक्क बहाल केला जातो.
याव्यतिरिक्त ’ट्रेड सिक्रेट्स’, ’सेमिकंडक्टर सर्किट्स’, ’बियाणं’ अशा क्षेत्रातल्या बौद्धिक आविष्कारांनाही वेगवेगळ्या प्रमाणात कायद्याचं सरंक्षण असतं. हे सर्व अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक देशात वेगवेगळा अर्ज करावा लागतो. प्रत्येक देश त्याच्या नियमांनुसार मात्र आंतरराष्ट्रीय संकेतांच्या कक्षेत राहून अर्जदाराला हे अधिकार प्रदान करतो.
बौद्धिक संपदेचा अर्थशास्त्राशी आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाशी अतिशय जवळचा संबंध आहे. आज आपण पाहिलं ते फार तर हिमनगाचं टोक म्हणता येईल. ह्या प्रत्येक प्रकाराशी निगडित गमतीजमती आणि रंजक माहिती आपण पुढच्या लेखांतून पाहुया.
- लेखिका नोंदणीकृत पेटंट एजंट, पीएचडी, एलएलबी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.