ओल्या कचर्‍यातून फुललेलं नंदनवन

विवेक मराठी    12-Jun-2026
Total Views |
पुण्यात राहणार्‍या गृहिणीने पर्यावरण रक्षणासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या घरातल्या ओल्या कचर्‍यापासून स्वतः खत बनवण्याचा यशस्वी निश्चय केला. गेल्या दोन वर्षांपासून त्या हा उपक्रम घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने राबवत आहेत. कचर्‍याची विल्हेवाट लावून निसर्गाचा समतोल राखणारा हा त्यांचा छोटासा पण मोलाचा ‘खारीचा वाटा’ आहे.

Environment
पुण्यासारख्या शहरात दोन बालकनी असलेल्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर भरपूर झाडे लावून आपली बागेची आवड पूर्ण करायची हे मी ठरवलेच होते. अनेक वर्षांपासून शहरातला वाढत जाणारा कचर्‍याचा प्रश्न सतत दिसत असल्यामुळे त्यावर आपल्यापुरता तरी उपाय काढायचा, हेही कधीपासून मनात होते. वेळेअभावी, जागेअभावी, मार्गदर्शनाअभावी या उपायाला सुरुवात मात्र झाली नव्हती. नवीन घरात हा विषयही ऐरणीवर घ्यायचा असे ठरवले आणि भरपूर झाडे लावून मनाचे समाधान झाल्यावर याकडे वळले.
 
 
‘आपल्या घरातला ओला कचरा बाहेर जाऊ द्यायचा नाही’, असा निश्चय केला. ओल्या कचर्‍यापासून खत तयार करण्याचे विविध मार्ग अभ्यासले. सुरुवात करायला सोपा डेली डंप (daily dump) कंपनीचा कंपोस्टर विकत घेऊन 100 टक्के ओला कचरा त्यात जिरवायला सुरुवात केली. हा कंपोस्टर अगदी कमी जागा व्यापतो, ही जमेची बाजू होती. दीड-दोन महिन्यांत कचर्‍याचे पूर्ण कुजलेल्या खतात रूपांतर झाले, तेव्हा कष्ट सार्थकी लागल्याचा आनंद झाला.
 
 
Environment
 
ज्ञानदा गद्रे-फडके, पुणे
 
गेली दोन वर्षे सातत्याने माझा हा कंपोस्ट तयार करायचा उपक्रम सुरू आहे. या कंपोस्टमुळे माझी बाग सतत सोनचाफा, सदाफुली, विविध रंगांच्या जास्वंदी, अबोली, मोगरा, मधुमालती अशा फुलांनी बहरत असते. शिल्लक खत सोसायटीमध्ये शेजार्‍यांना, नातेवाइकांना, मित्रमैत्रिणींना वाटत असते. आपल्या बागेबरोबर त्यांचीही बाग फुलल्याचा आनंद!
 
 
डेली डंपमध्ये ओला कचरा टाकणे, हलवणे हा माझ्या दिनक्रमाचा भाग केल्यामुळे ते जड गेले नाही. दर दोन महिन्यांनी खत तयार झाल्यावर वाळवून, चाळून पिशवीत भरून ठेवले की आपण ठरवून केलेला संकल्प पूर्ण केल्याचा आनंद दरवेळी मिळतो.
अनेकदा कचर्‍यातल्या कोयींना मोड फुटतात, अशा कोंब आलेल्या कोयींपासून आंब्याची रोपे तयार करून ती मुलीच्या महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमासाठी दिली. खत चाळून वर उरलेल्या बिया पीपल बाबांच्या रोपवाटिकेसाठी पाठवल्या.
ही कंपोस्टिंग पद्धत समजून घेण्याची उत्सुकता दाखवणार्‍यांना प्रात्यक्षिक दाखवले. त्यातून प्रेरणा घेऊन काहींनी आपल्या घरी याची सुरुवात केली.
 
 
पर्यावरणाच्या र्‍हासावर काम करण्यासाठी आपल्याकडे खूप संसाधने, ताकद नसली तरीही काहीतरी बदल घडवण्यासाठी आपल्या परीने छोटा प्रयत्न करण्याचा हा खारीचा वाटा उचलण्याचे समाधान वेगळेच आहे!