Sports Vlogging
मैदानातील खेळाचा थरार कॅमेर्यात टिपून लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारे ’स्पोर्ट्स व्लॉगिंग’ हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर तो एक प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला करिअर पर्याय बनला आहे. क्रीडाप्रेमी तरुणांना आपल्या आवडीचे रूपांतर मोठ्या व्यवसायात कसे करता येईल, याचे हे मार्गदर्शन! डिजिटल युगातील या नव्या संधी, कमाईची साधने आणि यशाची सूत्रे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.
डिजिटल युगात आपण काहीही खरेदी करण्यापूर्वी किंवा कुठेही जाण्यापूर्वी काय करतो? गुगल करतो, युट्यूबवर व्हिडिओ पाहतो, इंस्टाग्रामवर रिव्ह्युज पाहतो! ह्या सर्व गोष्टींचे संकलन जो करतो त्याला ’कंटेंट क्रिएटर’ म्हणतात आणि ह्याच सर्व गोष्टींना एकत्रितपणे म्हणतात-’कंटेंट क्रिएशन’. माहिती, अनुभव किंवा मत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ, फोटो, लेख, पोस्ट्स म्हणजे कंटेंट. याचे विविध प्रकार आहेत जसे की,
* व्हिडिओ (युट्यूब व्लॉग)
* फोटो (इंस्टाग्राम पोस्ट)
* लेख / ब्लॉग
* पॉडकास्ट
आज ग्राहक थेट जाहिरातींवर विश्वास ठेवत नाहीत. ते खर्या अनुभवावर (Real Experience) विश्वास ठेवतात आणि इथेच कंटेंट क्रिएशन महत्त्वाचे ठरते. क्रीडाक्षेत्रातही एका व्लॉगरचे किंवा कंटेंट क्रिएटरचे महत्त्व कसे आहे? हे आपण जाणून घेऊया.
* जेव्हा एखादा व्लॉगर एखादे स्टेडियम, हॉटेल किंवा स्पोर्ट्स इव्हेंट प्रत्यक्ष दाखवतो, तेव्हा ग्राहकाला हे खरे आहे असे वाटते.
* कुठे जायचे? किती खर्च येईल? अनुभव कसा असेल? याची स्पष्ट कल्पना कंटेंटमुळे मिळते.
* एखादा रोमांचक क्रीडा प्रवास पाहून, आपणही हे अनुभवूया! अशी भावना निर्माण होते.
* चांगला कंटेंट एखाद्या ठिकाणाला, इव्हेंटला किंवा सेवेला लोकप्रिय बनवतो.
उदा :एखाद्या व्लॉगरने Live Cricket Match Experience in Mumbai व्हिडिओ टाकला तर हजारो लोक तो पाहतात. अनेकजण पुढच्या सामन्याला जाण्याचा प्लॅन करतात.
* म्हणजेच, एक व्हिडिओ अनेक ग्राहकांचे निर्णय प्रभावित करण्यास मदत करतो.
या व्यवसायाचा क्रीडा पर्यटन उद्योगाला बराच फायदा होतो. तो असा ः
* इव्हेंट्सला जास्त प्रेक्षक मिळतात.
* खेळाची नवीन ठिकाणे प्रसिद्ध होतात.
* स्पोर्ट्स + ट्रॅव्हल व्यवसाय वाढतो.
* ब्रँड्स आणि टुरिझम कंपन्यांना प्रमोशन मिळते.
1. या व्यवसायाचे महत्त्व काय?
आज लोक कुठे फिरायला जावे, कोणता सामना पाहावा, कोणता स्पोर्ट्स इव्हेंट घ्यावा - हे ठरवताना ते युट्यूब, इंस्टाग्राम रील्स पाहतात.
इथेच स्पोर्ट्स व्लॉगर महत्त्वाचा ठरतो. तो लोकांना प्रत्यक्ष अनुभव दाखवतो आणि निर्णय घेण्यास मदत करतो.
* उदा. एखाद्याने IPLसामना पाहण्यासाठी मुंबईत यायचे का नाही, हे ठरवताना व्हिडिओ मदत करतो.
2. या क्षेत्राला मार्केटमध्ये मूल्य आहे का?
नक्कीच आहे. क्रीडा + पर्यटन आता एक मोठा उद्योग आहे.
* ब्रँड्स, टुरिझम कंपन्या, स्पोर्ट्स लीग्स यांना प्रमोशनसाठी कंटेंट क्रिएटर्सची गरज असते.
* उदा. कंपन्या व्लॉगर्सना प्रायोजित सहली देतात.
3. हा व्यवसाय चांगला पैसे देणारा आहे का?
सुरुवातीला कमी उत्पन्न आहे; पण जसजसे तुम्ही नावारूपाला येऊ लागतात, तसतसे अर्थार्जन पण वाढू लागते.
* या क्षेत्रात उत्पन्न देणारे काही महत्त्वाचे स्रोत म्हणजे युट्यूब जाहिराती, ब्रँड जाहिराती, प्रायोजकत्व, संलग्न विपणन (Affiliate marketing).
या क्षेत्रातील अंदाजे कमाई प्रवीणतेच्या पातळीवर अवलंबून असते. नवशिक्यांना सर्वसाधारणपणे 10,000 ते 30,000 रुपये प्रति महिन्यापासून, तर एखाद्या प्रस्थापित व्लॉगरला पाच लाख रुपये + प्रतिमहिना मिळू शकतात.
4. समाजात या क्षेत्राला मान्यता आहे का?
नक्कीच. आजच्या रील्सच्या काळात तर याचे महत्त्व अधीकच वाढले आहे. लोक इंफ्लुएन्सर्सना ओळखतात, इव्हेंट्समध्ये आमंत्रित करतात, सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग वाढते.
* उदा. अनेक स्पोर्ट्स व्लॉगर्सना स्टेडियममध्ये स्पेशल अॅक्सेस मिळतो.
5. हा व्यवसाय कोण करू शकतो?
- कोणताही युवक; विशेषः, जो क्रीडाप्रेमी त्याच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करू शकतो.
- खास करून असे युवक ज्यांना-खेळाची आवड आहे, प्रवास आवडतो, लोकांशी संवाद साधायला आवडते.
- अगदी आठव्या इयत्तेपासूनही ’स्पोर्ट्स व्लॉगिंग’ची सुरुवात करता येते.
या विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी काही कौशल्ये आणि क्षमता आवश्यक आहेत; जसे की :
* व्हिडिओ शूटिंग आणि संपादन (एडिटिंग)
* संवाद कौशल्य
* कथाकथन (कथा सांगण्याची कला)
* सोशल मीडिया हाताळणी
* सर्जनशीलता आणि सातत्य
या क्षेत्रात सध्या कोणतीही विशिष्ट पदवी अशी नाही, परंतु मास मीडिया, पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंग आदि विषयांचे शिक्षण आणि ज्ञान तुम्हाला या क्षेत्रात उपयुक्त ठरू शकते. भारतामध्ये अनेक डिजिटल मार्केटिंग संस्था, मास मीडिया कॉलेजेस, चित्रपट आणि संपादन संस्था आहेत जे या क्षेत्रात शिक्षण कोर्सेसच्या माध्यमातून देतात.
एका केस स्टडीच्या माध्यमातून आपण आज ह्या व्यवसायाकडे पाहूयात.
एक स्पोट्सर्र् व्लॉगरचा प्रवास-छंद ते करिअर
एक सामान्य युवक, ज्याला क्रिकेट आणि प्रवासाची प्रचंड आवड होती, त्याने आपल्या आवडीला दिशा देत युट्यूबवर ’स्पोर्ट्स व्लॉगिंग’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आरंभ ः सुरुवातीला त्याने मोठ्या संधींची वाट न पाहता, आपल्या आसपास होणारे स्थानिक क्रिकेट सामने, गल्लीतले टूर्नामेन्ट्स कव्हर करायला सुरुवात केली. साधा मोबाईल वापरून त्याचे शूटिंग आणि मूलभूत एडिटिंग केले. सुरुवातीला सोशल मीडियावर खूप कमी व्ह्युज मिळाले; मात्र त्याने त्यात सातत्य कायम राखले.
वाढीचा टप्पा ः हळूहळू त्याचा आत्मविश्वास आणि कौशल्य वाढत गेले. त्याने पुढे रणजी सामने, IPLसामने यांचे व्लॉग बनवायला सुरुवात केली. त्यात स्टेडियमवरील अनुभव दाखवणे, प्रेक्षकांचा उत्साह टिपणे, चाहत्यांचे अनुभव शेअर करणे अशा प्रकारचे व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांना त्याचा कंटेंट विषयाच्या संबंधित वाटू लागला.
ओळख निर्माण होणे ः त्याच्या व्हिडिओंना अधिक व्ह्युज मिळू लागले. हळूहळू त्याचे फॉलोअर्स वाढू लागले. प्रेक्षक त्याच्या रीव्ह्युजवर विश्वास ठेवू लागले. कालांतराने तो एक विश्वासू ’क्रीडा कंटेंट क्रिएटर‘ बनला.
कमाई आणि संधी ः त्याच्या वाढत्या आवाक्यामुळे ब्रँड्स, ट्रॅव्हल कंपन्या आणि इव्हेंट आयोजक त्याच्याशी संपर्क साधू लागले. प्रायोजित व्हिडिओ, सशुल्क जाहिराती, कार्यक्रम सहयोगाच्या माध्यमातून त्याला कंटेंट तसेच स्पोर्ट्स व्लॉगिंगमधून नियमित उत्पन्न मिळवायला सुरुवात झाली.
करिअरमध्ये रूपांतर ः काही वर्षांच्या सातत्य, कठोर परिश्रम आणि स्मार्टवर्कसह, त्याने आपला हा छंद पूर्ण वेळ व्यवसायामध्ये बदलला. आज तो वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन क्रीडा पर्यटनाच्या संबंधीत विविध कंटेंट बनवतो, खेळाचे विविध कार्यक्रम, सामने कव्हर करतो. आजच्या घडीला तो त्याचा वैयक्तिक ब्रँड विकसित करत आहे.
या प्रवासातून तुमच्या लक्षात आले असेलच की - आवडीचा उपयोग योग्य दिशेने केला, तर तीच तुमचे भविष्य घडवू शकते!
अशा प्रकारे ‘कंटेंट क्रिएटर‘ किंवा ‘स्पोर्ट्स व्लॉगर‘ हा क्रीडा पर्यटनातील एक आशादायक करिअर पर्याय बनू शकतो !!!
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि
मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.