घरच्या घरी पाण्याचा काटकसरीनं वापर आणि प्लॅस्टिकच्या प्रत्येक पिशवीचा पुनर्वापर करून पर्यावरण सहज जपता येतं. जुन्या वस्तू, करवंट्या आणि प्लॅस्टिक कंटेनरचा कल्पक वापर करून झाडांची सुंदर जोपासना करता येते. कापडी पिशव्यांचा वापर आणि रोपांची देवाणघेवाण या छोट्या सवयींमुळे निसर्गाचं रक्षण होतं. आपल्या दैनंदिन जगण्यातून पर्यावरण रक्षणासाठी असा ‘खारीचा वाटा’ उचलल्यास आपला भवताल नक्कीच समृद्ध होईल.
आमच्या घरी अनेक झाडं आहेत. त्यांच्या पानांवर हवेतील प्रदूषणामुळे खूप धूळ बसते. पानं स्वच्छ करण्यासाठी ती आम्ही ओलं, मऊ फडकं वापरून पुसून घेतो अथवा स्प्रे बॉटलचा वापर करतो.
आम्ही घरातील झाडांना दररोज पाईपनं पाणी न घालता बादली आणि मगचा वापर त्यासाठी करतो. कुंडीतून पाणी खाली गळणार नाही एवढंच पाणी घातलं तरीही झाडांना पुरतं हा अनुभव आहे. शिवाय गच्ची, बाल्कनीमधील फरशी स्वच्छ होण्यासाठी न धुता फडक्यानं पुसून घेतली जाते. त्यामुळे फरशी स्वच्छता तर होतेच आणि पाणीही वाया जात नाही.
पूर्वी एअर कंडिशनरच्या पाईपमधून बाहेर येणारं पाणी बादलीत भरून घेऊन बाथरूममध्ये अथवा झाडांना घालण्यासाठी वापरत असू. ते आता जमत नसलं तरीही वॉटर फिल्टरच्या आऊटलेटमधून येणारं पाणी बाथरूममध्ये आणि फरशी पुसण्यासाठी वापरलं जातं.
घरी जमा होणार्या प्लॅस्टिक कंटेनरचा वापर मी लहान रोपं लावण्यासाठी करते. अशी बरीचशी रोपं आजपर्यंत अनेकांना दिली आहेत. संक्रांतीच्या हळदीकुंकुवानिमित्त मिळालेल्या टोपल्यांचा वापर ऑर्किड लावण्यासाठी केला आहे. करवंटीचाही वापर अशाच प्रकारे पुदिन्यासारखी छोटी वनस्पती वाढवण्यासाठी करता येतो.
@ डॉ. अंजली रत्नाकर, डोंबिवली
कधी नळ गळत असेल तर लगेच दुरुस्त करणं, ब्रश करतांना नळ सुरू न ठेवणं, दिवे पंखे उगीचच न लावणं, डाळ तांदूळ धुतलेलं पाणी झाडांना घालणं अशा अनेक गोष्टी घरी नेमानं केल्या जातात.
भाजी-फळं यासाठी कापडी पिशवी नेहमीच बरोबर असते, चुकूनच प्लॅस्टिकची पिशवी घ्यावी, लागली तर खूप अपराधी भावना मनात दाटून येते. अशा चुकून घ्याव्या लागलेल्या पिशव्या मग अनेकदा वापरत राहते.
वाणसामानाच्या ज्या पिशव्या घरी येतात, त्या त्यालाच पुढील यादीबरोबर देत असे...त्यामुळे पुन्हा येणारं सामान त्याच पिशव्यांमधून घरी येई. खूप वर्षं हे करता आलं. आता नवीन दुकानदाराला मात्र हे समजत नाही.
हल्लीच डिसेंबरमध्ये घरी झालेल्या शुभ कार्यानिमित्त आलेल्या नातेवाइकांना, परिचितांना कापडी पिशव्यांमधून भेटवस्तू दिल्या. या एका छोट्याशा निर्णयामुळे आम्ही प्लास्टिकला पूर्णपणे फाटा दिला. साधारण 100 प्लास्टिकच्या पिशव्या घरीही आल्या नाहीत आणि त्यांचं काय करायचं हा प्रश्न कोणाच्याच मनाला भेडसावत राहिला नाही.
अनेकदा बिल्डींगमध्ये खाली वड, औदुंबर यांची रोपं वाढतात. ती घरी आणून, वाढवून साधारण चार वर्षांची झाली की जिथे ती व्यवस्थित वाढतील अशा योग्य ठिकाणी त्यांची पाठवणी केली आहे. अशाच प्रकारे आपट्याची काही रोपं परिचितांना वाटली होती, ती त्यांच्या घरी सुखेनैव वाढत आहेत.
’पर्यावरण दक्षता मंडळा’च्या वतीने रोपांची अदलाबदल (plant exchange) हा उपक्रम राबवला जातो. तसंच एकमेकांना काही वनस्पतींच्या बियासुद्धा दिल्या जातात. ह्यामुळे घरातील झाडांची संख्या तर वाढतेच, घरातील वातावरणही थोडंसं थंड राहतं. समान विचारांचे ’वृक्षप्रेमी’ भेटतात. पर्यावरण समृद्ध, सशक्त करण्याचा विषय अनेकांपर्यंत पोहोचवता येतो.
सामान्य माणूस पर्यावरण संरक्षणासाठी अशा किरकोळ वाटणार्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी सहज करू शकतो. रामायणामधील खारुताईची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून पार पाडायची ठरवली तर पर्यावरण संरक्षण सहज होऊ शकेल.