पुणे ः विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रभाव निर्माण करण्यासाठी आणि त्याचबरोबरीने शैक्षणिक परिसंस्थेत विद्यार्थीकेंद्री सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी 14 वर्षांपूर्वी शिक्षणविवेक ही चळवळ सुरू झाली. या वर्षी ’शिक्षणविवेक’ पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि यानिमित्ताने ’शिक्षणविवेक’ने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 4 ते 6 जून 2026 दरम्यान तीन दिवसीय ‘आनंदोत्सव 2026’ स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाच्या निमित्ताने पालक आणि मुलांनी एकत्र बसून उपक्रम करावेत, त्यातून कौटुंबिक संवाद वाढावा आणि एक सहजसुलभ नातं त्यांच्यात निर्माण व्हावं, सुट्टीचा काळ आनंदी जावा आणि त्याच बरोबरीने स्क्रीन विरहित जावा अशा अपेक्षेने या आनंदोत्सवात ‘स... संविधानाचा’ हे बालनाट्य, ‘अशी लिहावी कविता’ ही कविता लेखनाची कार्यशाळा, डॉ. नीलिमा गुंडी यांची मुलाखत, नीता उंब्रजकर या कलाशिक्षिकेची ‘असे काढावे चित्र’ ही चित्रकला कार्यशाळा तर मानसी दीक्षित यांचे ‘धम्माल गाणी’ असे कार्यक्रम घेण्यात आले.
आनंदोत्सव 2026चे उद्घाटन ’विवेक’ समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ’शिक्षणविवेक’ची ही चळवळ आता शैक्षणिकदृष्ट्या लोकचळवळ झाली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजीव तांबे ही उपस्थित होते. नीलिमा गुंडी यांनी बालसाहित्य कसे असावे या बरोबरीनेच कविता कवीच्या मनात कशी रुजलेली असते यावर भाष्य करत असतानाच, भाषा हा मुलांच्या घडणीतला अतिशय महत्त्वाचा घटक असतो असं प्रतिपादन केलं.
पालक आणि विद्यार्थ्यांनी सगळ्या कार्यक्रमांचा मन:पूर्वक आनंद लुटला. या सगळ्या उपक्रमात पालकांनीही आपला सहभाग नोंदवत कविता लेखन केलं, तर काही पालकांनी चित्र काढून आपल्या मनातल्या चित्रकला अभिव्यक्तीला वाव दिला, तर काही पालकांनी बालगीत आणि कवितांवर नाचून आनंद व्यक्त केला. या तिन्ही दिवशी मुलांचा उत्साह वाढेल, त्यांना आनंद वाटेल आणि त्यातून पालक आनंदी राहतील; तसेच अशा उपक्रमातून कौटुंबिक संवाद वाढण्याबरोबरीनेच स्क्रीनटाईम कमी होईल अशी एक चांगली शक्यता निर्माण झाल्याचे लक्षात आले.