Mamata Banerjee
ममता यांचे राज्य गेले असले तरीही ममता म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे, हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत गाफील राहण्याची चूक करता कामा नये. अत्यंत विपरीत परिस्थितीत पुन्हा उभे राहण्याची त्यांची क्षमता आहे. दीर्घकाळ त्या काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची अशी कोंडी केली की, अनेकांना वाटले की, त्यांचे राजकीय भवितव्य संपले. 1998 साली त्यांनी तृणमूल काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तो प्रसंग अतिशय नाट्यापूर्ण आहे.
ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षे सत्ता होती. गेल्या दीड महिन्यात ममता बॅनर्जी यांच्या विषयी आणि त्यांच्या निष्ठावान सहकार्यांविषयी सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर बातम्यांचा पाऊस पडतो आहे. दुसरा कुठला एखादा गरम विषय मिळेपर्यंत ही नौटंकी चालू राहणार आहे.
ममता बॅनर्जी यांचे जवळजवळ 58 आमदार त्यांना सोडून गेले आणि 20 खासदारही सोडून गेले, याच्याही बातम्या रंगवून रंगवून सांगितल्या जातात. जहाज बुडू लागले की, त्यातील उंदीर अगोदर पळू लागतात. ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेसचे जहाज बुडू लागले आहे. अशा बुडत्या जहाजात आपण बसलो तर आपले राजकीय भवितव्य समाप्त होईल, म्हणून आमदार आणि खासदार पळू लागले आहेत. त्यांच्याविषयी नको तितकी सहानुभूती किंवा ‘ममता’ दाखविण्याची गरज नाही.
ममता बॅनर्जी यांचा हा कठीण कालखंड चालू आहे. काहीजणांनी त्यांची तुलना उद्धव ठाकरे यांच्याशी केली आहे, परंतु ती योग्य नाही. ममता बॅनर्जी या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून अतिशय तीव्र संघर्ष करून पुढे आलेल्या राजनेत्या आहेत. उद्धव ठाकरे सत्तेचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले आहेत. ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास रस्त्यावरील संघर्षाचा, दगड-लाठ्या खाण्याचा, डोके फोडून घेण्याचा, सामान्य जनतेत मिसळण्याचा आहे. उद्धव ठाकरे यांचा प्रवास अलिशान गाड्यांतून दौरे करण्याचा आणि श्रोत्यांना पोटभर उपदेश देण्याचा आणि विरोधकांना शिव्या घालण्याचा आहे.
ममता बॅनर्जी या राजकारणात कसलेल्या नेत्या आहेत. पक्षाची बांधणी कशी करायची, कार्यकर्त्यांना कसे प्रेरित करायचे, जनतेचे कोणते प्रश्न हाती घ्यायचे, कोणते भावनिक आव्हान केले असता जनता आपल्या मागे उभी राहील, याबद्दलचे त्यांचे ज्ञान वादातीत आहे. बंगालमधील कम्युनिस्टांची सत्ता लोकशाही मार्गाने उलथून पाडणे महाकठीण काम होते. कम्युनिस्टांचा इतिहास असा आहे की, एकदा हाती आलेली सत्ता ते प्राण गेला तरी जाऊ देत नाहीत. सत्ता राखण्यासाठी दुसर्यांचे प्राण घेण्यात त्यांची बरोबरी करणारा राजकीय पक्ष नाही.
अशा पक्षाला ममता बॅनर्जी यांनी बंगालमधून संपवून टाकले, हे त्यांचे फार मोठे राष्ट्रीय कार्य आहे आणि त्याच बरोबर त्यांचे हे कार्य बंगालचा चेहरामोहरा बदलून टाकणारे ठरले. लोकांच्या अपेक्षा अशा झाल्या की, आता बंगाल राष्ट्रीय अस्मितेने पुन्हा उभा राहील, बंगालची ती खासियत आहे, परंतु ममता बॅनर्जी कम्युनिस्टांच्या गुंडगिरीच्या मार्गाने गेल्या. घुसखोर मुसलमानांना त्यांनी बंगालमध्ये मतदार केले. त्यांचे प्रमाणाबाहेर लांगूलचालन केले. गुंडाची दहशत निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा ‘गुंडमार्ग’ त्यांनी स्वीकारला. परिणाम त्यांचे सरकार जाण्यात झाला.
ममता यांचे राज्य गेले असले तरीही ममता म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे, हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत गाफील राहण्याची चूक करता कामा नये. अत्यंत विपरीत परिस्थितीत पुन्हा उभे राहण्याची त्यांची क्षमता आहे. दीर्घकाळ त्या काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची अशी कोंडी केली की, अनेकांना वाटले की, त्यांचे राजकीय भवितव्य संपले. 1998 साली त्यांनी तृणमूल काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तो प्रसंग अतिशय नाट्यापूर्ण आहे. तो ममता बॅनर्जी यांच्या चरित्रात वाचायला मिळेल.
1984 साली ज्येष्ठ कम्युनिस्ट सोमनाथ चॅटर्जी यांचा लोकसभा निवडणुकीत ममता बॅमर्जींनी पराभव केला, हा राजकीय भूकंपच होता. ममता बॅनर्जी यांचे सामर्थ्य काय, हे यावरून लक्षात येते. तसेच सोनिया गांधी आणि त्यांच्या सल्लागारांवर शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जी यांनी कशी मात केली याचा सर्व इतिहास जनता जाणतेच. यानंतर प्रचंड संघर्ष करून 2011 साली त्यांनी बंगालमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या उदयामुळे काँग्रेस संपली आणि कम्युनिस्ट पक्षही संपला. एवढे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, याचा विसर पडू देता कामा नये. पुन्हा सांगायचे तर ममता म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे. ज्यांना राजकारणातील डावपेच समजत नाहीत, अचूक निर्णय घेण्याची अचूक वेळ कोणती याचे ज्ञान ज्यांच्याकडे नाही, अशा राजनेत्याला ‘उद्धव ठाकरे’ म्हणतात. ममता बॅनर्जी म्हणजे निरंतर संघर्ष, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि जनभावनेची उत्तम जाण.
ममता बॅनर्जी यांच्याबद्दल खोटेनाटे अनेक व्हिडिओ चालू आहेत. तसेच त्यांचे भरपूर टिंगलटवाळी करणारेही व्हिडिओ चालू आहेत. हे सर्व उद्योेग करणारे भाजपाची सेवा करीत नसून उद्या भाजपाला अडचणीत आणण्याचे खड्डे खणत आहेत. ममता बॅनर्जी यांना जनतेने नाकारले आहे. जनतेची स्वीकृती आणि नकार हे जेव्हा टोकाचे होतात, तेव्हा ते धोकादायक असतात. कारण असे निर्णय भावनेच्या भरात जनता घेते आणि भावना कधीही कायम राहत नाहीत. 1977 साली जनतेने इंदिरा गांधीनाही पराभूत केले आणि 1980 साली त्याच इंदिरा गांधींना दोन तृतीयांश बहुमत देऊन निवडून आणले. लोकमत असे असते. लोकमत ममता बॅनर्जी यांना अनुकूल होईल असा कोणताही निर्णय सत्ताधारी पक्षाने केला तर तो उलटा चाबूक बनून अंगावर येईल. ममता बॅनर्जी यांना अटक करणे किंवा कोर्टात खेचणे किंवा त्यांच्यावर भन्नाट आरोप करणे हे सगळे विषय भावना इकडच्या तिकडे करणारे ठरतील, याचे भान ठेवले पाहिजे. विजय मिळविणे अवघड असते, पण त्याहून अवघड मिळालेला विजय पचविणे असते, हा राजसत्तेचा चिरकालिक सिद्धांत विसरता कामा नये.