कॉमेडी इज अ सिरीयस बिझनेस!

विवेक मराठी    18-Jun-2026
Total Views |
 comedy is the series business
 
@गौरी साळवेकर
 
comedy the series business 
जेव्हा सार्वजनिक आणि खासगी अवकाशामधील सीमारेषा पुसली जाते आणि त्याला ‘कंटेंट’ या कॅटेगरीत टाकलं जाऊन लोक त्याला समाजमान्यता देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते हताश करणारं असतं. सगळ्यात वाईट म्हणजे या विकृतीला क्लिनिकल लेव्हलवर घेणं. अभिव्यक्तीचं अति लोकशाहीकरण करण्याच्या नादात तिला कोणत्याही अगदी मानवतेच्या मूल्यांचंही अधिष्ठान नसणं या गोष्टीला नुसती मान्यताच नाही तर प्रतिष्ठादेखील मिळते आहे, हे दुर्दैव. खरं तर ‘कॉमेडी इज अ सिरीयस बिझनेस!’
 
आजकाल एखादा कलाकार समाज ढवळून टाकणारं वक्तव्य करतो, अजिबात पचनी पडू नये असे विनोद आणि मग जे घडतं ते खरं विचार करण्याजोगं असतं. कुणी एकदमच तलवारी उपसतात. ‘आमच्या संस्कृतीत हे असलं काही चालणार नाही हां! यांना चाबकाचे फटके द्या! धिंड काढा!’, इत्यादी इत्यादी. हे एक टोक. तर दुसरा गट कलाकाराला भक्कम पाठिंबा देत ’इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही. तुम्हाला विनोदाचं वावडं आहे. विनोदनिर्मितीसाठी विषयाचं बंधन हवं कशाला?’ वगैरे, वगैरे...असं तावातावानं विचारता होतो.
 
 
त्यातही राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, वसंत सबनीस, पु.ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, राम नगरकर, लक्ष्मणराव देशपांडे, मच्छिंद्र कांबळी, दादा कोंडके यांच्या निर्विष, खुसखुशीत, इरसाल तर कधी झणझणीत विनोदावर पोसलेला मध्यमवर्गीय, मराठी मनाचा पिंड रणवीर अलाहाबादिया, प्रणित मोरे नावाचा एक प्राणी, कुणाल कामरा नावाचा बिनकामाचा परफॉर्मर, समय रैना नामक समयसूचकतेचा लवलेशही नसलेला एक बाजारू सोंगाड्या आणि त्यांच्या कार्यक्रमात येणारे ’प्रेक्षक’ यांच्या ’तशा’ विनोदानं(?) ढवळून निघतो, यात नवल नाही. यातला विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवू.
 
 
माझ्या मध्यमवर्गीय पिंडाला धक्के बसले ते पेज थ्री लेखक वाचायला लागल्यानंतर. लैंगिकता, शरीरसंबंध यांची उघड वर्णनं या आधीच्या साहित्यात नव्हती असं नाही. पण या ’पेज थ्री’ लेखकांच्या पुस्तकात मध्यमवर्गीय, समाजमान्य मूल्यांना झुगारून देण्याचं आवाहन असायचं, त्याची भलामण असायची. मुक्त शरीरसंबंध, पॉलिगॅमी, फसवणूक, कोणत्याही ठोस विचारांच्या पायावर उभी नसलेली बंडखोरी यांवर ’जसं आहे तसं’ भाष्य न करता याला प्रतिष्ठेचा मुलामा दिलेला असायचा. फिरून फिरून सगळा कंटेंट ‘शेवटी मूल्यव्यवस्था म्हणजे काय? तुमचे सहा ते आमचे नऊ’. अशा बेजबाबदार विधानावर संपायचा.
 
खा-ऊ-जा काळात (ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन यांच्यासाठी एकत्रित वापरला जाणारा शब्द) साधंसरळ आयुष्य जगणार्‍या समाजातील मोठ्या वर्गाला असे लेखक, कंटेंट, हे चकचकीत, मुक्त वातावरण यांचं (साहजिकच) आकर्षण वाटू लागलं. तरीदेखील त्यात वाहवत जाणार्‍या आणि त्याला प्रतिष्ठा देणार्‍या लोकांची संख्या (तुलनेनं) कमी होती.
 
 
लैंगिकता या विषयाचा जाहीर उच्चार आपल्याला अजिबात निषिद्ध नाही हे आपलं साहित्य, शिल्प आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असताना आपण या लेखकांना डोक्यावर घेतलं.
 
कमल हसनचा मूकपट असणारा ’पुष्पक’ सिनेमाही असाच. पूर्वीपासून आपल्याला कधीच विनोदाचं वावडं नव्हतं. कोकणातील ’गजाली’, ’तमाशाचे फड’, ’गण गवळण’, ’दशावतार’ आणि गणपती उत्सवात असणारे ’मेळे’ ही अस्सल, रसरशीत विनोदाची जिवंत उदाहरणं! त्यातही काही विनोद असे असायचे की, त्यावेळी आम्ही आसपास असल्यावर मोठी मंडळी जरा कावरीबावरी व्हायची; पण तेवढ्यापुरतीच.  
 
याच काळात आमचे ’नॉनव्हेज विनोद’सुद्धा पुचाट विनोद अति गरीब कॅटेगरीतले असायचे. त्यावेळी मराठीत उत्तम विनोदी नाटकं यायची. त्यात ’ऑल द बेस्ट’ हे नाटक होतं. हे पूर्ण नाटक ’disabilityवर होणारे विनोद’ या विषयाला वाहिलेलं होतं. पण खरंच सांगते हे नाटक बघताना एकदाही लेखक दिग्दर्शक यांचा निषेध करता येऊ नये इतकं हे नाटक निर्विष आहे! तसंच दुसरं नाटक ‘यदाकदाचित!’ महाभारताची पार्श्वभूमी असूनही यातील विनोद अजिबात खटकत नाहीत. ‘जाने भी दो यारो’ हा सिनेमा आपल्याला आठवत असेल. संपूर्ण सिनेमा एका मृतदेहाभोवती फिरत विनोदनिर्मिती करतो तरीही हे कुठेच खटकत नाही. कमल हसनचा मूकपट असणारा ’पुष्पक’ सिनेमाही असाच. पूर्वीपासून आपल्याला कधीच विनोदाचं वावडं नव्हतं. कोकणातील ’गजाली’, ’तमाशाचे फड’, ’गण गवळण’, ’दशावतार’ आणि गणपती उत्सवात असणारे ’मेळे’ ही अस्सल, रसरशीत विनोदाची जिवंत उदाहरणं! त्यातही काही विनोद असे असायचे की, त्यावेळी आम्ही आसपास असल्यावर मोठी मंडळी जरा कावरीबावरी व्हायची; पण तेवढ्यापुरतीच. मग जे त्यावेळीही होतं त्यावरून आज इतकं का वादळ उठतंय? याचं उत्तर आहे - औचित्य, Propriety!
 
 
आपलं खासगी अवकाश आणि सार्वजनिक अवकाश यातील पुसलेली आणि त्याला फार हलक्यात घेणारी सीमारेषा!
 
लैंगिकता, शरीरधर्म, जात-वंश-धर्म याविषयी आपल्या मनात अनेकदा समाजमान्य नसणारे विचार येऊ शकतात (येतातच!) मात्र जेव्हा यातल्या सार्वजनिक आणि खासगी अवकाशामधील सीमारेषा पुसली जाते आणि त्याला ’कंटेंट’ या कॅटेगरीत टाकलं जाऊन लोक त्याला समाजमान्यता देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते हताश करणारं असतं. ’रेल्वे ट्रॅकवर पैसे टाका, ते घ्यायला कशी झुंबड उडते बघा, त्यात एखादा जीव गेला तर यापेक्षा मोठं थ्रिल तुम्हाला इतक्या कमी पैशात कुठे पाहायला मिळेल?’, ’बिर्याणीचे 370रुपये वसूल करण्यासाठी मी ’फुल चार्ज्ड’ होतो, ‘कडॅव्हरच्या (देहदान केलेला मृतदेह) गुप्तांगाचा आकार अमुक इतका होता’, ’आईवडलांना से*करताना पाहिलंत तर तुम्हीही त्यांना जॉईन व्हा’, असे विनोद करणारे आणि या विनोदावर हसणारे किंवा त्याचं समर्थन करणारे लोक मला निव्वळ ’विकृत’ वाटतात. याला ’डार्क कॉमेडी’ म्हणून सोडाच’, साधं विधान म्हणूनही संमती देता येणार नाही.
 
 
मृतदेहाची शाब्दिक का असेना विटंबना, स्त्रीला वसुलीची वस्तू समजणं, मृत्यू, लैंगिकता यांसारखे गंभीर विषय विनोदनिर्मितीसाठी वापरणं याला ’डार्क कॉमेडी’ म्हणत नाहीत. ’डार्क कॉमेडी’ ही स्वत:च्या दुःखावर वा अडचणींवर केलेला विनोद असतो आणि त्याला कारुण्याची एक किनार असते. हे विनोद हसवताना एकवेळ धक्का देतील; पण त्यांत विकृती नसते.
 
‘चला हवा येऊ द्या’ किंवा हास्यजत्रा बघा. अत्यंत हीन, रटाळ आणि सवंग कंटेंट, त्यावर खोटं खोटं हसणारे, पैसे घेऊन बोलवलेले सेलिब्रिटी आणि पिटातलं पब्लिक म्हणावं अशा स्तरावरील प्रेक्षक. शिव्या दिल्याशिवाय, पुरुषांनी साड्या नेसल्याशिवाय, हिडीस, हीन आणि लैंगिक संज्ञांचा वापर केल्याशिवाय, बोलल्याशिवाय विनोदनिर्मिती होऊ शकत नाही हे आपण आता मान्य केलं आहे असं समजायचं का? 
 
आज जेव्हा डॉक्टर होणारे विद्यार्थी किंवा डॉक्टर अशा गोष्टींवर ’जोक्स’ करतात तेव्हा त्यांनी देहदान केलेल्या व्यक्तीचा, मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे या भावनेतून केलेल्या देहदानाच्या उदात्त संकल्पनेचा, त्या कुटुंबाच्या धाडसी आणि विवेकी निर्णयाचा आणि आपला पहिला गुरू ’सायलेंट मेंटर’ म्हणून समोर असणार्‍या दात्याचा अपमान केलेला असतो. बिलाच्या पैशाच्या मोबदल्यात शरीरसुख ही कल्पना केवळ शिव्याशाप देण्याचा विषय होऊ शकते, विनोद नाही.
 
 
आज मराठीतील ‘चला हवा येऊ द्या’ किंवा हास्यजत्रा बघा. अत्यंत हीन, रटाळ आणि सवंग कंटेंट, त्यावर खोटं खोटं हसणारे, पैसे घेऊन बोलवलेले सेलिब्रिटी आणि पिटातलं पब्लिक म्हणावं अशा स्तरावरील प्रेक्षक. शिव्या दिल्याशिवाय, पुरुषांनी साड्या नेसल्याशिवाय, हिडीस, हीन आणि लैंगिक संज्ञांचा वापर केल्याशिवाय, बोलल्याशिवाय विनोदनिर्मिती होऊ शकत नाही हे आपण आता मान्य केलं आहे असं समजायचं का?
 
 
मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही, पण शिव्या हा भाषेतील अविभाज्य भाग आहे हे आपल्याला मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. पण म्हणून ’राग आला की दे प्रत्येकाला शिवी’ असं सुसंस्कृत मनुष्य करत नाही. स्थळ, काळ आणि प्रसंग बघून त्या वापरायच्या असतात याचं भान त्याला असतं! कित्येकदा सुसंस्कृत लोकदेखील ’निव्वळ सवय’ आणि ’भाषेचा भाग’ म्हणून शिव्या देतात हे आपल्याला सहज दिसेल; पण म्हणून त्या कुठे द्याव्यात/देऊ नयेत याबद्दलच्या औचित्याबद्दल कुणालाही किंतु असण्याचं कारण नाही.
 
 
दादा कोंडके हेे ’द्वयर्थी’ विनोदासाठी प्रसिद्ध होते, राम नगरकरदेखील ’सूचक’ विनोद करायचे. त्यांच्यावरही जबर टीका व्हायची; तरीही त्यांचे विनोद ऐकून आजही मला ते विकृत असल्याचं कधीही वाटत नाही. आज जगण्यातली आणि त्यामुळे अभिव्यक्तीमधली निरागसता पूर्णपणे संपून गेलीय. ’सकस कंटेंट’ म्हणजे काय? हे गेल्या दोन पिढ्यांना फारसं माहीतच नाही. त्याआधीच्या काळातील साहित्यनिर्मिती आजच्या काळाशी कुठेच मेळ खाणारी नाही, कारण तशी सामाजिक परिस्थितीच आज अस्तित्वात नाही. शालेय आणि घराच्याही शिक्षणात उत्तमोत्तम कलाकृती, विविध भाषांतील लेखक, कलाकार यांचा समावेशच नाही. त्यामुळेही असेल कदाचित की, आजकालच्या नुसत्या सवंग नव्हे; तर विकृत मनोरंजनाला मन आणि मेंदू चटावलं आहे.
 
 
सगळ्यात वाईट म्हणजे या विकृतीला क्लिनिकल लेव्हलवर घेणं. अभिव्यक्तीचं अति लोकशाहीकरण करण्याच्या नादात तिला कोणत्याही अगदी मानवतेच्या मूल्यांचंही अधिष्ठान नसणं या गोष्टीला नुसती मान्यताच नाही तर प्रतिष्ठादेखील मिळते आहे. काही गोष्टी या काळ्या पांढर्‍याच असतात हे समजणं इतकं अवघड असतं का खरंच?
 
 
हातातोंडाशी गाठ असणार्‍या वर्गाकडून आपण मूल्य, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टींची अपेक्षा करणं वेडेपणा असतो. कारण त्यांची अस्तित्वाची लढाईच फार मोठी असते. ’नैतिकता’, ’मूल्य’ अशा सगळ्या गप्पा भरल्या पोटी बर्‍या वाटतात. पण मग उच्चभ्रू, सुशिक्षित आणि तथाकथित सुसंस्कृत समाजात राहणार्‍या लोकांचं काय? या नैतिक दिवाळखोरीचे आपण नाईलाजानं साक्षीदार असू; पण त्याचे किमान भागीदार होऊ नये हेही भान कुणी पाळताना दिसत नाही.
 
 
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार्‍या एखाद्या अशा ’स्टॅण्ड अप कॉमेडी’ किंवा ’कॉमेडी शो’चा प्रेक्षक हा एखाद्या वस्तीतील मुलगा असतो किंवा सोबोसारख्या ठिकाणी राहणारा उच्चभ्रू तरुण, दोघेही त्याच वैचारिक अधःपतनाला ’मनोरंजन’ समजतात त्यावेळी त्यांचा स्वतःचा सदसद्विवेक एकाच वेळी आत्महत्या करत असतो. वस्तीतल्या मुलाला कुणी टोकणारं नसतं; कारण अशी भाषा, अभिव्यक्ती त्यानं आजूबाजूला अनेकदा बघितलेली असते. सुरक्षित वातावरणात राहणार्‍या मुलांच्या आईबापांना आपलं मूल ’अतिशय स्मार्ट’, ’कूल’ आहे आणि आपण अतिशय ’अपग्रेडेड’ आईबाप आहोत असं वाटत असतं! याच्या अध्येमध्ये राहाणार्‍या पालकांना मुलं काय बघतात, बोलतात याचा पत्ताच नसतो. ‘वासरात लंगडी गाय बनू पाहणारे काही महाभाग’ आधीच्या पिढीपेक्षा ही पिढी बरी. नैतिकतेचा दांभिक बुरखा तरी पांघरत नाहीत’ म्हणून या नैतिक आत्महत्येचं समर्थन करतात. यावर आक्षेप घेणार्‍यांना जुनाट, मूर्ख आणि दांभिक म्हणून हिणवलं जातं.
 
 
राहाता राहिला प्रश्न लैंगिकतेचा. लैंगिकता ही बाब खासगी असते, अगदी शरीरधर्म असतो तशीच. त्याकडे आपण जर मनोरंजन म्हणून बघत असू तर निदान स्वतःला काही नियम घालून घेण्याचा शहाणपणा अंगी हवा. नग्नता, लैंगिकता यांकडे ’निखळपणे’ बघण्यासाठी आपण एकतर आदिम असायला हवं, नाहीतर अत्यंत प्रगत! आपण दोन्हींच्या अध्येमध्ये आहोत. जिथे अशाच विषयांवर विनोद करायचे असतील तिथे viewershipचे  किमान काही निकष वा नियम हवेत.
 
 
हे पूर्वीही होतं, आजही आहे आणि यापुढेही राहील. पूर्वी समाजमाध्यमं नसल्याने अशा गोष्टी भरभर पसरून ’हा विनोद आणि हा विनोदवीर’ हा नरेटिव्ह सेट होत नव्हता. ज्यांना हेच हवंय त्यांनी जरूर घ्या. पण यालाच ‘डार्क कॉमेडी’, ’विनोदी साहित्यनिर्मिती म्हणून प्रत्येकाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून गळे काढणार्‍यांनी आज हे वास्तव डोळे उघडून पाहण्याची गरज आहे म्हणजे त्यांना हे समजेल की, आपल्याला आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अभिव्यक्ती संकोचाची जास्त गरज आहे. (त्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील याची मला पुरेपूर कल्पना आहे!) कंटेंट बनवण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेताना ते कुठे, कुणासाठी का आणि मुख्य म्हणजे कुणावर बनवतो आहोत याचं भान नसेल तर त्यापेक्षा अभिव्यक्ती संकोच केव्हाही चांगला! कारण सकस विनोदनिर्मिती ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही जबाबदारी फक्त मागणी तसा पुरवठा म्हणणार्‍या आणि पळवाटा शोधणार्‍या कंटेंट क्रिएटर्सची नाही; तर असा कंटेंट चवीचवीने पाहणार्‍या प्रेक्षकांची, एवढ्याशा गोष्टीचा किती तो बाऊ म्हणून सगळ्या गोष्टी क्लिनिकल लेव्हलवर झटकून टाकणार्‍या समाजातील मोठ्या वर्गाची आणि याविरोधात योग्य तिथे निषेध करणार्‍या प्रत्येकाची आहे.
 
 
कंटेंट सभ्यच असावा ही अपेक्षा आजच्या काळात बाळबोध आहे. पण निदान तो विकृत नसावा इतकी माफक अपेक्षा करता येते. माणूस हा अनेकदा विकृती किंवा वेडेपणाच्या सीमारेषेवर असतो असं म्हणतात. तिथून स्वतःला योग्य वेळी मागे घेऊन येणं हा असतो सदसद्विवेक. हा विवेक जसा वागण्याबोलण्यात असावा लागतो, तसाच तो अभिरुचीमध्येही डोकावत असतो. या संदर्भात पाहिलं तर संपूर्ण समाजाची अभिरुची ही आज गंभीर चिंतेची बाब आहे. विकृत कंटेंटला जाहीर विरोध होणं हा त्यातल्या त्यात बुडत्याला काठीचा आधार आहे.
 
 
जाता जाता - अय्यो श्रद्धा, अमित टंडन, ट्रॅव्हर नोहा यांच्यासारखे अजूनही काही चांगला आणि निखळ कंटेंट देणारे परफॉर्मर आहेत. त्यांची संख्या वाढत राहो!