प्लास्टिकच्या भस्मासुराला चीनचे बांबू उत्तर

विवेक मराठी    19-Jun-2026   
Total Views |
@डॉ. हेमंत बेडेकर
9767200905
 
bamboo 
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण, जलस्रोत आणि मानवी आरोग्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण जगभरासाठी चिंतेचा विषय ठरले आहे. अशा वेळी चीनने बांबूला ‘प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय’ म्हणून पुढे आणत एक नवा मार्ग दाखवला आहे. बांबूच्या नैसर्गिक, जैवविघटनक्षम आणि शाश्वत गुणधर्मांचा उपयोग करून प्लास्टिकच्या ‘भस्मासुराला’कसा आवर घालता येऊ शकतोे, याचा वेध घेणारा हा लेख..
प्लास्टिक आणि त्यापासून निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. किंबहुना सकाळी उठल्याबरोबर आपल्या दिवसाची सुरुवात प्लास्टिकच्या ब्रशनेच होते. गेल्या काही वर्षांत आपल्या दैनंदिन जीवनाचा प्लास्टिक हा अविभाज्य भाग झाला आहे. या प्लास्टिकची जगभरातील व्याप्ती इतकी वाढली आहे की, त्याला ’भस्मासूर’ म्हणणेच योग्य ठरेल. विशेषतः एकल (फक्त एकदाच वापरात असलेल्या वस्तू)उपयोगाच्या प्लास्टिकमुळे आपल्या शहरांतील सांडपाणी वाहिनी आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. माणसाच्या सहज प्रवृत्तीमुळे कुठेही गेले तरी आपण प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या वस्तू कुठेही फेकून देतो.
 
कोणत्याही प्लास्टिकच्या अशा वस्तूंचा प्रवास कचरा गाडीतील सुक्या कचर्‍याच्या ढिगात आणि पर्यायाने जमिनीत होतो. प्लास्टिक कुजण्यासाठी काही शे वर्षे लागतात. एकल वापराच्या प्लास्टिकचे हवामानातील उष्णतेने तुकडे होतात. हे तुकडे आणि आपण इकडे तिकडे फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या गटारे तुंबवून टाकतात. पाणी पुढे सरकत ओढे, नाले, नद्या यांमधून वाहत समुद्रात जाते. हे प्लास्टिक जमा होत होत त्याचा महापूर होतो. माणसाच्या जीवनापासून पाण्यातील जीवजंतू आणि शेवटी समुद्री (सागरी) जीव अशा सर्वांच्या जगण्याला प्रचंड अडथळा येतो. या सर्व ठिकाणचे मासे प्लास्टिक पोटात घेऊनच आपल्यापर्यंत येतात. म्हणजेच आपण फेकून दिलेले प्लास्टिक पुन्हा आपल्याच पोटात जाते.
 
या प्लास्टिकची व्याप्ती किती आहे? हे प्लास्टिक किती मोठ्या प्रमाणात आपल्या वाट्याला येते, आपल्या आयुष्यात येते, याची जागतिक स्तरावरची आकडेवारी बघितल्यावर प्लास्टिक हा खरोखरच ’भस्मासूर’ आहे हे प्रत्ययाला येते. याबद्दलची अधिकृत आकडेवारी असे सांगते की, 1960 सालापासून 2020 सालापर्यंत जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या वार्षिक निर्माणात वीसपट वाढ झाली. 2020 सालात हे उत्पादन 367 दशलक्ष टन एवढे झाले. त्याचबरोबर प्लास्टिकचा जागतिक व्यापार एक अब्ज डॉलर इतका झाला आहे. हे प्रमाण जगाच्या एकूण व्यापार मूल्याच्या पाच टक्के आहे. आपली जीवनशैलीच अशी झाली आहे की, आपल्याला प्लास्टिकच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील वापराशिवाय आपण जगू शकत नाही. अर्थात यातील फक्त काही वस्तू आपले जीवन सुसह्य करतात. या फायद्यांपेक्षा तोटेच जास्त आहेत.
 

bamboo 
आपल्या वापरातील प्लास्टिकपैकी सुमारे 80टक्के प्लास्टिक हे एकल वापराचे म्हणजेच एकदा वापरल्यानंतर फेकून द्यायच्या वस्तूंपैकी असते. आपण वापरलेले प्लास्टिक रासायनिक पदार्थांच्या प्रक्रियेतून बनवलेले असल्यामुळे ते जेव्हा कचर्‍याच्या ढिगात जाते तेव्हा त्याचे हवेचे तापमान व ढिगातील उष्णतेने विघटन होऊन त्यातील घातक अशा रासायनिक पदार्थात रूपांतर होते. ते जमिनीत मिसळत नाही. हे रासायनिक पदार्थ कर्करोगांसारख्या व्याधींना निमंत्रण देतात. त्या घातक रसायनांचा नैसर्गिक जीवजंतूंवरही जीवघेणा परिणाम होतो.
 
हे पदार्थ पाण्यात विरघळतात व आपल्या नागरी वस्तीच्या कचर्‍यातून पाझरणार्‍या द्रवाबरोबर पाण्याच्या प्रवाहात मिसळतात. त्यामुळे सर्व ओढे, नाले, नद्या प्रदूषित होतात व पर्यायाने पाण्यातून प्रदूषण वाढवतात. शुद्ध पाणी तयार करताना लागणार्‍या शुद्धीकरण यंत्रणावर यांचा प्रचंड ताण येतो. हे रसायनमिश्रित पाणी जमिनीत मिसळले जाते. साहजिकच आमच्या जमिनींचे आरोग्य बिघडते. परिणामी पिकांवर किडी, रोग असे भयंकर परिणाम होऊन उत्पन्न कमी होते. हे सर्व परिणाम संपूर्ण मनुष्य जातीला आणि जीवसृष्टीला भोगावे लागतात. हेच पाणी प्लास्टिक आणि त्याची रसायने समुद्राला जाऊन मिळते. सध्या मुंबईपासून लहानशा ठिकाणची सर्वत्र नालेसफाईची दृश्ये आपण पाहत आहोत. या सर्वात प्लास्टिकचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त असते. आपण वापरलेले एकल प्लास्टिक, आवेष्टणे आणि पेयांच्या बाटल्या यांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
 
या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे परिणाम जागतिक स्तरावर समुद्र आणि एकूणच परिसरावर होतो आहे. हा आकडा वाढता वाढता 2050पर्यंत 3000 हजार कोटी टन एवढा वाढण्याची शक्यता जगभरातील अनेकांनी वर्तवली आहे. या प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर तोडगा काढून त्यापासून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जगभर प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक जागतिक हवामान बदल परिषदेत दरवेळेला हा कळीचा मुद्दा असतो. या प्लास्टिक भास्मासूरावर उपाय करण्यासाठी सर्व राष्ट्रातील शास्त्रज्ञांना प्रत्येक जागतिक परिषदेत आवाहन केले जाते. त्यानुसार ठराव केले जातात. अनेक राष्ट्रांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्यासाठी काही उपाययोजना करून ती अमलांत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. अजूनही केले जातात.
 
चीनचा राजमार्ग
 
’आंतरराष्ट्रीय बांबू व वेत संस्था’ (इनबार) आणि चीन सरकार यांनी 2022 साली यावर एक ठोस उपाय म्हणून ’प्लास्टिकऐवजी बांबूच्या वस्तू वापरावर भर’ देऊन एक उत्तम पर्याय दिला आहे. चीनने याची सुरुवात केली आहे. यामध्ये बांबूच्या नैसर्गिकरीत्या विघटन होण्याच्या गुणधर्माचा सुयोग्य वापर केला गेला आहे. या वापरातून आपण प्लास्टिकला पर्याय म्हणून अनेक गोष्टींचा दैनंदिन वापर करून हे प्रदूषण टाळू शकतो, याची शिफारस केली गेली. ’इनबार’ आणि संयुक्त राष्ट्र संघ यांनी 2023 ते 2030 या कालावधीत कार्यवाही करण्यासाठी बांबू वस्तूंचा वापर हा एक शाश्वत असा पर्याय दिला आहे. यामध्ये बांबूच्या नैसर्गिक पर्यावरण स्नेही गुणधर्मांचा वापर करून प्लास्टिकच्या भस्मासूराला नियंत्रित करण्यासाठी उत्तर दिले गेले आहे.
 

bamboo 
चीनने गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रयत्नपूर्वक बांबूचा वापर करायला सुरुवात केली आहे. यासाठी गवत वर्गातील बांबूच्या अतिवेगाने वाढणार्‍या गुणधर्माचा, मुबलक उपलब्धतेचा, बहुवार्षिक वाढीचा उत्तम वापर केला गेला आहे. बर्‍याचशा प्लास्टिक वस्तूंना पर्याय म्हणून बांबूच्या नैसर्गिकरीत्या विघटीत होण्याच्या गुणधर्मामुळे चालना तर मिळालीच; पण त्याचबरोबर चक्रीय आणि हरित अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठीही मोठा हातभार लागला आहे. नैसर्गिक कर्ब चक्र सुरळीत चालू राहून पर्यावरणाचे आरोग्य अबाधित राहण्याचे मोठे काम केले आहे.
 
आपल्या दैनंदिन वापरातील एकल वापराच्या असंख्य वस्तू आपण बांबूच्या वापरू शकतो, उदा. चमचे, वाट्या,जेवणाची ताटे, चॉप स्टिक्स, ट्रेज, पेय पिण्यासाठीच्या नळ्या यांशिवाय पुनःपुन्हा वापरायच्या वस्तू जशा की, घड्याळे, टूथ ब्रश, की चेन्स, बांधकाम साहित्य, फर्निचर, फ्लोरिंग टाईल्स, पवनचक्क्यांची पाती, सांडपाणी वाहून नेण्याचे आणि शेतीत पाणी वाहून नेणारे पाईप्स अशी बरीच मोठी यादी होऊ शकते. आज या वस्तू कदाचित महाग वाटतील पण पर्यावरण वाचवण्यासाठी ही किंमत मोजणे परवडेल. चिनी व्यापाराचा विचार करून मोठ्या प्रमाणात वस्तू निर्मिती केली तर किमती आटोक्यात येतात. या सर्व वस्तू वापरून झाल्यावर निसर्गात जाताच विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी विशेष प्रयास करावे लागत नाहीत आणि प्रदूषणही होणार नाही.. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकजागृती करावी लागते.
 
लोकजागृती
 
चीनने प्लास्टिक प्रदूषणाला उत्तर शोधताना लोकजागृती, सर्व वस्तूंची मुबलक उपलब्धता यांवर विशेष भर दिला. या वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात बांबू उपलब्ध होण्यासाठी शेतकर्‍यांचे उत्पादन वाढण्यासाठी तंत्र विकसित केले. शेतकरी ते ग्राहक (देशी आणि विदेशी)यांच्यात जागृती, या सर्व वस्तू निर्मात्यांसाठी उपलब्ध कच्चा माल म्हणून बांबू उपलब्ध करणे, विविध खाजगी संस्था, शासकीय यंत्रणा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देणे अशा अनेक गोष्टी केल्या.
 
प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू वापरताना अनेक अडचणी येतात. चीनलाही आल्या. पण त्यासाठी या देशाने काही कठोर निर्णय घेतले. उदाहरणार्थ चिनी खाद्य संस्कृतीत चॉपस्टिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चॉपस्टिक्स पूर्वी लाकडापासून ते हस्तिदंतीपर्यंत अनेक प्रकारच्या असत. प्लास्टिकचा जमाना आल्यावर प्लास्टिकच्या बनू लागल्या. एकदा प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू वापरायचा असे ठरवल्यावर आज मोठ्या प्रमाणात बांबू चॉपस्टिक्स स्वस्तात बाजारात उपलब्ध आहेत.
 
आज प्लास्टिक कप, पेले, चॉपस्टिक, कान कोरण्यासाठी बड्स, दात कोरण्यासाठी काड्या यांचे सहज मिळणारे व स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच त्यांचा वापर प्रचंड वाढला. हे करताना सर्व लहानमोठ्या हॉटेल्समध्ये या पर्यायांवर भर दिला जातो. साहजिकच मागणी वाढते. आपोआप वस्तू स्वस्त होते. अर्थशास्त्राच्या ’मागणी तसा पुरवठा’ या तंत्राने हे शक्य होते. तीच गोष्ट दुपारच्या जेवणाच्या डब्याची आहे. बांबूपासून तयार केलेल्या पातळ प्लायच्या डब्यांना आता एवढी मागणी आहे की, हा पर्याय आपोआप निवडला जातो, किंबहुना तोच पर्याय उपलब्ध असतो.
 
अडचणी व उपाय
 
प्लास्टिकला ‘बांबू’ हा पर्याय शोधताना चीनला किंवा कोणत्याही देशाला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते. या अडचणी समजून घेऊयात. त्याचबरोबर त्यावर चीनने कशी मात केली, हेही समजून घेऊयात.
 
कोणतेही उत्पादन करताना कमी प्रमाणात उत्पादन झाल्यास जास्त उत्पादन खर्चामुळे त्याची विक्री किंमत भरमसाठ वाढते. चिनी उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याच्या पद्धतीने याला आपोआप उत्तर मिळाले. याचबरोबर उत्पादन खर्च कमी ठेवणे हे साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याआधी लेखात उल्लेखलेल्या प्राथमिक प्रक्रिया पद्धतींवर भर दिल्यामुळे किंमत आपोआप आटोक्यात येते. पर्यायी गोष्टींची बाजारातील उपलब्धता हा सामान्य ग्राहकाला पडलेला प्रश्न असतो. आपल्याकडे हे प्रकर्षाने जाणवते. आमच्या सामान्य ग्राहकाला बांबू फर्निचर हवे आहे; पण ते त्याच्या खिशाला परवडेल असे उपलब्ध नसल्याने त्याला प्लास्टिक किंवा इतर पर्यायांकडे वळावे लागते. जर कोणत्याही ठिकाणी ते उपलब्ध झाले तर आपोआप त्या पर्यायांची विक्री होते. मागणी वाढली की उत्पादक उभे रहातात.
 
ग्राहकाला प्लास्टिक पर्यायी गोष्टी बाजारात सहज मिळतात व त्या परवडतात आणि प्रसंगी थोड्या महाग पडल्या तरी आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी त्या घेतल्या पाहिजेत, ही जागृती मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था व शासकीय पातळीवर करावी लागते. हे चीनमध्ये सररास घडते. सातत्याने संशोधन ही बाब अनेकदा दुर्लक्षित केली जाते. याबाबत चीन फार आग्रही आहे. नवनवीन संशोधनाची माहिती सातत्याने ग्राहकांपर्यंत पोहाचणे फार महत्त्वाचे आहे. आपण शर्टला जे बटन लावतो ते बांबूपासून तयार केले जातात’ हे ग्राहकाला कळल्याबरोबर व मोठ्या प्रमाणात तयार कपडे विकणार्‍यांनी त्यांचा वापर करण्यास सुरुवात केल्यावर मागणी वाढू लागली. आज चीनमध्ये प्लास्टिक बटने फारशी विकली जात नाहीत. आपल्याकडे एका पुण्याच्या आमच्या मित्राने बांबूचे टूथब्रश बाजारात आणले. सुरुवातीला त्यांची किंमत शंभर रुपये होती. आता तेच टूथब्रश पन्नास रुपये किंमतीच्या आत मिळतात.
 
शासनाने करसंकलन करताना प्लास्टिक पर्यायाला प्राधान्य मिळावे म्हणून त्या पर्यायांवरचे कर हे अत्यल्प ठेवणे अपेक्षित आहे. आज जगभरात अजूनही प्लास्टिक वस्तूंवर कमी आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तू वर जास्त कर आकारणी केली जाते. त्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. वाढत्या उत्पादनांचा कर संकलनावर परिणाम होतोच. याबद्दलचे एक उदाहरण फार मजेशीर आहे. युरोपसारख्या समशीतोष्ण देशात जमिनीवर मोझाईक टाईल्सऐवजी लाकडाच्या टाईल्स पसरल्या जातात. युरोपात जंगलतोडीला बंदी असल्यामुळे याला पर्याय म्हणून बांबूच्या टाईल्स बनवल्या जातात व वापरल्या जातात.
 
बांबूला लाकूड वर्गातून काढून गवत वर्गात टाकून अनेक वर्षे झाली; पण अजूनही बांबू टाईल्सवर कर लावताना लाकूड वस्तू म्हणून भरमसाठ कर लावला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रत्येक गोष्टीचे विशिष्ट वर्गीकरण करून वस्तू विकल्या जातात. याला HS Code असे म्हणतात. अजूनही अशा बांबू टाईल्स लाकूड कोडमध्येच आहेत. जगभरातील या टाईल्सचा चीन हा सर्वात मोठा पुरवठादार आहे. हा कोड जर बांबूसाठी स्वतंत्र मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील हे चित्र बदलू शकते. तीच गोष्ट कोळशाची आहे.
 
सरकारी निर्णय हे सर्वच देशात असे विचित्र असतात; पण यावर तोडगा काढून मार्ग निघाला तर प्लास्टिक भस्मासुराला जग निकराने तोंड देऊ शकते. बांबूपासून जवळ जवळ 1500 प्रकारच्या म्हणजेच 15000पेक्षा जास्त निर्माण करता येतात हे जगजाहीर आहे. हे करण्यासाठी सर्वत्र नित्यनेमाने संशोधक काम करत आहेत व त्याचा लाभ जगभर मिळत आहे. कोणत्याही ठिकाणची बांबू धोरणे ठरवताना हे लक्षात घेऊन धोरणे ठरवून त्यावर उपाय शोधावे लागतात. केवळ आज एका गोष्टीची गरज भासते म्हणून तात्पुरते धोरण ठरवल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
 
बांबू ही एक अशी गोष्ट आहे की, जी देशाच्या अर्थकारणात व सकल उत्पन्नात लक्षणीय भर घालू शकते. देशांतर्गत बांबू आधारित वस्तूंचा वापर करताना आपण प्लास्टिकच्या भस्मासुराला उत्तर देऊन आपली माती व आपले पाणी आणि एकूणच पर्यावरणाचे रक्षण करीत आहोत; ही भावना निर्माण करण्यासाठी शासनाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर शासन हा सर्वात मोठा ग्राहक आहे हे लक्षात घेऊन स्वतः अशा वस्तूंची खरेदी केली तर जनता आपोआप ग्राहक बनते.
 
 
यातील अनेक गोष्टी या जर वाया जाणार्‍या बांबूपासून तयार केल्या गेल्या तर त्याचा बांबूच्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होतो.साहजिकच विक्री किंमत कमी होते. चांगल्या प्रतीच्या वस्तू विकता येतात. हे लक्षात घेऊन लघु व मध्यम उद्योगासाठी यंत्रसामुग्री कमी दराने उपलब्ध करून द्यावी लागते. हे वेगवेगळ्या स्तरावर स्वयंसेवी व सरकारी संस्थांनी केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे असते.
 
 
याचबरोबर अधिकाधिक बांबू उद्योग निर्माण झाले तर सहजच कच्च्या मालाची मुबलक उपलब्धी होते. हे करताना दर हेक्टरी बांबू उत्पादन वाढणे गरजेचे आहे. हे चीनने साध्य केले आहे. हेक्टरी 15 टनांवरून 30 किंवा अधिक टन उत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. सुदैवाने या सर्व प्रयत्नांत अनेक देशातील व विशेषतः चीनमधील सर्व चिनी आणि आंतरराष्ट्रीय संस्था प्रचंड मेहनत करत आहेत व उत्पादनात भर घालत आहेत. सोबत काही चिनी उत्पादनांची चित्रे देत आहोत. ते पाहून हे किती मोठे काम आहे, याविषयीची कल्पना येईल.
या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज चीन बाजारात अधिकाधिक वस्तू, तंत्र आणि यंत्र विकसित करून उपलब्ध करून देत आहे. ही यंत्रे आणि तंत्रे जशीच्या तशी वापरायची नसतात.त्यावर आपल्या गरजा, आपल्या नागरिकांच्या सवयी, औद्योगिक वापरायोग्य आणि आपल्या हवामानात उत्पादनासाठी योग्य वातावरणात वाढणार्‍या योग्य प्रजातींचा वापर करून व तंत्र आणि यंत्रात योग्य ते बदल करावे लागतात. हे चीनने जगाला दाखवून दिले आणि म्हणूनच ते आज बांबूच्या आंतरराष्ट्रीय बाजारात अग्रणी आहेत. आपल्याला तो पल्ला गाठण्यासाठी काय काय करावे लागेल, जेणेकरून आपण आंतरराष्ट्रीय बाजारात उभे राहून भारताचे बांबू उत्पादन सशक्तपणे उभे करू शकू हे पुढील काही लेखात पाहूया.
- संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.
venu.vedh25@gmail.com

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.