US-Iran ceasefire
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी झाली असली, तरी जगावरील युद्धाचे संकट पूर्ण टळलेले नाही. अण्वस्त्रांची स्पर्धा आणि इस्रायल-इराण या देशांमधील वादामुळे हा तह अजूनही धोक्यात आहे. होर्मुझ खाडी मोकळी होणे आणि अमेरिकेकडून इराणला मिळणारी आर्थिक मदत यामुळे तात्पुरती शांतता दिसेल; पण अमेरिका आणि इराण या देशांचा एकमेकांवरील अविश्वास पाहता, पुढील दोन महिने संपूर्ण जगासाठी जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतील.
सोमवार दिनांक 15 जून 2026ची सकाळ उजाडली आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांनी अनेक दिवस अपेक्षित असलेली सुखद बातमी प्रसारित करायला सुरुवात केली. त्याची घोषणाही अपेक्षेप्रमाणे ट्रम्पबाबानेच केली. शेवटी एकदाची अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदीची घोषणा झाली. यावेळी इराणने ते नाकारले नाही एवढेच. ती ऐकल्यावर सर्व जगाने सुस्कारा सोडला. अपेक्षेप्रमाणे युद्धादरम्यान जगात भडकलेले कच्च्या खनिज तेलाचे भाव एका रात्रीत कमी झाले, अगदी युद्धपूर्व पातळी जवळ म्हणजे 85 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले. भारतात शेअर बाजार 1000 अंकांनी वधारला.
ही युद्धबंदी होण्यासाठी ट्रम्पबाबा घायकुतीला आला होता. ज्या इराणी क्रांतिकारी संस्थेच्या हातात सर्व सत्ता एकवटली आहे, ते अजिबात आतुरता दाखवत नव्हते. ट्रम्पबाबाने कमी नव्हे 39 वेळा घोषणा केल्या; पण इराणने त्याला तोंडघशी पाडले. तसे पाहिले तर दोघांचाही शक्तिक्षय झाला असला तरी इराण बेफिकिरी दाखवत होता. निर्वाणीचा उपाय म्हणून ट्रम्पने अद्दल घडविण्यासाठी खार्ग बेटांवर हल्ला करण्याची धमकी दिल्यावर इराण नमला. इराण आणि इस्रायल या दोघांचीही यापुढे घाव सोसायची ताकद उरली नव्हती, नाईलाज होता. त्यामुळे एकंदरीत तहाला इराण आणि इस्रायलकडून मिळालेला प्रतिसाद पाहता तो ’अधांतरी’ झालेला आहे. हे दोन्ही देश येत्या दोन महिन्यांच्या मुदतीत या तहाला कसे प्रतिसाद देतील, याबाबत शंकाच आहे.
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा?
तेल वाहतूक पूर्ववत
खरोखरीच जनमानसात खाडीच्या देशांत शांतता प्रस्थापित होऊन खनिज तेलाची वाहतूक परत सुरळीत होईल, अशी आशा जागली आहे. कारण सर्वांसाठी महत्त्वाची घोषणा होर्मुझ खाडी मोकळी होणार असल्याची होती. इराण जरी जर-तरची भाषा बोलत असला तरी एवढे मात्र स्पष्ट होते की, यापुढे ना इराण ना अमेरिका होर्मुझ खाडीतून होणारी माल वाहतूक अडविणार आहेत आणि ना इराण या ना त्यानिमित्ताने त्यांच्याकडून टोलवसुली करणार आहे. दोघेही विनाशर्त आपापली नौदले मागे घेतील, अजिबात क्षेपणास्त्रे टाकणार नाहीत, यथावकाश पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू होईल असे चित्र आहे. आता प्रश्न आहे तो इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांचा आणि त्यावरील इराणच्या प्रतिक्रियेचा.
होर्मुझ खाडी पूर्णपणे मोकळी होण्यास बराच अवधी लागेल. कारण इराणने होर्मुझ खाडीत विशेषतः वळणाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात समुद्री सुरुंग पेरून ठेवले आहेत. त्यांना निकामी करण्याचे काम प्रथम करावे लागेल. असे सुरुंंग पाण्याखाली पेरताना त्यांच्या ठावठिकाणांचा नकाशा काढला जातो. युद्धादरम्यान इराणने घोषणा केली होती की, ते नकाशे हरवले आहेत. ती केवळ युद्धातील हूल होती की, खरोखरीच ते नकाशे हरवले होते ते आता समोर येईलच. नकाशे उपलब्ध झाले तर काम सोपे आणि लवकर होईल. अमेरिका आणि इराण सुरुंग निकामी करण्याच्या कामात सहकार्य करतील; कारण आता दोघांनाही निकड आहे.
जपानकडे पाणसुरुंग निकामी करण्याचे प्रगत तंत्र आहे. तेव्हा जपानचा त्यात नक्की सहभाग असेल. साधारणपणे दोन महिन्यांच्या अवधीत होर्मुझ खाडी पूर्णपणे मोकळी व्हावी. तुमच्या आमच्यासाठी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
इराणचे अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र धोरण
या युद्धाचे मूळ इराणच्या अण्वस्त्र धोरणाच्या आणि अणुबाँब तयार करण्याच्या धडपडीत होते. इराणने इस्रायल आणि त्या अनुषंगाने अमेरिकेच्या दबावाला कुठल्याही प्रकारे बळी न पडता तो कार्यक्रम पुढे रेटला होता. हे दोन्ही देश कोणतेही आंतरराष्ट्रीय संकेत न जुमानता अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले करू शकतील, हे लक्षात घेऊन ते जमिनीखाली कित्येक शेकडो मीटर जाड्या काँक्रिटच्या कवचांखाली उभारले होते. मागच्या वर्षी आणि याहीवेळी विशेष करून अमेरिकेने इराणच्या तिन्ही अण्वस्त्र प्रकल्पांवर जोरदार हल्ले केले.
याहीवेळी त्या प्रकल्पांचे म्हणावे तसे नुकसान झाले नाही. कारण क्षेपणास्त्रे त्या खोलीपर्यंत पोहचलीच नाहीत. थोडी डागडुजी करून ते सुरू करता येतील, हे लक्षात आल्यावर ट्रम्पबाबाने सैनिक उतरवून इराणच्या वृद्धिंगत युरेनियमचा सुमारे 440 किलो साठा उचलून आणण्याच्या वल्गना केल्या होत्या; पण ते करताना होऊ शकणारी मनुष्यहानी सहन करण्याची अमेरिकेच्या जनमानसाची मानसिकता नाही, हे लक्षात आल्यावर ट्रम्पबाबा पाय मागे खेचू लागला.
दुसरी मोठी इराणची शक्ती त्याने प्रगत केलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे होती. आपल्यावर हल्ला होणार हे लक्षात घेऊन त्यांचे प्रचंड साठे निर्माण करून इराणने तेही जमिनीखाली दडवून ठेवले. वारंवार जबरदस्त बाँबहल्ले होऊनही ते पूर्णपणे नष्ट करणे दोन्ही देशांना शक्य झाले नाही. ते लक्षात घेऊन वाटाघाटीत ’इराणने 500 किमीपेक्षा लांब पल्ल्याच्या वरची क्षेपणास्त्रे बनवू नये’ असे कदापी मान्य न होणारे कलम टाकण्याचा आग्रह इस्रायल धरून बसला. त्यामुळे वाटाघाटीची बोलणी फक्त अमेरिका आणि इराणमध्येच होत राहिली. यात आपला सहभाग नाही, त्यामुळे या तहातील अटी मानण्याचे आपल्यावर बंधन नाही हे इस्रायलने वारंवार जाहीर केले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या लेबनॉनशी वाटाघाटीत हामासचाही सहभाग नसल्याने हिजबुल्लानेही त्या तहाच्या अटींना पाळण्याचे बंधन नसल्याचे वारंवार जाहीर केले आहे.
इस्रायलच्या घशातील हाडके
इस्रायलच्या घशात एक नव्हे दोन हाडके अडकलेली आहे. गाझापट्टी आणि लेबनॉनमधील हामास, हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेचे अड्डे तेथे आहेत. त्यापैकी गाझापट्टीतील हामासचे भुयारांतील अड्डे दोन वर्षांपूर्वी हामासने हल्ला केल्यावर दयामाया न ठेवता इस्रायलने जवळपास नेस्तनाबूत केले. पॅलेस्टिनी लोकांची ससेहोलपट केली. यावेळी इस्रायल लेबनॉनमधील हिजबुल्लाचे अड्डे केवळ नेस्तनाबूत करून इस्रायल थांबणार नाही. त्याला लेबनॉनच्या दक्षिणेस मोठ्या संख्येने राहणार्या पॅलेस्टिनींना हाकलून देऊन थेट आक्रमणाला पायबंद घालता येणारा प्रदेश (buffer zone) निर्माण करायचा आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला अतिरेक्यांना इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा इतक्या मोठ्या संख्येने पुरवठा केला आहे की, आता सुमारे अडीच महिन्यांनतरही लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ले होत आहेत. इराणला इस्रायलच्या मागे ही डोकेदुखी सतत ठेवायची आहे. त्यामुळे ’आहे, त्या स्थितीत इस्रायलने लेबनॉन वरील हल्ले थांबवावे’ हे कलम इराणने वाटाघाटीत घातले आहे.
प्रारंभापासूनच इराणची अण्वस्त्रांची महत्त्वाकांक्षा इस्रायलला समूळ नष्ट करण्यासाठी होती. तिला पूरक अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे इराणने प्रगत केली. त्यांचा वापर इराणने यावेळी मोठ्या प्रमाणावर इस्रायलवर करून त्यांची चाचपणी केली. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी इस्रायलने त्या कारखान्यांवर ठरवून मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. तसेच इस्रायल इराणकडे युरेनियम साठे राखून ठेवण्यासाठी कधीही तयार होणार नाही.
तहातील अटींप्रमाणे इराण आणि अमेरिका अण्वस्त्रांबाबत नक्की धोरण ठरवण्यासाठी दोन महिने घेणार आहेत. त्यामुळे तहाच्या अंमलबजावणीबाबतची अनिश्चितता येथे दोन महिने राहणार आहे. त्यांना अण्वस्त्र प्रकल्पांपासून दूर राखण्यासाठी इराणने त्यांची प्रवेशद्वारे बाँबस्फोट घडवून आणि आसपास सुरुंग पेरून बंद करून टाकली आहेच. ती जशी हल्ल्यांपासून सुरक्षित झाली असली तरी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणला सोपे जाणार नाही.
तसे पाहिले तर इराणसारख्या एकंदरच अतिरेकी आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या हातात अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे असणे मानव जातीकरितासुद्धा अपकारक ठरू शकते. खाडी देशांतील इस्लामी देशांवरच बेमुर्वत हल्ले करून इराणने त्याची उपद्रव क्षमता दाखवली आहे.
डॉलरचे आमिष
सुरुवातीपासून इराण युद्धात झालेल्या प्राण आणि वित्तहानीचा मोबदला अमेरिकेने द्यावा यावर अडून होता. कब्जात केलेल्या इराणच्या डॉलरच्या ठेवी अमेरिका परत द्यायला तयार झाली आहे. तसेच वाटाघाटींदरम्यान ताणून धरून इराणने मोबदल्याच्या सुमारे 22 लाख कोटी डॉलरची रक्कम पदरात पाडून घेतलेली दिसते. तिचे हप्ते ठरल्याप्रमाणात येत राहिले तर इराणवरही अटी पाळण्याचे बंधन राहील. अशी मदत दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने जर्मनीला दिली होती.
मदत करताना पक्का धंदेवाईक असलेला ट्रम्पबाबा अमेरिकन कंपन्यांना इराणमध्ये काम मिळवून देईलच. इराणला अनायसे भरघोस मदत मिळण्याचे गाजर समोर असल्याने तो पाय मागे घेणार नाही. याशिवाय अगदी सहा महिन्यांपूर्वी सत्ताधार्यांच्या विरोधात रस्त्यांवर उतरलेली इराणी जनता अमेरिकेने प्रबंध उठवले आणि आर्थिक मदत ओतली तर सहन करण्याची मनस्थिती दाखवेल, अन्यथा पुन्हा राज्यकर्त्यांविरोधात ते उठतील. यावेळी मात्र त्यांना आवरणे शक्य होणार नाही, याची क्रांतिकारी सेनेला कल्पना असल्याने त्यांनी ताणलेले नाही. दोन महिने किंवा त्याच्या आसपासच्या काळात इराणचे अण्वस्त्र धोरण खरोखरी मवाळ होते का, अमेरिका आणि इस्रायलच्या धोरणाला धरून इराण काही काळासाठी अण्वस्त्र प्रगती रोखण्याला राजी होतो का यावर तह आणि म्हणून जगात शांततेचे वातावरण टिकेल का ते अवलंबून आहे.
दुसरी अडचण निर्माण होण्याची शक्यता ट्रम्पबाबाचा धरसोडीचा स्वभाव आहे. उद्या त्याची मती फिरली आणि मुख्य म्हणजे आर्थिक मदतीचा ओघ मंदावला अथवा थांबवला तर इराणचा अमेरिकेबाबतचा भरोसा तुटेल आणि इराणी राज्यकर्ते पुन्हा होर्मुझ अडवून जगाला वेठीस धरू शकतात.
इस्रायल-इराण त्रांगडे
इस्रायलला स्वस्थता लाभू नये केवळ याच उद्देशाने इराण हामास, हिजबुल्ला आणि येमेनमधील हुतींना भरपूर पाठबळ देत आहे. विशेष करून लेबनॉनमधून इस्रायलवर अतिरेकी हल्ले सुरू रहावेत यासाठी इराण प्रयत्नशील राहत आला आहे. आता तर इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून पॅलेस्टिनींनी कब्जा केलेली गावे रिकामी करून घेऊन सुमारे 2000 चौ. किमीचा प्रदेश ताब्यात घेतला आहे. इस्रायल तो ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात राहील आणि इराण त्याला सतत विरोध करत राहण्यासाठी अतिरेक्यांना खतपाणी घालत राहील हे स्पष्ट आहे.
सध्या जरी ट्रम्पबाबा इस्रायलला लेबनॉनवरील हल्ले थांबविण्यास ठणकावून सांगत असला, तरी नेतन्याहू आणि नंतर येणारा पंतप्रधान ट्रम्पबाबाच्या कितपत ऐकण्यात राहतील हेही अनिश्चित आहे. सध्यातरी इराण लगेच अण्वस्त्रे बनवण्याच्या परिस्थितीत येणार नाही ही या युद्धातील इस्रायलची जमेची बाजू समजावी. पण हाती आलेले होर्मुझचे शस्त्र वापरण्यास इराण मागे पुढे पाहणार नाही. युद्धादरम्यान दोघांचीही झालेली प्राण आणि वित्तहानी भरून काढण्यास काही वर्षे लागतील. यापुढे युद्धाचा उन्माद परत चढू नये अशीच जगाची इच्छा राहील.