भारतीय पर्यावरण - विचार

विवेक मराठी    02-Jun-2026
Total Views |
@दिलीप कुलकर्णी
8698195076
 

Environment 
आज संपूर्ण जग हवामान बदल, प्रदूषण आणि नैसर्गिक संपत्तीचा बेसुमार नाश यांसारख्या मानवनिर्मित पर्यावरण संकटाचा सामना करत आहे; ज्याचे मुख्य कारण आपली अमर्याद उपभोग घेण्याची जीवनशैली आहे. याउलट, हजारो वर्षे जुनी भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गाचे शोषण न करता, संयमाने जगण्याचा आणि प्रकृतीचा समतोल राखण्याचा शाश्वत मार्ग दाखवते. पुरुषार्थ, यज्ञ आणि जैन धर्मातील ‘पच्चक्खाण’ यांसारख्या संकल्पनांमधून निसर्गाशी नाते जोडणारा हाच विचार मांडला गेला आहे. हाच प्राचीन विचार आजच्या आधुनिक काळात पुन्हा समजून घेणे, ही केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची आजची खरी गरज आहे.
सध्या सारेच जग एका पार्यावरणिक महासंकटाचा सामना करीत आहे. जगातील प्राय: सर्वच राष्ट्रे निसर्गाचे शोषण आणि प्रदूषण करीत आहेत. जागतिक तापमानवाढीसारख्या समस्यांमुळे आता पृथ्वीवर सहावा महाविनाश ओढवेल की काय, अशी शंका तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त होताना दिसत आहे.
 
 
हे जे आजचे ’विकास-प्रतिमान’ (model of development) आहे, ते अवघे अडीचशे-तीनशे वर्षांचे आहे. एवढ्या अत्यल्प कालावधीत महाविनाशाचे संकट ओढवण्याइतके त्यात चुकीचे काय आहे हे समजून घेतानाच आपल्या मनात एक उत्सुकता अशी निर्माण होते की, मग,सहस्रों वर्षे जुन्या असलेल्या भारतीय सभ्यतेत अशी समस्या का निर्माण झाली नाही? ह्या सभ्यतेत, ती मागच्या तत्त्वज्ञानात, तिच्या निसर्गविषयक धोरणात असे काय आहे की, ज्यामुळे ही सभ्यता धारणाक्षम बनली? सहस्रों वर्षे प्रवाहित राहिली? हे तत्त्वज्ञान प्रत्येक सामान्य नागरिकाच्या जीवनात उतरावे, ह्यासाठी तिने कोणते प्रयत्न केले? तिची सामाजिक अभियांत्रिकी कशा प्रकारची होती?
 
 
हे सर्व समजून घेण्यामागचा उद्देश हा निव्वळ माहिती मिळवणे हा नाही; किंवा,’पाहा, आमची सभ्यता किती थोर आहे’ असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणे हा देखील नाही. अशा केवळ पूर्वगौरवातून अहंकार सुखावण्यापलीकडे काहीच साध्य होत नाही. आपण प्राचीन भारतीय पर्यावरण-विचार आणि पर्यावरण-आचार अशासाठी समजून घेणार आहोत की, त्यातून ’धारणाक्षम विकासा’चे (sustainable development) एक प्रतिमान आपल्याला गवसणार आहे : ज्याची आज केवळ भारतालाच नव्हे, तर सार्‍या जगाला नितांत आवश्यकता आहे.
 
सध्याच्या पार्यावरणिक महासंकटाची कारणे
 
सध्या सारे जग असंख्य पार्यावरणिक संकटांचा सामना करीत आहे. आपण ह्या संकटांचे काही गट करू :
 
(अ) नवीकरणक्षम (renewable) आणि अ-नवीकरणक्षम (non-renewable) अशा दोन्ही प्रकारांच्या संसाधनांचा र्‍हास.
 
(आ) अशाच दोन्ही प्रकारांच्या ऊर्जास्रोतांचा र्‍हास.
 
(इ) सर्व प्रकारांच्या प्रदूषणात वाढ.
 
(ई)विघटनक्षम (degradable) आणि अ-विघटनक्षम (non-degradable) अशा दोन्ही प्रकारांच्या कचर्‍यांत वाढ.
 
(उ) वरील चारांच्या परिणामत: जैवविविधतेत (bio diversity) घट.
 
सुमारे चारशे वर्षांपूर्वी ’विज्ञान’ नावाच्या विचारसरणीचा झाला. ह्या विचारसरणीचा पाया ‘जडवाद’ (materialism) हा आहे. ’जडवाद’ ह्याचा अर्थ सर्व काही अजीव (dead) मानणे. तिचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तीत नीती-अनीती (moral-immoral), उच्चमूल्येर (values) अशा बाबींना काहीही स्थान नाही. अशा प्रकारच्या विचारांचा व्यावहारिक परिणाम म्हणजे मानवी जीवनाचे ध्येय ’अधिकाधिक उपभोग’ हे बनणे. ’उपभोगवाद’ (consumerism) हा ’जडवादा’चा (materialism) अपरिहार्य परिणाम असतो.
 
 
आजची ’विकासा’ची जी (अर्थशास्त्रीय) संकल्पना आहे, ती ह्यातूनच उदयाला आली आहे. तीत दरडोई उपभोग (per capita consumption),दरडोई उत्पादन (per capita production) दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (per capita GDP) सातत्याने वाढत राहणे; तसेच, ह्या तीनही प्रकारांच्या वाढी ह्या रेखीय (linear), अमर्याद (limitless), अनंत (infinite) अशा असणे अभिप्रेत आहे.
 
 
अशा प्रकारच्या अमर्याद वाढींवर विज्ञानपूर्व काळात दोन प्रकारांची बंधने होती : नैतिक आणि व्यावहारिक. विज्ञानाने ती दोन्ही बंधने नष्ट केली. शोषण, हिंसा, लूटमार, चोरी अशा सार्‍या अनैतिक बाबींवर प्राचीन काळी धर्मांनी (religion) बंधने घातली होती. विज्ञानाने धर्मही बाबच नाकारली, ज्याचा परिणाम ही बंधनेही नाकारण्यात झाला. दुसरे बंधन हे व्यावहारिक स्वरूपाचे होते. उपभोग आणि उत्पादन वाढावे असे कितीही वाटले, तरी त्यासाठीच्या ऊर्जा आणि तंत्रज्ञान विज्ञानपूर्व काळातील माणसाकडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीतून ऊर्जेचे नवनवीन स्रोत ’उदा. वाफ, खनिज तेल, वीज’माणसाला गवसत गेले. अधिक प्रमाणातल्या आणि अधिक संहत (concentrated) अशा ऊर्जामुळे तंत्रज्ञानही अधिकाधिक मोठे, अवजड, वेगवान असे बनत गेले.
 
 
ह्यातून, एकीकडे आजच्या अर्थशास्त्रीय परिभाषेतला ’विकास’.. ज्याला ‘बृहद् आर्थिक वाढ’ (macro economic growth)म्हणतात.. जरी साध्य होत गेलेला असला, तरी त्याचाच अपरिहार्य परिणाम म्हणून वर उल्लेखिलेल्या पार्यावरणिक समस्या क्रमश: वाढत जाऊन, ’सहाव्या महाविनाशा’चे महासंकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. पूर्वीचे पाच महाविनाश हे नैसर्गिक कारणांमुळे घडून आले. हा सहावा महाविनाश मात्र मानवनिर्मित (anthropocene) असणार आहे.
 
 
एका मूलभूत चुकीच्या विचाराने आपल्याला महाविनाशाच्या कड्यावर कसे आणून उभे केले आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे. ह्या पार्श्वभूमीवर आता भारतीय विचार आणि त्याचा निसर्गावरचा परिणाम ह्यांचा ऊहापोह करूया.
 
भारतीय जीवनदृष्टी आणि जीवनध्येय
 
’जडवाद’ हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण मानले, तर भारतीय विचाराचे व्यवच्छेदक लक्षण ‘आध्यात्मिकता’ ह्या शब्दाने व्यक्त होते. चार्वाक दर्शनासारखे काही अपवाद वगळल्यास सारा भारतीय विचार हा ’आध्यात्मिक’ (spiritual) आहे. अध्यात्माचा मूलभूत सिद्धांत असा आहे की, संपूर्ण विश्व हे एका चैतन्यमय अशा तत्त्वाने व्यापलेले आहे. ह्या तत्त्वाला ’ब्रह्म’ असे नाव आहे. ह्या‘ब्रह्मा’चाच एक अंश सर्व सजीवांमध्ये असतो.
 

Environment 
 
आत्मा
 
‘आपले खरे स्वरूप ’आत्मा’ हे आहे, देह हे नव्हे हे जाणणे, ह्याला ’आत्मदर्शन’ असे नाव आहे. योग्य प्रकारे प्रयत्न केले, तर कोणाही व्यक्तीला असे ’आत्मदर्शन’, किंवा ’आत्मसाक्षात्कार’ होऊ शकतो. भारतीय विचारानुसार, अशा प्रकारे ’आत्मज्ञान’ हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. देह, मन आणि बुद्धी ह्यांच्या पलीकडे जाऊन हे ’आत्मदर्शन’ करून घ्यावे लागते. ’देहस्थिती’कडून ’आत्मस्थिती’कडे असा हा प्रवास असतो. हा प्रवास व्यक्तीने करण्याची जी प्रक्रिया, तिला ’साधना’ असे म्हटलेले आहे. ही प्रक्रिया इंद्रिये आणि मन ह्यांच्यावरचा संयम क्रमश: वाढवत नेण्याची आहे. स्वाभाविकपणेच, ह्या प्रक्रियेत व्यक्तीचे उपभोग कमीकमी होत जातात.
 
आपण वर पाहिले की, सध्याच्या विकास-संकल्पनेचा पाया ‘उपभोग वाढवत नेणे’ हा आहे. पर्यावरणाच्या सर्व समस्या ह्या, ह्या मूलभूत चुकीतून उद्भवलेल्या आहेत, हेही आपण पाहिले. भारतीय विचार हा ह्याच्या नेमका उलट आहे. उपभोग कमी करत नेणे. साहजिकच, अशा जीवनशैलीतून पर्यावरणाची हानी तर टळतेच; पण, पुढे जाऊन ’धारणाक्षम विकासा’चे  sustainable development) प्रतिमान साकार होते. उपभोग आणि त्यांसाठीचे उत्पादन हे संयमित राहिल्याने संसाधनांचे आणि ऊर्जास्रोताचे संधारण होते; प्रदूषण हे निसर्गाच्या ते शुद्ध करण्याच्या मर्यादेत राहते; कचरा हा निसर्गाच्या तो विघटन करण्याच्या मर्यादेत राहतो, आणि ह्या सार्‍यांमुळे जैव विविधता टिकून राहते.
 
 
पर्यावरणशास्त्राच्या परिभाषेत बोलायचे, तर ’संयमित उपभोगा’च्या जीवनशैलीमुळे कर्ब-पदचिन्ह (carbon footprint), जल-पदचिन्ह (water footprint)हे सर्व छोटे राहते. किंवा, एकूणातच, ’पार्यावरणिक पदचिन्ह’ (ecological footprint) छोटे राहते. भावी पिढ्यांच्या उपजीविकेच्या संधी टिकून राहिल्यामुळे विकास हा आपोआपच ’धारणाक्षम’( sustainable) होतो.
अशा प्रकारे, भारतीय विचारांत, ‘उपभोग’ हे ’साध्य’ नसून, ’साधन’ आहेत. इंद्रिय-मनांवरचा संयम क्रमश: वाढवत नेण्याची जी साधना व्यक्तीने करायची आहे, ती देहाच्या माध्यमातूनच करावी लागते. मग, देह टिकवायचा आहे म्हणताना अन्न, वस्त्र, निवारा, इ. गरजांची आपूर्ती आवश्यक ठरते. तथापि, हे ’जगण्यासाठीचे उपभोग’ आहेत, ’उपभोगसाठीचे जगणे’नाही, ही सर्वांत महत्त्वाची बाब. आज ‘उपभोगाचे उच्चतमीकरण’ (maximization of consumption) हे जीवनाचे ’साध्य’ बनलेले आहे, जे पर्यावरण-विनाशक आहे. उपभोगांना ’साधन’त्व देणारा भारतीय विचार, हा, म्हणूनच आपोआप पर्यावरण-रक्षक, पर्यावरण-संवर्धक असा बनून राहतो.
 
 
इंद्रिय-मनांचा संयम आणि भगवद्गीता
 
इंद्रिये आणि मन ह्यांच्या संयमाविषयी अतिशय आग्रहीपणाने जर कोठे सांगितलेले असेल, तर ते म्हणजे, जिला उपनिषदांचे सार म्हटले जाते त्या भगवद्गीतेत. दुसर्‍या अध्यायात स्थितप्रज्ञ-लक्षणे सांगताना; तसेच अन्यही अनेक ठिकाणी गीतेत ह्यासंबंधीचे श्लोक वा चरण येतात - वशे हि यस्येन्द्रियाणि;संनियम्य इन्द्रियग्रामं; इन्द्रियार्थेषु वैराग्यम्; बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा, इत्यादी. असेच अनेक उल्लेख मनाच्या संयमाबाबत; मन सदैव शांत, स्थिर, अविचल ठेवण्याबाबत येतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ; न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम्; शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि; येषां साम्ये स्थितं मनः; यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभते, इत्यादि.
 
चार पुरुषार्थ
 
असे जीवन ‘त्यागमूलक’ असले, तरी त्यात उपभोग पूर्णपणे नाकारणे अभिप्रेत नाही. गरजेपुरते उपभोग ह्यात कोठेही नाकारलेले नाहीत. ’इंद्रिये आणि मन ह्यांचा संयम’ ह्याचा अर्थ माणसाने उपभोग घ्यायचेच नाहीत असे नाही. किंबहुना, तसे शक्यही नाही. जिवंत राहण्यासाठी तरी काही किमान उपभोग प्रत्येकाला घ्यावेच लागतील. शिवाय, हा संयम ज्यांना पुरेसा साध्य झालेला नाही, अशा (बहुसंख्य) लोकांना ह्याहूनही काही अधिक उपभोग घ्यावेसे वाटतील. इंद्रिये किंवा मन ह्यांचे अतिरेकी दमन केल्यास ते केव्हा ना केव्हा तरी बंड करून उठतील. हे टाळण्यासाठी, ज्यांच्यामुळे फारशी हानी होणार नाही, असे गरजेपेक्षा अधिक उपभोग घेणे हे मान्य करावे लागेल.
 
हे व्यावहारिक शहाणपण, भारतीय जीवन-विचारांतील जी चार पुरुषार्थांची संकल्पना आहे, तीतून व्यक्त होते. हे चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्यात ’काम’ आणि ’अर्थ’ हे नाकारलेले नाहीत; तथापि, त्यांच्या पूर्ततेला ’धर्मा’चे बंधन आहे, आणि ’मोक्षा’चे ध्येय आहे. ह्या चारांपैकी ’मोक्ष’ हा सर्वांत महत्त्वाचा; म्हणूनच त्याला ’परम पुरुषार्थ’ म्हटलेले आहे. एकदा ते जीवनध्येय निश्चित झाले की, अर्थ आणि काम ह्यांच्यावर आपोआपच बंधने पडतात. दुसरे बंधन ’धर्मा’चे आहे. ही संकल्पना नीट समजणे आवश्यक आहे. ’धर्म’ म्हणजे religion’ नव्हे.’Religion’ ह्याचा अर्थ ’उपासनापद्धती’. ही ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार हिंदू, बौद्ध, जैन, महंमदी, ख्रिस्ती अशी कोणतीही असू शकते.
 
’धर्म’ ह्याचा अर्थ ’धारणा होणे’, ’ती व्यवस्था टिकून राहणे’.आजच्या परिभाषेत sustainability. ’धर्मा’ची ही व्याख्या महाभारतात सांगितलेली आहे :
 
धारणात् धर्मम् इति आहु:। (कर्णपर्व, 69.59)
 
’धर्म’ ह्याचा दुसरा अर्थ ‘ती ती व्यवस्था टिकून राहण्यासाठी करण्याची कर्तव्ये’ असाही होतो. व्यक्तीचे अर्थ आणि काम ह्यांना ’धर्मा’ची मर्यादा आहे, ह्याचा अर्थ व्यक्तीचे उपभोग हे वरील सर्व व्यवस्था टिकून राहतील.. उद्ध्वस्त होणार नाहीत.. ह्या मर्यादेत असले पाहिजेत. जडवादी विचारसरणीमुळे उपभोगवाद वाढून व्यक्तीच्या शरीर-मनापासून निसर्गापर्यंतच्या सर्व व्यवस्था कश्या उद्ध्वस्त होत आहेत, हे आपण पूर्वी बघितलेच. हा विध्वंस टाळण्यासाठी; तसेच सर्व व्यवस्थांच्या धारणेसाठी व्यक्तीने आपले अर्थ आणि काम संयमित ठेवले पाहिजेत, असा सुजाण विचार भारतीय परंपरा सर्वांपुढे ठेवते.
 
 
अर्थ आणि काम पूर्णतः नाकारायचे नाहीत; ते केवळ धर्माच्या मर्यादेत ठेवायचे एवढेच, हे सूत्र गीतेतही सांगितलेले आहे. कृष्ण अर्जुनाला सांगतो :
 
धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ। (7.11)
 
धर्माच्या अविरोधी असा जो प्राणिमात्रांचा ’काम’ आहे, तो मीच आहे. ह्याचाच अर्थ ज्या इच्छा, जे उपभोग हानीकारक नाहीत; न्याय्य (legitimate) आहेत, ते घेण्यास काहीच हरकत नाही.
 
पर्यावरणाच्या संदर्भात विचार करायचा, तर जे उपभोग घेतल्याने नैसर्गिक संसाधने नष्ट न होता टिकून राहतात; ऊर्जास्रोत संपून न जाता टिकून राहतात; अतिरेकी प्रदूषण आणि कचरा होत नाही, जैववैविध्य टिकून राहते...असे उपभोग घेण्यास हरकत नाही. काही व्यावहारिक उदाहरणेच घ्यायची, तर ती अशी : जमिनीचा कस टिकवून ठेवून शेतीतून भरपूर उत्पन्न घ्यायला हरकत नाही. भूजलाची पातळी घटू न देता जमिनीतील पाणी उपसण्यास हरकत नाही. झाडे वाढण्याच्या वेगापेक्षा ती तोडण्याचा वेग कमी ठेवून झाडे तोडण्यास हरकत नाही.
 
ह्या मर्यादेमधले जीवन म्हणजे ’मागास’,’अविकसित’ असे जीवन कदापि नाही. किंबहुना, ह्या मर्यादा पाळूनही समृद्ध असे भौतिक जीवन, रसिकतापूर्ण रितीने कसे जगता येऊ शकते, हे भारताचा प्राचीन इतिहास दाखवून देतो. साधारणतः वाफेचा शोध लागण्यापूर्वी.. इ.स. 1750 पूर्वी.. भारत आणि चीन हे आलटून-पालटून सर्वाधिक GDP असणारे देश होते, हे इतिहासात नमूद आहे.
 
आणि केवळ भौतिक वस्तूंचे उत्पादनच नव्हे; तर, साहित्य-संगीत-नृत्य-नाट्य-शिल्प...अशा कलांचीही जोपासना भारतीयांनी करून त्यात जवळपास पूर्णत्व गाठले. अगदी लैंगिक संबंधांचेही ’कामशास्त्र’ भारतीयांनी रचले.
 
’यज्ञ’ संकल्पना
 
चार पुरुषार्थाच्या संकल्पनेचा सुपरिणाम ज्याप्रमाणे पर्यावरणाच्या स्थितीवर होतो, त्याचप्रमाणे ’यज्ञ’ ह्या भारतीय संकल्पनेचाही होतो. ‘सर्व प्रकारची उपयुक्त कर्मे’ असा ’यज्ञा’चा व्यापक अर्थ होतो.अशा यज्ञांमुळे ज्याप्रमाणे समाजव्यवस्था नीट चालते, त्याचप्रमाणे निसर्गव्यवस्थाही. विनोबांनी ’गीता-प्रवचनां’त ’यज्ञा’चा मूळ हेतू ’निसर्गाची सुस्थिती राखणे’ असा सांगितला आहे. ह्या दृष्टिकोणातून पाहिल्यास वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलसंग्रहण,सेंद्रिय शेती... हे सारे ’यज्ञ’ ठरतात.
 
जैन धर्मातील ‘पच्चक्खाण’ संकल्पना
 
’भारतीय परंपरा’ म्हणताना, त्या केवळ ’हिंदू’ परंपरा नाहीत. अन्यही ज्या भारतीय उपासनापद्धती आहेत, त्यांतही निसर्गरक्षणाच्या परंपरा आहेत. उदाहरणादाखल-जैन उपासना पद्धतीमधील ’पच्चक्खाण’ ही संकल्पना. मूळ शब्द आहे ’प्रत्याख्यान’. आपण दिवसभरात ज्या ज्या वस्तू वापरतो; किंवा, जी कामे करतो, त्यांचे प्रमाण हळूहळू कमी करत नेणे, हे ‘प्रत्याख्याना’त अभिप्रेत आहे. अशा 14 गटांच्या बाबतीत उपभोगकमी करत न्यायचे-सजीव अन्न, जेवणातले विविध पदार्थ, मिठाई, पादत्राणे, मुखवासाचे पदार्थ, वस्त्रे, सुवासिक द्रव्ये, वाहन, शय्या, विलेपन, करमणूक, कामाच्या दिशा, स्नान आणि भोजन.
असे व्रत घेण्यामागे दोन मुख्य हेतू आहेत. पहिला म्हणजे उपभोगांविषयीची आसक्ती कमी होणे; आणि दुसरा म्हणजे इंद्रिये आणि मनावरचा संयम वाढणे.
 
शास्त्रात न दिलेला तिसरा लाभही खूप महत्त्वाचा आहे: उपभोग कमी झाल्याने टळणारी पर्यावरणाची हानी.
हिंदू उपासना पद्धतीतील ‘उपवासा’च्या संकल्पनेशी समांतर अशी ही संकल्पना आहे. तथापि, ’उपवास’ ही केवळ खाण्याशी संबंधित संकल्पना आहे; तर ’प्रत्याख्याना’तील उपवास हा बहुअंगी आणि व्यापक आहे.
 
संसाधने, ऊर्जा आणि तंत्रज्ञान
 
एकदा ’मोक्ष’ हे जीवनध्येय, आणि अर्थ व काम ह्यांवरची ’धर्मा’ची बंधने ही व्यावहारिक मर्यादा निश्चित झाली की, त्यातून भौतिक जीवनासाठी वापरण्याची संसाधने, ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांच्याही मर्यादा आपोआपच निश्चित होतात. केवळ दैनंदिन जीवन जगतानाच नव्हे; तर विविध क्षेत्रांत भौतिक प्रगती करत असताना भारतीयांनी ह्या मर्यादांचा सदैव आदर केला. त्यामुळे समृद्ध असे भौतिक जीवन जगत असतानाही पर्यावरणाची एका मर्यादेबाहेरची हानी कधीही झाली नाही. जी काही हानी झाली, वा होत होती, ती निसर्गाच्या क्षतिपूर्तीच्या मर्यादेत असल्याने ती स्थायी नसून तात्कालिक होती.
 
 
असे होण्यासाठी संसाधने, ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांवर भारतीयांनी स्वेच्छेने मर्यादा घालून घेतलेल्या होत्या. भारतीय लोक प्राचीन काळीं जी संसाधने वापरीत, ती प्रामुख्याने नवीकरणक्षम ( renewable)होती. धातूंचा वापर नव्हता असे नाही; पण, तो फारच कमी प्रमाणात होता. माती आणि लाकूड हीच प्रामुख्याने वापरली जाणारी संसाधने होती. ऊर्जा ह्या अक्षय्य वा नवीकरणक्षम होत्या. माणसाचे वा पशूंचे शरीरबल, लाकूड, सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता, वाहते पाणी, इ. त्या ऊर्जांच्या मर्यादेत जेवढे काही उत्पादन होईल, वा जितकी काही समृद्धी निर्माण होईल, तेवढीच धारणाक्षम असते, ही शहाणीव त्यांना होती. शरीरश्रमाधारित जीवन हेच स्वास्थ्यपूर्ण असते, असा पिढ्यानुपिढ्यांचा अनुभवही त्यांच्याकडे होता. अशा ऊर्जांच्या मर्यादांमध्ये काम करणारे तंत्रज्ञान हे ’प्राथमिक’ स्वरूपाचेच असणार, हे निश्चित आहे. साधी-सोपी उपकरणे वा साधने असे त्यांचे स्वरूप होते. पण, ह्याचा अर्थ ही तंत्रे मागास होती असा मुळीच नाही. ह्या साध्या-सोप्या तंत्रांच्या आधारे भारतीयांनी प्रचंड समृद्धी आणि सौंदर्य निर्माण केले- राजवाडे आणि हवेल्या, धरणे आणि तलाव, मंदिरे आणि शिल्पे, दागिने आणि वस्त्रे... असे बरेच काही.
 
तथापि, इतकी समृद्धी निर्माण करूनही त्या ऊर्जा-आणि तंत्र-वापराचा पर्यावरणावरचा आघात (environmental impact) न्यूनतम राहिल्याने त्याचीहानी झाली नाही. प्रकृती आणि संस्कृती ह्यांत समतोल राखल्यानेच हे शक्य झाले.
 
निसर्गविषयक भाव
 
आता विचार करू तो भावनिक अंगाने. तत्त्वज्ञान कितीही उच्च असले, आणि सैद्धान्तिक मांडणी कितीही चिरेबंद असली, तरी माणसे व्यवहारात त्यानुसार वागतातच असे नाही. सध्याचे माणसाचे वागणे हेच ह्याचे उत्तम उदाहरण आहे. ह्यामागचे मुख्य कारण म्हणजे भावनेचा अभाव. कोणताही विचार केवळ बुद्धीला पटून भागत नाही : तो आचरणात उतरवण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते.
 
 
प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी योग्य तत्त्वज्ञान, योग्य जीवनदृष्टी आणि योग्य जीवनध्येय देण्याबरोबरच, निसर्गाविषयीचा आत्मीयतेचा, प्रेमाचा, कृतज्ञतेचा, पारस्परिकतेचा भाव जागृत करण्याचेही कार्य केले. ह्यात ऋषिमुनींइतकाच मोठा वाटा साहित्यिक, कवी, कीर्तनकार, प्रवचनकार ह्यांचाही आहे. भारतीयांना ’पर्यावरणशास्त्र’ रचण्यात स्वारस्य नव्हते. प्रत्येक व्यक्तीचे जीवन निसर्गस्नेही बनावे, ही आस त्यांना होती. म्हणून त्यांनी भावजागरण करून अनेक श्रद्धा, परंपरा, संकेत रूढ केले.
 
 
संपूर्ण विश्व हे ’ब्रह्म’ नावाच्या चैतन्यमय तत्त्वाने व्यापलेले आहे, हा तत्त्वज्ञानाचा मूळ सिद्धान्त आहे. ह्यालाच ’अद्वैत’, ’विश्वात्मैक्य’ अशी नावे आहेत. ह्यातून एक उपसिद्धान्त असा पुढे येतो की, अवती-भवती दिसणार्‍या सर्व गोष्टींशी आपले बंधुत्वाचे नाते आहे. ह्यालाच ’विश्वबंधुत्व’ असे म्हणतात. हे बंधुत्व केवळ माणसा-माणसांमधले न राहता सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांपर्यंत विस्तारते; एवढेच नव्हे, तर अजीव सृष्टीशी देखील माणूस जोडला जातो.
 
 
हा भाव विविध काळांतील साहित्यात आणि परंपरांमध्ये व्यक्त झालेला आहे. भारतीयांसाठी जमीन, डोंगर, तलाव, नद्या, समुद्र, अग्नी, वारा हे सारे अजीव सृष्टीचे घटक हे पूज्य, वंदनीय असे आहेत. भूमीला ’माता’ मानण्याची परंपरा वेदांपासून जी सुरू होते, ती अगदी आजपर्यंत सुरू आहे. आजचा शेतकरीही त्याच्या शेतजमिनीला ’काळी आई’ म्हणतो. घर असो वा अन्य कोणत्याही वास्तूची उभारणी : ’भूमिपूजन’ करून त्या कार्याचा प्रारंभ आजही केला जातो.
 
पाण्याचा विचार केला, तर आपल्या गावातील नदी-तलाव-विहिरींपासून ते समुद्रापर्यंतचे पाणी हे भारतीयांसाठी पवित्र आहे; पूज्य आहे. नद्या ह्या ’लोकमाता’ आहेत.
 
पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असल्याने, पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी करण्याची कामे ही पवित्र, पुण्यदायक अशी सांगितली गेली. त्यातून भारतभर अशा प्रकारची असंख्य कामे सहस्रों वर्षाच्या काळात उभी राहिली-तलाव,विहिरी,धरणे, इ.
 
 
सजीव सृष्टीशी नाते
 
 
सृष्टीच्या अजीव घटकांप्रमाणेच सजीव घटकांशी असलेले भारतीयांचे नातेही बंधुत्वाचे, प्रेमाचे, कृतज्ञतेचे असेच आहे. वनस्पती, पशू, पक्षी हे आपल्याला उपयोगी पडतात म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे हा एक भाग झाला. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन, निसर्गव्यवस्थेत माणसाइतकेच त्यांनाही समान स्थान आहे, असा आजच्या ’मानवकेंद्री’ (anthropocentric) दृष्टिकोणापेक्षा पूर्णतः भिन्न असणारा ’निसर्गकेंद्री’ (ecocentric) दृष्टिकोण प्राचीन भारतीयांकडे होता. निसर्ग फक्त माणसासाठी नाही.सर्वांसाठी आहे; निसर्गावर सर्वांचा समान अधिकार आहे, असे ते मानीत. ईशावास्य उपनिषदात
तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यस्विद् धनम्। (श्लोक 1)
 
 
असे सांगितलेले आहे. ‘इतरांना त्यांचे म्हणून जे आहे ते देऊन मग तुम्ही भोगा: कोणाचेही काही लुबाडू नका’ असा हा सांगावा आहे. गीतेत ’परस्परंभावयन्त:’ असा एक संदेश येतो (3.11). त्याचा अर्थ ’परस्परांना जे हवे ते देऊन सर्वांचे हित साधा’ असा आहे. वनस्पती, पशू, पक्षी हे माणसाला बरेच काही देतात : माणसानेही त्यांना जे जे हवे ते द्यायचे. थोडक्यात, माणूस आणि मानवेतर सजीव सृष्टी ह्यांचे संबंध हे परस्पर-पूरक, परस्पर-उपयोगी (symbiotic) असे हवेत.
 
ह्यातूनच भारतीय विचारांतली ’दोहना’ची संकल्पना पुढे आलेली आहे. ’दोहन’ म्हणजे ’दूध काढणे’. पण, आपल्या उपयोगासाठी गायीचे दूध काढत असताना, दुसरीकडे तिला प्रेमाने पोसायचे आहे; आणि आधी तिच्या वासराला पोटभर दूध पिऊ देऊन मग उरलेले आपण घ्यायचे आहे. ह्याच्या विपरीत वागणे म्हणजे ’शोषण’. ते मुळीच करायचे नाही.
 
आणि असे दोहन केवळ गायीचेच नव्हे; तर सर्व सृष्टीचेच करायचे. सृष्टीला समृद्ध करत राहायचे, नि मग तिच्याकडून संयमित उपयोगासाठी जितके न्यूनतम हवे, तितकेच घ्यायचे.
 
आजचा भारत मात्र ह्या विचार-परंपरापासून पूर्णतः तुटलेला आहे. पश्चिमेकडून आलेली अपरिपक्व, घातक अशी विकास संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली आपणही आज स्वीकारलेली आहे. ती विनाशक असल्याने तिचा त्याग करून, सुयोग्य अशा प्राचीन भारतीय पर्यावरणविषयक विचारांकडे; त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे जाण्याची आज नितांत आवश्यकता आहे. योग्य अशी भारतीय जीवनदृष्टी, योग्य जीवनध्येये आणि योग्य जीवनशैली ह्यातूनच ’धारपाक्षम विकास’साकार होणार आहे.