Abhishek Banerjee
इतिहासातील काही दाखले प्रत्येक राजनेत्याने लक्षात ठेवायला पाहिजेत. मुसोलिनी हा इटलीचा सर्वसत्ताधीश होता. युद्ध हरल्यानंतर तो पळून जाऊ लागला. लोकांनी त्याला धरले आणि झाडावर फासावर लटकावले. कर्नल गडाफी लिबियाचा अभिषेक होता. त्याचा शेवट प्राण वाचविण्यासाठी गटारात लपून बसण्यात झाला आणि तिथे तो ठार झाला. फ्रान्सचा सोळावा लुई सम्राट होता. त्याच्या जुलूमाविरुद्ध लोकांनी बंड केले, देश सोडून त्याने पलायनाची योजना केली. फ्रान्सच्या सीमेवर लोकांनी त्याला पकडले आणि त्याला पुन्हा पॅरिसमध्ये पाठवून दिले. नंतर तो आणि त्याची राणी गिलोटीनखाली गेले. हे सर्व सत्तधीशांना जनतेने दिलेले धडे आहेत. त्यामुळे अभिषेक बॅनर्जींची ही घटना बातम्यांमध्ये पाहत असताना, बडे गुलाम अली खाँ यांनी अडानामध्ये गायलेली एक चीज आठवली. या चीजेचे बोल आहेत, ‘जैसी करीये, वैसी भरीये।’
खासदार अभिषेक बॅनर्जी यांना बंगालमधील सोनारपूर या गावी लोकांनी धरून झोडले. अंड्यांनी त्यांना मारले. त्यांचे कपडे फाडले. या हिंसाचाराचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. लोकशाहीत असे जर हिंसाचार घडू लागले तर, डॉ. बाबासाहेबांच्या शब्दांत सांगायचे, तर ते ‘अराजकतेचे व्याकरण’ ठरेल. अभिषेक बॅनर्जींची ही घटना बातम्यांमध्ये पाहत असताना, बडे गुलाम अली खाँ यांनी अडानामध्ये गायलेली एक चीज आठवली. या चीजेचे बोल आहेत, ‘जैसी करीये, वैसी भरीये।’
रागदारीतील बंदिशीचे बोल सामान्यत: नैतिक वचनाचे फार कमी असतात. प्रेेमिकेची आर्तता, आतुरता, विरह, वेदना, व्यथा इत्यादींचे दर्शन रागदारीच्या चीजांतून होते. जैसी करनी, वैसी भरनी हे भजन देखील आहे, आणि त्याचे शब्द पुढीलप्रमाणे
जैसी करनी वैसी भरनी
यह तो एक सच्चाई हैं
देख ले तू
तेरी करनी तेरे आगे आयी हैं
जो हैं करता वही पाता
कोई किसीके साथ ना जाता
जैसी लिखेगा तू कर्मों की रेखा
गुनाहो का तिल तिल का लेखा।
अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते समजले जातात. पहिल्या ममता बॅनर्जी आणि दुसरे अभिषेक बॅनर्जी. तृणमूल काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, असा याचा अर्थ झाला. ममता बॅनर्जींची घोषणा होती, ‘माँ, माती, माणूस’ पंधरा वर्षार्ंत हे तीनही शब्द विसरले गेले आणि घराणेशाही सुरू झाली. सर्वच प्रादेशिक पक्षांना घराणेशाहीच्या कर्करोगाने ग्रासलेले आहे. पंधरा वर्षे सर्व सत्ता हातात, पोलीस यंत्रणा हातात आणि राज्यभर पोसलेली गुंडसेना हातात. अभिषेक बॅनर्जी तरुण, त्यात पक्षाची सत्ता, पोलिसांची सत्ता आणि गुंडांची सत्ता यांचे ते स्वामी झाले. या तीन सत्तांपैकी कोणतीही एक सत्ता अनर्थ करू शकते आणि तिन्ही सत्ता एकवटल्या की, अनर्थाला पारावार राहत नाही. अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा अध्यक्षांना जे पत्र दिले, त्यावर आमदारांच्या बनावट सह्या केल्या. ज्या आमदारांच्या नावाखाली या सह्या आहेत, त्यांनी त्याचा जाहीर इन्कार केलेला आहे. अभिषेक बॅनर्जी यांची बाबतही कसून चौकशी चालू आहे. तसेच कोळसा घोटाळा प्रकरणी त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी या दोघांवरही सीबीआय चौकशी चालू होती. शिक्षक भरती घोटाळा हे गंभीर प्रकरण तर देशाची पिढी बरबाद करणारी होती. या सर्व घोटाळ्यांच्या ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी चालू आहेत. तिन्ही सत्तांंचा माज असा असतो.
बंगाल विधानसभेच्या निवडणुकी प्रचारात अभिषेक बॅनर्जी यांची भाषणे झाली. गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘बापाचे पुत्र असाल तर, 4 मे नतंर कलकत्यात पाऊल ठेवण्याची हिंमत करा.’ आणखी एका भाषणात मतदारांना धमकावताना ते म्हणाले, ‘कोण काय करतो याची यादी माझ्याकडे आहे, त्या सर्वांचा हिशोब 4 मे नंतर केला जाईल.’ ही फक्त नमुन्यादाखल दोन उदाहरणे दिली आहेत. सत्तेचा विंचू एकदा चावला आणि सत्तेची दारू एकदा चढली की जे रूप तयार होते त्याला अभिषेक बॅनर्जी असे म्हणतात. भगवान गौतम बुद्धांची एक जातक कथा आहे.
या जातक कथेचे शीर्षक आहे, ‘केली शील जातक.’ याची कथा अशी आहे, बनारसमध्ये ब्रह्मदत्तचे राज्य होते आणि बोधिसत्वांचा जन्म इंद्र म्हणून झाला होता. (इंद्र देवांचा राजा) ब्रह्मदत्त राजा असल्यामुळे सर्व सत्ता त्याच्या हाती होती आणि सत्तेचा माज त्याला भरपूर चढला. या माजाचा परिणाम असा झाला की, त्याने आदेश काढला, माझ्या राज्यात जीर्ण-शीर्ण काहीही चालणार नाही. वृद्ध हत्ती, घोडे, बैल, बैलगाड्या, घोडागाडी सर्व नष्ट करण्याचा सपाटा त्याने सुरू केला. वृद्ध स्त्री-पुरुषांना त्याने मारले नाही, पण ते बनारसमध्ये राहणार नाही, हे त्याने पाहिले. वृद्धांना पकडून पकडून त्याने मैदानात लोळायला लावले, नाच करायला लावले, याप्रकारे त्याने त्यांना खूप छळले.
राजाच्या शक्तीचा प्रतिकार सामान्य लोक करू शकत नाहीत. ते अन्याय सहन करतात. लोकांनी आपल्या घरातील वृद्धांना दूर दूरच्या गावी पाठवून दिले. बोधिसत्व झालेल्या इंद्राला हे पहावले नाही, त्याने ब्रह्मदत्तला धडा शिकविण्याचे ठरविले.
एका जुनाट गाडीत त्याने ताकाची दोन पिंपे ठेवली. अत्यंत मळकट कपडे घातले, गाडीला दोन वृद्ध घोडे जोडले आणि बनारसच्या वाटेवर तो थांबला. ब्रह्मदत्त राजा उंची रथावर बसून शहराची पहाणी करण्यासाठी निघाला होता. त्याने ती गाडी, गाडीवानाचा अवतार आणि म्हातारे घोडे पाहिले. तो संतापला आणि म्हणाला, ‘इथून चालता हो, शिपायांना आज्ञा दिली, त्याला पकडा आणि त्याची गाडी नष्ट करून टाका.’ परंतु इंद्र हा देव असल्यामुळे त्याची गाडी, घोडे कोणाला दिसत नव्हते, ते फक्त राजाला दिसत होते. तो गाडीवान म्हणजे इंद्र आपली गाडी घेऊन रथाजवळ आला आणि ब्रह्मदत्ताला म्हणाला, ‘तुला सत्तेचा खूप माज चढला आहे. प्रजेचे पुत्रवत पालन करण्याऐवजी तू प्रजेचा छळ करीत आहेस. तुला धडा शिकविला पाहिजे.’ असे म्हणून त्याने दोन्ही पिंपातील ताक त्याच्या डोक्यावर ओतले. लोकांना फक्त तेवढेच दिसले. राजा ताकाने माखून गेला आहे. फुटलेल्या अंड्यांनी अभिषेक बॅनर्जी असाच माखून गेला. लोकशाहीत इंद्र म्हणजे राजा, आणि राजा म्हणजे प्रजा असते. प्रजेचा रोष असा असतो.
अशा वेळी ‘करावे तसे भरावे’, ‘कर्मफळ कोणाला चुकत नाही’ इत्यादी वचने खरी ठरतात. ही वचने फार प्राचीन काळापासून आहेत, सर्व भाषेत आहेत आणि सर्वांना ती तोंडपाठ असतात. कर्मफळ भोगावे लागते हा तर गीतेचा मूलभूत सिद्धांत आहे. कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की, जे अधर्माचरण करून सत्तेवर बसले आहेत, ते गुरू आहेत, आजोबा आहेत की बांधव आहेत यांचा काहीही विचार न करता त्यांचा वध करणे हाच धर्म आहे. त्याचे तू पालन कर. अधर्मींचे रक्षण परमेश्वरही करीत नाही, असा याचा अर्थ होतो आणि लोकशाहीत प्रजा हीच परमेश्वराचे दुसरे रूप असते.
अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ओढावलेला प्रसंग हा सर्व राजकारण्यांसाठी धडा आहे. त्या धड्याचे पाठ असे आहे-
1) सत्ताधार्यांनी प्रजेचे मालक बनता कामा नये, सदैव सेवकाच्या भूमिकेत असले पाहिजे.
2) सत्ता कितीही सामर्थ्यशाली असली तरी, जनतेचे सामर्थ्य त्याहून मोठे असते.
3) सार्वजनिक भाषणे करताना, वक्तव्ये देत असताना शिवीगाळ करू नये. प्रतिपक्षाचे आई-बाप काढू नयेत. मुद्द्याला धरून बोलावे.
4) मला हात लावायची कोणाची हिम्मत आहे, मी अस्पर्श आहे, अजिंक्य आहे या घमेंडीत राहू नये. गर्वाचे घर नेहमी खाली असते.
5) प्रजा नेहमी सहनशील असते. या सहनशीलतेला मर्यादा असतात. सहनशीलतेचा कडेलोट झाला की, त्याचा अभिषेक होतो. ही गोष्ट सर्व राजनेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
इतिहासातील काही दाखले प्रत्येक राजनेत्याने लक्षात ठेवायला पाहिजेत. मुसोलिनी हा इटलीचा सर्वसत्ताधीश होता. युद्ध हरल्यानंतर तो पळून जाऊ लागला. लोकांनी त्याला धरले आणि झाडावर फासावर लटकावले. कर्नल गडाफी लिबियाचा अभिषेक होता. त्याचा शेवट प्राण वाचविण्यासाठी गटारात लपून बसण्यात झाला आणि तिथे तो ठार झाला. फ्रान्सचा सोळावा लुई सम्राट होता. त्याच्या जुलूमाविरुद्ध लोकांनी बंड केले, देश सोडून त्याने पलायनाची योजना केली. फ्रान्सच्या सीमेवर लोकांनी त्याला पकडले आणि त्याला पुन्हा पॅरिसमध्ये पाठवून दिले. नंतर तो आणि त्याची राणी गिलोटीनखाली गेले. हे सर्व सत्तधीशांना जनतेने दिलेले धडे आहेत. संत तुकारामांचे वचन आहे, ‘नम्र जाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता।’ जो सर्व प्रजेविषयी अतिनम्र आहे त्याची नम्रता परमेश्वरालादेखील साहाय्य करण्यास बाध्य करते, हा शाश्वत धडा आहे.