निवृत्तीनंतरची कृतिशील निसर्गसेवा!

विवेक मराठी    02-Jun-2026
Total Views |
@संदीप भगाडे, छत्रपती संभाजीनगर
9422470709
 
 
vivek
स्टेट बँकेतून निवृत्ती घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील भीषण पाणीटंचाईचा सामना करत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वत:ला निसर्गसेवेत वाहून घेतले. घरच्या बागेपासून सुरू झालेला हा प्रवास ‘इको ब्रिक्स’, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वृक्षारोपणापर्यंत कसा विस्तारला, याची ही एक प्रेरणादायी कृतिशील अनुभवगाथा...
2014 साली स्टेट बँकेतून निवृत्ती घेतल्यावर सर्वप्रथम घरातील बागेकडे लक्ष दिले. टेरेस गार्डनवर भाजीपाला लावला. त्यानंतर घराजवळील सुमारे एक किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत झाडे लावून त्यांना नियमित पाणी देऊन त्यांचे संवर्धन केले. झाडे लावण्यासाठी चहाची टपरी, पानवाले यांनाही रोपे देऊन प्रोत्साहित केले. हे हातावर पोट असणारे लोक झाडांची तळहातावरील फोडासारखी कशी काळजी घेतात, याचा सुखद अनुभव आला.
 
 
छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘इको ग्रीन फाउंडेशन’ या संस्थेचे आजीवन सभासदत्व घेतले आहे. शहरातील इतर पर्यावरण संस्थांच्या वृक्षारोपण, वृक्षतोड थांबविणे अशा विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवून त्यांच्याशी संपर्क ठेवला आहे.
 

vivek 
 
घरी किचन आणि गार्डन वेस्टपासून गेली दहा वर्षे कंपोस्ट खत तयार करीत आहे. कंपोस्ट खत प्रकल्प विविध शाळा, हाऊसिंग सोसायटी येथेदेखील राबविला आहे. घरातील प्लास्टिक कचरा, कॅरी बॅग्स, दुधाचे वगैरे पाऊच बाहेर कचर्‍यात न टाकता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स जमा करून ‘इको ब्रिक्स’ तयार केल्या आहेत.
 
 
अगदी साध्या साध्या गोष्टींतून पर्यावरणरक्षणाचे काम होऊ शकते. त्याचे प्रयोग मी स्वतः केले आहेत. जसे-उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणापूर्वी आणि नंतर आपले हात झाडाच्या मुळाशी, कुंडीवर धुतल्यास हात धुण्याचे कामही होते आणि झाडांना पाणीही मिळते. छत्रपती संभाजीनगरसारख्या तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावात हे अत्यावश्यक आहे. पक्ष्यांसाठी पारळ, बोळके यात उन्ह्यांळ्याच्या दिवसात दरवर्षी न चुकता पाणी ठेवतो. कामानिमित्त बँक, वाचनालय, कटिंग सलून वगैरे ठिकाणी जावेच लागते. तिथल्या लोकांना झाडे किंवा कुंड्या देऊन पर्यावरणाच्या कामाशी जोडून घेतले आहे. कॉलनीतील बाग आणि मंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी झाडे लावून, त्यांना नियमित पाणी देण्याचे काम सुरू असते. त्यासाठी सकाळी दूरवरची झाडे आणि संध्याकाळी जवळची झाडे, असे पाणी देण्याचे नियोजन आखले आहे.
 
 
या वृक्ष प्रेमामुळे उन्हाळ्याचे चार महिने आपले घर, गाव सोडून इतरत्र न जाण्याची शिक्षा आनंदाने सोसतो. रोज सकाळ, संध्याकाळ हातात पाण्याचे जार घेऊन पाणी टाकताना पाहून बर्‍याच अनोळखी लोकांना वाटते की, ’नगरपालिकेकडून यांना या कामाचे पैसेबीसे मिळत असतील.’ जे परिचयाचे आहेत ते, ”सर, तुम्हाला हे काम करताना पाहून आम्हाला खूप बरं वाटतं,” असे कौतुकाचे दोन शब्द बोलतात. आपल्या उपक्रमशील दर्शनाने दुसर्‍याला समाधान मिळत असेल, तर त्यापेक्षा मोठा आनंद तो कोणता?