इमारतीतून सुरू झालेली पर्यावरण चळवळ - वृक्षमित्र कट्टा

विवेक मराठी    02-Jun-2026
Total Views |
@ अजित वर्तक 
 

Environment 
इमारतीतील झाडे वाचवण्याच्या एका छोट्या प्रयत्नातून गोरेगावात ‘वृक्षमित्र कट्ट्या’ची सुरुवात झाली, ज्याचे रूपांतर आता कचरा व्यवस्थापन आणि हरित चळवळीत झाले आहे. लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन कसे करता येते, याचे उत्तम उदाहरण असलेला हा अनुभव...

Environment
 
12 जून 2022 ची गोष्ट. नुकताच पर्यावरण दिन होऊन गेलेला. आमची इमारत पुनर्विकासाला जाणार अशी चिन्हं होती. मी विचार केला, इमारतीतील काही झाडे आपण वाचवू शकू का? सांदीपनी प्रभात शाखेच्या काही स्वयंसेवकांना घेऊन, इमारतीतील पंचवीस एक झाडांचे (केळी, शमी, बेल, अबोली, सोनटक्का, कढीपत्ता, पानवेल आणि लिंबू इ.) मुंबई उपनगरातील गोरेगांवच्या जयप्रकाश नारायण उद्यानात पुनर्रोपण केले. त्या निमित्ताने बागेत नियमित येणार्‍या काही जेष्ठ मंडळींशी ओळख झाली, परिचय वाढत गेला आणि 3 जुलै 2022 साली ‘वृक्षमित्र कट्टा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
 
 
दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी10 वाजता वृक्षमित्र कट्टा भरतो (गेली 46 महिने हा उपक्रम चालू आहे) ज्यात पर्यावरणासंबंधी एका विषयावर मान्यवर मार्गदर्शन करतात. साधारण 30 ते 40 गोरेगावकर उपस्थित असतात. कट्ट्याच्या माध्यमातून आतापर्यंत उद्यानात औषधी, फुले, फळे, वृक्ष , झुडूप अशी दीडशेहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. या जैवविविधतेमुळे बागेतील फुलपाखरे आणि पक्षी यांच्या संख्येत वाढ झाली आहे . या व्यतिरिक्त बागेत राशीचक्र (प्रत्येक राशीचे झाड) आणि सोबत भिंतीवर म्युरल पेंटिंग लोकसहभागातून तयार केले आहे.
 
 
‘वृक्षमित्र कट्टा’च्या कट्टा क्रमांक 16मध्ये (5 नोव्हेंबर 2023 रोजी) ‘प्लास्टिक रिसायकल’ हा विषय बिसलेरीच्या Bottle for Change उपक्रमाचे सदानंद तानावडे यांनी मांडला. त्यातून BINTIX कंपनीचा संपर्क मिळाला. ही कंपनी जसा रद्दीवाला रद्दी विकत घेतो, तसा सुखा कचरा (प्लास्टिक, रबर, काच, ई-कचरा)आठवड्यातून एकदा आपल्याकडून प्रतिकिलो चार रुपयांप्रमाणे खरेदी करून त्याचे रिसायकलिंग करते. ‘प्लास्टिक रिसायकल’ या उपक्रमाची सुरुवात मी माझ्यापासून केली; तसेच या उपक्रमात इमारतीतील 15 सभासद जोडले. मला सांगायला अभिमान वाटतो की, गेल्या दोन वर्षांत फक्त आमच्या इमारतीतून 684 किलो कचरा रिसायकल झाला. त्यातून सहा झाडांचे आयुष्य वाढले. 995 लीटर पेट्रोल आणि 1505 किलो CO2 उत्सर्जन वाचले. गेल्या वर्षभरात गोरेगावातील इतर सात सोसायटीतील 60 नागरिक या उपक्रमांत सहभागी झाले आहेत. एवढेच नव्हे तर त्यातून प्रेरणा घेऊन पार्ल्यातही अनेक इमारतींनी याची सुरुवात केली आहे.
 

Environment 
BINTIXसोबत काम केल्यामुळे IPCAMने (Indian Pollution Control Association) ओल्या कचर्‍यापासून खत बनवण्याच्या प्रोजेक्टची माहिती दिली. आमची इमारत आणि प्रज्ञा बोधिनी शाळा अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालू केला. सध्या आमच्या इमारतीत दर दोन महिन्यांनी ओल्या कचर्‍यापासून 30 किलो कंपोस्ट तयार होते. हाच उपक्रम ‘उत्तुंग’ सोसायटीतही सुरू केला. गोरेगावांतील इतर बागेत व मंदिरांमध्ये हा उपक्रम चालू करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे घरातील, मंदिरातील निर्माल्य डंपिंग ग्राऊंडमध्ये जाणार नाही. बागेतही आम्ही पालापाचोळ्यापासून खत तयार करतो, त्यामुळे तो डंपिंग ग्राऊंडला जाण्यापासून वाचतो.
 
 
मी लीड्समध्ये (इंग्लंड) असताना वेगळ्या पद्धतीचा फ्लॉवर शो अनुभवला होता. त्याच धर्तीवर 2024च्या नवरात्रीत, प्रत्येक संध्याकाळी गोरेगाव पूर्वेतील एक टेरेस गार्डन (छत बाग) असा द गोरेगाव गार्डन शो आयोजित केला. पन्नासहून अधिक जण सहभागी होते. त्यानिमित्ताने आमची FOTAच्या तुषार देसाई आणि बालाजी टोकरेंशी (पोलीस) संपर्क झाला. तुषार देसाईंमुळे मुंबईतील गार्डन कॉम्पिटिशनची माहिती मिळाली, ज्यात सात ते आठ गार्डनर सहभागी झाले आणि त्यातील तिघांना पारितोषिकही मिळाले. बालाजी टोकरे यांनी SRP कॅम्प येथे ‘औषधी वनस्पती उद्यान’, ’मियावाकी जंगल’ उभे केले आहे, जे आम्ही 70 वृक्षमित्र बघून आलो, त्यातून अनेकांना बागकामाची प्रेरणा मिळाली.
 
कट्ट्यावर ‘परसातील औषधी वनस्पती’, ‘किचन गार्डन’, ‘बायो एन्झाईम’, ‘इनडोअर प्लांट’, ‘शाश्वत जीवनशैली’ , ‘बटू वृक्ष’ (बोन्साय) , ‘बीज संकलन’ , ‘देशी वृक्ष’ अशा झालेल्या नानाविध विषयांमुळे गोरेगावकरांना पर्यावरणाच्या अनेक बिंदूंची उत्तम जाण झाली आहे. गेल्या चार वर्षांच्या प्रवासात ‘वृक्षमित्र कट्टा’ हे हरित, स्वच्छ, सुरक्षित गोरेगावसाठी केंद्रबिंदू ठरले आहे.