@मनोज श्रीराम पारनेरकर
9420004893
साल 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ सुरू झाला आणि जगभरात योगाच्या आपल्या प्राचीन परंपरेला मानाचं स्थान मिळालं. यंदाची योग दिवसाची संकल्पना आहे, ’धेसर ऋेी कशरश्रींहू असशळपस’ म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. वृद्धत्व आनंदी, निरोगी घालवायचं असेल तर तरुणपणापासून योगाची कास धरायला हवी, योग दिनाचे औचित्य साधत ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
हजारो वर्षांपूर्वी भारत हा ऋषिमुनींचा देश होता आणि योगावर आधारित अशी त्यांची जीवनशैली होती. त्या काळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल योगाच्या नावानं होत नसे. कोणत्याही विकारापासून मुक्ती, तणावमुक्ती अशी ग्वाही देण्याची वेळ येत नसे. त्या काळी मुळात विकारच नव्हते. कारण प्रत्येक जण नित्यनियमानं योगसाधना करत. किंबहुना तो त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग होता. कालांतरानं भारतात ब्रिटीश काळात दैनंदिन जीवनातून योगाची पिछेहाट होऊ लागली.
स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणांमुळे पाश्चिमात्य लोकांना योगविद्येमध्ये रस वाटू लागला. मात्र भारतामध्ये ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षणपद्धती राबवायला सुरुवात केली. या शिक्षणपद्धतीत योगसाधनेला जागा नव्हती. शिक्षण म्हणजे पदवी मिळवणे, परीक्षेतील यश असं समीकरण झालं. योग आधारित जीवनशैलीचं पद्धतशीरपणे उच्चाटन करण्यात आलं. परिणामी आध्यात्मिक वृत्तीचा र्हास झाला. ब्रिटिशांनी ही सगळी कारस्थानं लोकांच्या लक्षात येणार नाही अशा चलाख पद्धतीनं केली. परिणामी आज भारतामध्ये बदलत्या जीवनशैलीजन्य आजारांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. योगशास्त्र, आयुर्वेद यांची परंपरा असलेला भारत देश जागतिक पातळीवर मधुमेह, कॅन्सर यांसारख्या आजारांची राजधानी बनत आहे. हे चित्र खरोखरीच लाजिरवाणं आहे. ब्रिटिशांनी केलेल्या आपल्या संस्कृतीच्या नाशापेक्षाही भयंकर नाश आपणच आज करत आहोत. कारण आपलं अज्ञान, सगळ्या गोष्टी कमी वेळात, कमी त्रासात, घाईनं मिळवण्याची आपली मानसिकता, त्यामुळे आपल्याला कुणीही सहजपणे फसवू शकतो.
योगाचे बाजारीकरण झाल्यामुळे योगसंस्थांमध्येसुद्धा स्पर्धा सुरू झाली. परिणामी आपापले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक योगगुरूंनी पारंपरिक योगात बदल केले. त्यामुळे कुठेही एकसूत्रता राहिली नाही आणि साधकांमध्ये काय योग्य, काय अयोग्य याचा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे खर्या अर्थानं योगाचं सुपरिणाम दिसून येत नाहीत आणि मूळ ’योगशास्त्र’ लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यातच आजच्या विद्यार्थ्यांकडे संयम नसल्यामुळे कोणतीही गोष्ट कमी वेळात घाईनं मिळवण्याच्या हव्यासानं पटकन कोणीही योगाकडे वळत नव्हते. मात्र 2015पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू झाला आणि जगभरात योगाच्या आपल्या प्राचीन परंपरेला मानाचं स्थान मिळालं.
यंदाची योग दिवसाची संकल्पना आहे ’धेसर ऋेी कशरश्रींहू असशळपस’ म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. जशी तुम्ही थेट दहावीची परीक्षा देऊ शकत नाही त्यासाठी पहिली ते नववी पाया पक्का असावा लागतो, अगदी त्या पद्धतीनंच वृद्धत्व आनंदी, निरोगी घालवायचं असेल तर तरुणपणापासून योगाची कास धरायला हवी.
योग आणि जीवनशैली
’बदलती जीवनशैली’, ’जीवनशैलीजन्य आजार’ हे शब्द आज आपण सध्या सगळीकडे वाचतो, ऐकतो. ’जीवनशैलीजन्य’ आजारांमध्ये ’मधुमेह’, ’थायरॉईड’, ’कॅन्सर’, ’ओबेसिटी’, ’पीसीओडी’, ’मासिक पाळीचे विकार’, ’हृदयविकार’, ’रक्तदाब’ या आजारांचा समावेश होतो आणि आजकाल हे आजार होतातच असा लोकांचा एक चुकीचा ग्रह झाला आहे. हे आजार नेमके कशामुळे होतात? बदलती जीवनशैली म्हणजे काय? आपण स्वत:मध्ये काय बदल करायला पाहिजे याचा विचार कोणी करताना दिसत नाही. त्यामुळे आज जिकडेतिकडे पंचतारांकित हॉस्पिटलची चेन स्थापन होताना दिसत आहे. आणि सेवाव्रती वैद्यकीय व्यवसायामध्ये आज कोट्यावधीची उलाढाल होताना दिसत आहे. या आधुनिक उपचारांनी आजार पूर्ण बरा होत नाहीच उलट साईड इफेक्ट होतात. तरीदेखील लोकांना आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे असे वाटत नाही. असं म्हणतात की, झीशलर्रीींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश पण आज ही केवळ उक्ती राहिली आहे. तिचे कृतीत रूपांतर झालेले दिसत नाही.
खरं म्हणजे योगशास्त्र हे व्यवस्थित जगण्याचे आणि जाणण्याचे शास्त्र आहे. म्हणून ते प्रत्येकाच्या जीवनशैलीचे अविभाज्य अंग असावे अशी अपेक्षा प्राचीन ऋषिमुनींची होती. यौगिक प्रक्रियांचा अभ्यास शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक अशा सर्व अंगांना स्पर्श करतो. योग म्हणजे एकरुपता. संस्कृत ’युज्’ या धातूपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. ’युज्’ म्हणजे जोडणं. आध्यात्मिक भाषेत आपलं मन आणि परमेश्वर यांना जोडण्याचे साधन म्हणजे योगमार्ग. शुद्ध व्यावहारिक पातळीवर असे म्हणता येईल की, योग म्हणजे शरीर, मन आणि भावना यांच्यात संतुलन प्रस्थापित करणे होय. ’आसन’, ’प्राणायाम’, ’बंध’, ’षट्कर्म’ व ’ध्यान’ याद्वारे हे संतुलन राखले जाते.
योगशास्त्राचा परिणाम सुरुवातीला व्यक्तीच्या शारीरिक पातळीवर होतो, जेव्हा शारीरिक पातळीत असंतुलन निर्माण होतं; त्यावेळी स्नायू व मज्जारज्जू एकसंघपणे काम करत नाही. एन्डोक्राईन (अंत:स्रावी ग्रंथी) संस्थेत अनियमितता निर्माण होऊन मज्जासंस्थेचं कार्य मंदावतं. पुढे अनेक व्याधींचा शरीरात प्रवेश होतो. त्याचबरोबर ताणतणाव, नैराश्य यांसारख्या मानसिक व्याधींमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अशा ताणतणावांना पुरून उरण्याचं तंत्र योगामध्ये आहे.
सध्या सर्व जगभर योगाभ्यास करताना आणि केल्यानंतर शरीर वा मनावर काय परिणाम होतात, काय बदल होतात यावर शास्त्रज्ञ, डॉक्टर संशोधन करत आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व जपण्यासाठी आसन, प्राणायाम, ध्यान हेच 100 टक्के उपाय आहेत या निष्कर्षापर्यंत आले आहेत. प्राचीन ऋषिमुनींनी आखून दिलेल्या दिनचर्येत आणि योगशास्त्राच्या प्रणालीत आधुनिक काळात कोणताही बदल करण्याची गरज नाही, याची त्यांना खात्री पटली आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेला योग, ज्ञानेश्वर माऊलींनी ’ज्ञानेश्वरी’त सांगितलेला योग, रामदास स्वामींनी सांगितलेली ’बलोपासना’ व ’दिनचर्या’ या सगळ्यात अतिशय विचारपूर्वक शरीर व मनाचा विचार करून शेवटच्या श्वासापर्यंत निरोगी, समाधानी, आनंदी, दीर्घायुषी जीवन जगण्याची कलाच सांगितली आहे. म्हणून तरुणपणातच या संतसाहित्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण पूर्वी उतारवयात जडणारे विकार आज तरुणपणीच जडतात आणि आजचे तरुण तारुण्य आणि वृद्धावस्था एकाच वेळी अनुभवतांना दिसत आहेत. खरं म्हणजे योगशास्त्राच्या अभ्यासामुळे वृद्धावस्थेतदेखील तारुण्य अनुभवास येते. व्यक्तिमत्त्व विकास जर करायचा असेल आणि जीवनाचा खरा आनंद प्राप्त करावयाचा असेल तर योगसाधनेला पर्याय नाही.
गीता व ज्ञानेश्वरीतील योग
भारतीय योगशास्त्र हे मानसशास्त्रच आहे. योगशास्त्राच्या दृष्टीने विकार तीन प्रकारचे असतात.
शारीरिक, मानसिक व आत्मिक (अहंकाराचे) विकार.
आपलं डोकं दुखत असेल, कान दुखत असेल तर आपलं लक्ष सतत त्या वेदनेकडे जातं. मन अस्वस्थ होतं. म्हणून योगशास्त्राचं म्हणणं असं आहे, शरीरातून मन मुक्त व्हायचं असेल तर शरीर अतिशय स्वस्थ असणं आवश्यक आहे. आपली प्रकृती स्वस्थ असेल तर आपलं लक्ष प्रकृतीकडे जातच नाही. यावर उपाय काय? तर शरीराच्या स्वास्थ्यासाठी योगासनं हाच उपाय आहे. हाच विचार गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितला आहे.
दुसरा विकार कामक्रोधाचा आहे. काम-क्रोध हे मनात निर्माण होतात. त्यावर योगशास्त्राचा उपाय काय? तर प्राणायाम, प्राणायाम म्हणजे श्वासाची नियमबद्धता आणि प्रमाणबद्धता. काम-क्रोध जेव्हा मनात उद्भवतात तेव्हा श्वासोच्छ्वास तीव्र आणि विस्कळीत होतात. म्हणून श्वासाची गती मंद, नियमित आणि प्रमाणबद्ध केली तर आपोआपच ते विकार निवळतात आणि नियमित प्राणायाम केला तर कामक्रोधावर विजय मिळवता येतो.
तिसरा विकार म्हणजे अहंकार, ’मी’पणा आहे. आपण अहम्ची घडण विचारपूर्वक करत नाही. आपली पंचज्ञानेंद्रियं आपल्या मनात अनेक विचार आणून टाकत असतात. त्यांची कोणतीही रचना नसते. अनेक विचार गोळा होतात आणि आपलं मन म्हणजे अडगळीची खोलीच असते. कित्येक वेळा नको असलेल्या विचारांनीच आपलं मन भरलेलं असतं. यावर ज्ञानदेव म्हणतात,“आपल्या आचारातून मनच प्रकट होत असतं. म्हणून योगशास्त्र हा एक अप्रतिम उपाय सांगते. तो उपाय आहे ध्यानाचा.” योगाभ्यासाचा हेतूच हा आहे, कोरं बनणं, स्वच्छ बनणं, मनावरील सर्व कुसंस्कार पुसून टाकणं.
आसनं, प्राणायाम आणि व्यवहार
स्नायू विकसित करून देखणं करणं हा आसनांचा उद्देश नसून शरीर लवचीक बनवण्यासाठी आसनं करावयाची असतात. आसनांमुळे त्वचा व स्नायू ताजंतवानं होतात. फुफ्फुसं सबल होतात, पचन व उत्सर्जन क्रिया प्रोत्साहित होतात. विद्यार्थ्यांना, बैठं काम करणार्यांना, संशोधकांना व लेखकांना ’आसनजय’ साधावाच लागतो. त्यांना दीर्घकालीन बैठक मारावी लागते. त्यामुळे आसनांचा उपयोग होतो. तसंच गायक, अभिनेते, प्राध्यापक, डॉक्टर यांना सतत बोलावं लागतं. त्यामुळे घसा व स्वरयंत्रावर ताण येतो. त्यासाठी ’सिंहमुद्रा’ उपयुक्त आहे. शिवाय रक्तदाब, हृदयस्पंदनं नियमित होतात. टॉन्सिल्स व थायरॉईड ग्रंथींवर ही मुद्रा उपयुक्त आहे. ’पद्मासन’ योगमुद्रा ही स्त्रियांना अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे कमरेची, ओटीपोटाची दुखणी कमी होतात.
’धौती’, ’जलनेती’, ’कपालभाती’ या क्रिया आहेत तर ’दीर्घ श्वसन’, ’शीतली’, ’नाडीशुद्धी’ हे प्राणायमाचे प्रकार आहेत.
‘शवासना‘नं श्वास मंद होतो आणि हृदयावरील ताण कमी होतो. श्वसनमार्ग मोकळे होऊन श्वसनाचे विकार कमी होतात. ‘प्राणायामा’नं स्वरशुद्धी व नाडीशुद्धी होते. तसेच कामक्रोधावर ताबा येतो. ज्ञानतंतू, मेंदूला उत्कृष्ट रक्तपुरवठा व ऑक्सिजनचा पुरवठा होतो. वक्तृत्व, संगीत, अभिनय व नृत्य या कलांना प्राणायामाची नितांत गरज असते. एकाग्रता आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ’ओंकार साधना’ अतिशय उपयोगी आहे. अशा रितीने ‘हठयोगा‘चा आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांनाच उपयोग होतो.
या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, शास्त्रशुद्ध योगाभ्यास म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म आहे. तो बुद्धिपुरःसर व प्रयत्नपूर्वक घडवावा लागतो. म्हणून ते तपही आहे. प्रत्येक क्षण योगानुकूल जगलात तर शांत, सुखी, समाधानी, आरोग्यसंपन्न असं दिव्य जीवन अनुभवास येईल. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तरुणपणापासूनच योगाचं आचरण केलं पाहिजे. वृद्धत्व चांगलं जावं यासाठी तरुणपणापासून आपण आर्थिक गुंतवणूक करतो; पण हल्ली ती गुंतवणूक आजारपणात संपते. वृद्धत्व आनंदी, निरोगी जगायचं असेल तर आर्थिक गुंतवणुकीसोबतच योगातही गुंतवणूक करायला हवी.
निरोगी, आनंददायी, संतुलित वृद्धत्वाची गुरुकिल्ली म्हणजे योगशास्त्र!