महाराष्ट्राचे ‘फणसकिंग’

विवेक मराठी    20-Jun-2026   
Total Views |
बालपणात रस्त्याच्या कडेला अवघ्या 25 पैशांना फणस विकणार्‍या हरिश्चंद्र देसाई यांनी या फळाला ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे. आपले कृषी अभियंता सुपुत्र मिथिलेश यांच्या साथीने त्यांनी आज फणस शेतीची एक नवी क्रांती उभी केली आहे. वडलांचा प्रदीर्घ अनुभव आणि मुलाची तंत्रज्ञानाची जोड, या दोन्हींच्या समन्वयातून देसाईंनी झापडे या गावी तब्बल 86 जातींच्या फणसांची अनोखी फळबाग फुलवली आहे. महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य फणस रोपवाटिका आणि ‘जॅकफ्रुट किंग अ‍ॅग्रो कंपनी’ स्थापन करणार्‍या व ‘फणसकिंग’ म्हणून लोकप्रिय असणार्‍या या पिता-पुत्रांचा हा प्रेरणादायी प्रवास...
 vivek
 
 
आंबा, काजू आणि कोकम या फळांसाठी जगभरात ओळखला जाणारा कोकण पट्टा आता हळूहळू फणसाच्या सुवासानेही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. ’जॅकफ्रुट किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिथिलेश देसाई यांना याबाबत विचारले, तर त्यांचे उत्तर ठामपणे होकारार्थी असेल. कारण फणस या पारंपरिक फळाला केवळ खाण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला उद्योगाचे स्वरूप देत लोकमान्यता प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणातील फणसाला नवसंजीवनी मिळाली असून तो आता शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचा नवा आणि आशादायी मार्ग ठरत आहे. फणस व्यवसायाच्या या यशस्वी प्रवासाची कहाणी जाणून घेण्यापूर्वी, त्यामागील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या हरिश्चंद्र देसाई यांच्या वाटचालीवर एक नजर टाकणे आवश्यक ठरते.
 
 
देसाई कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. 1972च्या भीषण दुष्काळात हरिश्चंद्रजी चौथीत शिकत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हातखंबा (जिल्हा रत्नागिरी) येथे रस्त्याच्या कडेला ते फणस विकायचे. त्या काळी एका फणसाला अवघे 25 पैसे भाव मिळायचा. करवंदे विकणे, रानातून गोळा केलेल्या ओल्या काजूगरांची शंभर नगांची पाकिटे तयार करून ती 25 पैशांना विकणे, अशी अनेक कामे करत त्यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला.
 
 
vivek
 
कष्टांची साथ आणि अभ्यासाची जिद्द यांमुळे दहावीच्या परीक्षेत 65 टक्के गुण मिळवत ते शाळेत प्रथम आले. पुढे 1989 साली शिरोडा-सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे टेक्निशियन म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर त्यांची बदली लांजा येथे झाली. नोकरी करत असतानाच 2004 साली त्यांनी लांजा तालुक्यातील झापडे येथे आठ एकर डोंगराळ जमीन विकत घेतली. पुढे थोडी-थोडी जमीन खरेदी करत त्यांनी दोन ठिकाणी मिळून तब्बल 27 एकर क्षेत्र उभे केले. सुरुवातीला या जमिनीत सुमारे अकराशे काजू रोपांची लागवड केली. मात्र हरिश्चंद्र देसाई यांची विचारसरणी केवळ पारंपरिक शेतीपुरती मर्यादित नव्हती. काहीतरी वेगळे, नावीन्यपूर्ण आणि चाकोरीबाहेरचे करण्याची धडपड त्यांना सतत अस्वस्थ करत होती. याच अस्वस्थतेतून पुढे ’फणसकेंद्रित’ शेतीचा अनोखा आणि यशस्वी प्रवास आकाराला आला.
 
 
लहानपणापासूनच फणस व्यापाराचा अनुभव असल्यामुळे भविष्यात या फळाला मोठी बाजारपेठ मिळेल, याची त्यांना खात्री होती. मात्र केवळ अंदाजावर न चालता त्यांनी शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक रविवारी मोटारसायकलवरून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांचा दौरा सुरू झाला. गावातील पोलीस पाटील, गावकरी यांच्याशी संवाद साधत ते फणसाच्या झाडांची संख्या, त्यातील कापा आणि बरका जातींचे प्रमाण याची माहिती गोळा करू लागले. या अभ्यासातून एक महत्त्वाची बाब समोर आली. कोकणात पूर्वी फणसाच्या असंख्य स्थानिक जाती आढळत असत. मात्र काळाच्या ओघात त्यांचे संवर्धन आणि शास्त्रीय संगोपन न झाल्याने अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर गेल्या. हरिश्चंद्र देसाई यांनी ही उणीव ओळखली आणि फणसाच्या विविध जातींचा सखोल अभ्यास सुरू केला.
 
 
कोकणातील केवळ आठ टक्के फणस कापा जातीचे होते, तर तब्बल 92 टक्के फणस बरका (रसाळ) प्रकारातील होते. मात्र बाजारपेठेत मागणी होती ती प्रामुख्याने कापा फणसाची. याच निरीक्षणातून त्यांनी कापा जातीच्या फणस लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी दर्जेदार कलमे तयार करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी देशभरातील तज्ज्ञांचा शोध सुरू केला.
 

vivek 
 
2014 साली दापोली येथील ’डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’त आयोजित एका परिसंवादात त्यांचा हा शोध पूर्ण झाला. त्या ठिकाणी फणस संवर्धनासाठी देशभरात कार्य करणारे श्री. पद्रे आणि फणस कलमांचे तज्ज्ञ गुरुराज यांच्याशी त्यांची भेट झाली. गुरुराज यांच्याकडे फणसाच्या अनेक दुर्मीळ जाती असल्याचे समजताच त्यांनी थेट केरळ गाठले. तेथून 2016 साली चारशे कलमे रेल्वेने आणून झापडे येथील शेतात लागवड केली. त्यातून त्यांनी तब्बल 25 विविध जातींच्या फणसांचे संवर्धन करण्यात यश मिळवले. एवढ्यावरच न थांबता, सातत्यपूर्ण प्रयोगांतून त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र जात विकसित केली आणि तिला अभिमानाने ‘देसाई कप्पा’ हे नाव दिले.
 
 
 
फणसाचे नाव कोकणाशी जोडले गेले असले, तरी कोकणातील अतिवृष्टी हे या फळासाठी मोठे आव्हान आहे. सर्वच जाती या हवामानात तग धरू शकत नाहीत. उदाहरणार्थ, ‘जे-33’ ही अत्यंत गोड गर्‍यासाठी प्रसिद्ध असलेली जात. मात्र तिची रोपे कोकणात जगत नव्हती. सततच्या पावसामुळे पानांवर बुरशी येत असे. पण देसाई यांनी हार मानली नाही. तीन वर्षे रोपे कुंडीत वाढवून नंतर जमिनीत लावण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
 
 
भगव्या रंगाचा गरा असणार्‍या या जातीच्या फणसाच्या फांद्या वारंवार सुकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी स्थानिक फणसाच्या मजबूत झाडांवर कलमे बांधून ही दुर्मीळ जात टिकवून ठेवली. गुलाबी रंगाच्या गर्‍यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘थायलंड पिंक’ जातीच्या संवर्धनासाठीही त्यांनी अशाच कल्पक आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला.
 
 
हरिश्चंद्र देसाई यांच्या या अथक धडपडीला समाजातून आणि कुटुंबातून भरभरून प्रोत्साहन मिळत होतेच. मात्र त्यांच्या स्वप्नांना खर्‍या अर्थाने पंख मिळाले, ते राहुरी येथील ’महात्मा फुले कृषी विद्यापीठा’तून कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेला त्यांचा पुत्र मिथिलेश यांच्या साथीमुळे. याच पितापुत्रांच्या एकजुटीतून पुढे ’फणसकेंद्रित’ शेती-उद्योगाचे एक यशस्वी आणि प्रेरणादायी मॉडेल आकाराला आले.
 
 
vivek
 
फणसाच्या 86 जातींची बाग
 
सन 2017पासून मिथिलेश देसाई यांनी वडील हरिश्चंद्र देसाई यांच्यासोबत फणस क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करण्याचा निर्णय घेतला. कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण आणि वडलांचा प्रदीर्घ अनुभव यांची सांगड घालत त्यांनी फणस संवर्धनाच्या कार्याला नवी गती दिली. याबाबत अधिक माहिती देताना मिथिलेश सांगतात, “2017मध्ये सुट्टीसाठी घरी आलो असताना बाबा केरळमधील वायनाड येथे आयोजित भारतातील पहिल्या जागतिक फणस परिषदेला जाण्याच्या तयारीत होते. ‘नवीन काहीतरी शिकायला मिळेल, चल सोबत येतोस का?’ असा त्यांचा प्रश्न होता. त्या एका प्रश्नाने माझ्या आयुष्याची दिशा बदलली.“
 
 
“वायनाड येथे भारत सरकारच्या कृषी सचिवांनी जगभरात फणसाला प्राप्त होत असलेले महत्त्व आणि त्याच्या अफाट शक्यता याविषयी सविस्तर माहिती दिली. परिषद संपून परतीच्या प्रवासातच माझा करिअरचा निर्णय पक्का झाला होता. यूपीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणतीही नोकरी करायची नाही; महिन्याला पाच हजार मिळोत किंवा पाच लाख, आयुष्य फणसासाठीच वाहून घ्यायचे, हे मी ठरवून टाकले. आई-वडलांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही,“ हे सांगताना मिथिलेश यांच्या बोलण्यातून एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची वृत्ती आणि फणस व्यवसायाच्या भविष्याबद्दलची मोठी दूरदृष्टी प्रकर्षाने जाणवली.
 
 
’फणस परिषदे’च्या निमित्ताने आपल्या आयुष्यात काय बदल झाले ते मिथिलेश यांचे सांगून संपले नव्हते, “फणसाच्या प्रेमाने झपाटल्यासारखे आम्ही रात्रंदिवस बागेत काम करू लागलो. जगात फणसाच्या एकूण 128 जाती आढळतात. त्यापैकी 25 जातींची झाडे बाबांनी यापूर्वीच लावली होती. मी पूर्णवेळ शेतीत उतरल्यानंतर देशभरातून विविध जातींची रोपे आणण्याचा ध्यास घेतला. आज आमच्या 18 एकर क्षेत्रावरील बागेत तब्बल 82 जातींची सुमारे 1500 फणसाची झाडे डौलाने उभी आहेत.“ ही माहिती देताना मिथिलेश यांच्या चेहर्‍यावर अपार कष्टांतून उभारलेल्या या फणस साम्राज्याचा सार्थ अभिमान ओसंडून वाहत होता.
“दोन फणसाच्या झाडांमधील जागेत आम्ही हळद, आले आणि लिंबू यांसारखी आंतरपिके घेतो. लाल, भगवा, पिवळा, सोनेरी, गुलाबी आणि चॉकलेटी रंगाचे गरे असलेल्या जाती येथे पाहायला मिळतात. काही जाती डिसेंबरपासून जुलैपर्यंत वेगवेगळ्या काळात उत्पादन देतात. पारंपरिक बीपासून वाढलेल्या झाडाला फळे यायला 15 ते 20 वर्षे लागतात; मात्र आमच्याकडील काही सुधारित जाती अवघ्या दीड वर्षांत फळधारणा करतात,“ मिथिलेश यांच्या बोलण्यातून त्यांची ’प्रयोगशीलता’ आणि फणस शेतीकडे पाहण्याचा ’व्यावसायिक दृष्टीकोन’ प्रकर्षाने जाणवला.
 
 
पुढे मिथिलेश सांगतात, ”पुढे दोन किलो वजनाच्या छोट्या फणसापासून ते तब्बल 50 किलो वजनाच्या महाकाय फणसापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण जाती आम्ही जतन केल्या आहेत. अननसासारखा दिसणारा बिनआठळीचा फणस, एक मीटर लांब आणि 50 किलो वजनाचा ‘मीटर जॅक’, हाताला चीक न लागणारा ‘गमलेस’ फणस, अधिक गोडीचा ‘हेमचंद्र’ फणस अशा अनेक दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण जाती या बागेचे आकर्षण ठरल्या आहेत.”
 
 
“विशेष म्हणजे ही संपूर्ण बाग सेंद्रिय पद्धतीने विकसित करण्यात आली असून इतर अनेक फळपिकांच्या तुलनेत येथे कीटकनाशकांचा वापर शून्य आहे. बाग फुलत गेली तशी तिची कीर्तीही दूरदूरपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील अभ्यासक, शेतकरी आणि उद्योजक येथे भेट देतात. एवढेच नव्हे, तर युक्रेन, जर्मनी, नायजेरिया आणि अमेरिका यांसारख्या देशांतील कृषिप्रेमींनीही या फणसबागेला भेट देऊन तिचे कौतुक केले आहे,“ या शब्दांत मिथिलेश यांनी रत्नागिरीच्या मातीतील हा प्रयोग आता जागतिक स्तरावर कसा नावाजला जात आहे, हे अधोरेखित केले.
 
 
संशोधन आणि प्रक्रिया केंद्राची उभारणी
 
फणसाच्या विविध जातींचे जतन आणि संवर्धन यापुरतेच आपले कार्य मर्यादित न ठेवता मिथिलेश देसाई यांनी झापडे येथे ’अत्याधुनिक फणस संशोधन व प्रक्रिया केंद्रा’ची उभारणी केली आहे. संशोधन, नवकल्पना आणि मूल्यवर्धन यांचा संगम घडवून त्यांनी फणसाला केवळ फळ न ठेवता एक आर्थिक चळवळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
याबाबत बोलताना मिथिलेश सांगतात, “फणसाची लागवड वाढवणे हे आमचे उद्दिष्ट होतेच; पण त्याचबरोबर या फळामध्ये दडलेल्या अमर्याद शक्यता शोधण्याची उत्सुकता मला कायम होती. सातत्यपूर्ण प्रयोग, निरीक्षण आणि अभ्यास यांच्या आधारे 2018 साली आम्ही फणसाची एक नवीन जात विकसित केली. वडलांच्या अथक परिश्रमांना आणि योगदानाला मानाचा मुजरा म्हणून या नव्या जातीला ‘हरिश्चंद्रा’ असे नाव दिले.“
 
 
कृषी अभियांत्रिकी विषयातील शिक्षणाचा उपयोग करून फणसावर आधारित नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. याच दृष्टीने तब्बल 11 हजार चौरस फूट क्षेत्रावर आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातून दरवर्षी सुमारे पाच टन विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते.
 
 
कच्च्या आणि पिकलेल्या फणसापासून अनेक मूल्यवर्धित पदार्थ देसाईंच्या ’अत्याधुनिक फणस संशोधन व प्रक्रिया केंद्रा’त तयार केले जातात. छोट्या किंवा कोवळ्या फणसापासून रेडी-टू-ईट भाजी, कच्च्या गर्‍यांपासून विशेष पावडर, पिकलेल्या गर्‍यांपासून कुरकुरीत चिप्स, गर्‍यांपासून तयार होणारी बिर्याणी तसेच फणसाच्या बियांपासून पौष्टिक पावडर अशी विविध उपयुक्त उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.
 
 
फणसाच्या पानांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. परदेशातील संशोधन संस्थांकडून आणि औषधी उद्योगांकडून पानांना विशेष मागणी येत आहे. 2021 साली जर्मनीला एक टन पानांची निर्यात करण्यात आली होती. त्यानंतरच्या 2025-26वर्षी हा आकडा 2023साली एक टन तर 2024 साली पाच टनांवर पोहोचला. वर्षागणिक वाढणारी निर्यात ही या उपक्रमाच्या गुणवत्तेची आणि विश्वासार्हतेची साक्ष देणारी ठरली आहे.
 
 
महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य ’फणस रोपवाटिका’
 
फणस संवर्धन आणि प्रसाराचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मिथिलेश देसाई यांनी 2019 साली महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य ’फणस रोपवाटिका’ विकसित केली आहे. आज या रोपवाटिकेतून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील शेतकर्‍यांना विविध जातींची फणस रोपे पुरवली जात आहेत. विशेष म्हणजे मॉरिशससारख्या परदेशातही झापडेतून फणसाची रोपे पाठवली जात आहेत.
 
 
याबाबत माहिती देताना मिथिलेश देसाई सांगतात, “या प्रवासाची सुरुवात अवघ्या एक हजार रोपांच्या नर्सरीपासून झाली. विशेष म्हणजे ती सर्व रोपे एका महिन्यातच विकली गेली. पुढील वर्षी तीन हजार रोपे विकली गेली, तर गेल्या वर्षी तब्बल 15 हजार फणस रोपांची महाराष्ट्रातील सुमारे 200 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. ‘पल्लूर’, ‘हरिश्चंद्रा’, ‘व्हिएतनाम एसई’, ‘रुद्राक्षी’, ‘सिंगापूर’(नारिंगी), ‘हनी जॅक’, ‘मलेशियन’, ‘नागचंद्र’, ‘बहिरचंद्र’, ‘लालबाग मधुरा’, ‘संपूर्णा’ अशा पंचवीसहून अधिक उत्कृष्ट वाणांची फणस रोपे आमच्याकडे उपलब्ध आहेत.“
 
 
“पूर्वी फणसाचे झाड फक्त कोकणातच वाढू शकते, असा समज होता. मात्र विविध हवामानाशी जुळवून घेणार्‍या सुधारित जाती उपलब्ध झाल्याने आज महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फणसाची यशस्वी लागवड शक्य असल्याचा अनुभव आम्हाला आला आहे. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील एकमेव ‘शासकीय मान्यताप्राप्त फणस नर्सरी’ म्हणून आमची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी गोवा सरकारनेही आमच्या रोपवाटिकेतून तीन हजार रोपे घेऊन ती तेथील शेतकर्‍यांना वितरित केली,“ असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
 
 
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
 
फणसाच्या लागवडीपासून संशोधन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यात अशा सर्व घटकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिथिलेश देसाई यांनी 2020 साली ‘जॅकफ्रुट किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना केली. अल्पावधीतच या कंपनीने शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला असून आज संस्थेशी अकराशेंहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.
 
 
शासनाच्या ‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांचा अत्याधुनिक प्रक्रिया व निर्यात प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. सुमारे 1300 टन वार्षिक क्षमतेच्या या प्रकल्पासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कच्च्या फणसाची गरज भासणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या दीडशे टन कच्च्या मालाबरोबरच उर्वरित फळांची खरेदी थेट शेतकर्‍यांकडून केली जाणार असल्याने शेकडो उत्पादकांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
 
 
कंपनीने विकसित केलेल्या ‘देसाई कप्पा’ आणि ‘हरिश्चंद्रा’ या फणसाच्या सुधारित जातींना शेतकरी आणि ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध हवामानात तग धरणार्‍या, चव, उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या जाती फणस क्षेत्रातील नव्या क्रांतीची नांदी ठरत आहेत.
 
 
फणस केवळ फळ म्हणून विकण्याऐवजी त्याचे मूल्यवर्धन करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. फणसाचे चिप्स, पीठ, पावडर, गोठवलेले गरे (फ्रोझन बल्ब्स), रेडी-टू-कूक पदार्थ, व्हेगन मीटचे पर्याय, बियांचे पौष्टिक पीठ, पशुखाद्य तसेच इतर अनेक नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीवर संशोधन सुरू आहे. या उपक्रमांमुळे फणसाला वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होत असून शेतकर्‍यांना कच्च्या फळाच्या विक्रीपेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळत आहे.
 
 
कोकणातील यशस्वी प्रयोगाच्या बळावर ’जॅकफ्रुट किंग एफपीओ’ आता महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे देशव्यापी स्तरावर कार्यरत आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, ईशान्य भारत आणि इतर फणस उत्पादक राज्यांतील शेतकरी गट, एफपीओ, कृषी संस्था आणि प्रक्रिया उद्योगांशी सहकार्याचे जाळे विस्तारले जात आहे. देशभरातील उत्पादकांना फणस लागवडीचे दर्जेदार साहित्य, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, बाजारपेठेची जोड आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.‘वन डिस्ट्रिक्ट, वन जॅकफ्रुट क्लस्टर’ या दूरदर्शी संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील ’फणस नेटवर्क’ उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
 
 
कोकणातील झापडे या एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही वाटचाल आज हजारो शेतकर्‍यांसाठी प्रेरणेचा दीप ठरली आहे. जिद्द, अभ्यास, प्रयोगशीलता आणि शेतीवरील अपार प्रेम यांच्या बळावर देसाई पितापुत्रांनी फणसाला नवी ओळख दिली. त्यांच्या कार्यामुळे फणसाचे झाड आता केवळ अंगणातील वृक्ष न राहता शेतकर्‍यांच्या उज्ज्वल भवितव्याची ’नवी उमेद’ जागवणारे ठरले आहे.

विकास पांढरे

सध्या 'कृषी विवेक' (विवेक समूह) चे कार्यकारी संपादक. एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारी याठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून अनुभव. कृषी, समाज, साहित्य व वंचित समाजाविषयी लिखाण.