वेगवान मुंबई ते संघमय पुणे एका प्रवासाची गोष्ट

---आणि घर संघाचे झाले

विवेक मराठी    22-Jun-2026
Total Views |
@जयश्री विश्वास हर्षे
मुंबईच्या वेगवान वातावरणात वाढलेल्या एका तरुणीचा विवाह पुण्याच्या समर्पित ‘संघाच्या घरात’ होतो. सुरुवातीला कौटुंबिक रुटीन, पाहुणचार आणि सततच्या समाजसेवेचा स्वीकार करणे तिला जड जाते. मात्र, पतीचे झोकून देऊन काम करणे आणि कार्यकर्त्यांची तळमळ ती जवळून पाहते. कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत हळूहळू तिच्याही विचारांची बैठक बदलत जाते. शेवटी ती केवळ या जीवनशैलीचा स्वीकारच करत नाही, तर स्वतःही या राष्ट्रकार्यात आनंदाने समरस होते.

rss
 
माझं माहेर ठाण्याचं. माझे वडील स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनियर) होते. ते ’टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनी’मध्ये नोकरीला होते. त्यांचा पूर्ण दिवस प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (साईटवर) जात असे. ते सकाळी साडे सहा वाजता घर सोडत. अनेकदा रात्री उशिरा घरी येत. त्यामुळे वडील संघशाखेवर कधी जाऊ शकत नसत; पण संघशाखेचे स्वयंसेवक आमच्या घरी रविवारी येत असत. त्यांची वडलांबरोबर सद्यपरिस्थितीवर चर्चा चाले. तसंच ठिकठिकाणी चालणार्‍या सेवाकार्याची माहितीही वडलांना देत असत. वडील या सेवाकार्याला किंवा संघाच्या विचारांच्या संस्थांना आर्थिक मदत देत असत. या चर्चा आम्ही भावंडही ऐकत असू. त्याचबरोबर संघाशी संबंधित राजकीय व्यक्ती, समाजसेवक यांची भाषणं ऐकण्यास वडील आम्हा भावंडांना घेऊन जात. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे विचार आम्ही अनेकदा लहानपणी ऐकले आहेत. मला इथूनच ’संघविचारांचा’ परिचय होत गेला.
 
 
लहान वयात अशा चर्चा, सामाजिक, राजकीय परिस्थितीवरचे विचार ऐकले की विचारांची एक विशिष्ट बैठक मनात तयार होते. ’संघ’ म्हणजे ’राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांचे संघटन’ एवढं त्या वयात समजलं होतं.
 
 
माझं लग्न जेव्हा विश्वास हर्षे यांच्याशी झालं, तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत तसंच सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे मला माहीत होतं.
 
 
’सामाजिक कार्यकर्ते’ म्हणजे ’जिथे गरज तिथे मदतीला जाणारे’ एवढंच माहीत होतं. पण ’संघाचं घर’ म्हणजे - ’सतत घरी येणारे कार्यकर्ते’, ’प्रचारक तसेच गरजूंना पदरमोड करून केली जाणारी मदत’, ’दर महिन्याला मिळणार्‍या पगारातून काही रक्कम समाजासाठी बाजूला काढून ठेवायची’, ’सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत मागायला जाताना देणगी पुस्तकातली पहिली पावती आपण फाडायची’ आणि ’अचानक जेवायला घरी येणार्‍या प्रचारकांना, संघ कार्यकर्त्यांना अगत्यानं, आनंदानं जेऊ-खाऊ घालायचं’...याचा हळूहळू परिचय होत गेला.
 
 
सुरुवातीला सतत येणारे पाहुणे, अचानक जेवायला येणारे कार्यकर्ते...या गोष्टींचा स्वीकार करणं खूप जड गेलं.
 
 
पती विश्वास हे ’कमिन्स इंडिया’मध्ये नोकरीला होते. त्यांची नोकरी शिफ्ट ड्युटीची होती. सकाळी 7.30 ते 4.00 किंवा दुपारी 4.00 ते 12.00. सकाळची शिफ्ट संपवून साडेचार वाजता घरी यायचं, जेमतेम तासभर घरी थांबायचं आणि मग जे संघानं ठरवून दिलेल्या कामासाठी बाहेर पडायचं ते रात्री आठ वाजता जेवणाच्या वेळी घरी यायचं. दुपारच्या शिफ्टला जाण्यापूर्वी त्यांचं संघकार्य पूर्ण करण्यााचं असंच रुटीन असायचं.
 
लग्न झाल्या झाल्या लगेच या रुटीनचा स्वीकार करणं खूप जड गेलं. मी मुळची मुंबईची. लग्नापूर्वी ’टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनी’मध्ये नोकरी करत होते. माझं मुंबईचं रुटीन अतिशय वेगवान होतं. आणि तेव्हा पुणं पेन्शनरांचं म्हणून ओळखलं जायचं. मुंबईच्या तुलनेत अतिशय निवांत. मला अशा निवांत राहणीमानाची अजिबातच सवय नव्हती. मुंबई-पुणे राहणीमान, दिवसाचं वेळापत्रक, विचारांचा दृष्टीकोन, वृत्ती या सगळ्यांत फरक होता.
 
 
माझं सासरचं घर म्हणजे ’संघ’, ’विश्व हिंदू परिषद’, ’वनवासी कल्याण आश्रम’, ’हिंदू महासभा’ यांपैकी कोणत्या तरी एका संघटनेचं काम करणारं घर. सतत समाजसेवेच्या गप्पा घरात चालत. मौजमजेसाठी फिरणं, हॉटेलमध्ये जाणं, चित्रपट बघणं, खरेदी...या गोष्टी जवळजवळ व्यर्जच होत्या. माझ्यासारख्या मुंबईत वाढलेल्या मुलीला सुरुवातीला हे फार जड गेलं. असं वाटे की, ’समाजसेवेव्यतिरिक्तही जग आहे, यांनी तेही अनुभवलं पाहिजे, त्याचाही आनंद घेतला पाहिजे.’
 
या निमित्ताने आमच्या लग्नाच्या साखरपुड्याची एक आठवण सांगते. 1980च्या मे महिन्यात आमचा साखरपुडा ठरला. त्याचवेळी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या. आण्णा जोशींचा प्रचार माझे पती विश्वास करत होते. प्रचारकामात व्यत्यय नको म्हणून विश्वास यांनी मे महिन्यात साखरपुडा करण्यास नकारच दिला होता. ’पण लग्न निवडणुकीनंतरच’ या अटीवर साखरपुडा झाला. साखरपुड्याला जेमतेम तासभर वेळ काढून आले आणि लगेच मला सासरच्या अनोळखी मंडळींवर सोपवून प्रचाराला निघून गेले. झोकून देऊन काम करणं, कामाची झिंग म्हणजे काय हे मी त्या दिवशी पाहिलं.
 
 
जसजसं लग्न जुनं होऊ लागलं, तसतसं हे सर्व अंगवळणी पडू लागलं. आणि हळूहळू या सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल होऊ लागला. ’संघाच्या कार्यकर्त्यांची समाजसेवेची तळमळ’, ’उन्हातान्हातही घरोघरी फिरणारे’, ’काही लोकांकडून मिळणारा नकार किंवा अवहेलनाही न चिडता झेलणारे’, आणि ’संघानं नेमून दिलेलं झोकून देऊन करणं’... हे सर्व मला कौतुकास्पद वाटू लागलं. माझ्या विचारात फरक पडू लागला. असं वाटू लागलं की, ’लग्नानंतर एकत्र फिरणं’, ’हॉटेलमध्ये जाणं’, ’चित्रपट बघणं’- याबरोबरच आजुबाजूच्या समाजाचं भान असणंही महत्त्वाचं आणि मग तळागाळातल्या लोकांचा विचार करणं, त्यांंच्या विकासाचा प्रयत्न करणं, ’वनवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणं’...हे सर्व सवयीचं होऊ लागलं, अभिमानास्पद वाटू लागलं; इतकं की, काही काळानं मीसुद्धा त्या कार्यात सहभागी झाले, संघमय झाले. या सगळ्याचा मी मनापासून स्वीकार केला.