bharat bhagya vidhata movie review
@ वैद्य ज्योत्स्ना पेठकर
केवळ काही तासांचा हा थरार, त्यावर ‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट बनवणे अतिशय आव्हानात्मक काम होते. कथेचा जीव अगदी चिमुकला असला तरी त्यात आशय जबरदस्त आहे. चित्रपटाची लांबी वाढवण्यासाठी कथानक उगाच अतिरंजित करण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे आणि तरीही त्यातला थरार प्रभावी झाला आहे ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. आपण राष्ट्रासाठी काय केले, काय करू शकतो याची जाणीव सतत हवी हा संदेश देणारा चित्रपट प्रत्येक भारतीयाने अवश्य बघायला हवा.
अनुरक्त: शुचि: दक्ष बुद्धिमान परिचारक:
आयुर्वेदात सांगितलेल्या चिकित्सेच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक स्तंभ म्हणजे ‘परिचारिका’. परिचारिकेत कोणते गुण असावेत हे वरच्या सूत्रात नेमकेपणाने सांगितले आहे. रुग्णाप्रती प्रेम, स्वच्छ, बुद्धिमान आणि याच बरोबर ‘अत्यंत दक्ष’ राहणे हे परिचरिकेचे महत्त्वाचे गुण.
सूत्र स्थान हा आयुर्वेदातल्या प्रत्येक ग्रंथाचा आत्मा. रुग्ण कुठलाही असो या सूत्रांनी कायमच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत यशस्वी चिकित्सेचा मार्ग दाखवला आहे. या सूत्रांचे/conceptsचे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त वैद्यकीय नाही तर कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही काळी लागू पडणारी सूत्रे आहेत. याचा प्रत्यय मी अनेक क्षेत्रात अनेकदा घेतला आहे. ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट बघताना मला पुन्हा याचा प्रत्यय आला. परिचारिका या महत्त्वाच्या स्तंभाचे वर्णन करताना ग्रंथकार काय म्हणतात ते आपण लेखाच्या सुरुवातीला पाहिले.
या सर्व गुणांमुळेच 26/11च्या अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिथल्या परिचरिकांनी (सिस्टर्सनी) एक असामान्य कामगिरी केली. त्या स्वच्छता राखून होत्या, रुग्णाप्रती करुणा तर होतीच, आजाराची लक्षणे आणि औषधे याबाबतीत बुद्धिमानदेखील होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या ‘दक्ष’ होत्या.
दहशतवादी हल्ल्यांसाठी भारताची आर्थिक राजधानी मुंबई नेहमीच ‘लक्ष्य’ असते. 26/11ला झालेल्या अचानक हल्ल्यात कामा रुग्णालायला casualtyसाठी सज्ज राहण्याचा अलर्ट कॉल आला. अत्यंत दक्ष असणार्या परिचारिका फक्त casualtyसाठी नाही तर पुढे येऊ घातलेल्या संकटासाठीदेखील वेगाने हालचाल करत सज्ज झाल्या. casualty हाताळणारे रुग्णालयच खुद्द अपघातग्रस्त झाले.
‘दहशतवादी हल्ला’ झालाच तर काय करायचे याचे कुठलेही फॉर्मल ट्रेनिंग घेण्यासाठी त्या काही सैनिक नव्हत्या किंवा आत्मसंरक्षणासाठी त्यांच्याकडे कोणतीही हत्यारे नव्हती; पण कुठल्याही परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवायचे यासाठी मात्र कटिबद्ध होत्या. अतिरेक्यांच्या एके-47 पुढे जिथे पोलिसांच्या साध्या बंदुकी टिकल्या नाहीत; तिथे या नि:शस्त्र परिचारिकांनी तब्बल 300 ते 350 रुग्णांचे प्राण आपल्या बुद्धिचातुर्याने वाचवले. ‘अत्यायिक अवस्थेत’ म्हणजेच एमर्जन्सीमध्ये घाबरून न जाता, तत्परतेने निर्णय घेत रुग्णाचे प्राण वाचवण्याचे ट्रेनिंग कामी आले.
परिचारिकांनी हे साहस दाखवले नसते तर त्या दोन दहशतवाद्यांनी काय नरसंहार केला असता याची कल्पनादेखील करवत नाही. गर्भिणी, प्रसुता, ताप ते कर्करोग असे विविध रुग्ण सगळेच असहाय्य होते...
केवळ काही तासांचा हा थरार, त्यावर चित्रपट बनवणे अतिशय आव्हानात्मक होते. कथेचा जीव अगदी चिमुकला असला तरी त्यात आशय जबरदस्त होता. चित्रपटाची लांबी वाढवण्यासाठी कथानक उगाच अतिरंजित करण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे आणि तरीही त्यातला थरार प्रभावी झाला आहे ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. पात्रांना ‘लार्जर दॅन लाइफ’ दाखवण्याचा मोहदेखील दिग्दर्शकाने टाळला आहे. त्यामुळेच समोर स्क्रीनवर जे काही चाललंय ते आपल्याला भिडतं. पडद्यावरचा हिरो आपल्यासारखा सामान्य असू शकतो ही भावना आपल्याला या कथानकाशी जोडते. हाच या कथेचा प्राण आहे.
प्रत्येक फ्रेम स्मरणीय आणि प्रभावी
या आटोपशीर आणि प्रभावी कथानकाची सर्वात मोठी गरज होती पात्रांसाठी योग्य कलाकार आणि त्यासाठी अर्थातच निवड झाली मराठी कलाकारांची. आपल्या सर्वच मराठी कलाकरांनी त्यांच्या कसदार अभिनयातून अत्यंत प्रभावीपणे पात्रं उभी केली आहेत.
स्मिता तांबे, इशा डे, गिरिजा ओक, प्रिया बेर्डे, सुहासी थत्ते आणि दस्तुरखुद्द कंगना राणावत या सगळ्यांनी काही महिने कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम केले की काय असे वाटावे इतकी सहजपणे पात्र साकारली आहेत.
26/11च्या आठवणी कितीही कटू असल्या तरी, त्या हल्ल्याची पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात कामा रुग्णालयाप्रमाणे इतर ठिकाणी अजून काय काय झाले हे एक भारतीय म्हणून माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
धुरंधरचा प्रभाव अजून ताजा आहे. 26/11चा प्लॉट ‘तिथे’ बसून कसा कार्यान्वित झाला हे सत्य आता सामान्य माणसापासून लपून राहिलेले नाही. कसाब पकडला गेला नसता तर ‘भगवा दहशतवाद’ प्रस्थापित करण्याचे षड्यंत्र यशस्वी झालेच असते.
ज्याप्रमाणे कसाबला जिवंत पकडणार्या तुकाराम ओंबळेंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, त्याचप्रमाणे त्याची ओळख पटवणार्या सिस्टर अंजली कुलथे यांचे देखील. हल्ला सुरू असताना जी जोखीम त्यांनी पत्करली तीच जोखीम कसाबच्या ओळख परेडमध्येही पत्करली. चित्रपटात हा प्रसंग खूप छान साकारला गेलाय. गणवेशातून आलेले धैर्य आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित झाली आहे.
हे सगळे बघितले की, वाटते आपण कितीही सामान्य असलो तरी आपल्या आत असणारी राष्ट्र प्रथमची भावना आपल्याला असामान्य बनवते.
Dignity of labour ही शिकवून येणारी भावना नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा पुरवणार्या मंडळीना ‘भारत भाग्य विधाता’ असे सुंदर संबोधन देऊन आपल्या पंतप्रधान मोदींनी त्यांचा खूप मोठा गौरव केला आहे.
चित्रपटातील एक प्रसंग आहे जिथे कंगना म्हणते की,“ते फक्त दोन आहेत आणि आपण 200.” फार अर्थ दडलाय त्यात. आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ‘आपण’ सक्षम आहोत असं ती सुचवते आहे. त्यासाठी लढायला प्रेरित करते आहे.
कामा रुग्णालयाच्या भिंतींवरील गोळ्यांच्या खुणा अस्वस्थ तर करतातच; पण आपण सदैव दक्ष राहणे गरजेचे आहे याची आठवणदेखील करून देतात. काळाचा महिमा असा आहे की, परिचारिकांचे वर्णन केलेल्या गुणांपैकी ‘दक्ष’ गुण आपल्यात मुरायला हवा आहे.
आपल्या राष्ट्राचे भाग्य आपल्या हाती आहे - आपण राष्ट्रासाठी काय केले, काय करू शकतो याची जाणीव सतत हवी हा संदेश देणारा चित्रपट प्रत्येक भारतीयाने अवश्य बघायला हवा. स्वत:मध्ये मुरवायला हवा.