प्रेमळ मनाचा निस्सीम कार्यकर्ता

विवेक मराठी    25-Jun-2026
Total Views |
 
@इरफान अली पिरजादे
 9167239495
 

rss 
 
‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ (MRM)चे राष्ट्रीय संयोजक, संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि इस्लाम-ख्रिश्चन धर्माचे गाढे अभ्यासक विराग पाचपोर यांचे 18 जून 2026 रोजी निधन झाले. राष्ट्रीय मुस्लीम मंचाच्या कार्यात विरागजी यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यांचा शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि दूरदर्शी विचार यामुळे ते सर्वांना प्रिय होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
 
 
विराग श्रीकृष्ण पाचपोर यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. नागपूरच्या राहत्या घरात गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने एका महान व्यक्तिमत्त्वाने डोळे मिटले. त्यांचा जन्म 6 एप्रिल 1952चा. यवतमाळपासून सुरू झालेला प्रवास नागपूरपर्यंत पोहोचला होता. 56 वर्षांपूर्वी ते यवतमाळ शहराचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मंत्री होते. आज ते ’मुस्लीम राष्ट्रीय मंच’ (MRM)चे राष्ट्रीय संयोजक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि इस्लाम-ख्रिश्चन धर्माचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जात होते.
 
 
त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा पाचपोर, कन्या राधिका पाचपोर आणि बंधू सुधीर पाचपोर यांच्यासह मोठा आप्तपरिवार शोकाकुल आहे. संघ परिवार, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 
विराग पाचपोर हे केवळ एक नाव नव्हते. ते एका विचाराचे, एका समर्पणाचे आणि एका प्रेमळ कार्यकर्त्याचे प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन ’राष्ट्रसेवा’, ’सामाजिक समरसता’ आणि ’बौद्धिक जागृती’साठी वाहिले होते. शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि दूरदर्शी विचार यामुळे ते सर्वांना प्रिय होते. ‘प्रेमळ मनाचा निस्सीम कार्यकर्ता’ हेच त्यांचे योग्य वर्णन आहे.
 
 
सुमारे 13 वर्षे त्यांनी उत्तर-पूर्व भारतात संघाचे प्रचारक म्हणून अतुलनीय कार्य केले. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँडसारख्या भागात त्यांनी संघ विचारांचा प्रसार केला. तेथील स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांनी हे कार्य अत्यंत कठीण परिस्थितीत केले होते, या आव्हानात्मक कालखंडातही त्यांनी कधीही हार मानली नाही.
 
 
डॉ. इंद्रेश कुमार यांनी त्यांच्या श्रद्धांजलीत म्हटले आहे की, महाराष्ट्र के साहित्य एवं पत्रकारिता मे अच्छा नाम, श्री. विराग पाचपोरजी ने लगभग 13 वर्ष तक उत्तर-पूर्व भारत में आर.एस.एस के प्रचारक रूप में बेहतरीन कार्य किया। संघ ने जब यह संकल्प लिया कि देश को फुल इंटीग्रेशन की तरफ ले जाना है। ऐसे समय में पूरे देश भर से सैकड़ों कार्यकर्ता लगातार नॉर्थ ईस्ट में जाते थे। कुछ ऐसे भी थे जिनको जान गवानी पड़ी। कुछ ऐसे भी थे जो जान पर खेलते-खेलते बच गए। ऐसे समय के अंदर विराज जी नॉर्थ ईस्ट में गए। मेरा वहां उनसे संपर्क रहा। उनकी दो विशेषताएं थी। एक तो सुनने की आदत, ट्रेनिंग भी यही दी गई थी कि सुनिए। दुसरा सुनने के बाद अपने आप उसमें से जो संवाद विकसित होगा वह समाधान की तरफ ले जाना।
 
नागपूरला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत पदार्पण केले. ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये लेखन केले. ’पांचजन्य’सारख्या संघ परिवाराच्या नियतकालिकात त्यांचे नियमित लेख येत. त्यांचे लेखन नेहमीच अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि समाजाला दिशा देणारे असे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केले.
 
 
त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे गाढे अध्ययन. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावर त्यांनी शोधपूर्ण ग्रंथ आणि लेख लिहिले. या लेखनाला व्यापक मान्यता मिळाली. ते म्हणत,”भारतीय मुसलमान म्हणून जो काही समाज आज हिंदुस्थानात राहतो आहे, तो बहुतांश मूळचा हिंदूच आहे.” त्यांचा हा विचार हिंदू-मुस्लीम ऐक्याचा आधार होता.
 
 
त्यांच्या प्रमुख पुस्तकांपैकी ’देवरस पर्व’ हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात त्यांनी संघाच्या इतिहासातील बाळासाहेब देवरस यांच्या काळाचे सविस्तर वर्णन केले आहे. संघविचारांचे व्युत्पन्न भाष्यकार म्हणून बाळासाहेब देवरस यांचे योगदान त्यांनी उलगडले. या पुस्तकामुळे संघ इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांसाठी एक महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले. ’साप्ताहिक ’विवेक’चे माजी संपादक कै. राजाभाऊ नेने यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार’ यंदाच्या वर्षी दि. 13 एप्रिल 2026 रोजी विरागजी पाचपोर यांना त्यांच्या पत्रकारितेतील अतुलनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.
त्यांच्या अन्य पुस्तकांमध्ये
 
1.The Indian Church
2.Jesus, Christianity, and Swami Vivekananda
3 राष्ट्रीय परिप्रेक्ष्य में भारतीय मुस्लिम
 
4. ईसाईयत का मुक्ति दर्शन एक छलावा
 
5. रा. स्व संघातील देवरस पर्व...
 
 
या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश करता येईल. हे लेखन त्यांच्या विचारांची साक्ष देते. ते नेहमी ’सामाजिक समरसता’, ’राष्ट्रहित’ आणि ’सत्यशोध’ यावर भर देत. ’मुस्लीम राष्ट्रीय मंचा’त त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. राष्ट्रीय संयोजक म्हणून त्यांनी मुस्लीम समाजात हिंदुस्तानियत जागवण्याचे कार्य केले. ’वक्फ सुधारणा कायदा’, ’मदरसा आधुनिकीकरण’, ’तिरंगा यात्रा’ यांसारख्या उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे मार्गदर्शन अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत होते.
 
 
विरागजींच्या आकस्मित निधनानंतर बर्‍याच कार्यकर्त्यांशी बोलणे होत होते. त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करताना छत्तीसगडचे कार्यकर्ते डॉ. सलीम राज म्हणाले, “मुस्लिम राष्ट्रीय मंच के राष्ट्रीय संयोजक श्रद्धेय श्री विराग पाचपोर जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। उनका संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता एवं संगठन के प्रति समर्पित रहा। हमारे जैसे कार्यकर्ता का संघटनात्मक बडा नुकसान है।”
 
 
झारखंड जिल्ह्यतील राष्ट्रीय संयोजक डॉ. शहीद अख्तर विरागजींबद्दल भावना व्यक्त करताना म्हणाले, ”वरिष्ठ पत्रकार, प्रख्यात लेखक, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आणि रा.स्व.संघाचे समर्पित स्वयंसेवक यांच्यासोबत काम करायला मिळणे माझे भाग्य समजतो.” हबीब मोहम्मद चौधरी या आसामच्या कार्यकर्त्याचा कंठ दाटून आला आणि म्हणाला,''He was a respected elder brother to me, whose guidance, wisdom, and encouragement inspired me greatly. I learned many valuable lessons from him." दिल्लीच्या कार्यकर्त्या श्रीमती शालिनी अली यांनी ’पितृतुल्य छत्र हरपल्याची’ भावना व्यक्त केली. अशा प्रकारे देशभरातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
 
 
विराग पाचपोर यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच अनोखे होते. ते अभ्यासू, संवेदनशील, शांत स्वभावाचे आणि दूरदर्शी चिंतक होते.त्यांचे बोलणे नेहमी विचारपूर्वक आणि प्रभावी असे. कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमळ आणि मार्गदर्शकासारखा होता. त्यांनी कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. नेहमी संघ आणि मंचाच्या विचारांसाठी झटले.
 
 
त्यांचे लेखन केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नव्हते, ते समाजाला दिशा देणारे होते. त्यांच्या निधनाने बौद्धिक क्षेत्रात, संघ परिवारात आणि मुस्लीम राष्ट्रीय मंच यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांचा वैचारिक वारसा अमर राहील. त्यांनी लिहिलेले लेख, पुस्तके आणि कार्यकर्त्यांना दिलेले मार्गदर्शन पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
 
 
शेवटी, विराग पाचपोर यांना श्रद्धांजली अर्पण करताना असे म्हणावेसे वाटते,“तुम्ही गेलात, पण तुमचे विचार, तुमचे लेखन आणि तुम्ही रूजवलेली समरसतेची बीजे कायम राहतील.''
या प्रेमळ कार्यकर्त्याला आमचा सलाम!
 
लेखक मुस्लीम राष्ट्रीय मंच, मुंबईचे राष्ट्रीय संयोजक आहेत.