Ancient Temples of Kashmir
@मिलिंद परांजपे
9869631895
काश्मीर म्हणजे केवळ निसर्गसौंदर्याची उधळण नाही तर तो प्रदेश म्हणजे भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि देदीप्यमान इतिहासाचा एक मोठा ठेवा आहे, याची जाणीव ‘एन्शंट अँड लॉस्ट टेम्पल्स ऑफ काश्मीर’ हे पुस्तक करून देतं. परकीय आक्रमकांचा विध्वंस आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यांमुळे आज तिथल्या वैभवशाली हिंदू मंदिरांची काय दुरवस्था झाली आहे, याचं विदारक चित्र लेखिका अवंती सोपोरी यांनी पुस्तकांत मांडलं आहे. बारामुल्लाचे ‘बुनियार मंदिर’, अनंतनागचे ‘मार्तंड सूर्य मंदिर’ किंवा श्रीनगरचे ‘शीतलनाथ मंदिर’ अशा 60 मंदिरांचा इतिहास आणि हा अमूल्य वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचवणार्या पुस्तकाचा वेध घेणारा हा एक अभ्यासपूर्ण लेख.
काश्मीर हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. काश्मिरात अनेक हिंदू राजांनी उत्तमोत्तम मंदिरं बांधली. त्यातील काही इसवीसन पूर्व काळापासून आहेत. वास्तुशास्त्राच्या आणि कलेच्या दृष्टीने ती प्रेक्षणीय होतीच. त्याशिवाय त्याकाळच्या राजवंशाची, संस्कृतीची माहिती, त्यावेळच्या श्रद्धा, श्रद्धास्थानं आणि प्रथा यांची साक्ष ती देवळं देत असत, आजही देतात. प्रस्तावनेतच लेखिका अवंती सोपोरी म्हणतात की ’आज त्या मंदिरांची दुरवस्था पहिली की तिचं अंतःकरण पिळवटून निघतं.’
पाटलीपुत्रपासून मध्य आशियापर्यंत पसरलेल्या साम्राज्याचा सम्राट कनिष्क याने इ.स. दुसर्या शतकात तत्त्वज्ञानातील विद्वानांची परिषद बोलावली होती. ती जागा हल्लीच्या श्रीनगरपासून 19 कि.मी.वरील कुंडलवनविहार इथे होती. अनेक बौद्ध आणि सनातन पंडितांनी त्यात वाद संवाद करून तीन लाख श्लोक असलेली विभाषा ही बौद्ध त्रिपिटकावरील विद्वन्मान्य टीका निर्माण केली. परिषदेला कनिष्क, वसुमित्र आणि अश्वघोष यांचा आश्रय लाभला होता.
’नीलमत पुराण’ हा इसवीसनाच्या सहाव्या ते आठव्या शतकात काश्मिरात लिहिला गेलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात काश्मीरचा इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगीते यांची माहिती आहे. काश्मिरी विद्वान ’कल्हण’ याने काश्मीरच्या इतिहासावरचा ’राजतरंगिणी’ नावाचा संस्कृत ग्रंथ बाराव्या शतकात लिहिताना ’नीलमत’ पुराणाचा आधार घेतला आहे.
चौदाव्या-पंधराव्या शतकापासून तुर्क, मोगल, अफगाण वगैरे आक्रमकांनी भारतीयांची ती प्राचीन संस्कृती, श्रद्धा आणि इतिहास नष्ट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न म्हणून काश्मीरच्या वैभवशाली मंदिरांचा विध्वंस केला. त्यात सिकंदर शाह मिरी ऊर्फ सिकंदर ’बुतशिकन’ म्हणजे सिकंदर ’मूर्तिभंजक’ (इ.स.1394-1416) याचं नाव पुन्हा पुन्हा वाचनात येतं. बहुतेक मंदिरं त्यात अर्धी अधिक नष्ट झाली. काश्मीरच्या इतिहासातील हिंदू-शीख कालखंड सुमारे 1819पासून सुरू झाल्यावर हिंदू मंदिरं आणि संस्कृती यांना काही दिलासा मिळाला.
पुस्तकाच्या लेखिका अवंती सोपोरी या स्वतः अनेक पिढ्यांपासून काश्मिरात राहणार्या हिंदू आहेत. लेखिकेने काश्मीरमधील 60 मंदिरांची माहिती गोळा केली आहे. मंदिराचा इतिहास, स्थापत्य यांच्या दृष्टीने निरीक्षण, कशामुळे पडझड वा विध्वंस झाला, सद्यस्थिती, इथून पुढे काय करण्याजोगे आहे या प्रत्येक बाबींचं वर्णन केलं आहे. हे करताना त्यांना खूप अभ्यास आणि कष्ट करावे लागले हे उघड आहे.
पुस्तकातील मंदिरांची विभागणी
1 : पडझड झालेली तरी अस्तित्वात असलेली
2 : पूर्ण विध्वंस झालेली
3 : तुलनेने अजून सुस्थितीत असलेली प्राचीन आणि
4 : श्रीनगरमधील अष्ट भैरव
अशा चार शीर्षकांखाली केली आहे. त्यातील काही प्रसिद्ध मंदिरांची माहिती इथे घेऊ.
पहिल्या विभागात बारामुल्लाचे ’बुनियार’ किंवा ’भवानीयार’ हे भवानी देवीचे सर्वात उत्तम जतन झालेले मंदिर पाचव्या शतकातील आहे. उरी-बारामुल्ला रस्त्यावरील ’बंदी’ अथवा ’दत्त मंदिर’ नवव्या शतकातील असून 1947च्या पाकिस्तानी आक्रमणात इतर अनेक मंदिरांप्रमाणे याही मंदिराची खूप नासधूस झाली. मुख्य मूर्ती फोडली गेली. सध्या जवळील सेनादलाने शिवलिंगाची स्थापना केली आहे. आज सैन्यदलच मंदिराची देखभाल करतं. ’बारामुल्ला’ या शब्दाची उत्पत्ती ’वराहमूल’ शब्दाशी जोडली जाते. बारामुल्लातील ’शंकरगौरीश्वर’, ’सुगंधेश’ आणि ’रत्नवर्धनेश’ ही आणखी तीन प्रसिद्ध मंदिरं आहेत.
त्याशिवाय सिंधू आणि वितस्ता (म्हणजे हल्लीची झेलम) नद्यांच्या संगमाजवळील परिहासपुरा मंदिर याचाही सिकंदर बुतशिकननं पूर्ण विध्वंस केला होता.
बारामुल्लापासून तीन मैलांवर फतेपूर येथील एका भव्य परंतु भग्न मंदिराच्या उंच भिंतींचा फोटो पुस्तकात छापला आहे. ते आठव्या शतकातील मंदिर कोणी बांधलं याबाबत निश्चित माहिती नाही.
परिसरात अनेक मोठे दगड पडलेले आहेत. त्यात शिवलिंगही पडलेले आहे, हे वाचून वाईट वाटतं. कुंपणाच्या भिंतीपलीकडे लागूनच गाव आहे. लेखिका लिहिते, - ’तिथले खेडूतही भग्न मंदिराची भव्यता बघून अचंबित होतात. मंदिर ‘बघितलेच पाहिजे -मस्ट विझिट’ असे आहे; पण पर्यटकांचा मात्र पूर्ण शुकशुकाट!’
अनंतनाग येथील ’मार्तंड’ मंदिराचे अवशेष आजदेखील भव्य दिसतात. (’नाग’शब्दाचा अर्थ निर्झर असा आहे) चौथ्या-पाचव्या शतकात ते मंदिर बांधले असले तरी आठव्या शतकातील सम्राट ललितादित्याशी त्याचा संबंध ’राजतरंगिणी’मध्ये जोडला गेला आहे. Colonnaded म्हणजे अनेक ’खांब-आवरित अंगण’ (इंग्लिशमध्ये ’पेरिस्टाईल’) रोमन किंवा ग्रीक वास्तूंच्या भव्यतेची आठवण करून देते. चुनखडीचे अजस्त्र दगड त्या काळात कसे बसवले असतील हे एक आश्चर्यच आहे. काश्मिरातील ‘बघितलेच पाहिजे’ - ‘मस्ट विझिट’मध्ये हे ’सूर्य मंदिर’ आहे. अशा स्थळाला स्थानिक लोक ‘सैतान गुंफा’ म्हणतात. यापेक्षा अधिक दुर्दैव काय असावं?
अनंतनागमधील ’विजेश्वर’ हे आणखी एक प्रसिद्ध मंदिर. ’विजेश्वर’चेच ’बेजबेहारा’ झालं. पुलवामाच्या इसवीसनाच्या अकराव्या शतकात बांधलेल्या; पण अजूनही सुस्थितीत असलेल्या ’पायर’ मंदिराला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक’ दर्जा मिळाला आहे. भव्य चिनार वृक्षांची पार्श्वभूमी लाभलेलं मंदिर दुरूनही प्रेक्षणीय आहे हे लक्षात येतं.
आठव्या शतकात काश्मीरच्या सम्राट ललितादित्याचे साम्राज्य ’मथुरे’पासून ’कास्पियन समुद्रा’पर्यंत पसरलेले होते. अवंतिपुराच्या 20 मैल ईशान्येस ललितादित्यानेच बांधलेले ’नरस्थान ’(नारायणाचे स्थान) मंदिर म्हणजे देशाला मिळालेली एक मोठी देणगी आहे. सिकंदर बुतशिकन (मूर्तिभंजक)ने चौदाव्या शतकात मंदिर फोडलं. जसं फोडलं तशाच त्या प्रचंड शिळा आजही तिथेच पडलेल्या आहेत. उरल्यासुरल्या मंदिराचे सविस्तर वर्णन करून लेखिका लिहिते - ’नंतर आणखी र्हास झालेला वाटत नाही हे नशीब. फक्त संशोधकच या ‘मस्ट विझिट’ स्थळाला भेट देतात.’ ललितादित्याने ’परिहासपूर’ नावाची नगरी आपल्या साम्राज्याची राजधानी म्हणून श्रीनगरपासून जवळच एका उंचवट्यावर वसवली. ’परिहास’ म्हणजे ’हास्य’. आज तिथे फक्त अस्ताव्यस्त पडलेले दगडच दिसतात. स्थानिक लोक त्या जागेला ’कानी शहर’ म्हणजे ’दगडांचे शहर’ म्हणून ओळखतात.
श्रीनगर अनंतनाग हमरस्त्यावरील ’पांडरेथान विष्णू मंदिर’ सम्राट पार्थ कालीन (इ.स. 906-921) मंत्री मेरूवर्धन यानं बांधलं.
’पांडरेथान’ हा ’पुराणाधिष्ठान’ म्हणजे ’जुनी राजधानी’ या शब्दाचा अपभ्रंश. मंदिर बांधकामाचं वर्णन करून लेखिका लिहितात- ’मंदिर बांधल्यावर 40 वर्षांनी मोठी आग लागून परिसराची खूप हानी झाली. मंदिराभोवतालच्या तळ्यामुळे ते वाचलं. जवळच एका मशिदीचं जोत असून मंदिराचे दगड त्यासाठी वापरलेले दिसतात. सध्या बदामीबाग सैन्यदल अधिकारी मंदिराची देखभाल करतात. परिसर स्वच्छ असला तरी फारसं कोणी मंदिराकडे फिरकत नाही. मंदिर देखभालीचं हे काम सैन्याचं नसून नागरी प्रशासनाचं आहे,’ असं लिहिण्यास लेखिका विसरली नाही.
आजही अस्तित्वात असलेल्या मंदिरांपैकी ’अष्टकोनी शंकराचार्य मंदिर’ श्रीनगरमध्ये 1000 फूट उंच गोपाद्री टेकडीवर आहे. त्याचा संबंध आद्य शंकराचार्यांच्या वास्तव्याशी जोडला आहे. ’हरी पर्वत’ तथा ’सारिका पर्वत’ श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात असून काश्मिरी संस्कृतीचे केंद्र आणि एक सिद्धपीठ मानलं जातं. मंदिरात 18 भुजांच्या त्रिपुरसुंदरी देवीची मूर्ती आहे. ’सारिकामहात्म्य’ काश्मिरी लोकांना आजही प्रिय आहे. ’माता क्षीर भवानी’ अथवा ’रग्न्या देवी मंदिर’ जवळच्या गांदरबल येथील तुलमूल गावात आहे. मंदिर एका पवित्र झर्याच्या मध्यभागी आहे. दर वर्षी ज्येष्ठ अष्टमीला तिथे मोठा मेळा भरतो. ’क्षीर भवानी मंदिरा’ची लोकप्रियता फक्त अमरनाथ खालोखाल आहे.
अनेक काश्मिरी संत (विवेकानंदांसहित) आणि राजे यांचं नातं मंदिराशी विस्तारानं सांगून लेखिका म्हणतात- ’काश्मीरचे एक लोकप्रिय मुख्यमंत्री बक्षी गुलाम महंमद मेळ्याला देवीच्या दर्शनास आवर्जून येत असत. 1990च्या काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनानंतरही (exodus) मेळ्याला हिंदू संख्येने बरेच कमी तरी येतातच. इतकी देवीवर जनतेची श्रद्धा आहे.’
श्रीनगरातील ’अष्ट भैरवां’पैकी ’शीतलनाथ मंदिर’ परिसरात अनेक नेत्यांची भाषणं होऊन गेली. त्यात नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबरोबर वीर सावरकर हे नाव पुस्तकात वाचल्यावर मी कुतूहलानं गुगलमध्ये तपासलं. त्यात माहिती मिळाली की, स्वातंत्र्यवीर ऑगस्ट 1943 साली तिथे येऊन गेले होते. तिथल्या जाहीर भाषणात सावरकरांनी ’संभाव्य पाकिस्तानच्या संकटाचा सगळ्यात जास्त धोका काश्मिरी जनतेस आहे, असं म्हटलं होतंं. त्यांनी असंही म्हटलं होतं की,‘काश्मीरच्या महाराजांनी नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्या संगनमतास ओळखून सावधगिरी बाळगावी.’ मंदिरात दर वर्षी होणारा वसंत पंचमीचा उत्सव काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनानंतर बंद पडला होता. तो 2021मध्ये म्हणजे 31 वर्षांनी काही हिंदूंनी पुन्हा चालू केला आहे.
पुस्तकाला डॉ. करणसिंग यांनी प्रशस्तीपत्र लिहिलं आहे. त्यात ते लिहितात,‘काश्मीरच्या प्राचीन मंदिर वारशाची हल्लीची दुरवस्था पाहून, वाचून मन खिन्न होते.’ कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्यांनी पुस्तकाला आशीर्वाद दिले आहेत. प्रत्येक मंदिराचे कृष्णधवल छायाचित्र छापलं आहे. गुळगुळीत कागदावर रंगीत छायाचित्र बघून वाचक जास्त आकर्षित झाला असता. तशी छापलेल्या ‘कॉफी टेबल मॅन्युअल’ची योग्यता या पुस्तकाची आहे.
प्रत्येक मंदिराच्या वर्णनाअखेरीस लेखिकेने दुरवस्था होण्याचं कारण, सद्यस्थिती, इथून पुढे काय करता येण्याजोगं आहे यांचा आढावा घेतला आहे. दुरवस्था होण्याची कारणं बहुतेक आक्रमकांनी केलेला विध्वंस हीच आहेत. थोडी मंदिरं भूकंप किंवा आग यांनी नुकसान झालेली तर एखादं दुर्लक्षामुळे झालं. ASIम्हणजे ’आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ यांच्याकडून मंदिरांची कशी दुरुस्ती आणि पुनरुद्धार करता येईल याच्या सूचना लेखिकेने केल्या आहेत. अर्थात त्यासाठी लागणारा निधी सरकारला पुरवावा लागेल. ग्रीस, कंबोडिया आणि इजिप्त येथील प्राचीन मंदिरं आणि वास्तूंचा जीर्णोद्धार तेथील लोक कसा करत आहेत, यापासून आपण खूप शिकण्यासारखं आहे. सुबोध भाषेत लिहिलेली रंगीत माहितीपत्रके (ब्रोशर्स) आणि देवळांबद्दल अस्सल आणि सत्य शिक्षण घेतलेले गाईड सर्वत्र उपलब्ध असले पाहिजेत.
काश्मीर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. पुस्तक वाचल्यावर विचार येतो की, काश्मिरातील मंदिरांची माहिती फारच थोड्या पर्यटकांना असते. पर्यटन आयोजकांकडून (टूर ऑपरेटर्स) त्यांना अशी जुनी देवळं दाखवली जात नाहीत. टूर ऑपरेटर्सनी अशी माहिती पुरवल्यास जास्त पर्यटक आकर्षित होतील. मंदिरांना भेटी हे त्यांच्या दिनक्रमामध्ये असावं. सामान्य परदेशी पर्यटकासदेखील तेवढ्या माहितीनं काश्मीर किती भारतास जोडलेला आहे याची जाणीव होईल. भारतीय पर्यटकाला काश्मीरच्या भारतीयत्वाबद्दल पुष्कळ अधिक आत्मीयता वाटू लागेल. काश्मीरच्या प्राचीन मंदिरांवर आकर्षक माहितीपट (डॉक्युमेंटरीज) करून ते भारतात व इतरत्रही दाखवले जावेत. काश्मीरच्या पर्यटन व्यवसायात मंदिर भेटींना खूप वाव आहे.