शिक्षण क्षेत्रातील ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ (IKS) सध्या प्रामुख्याने प्राचीन लिखित साहित्याभोवती फिरताना दिसते; परंतु भारताचा खरा इतिहास केवळ ग्रंथांमध्ये नसून तो पूर्वजांच्या कौशल्यांमध्येही दडला आहे. जुन्या मंदिरांचे स्थापत्य, संगीतमय खांब, अजिंठा-वेरूळ लेण्यांचे रंग आणि वनवासी-भटक्या जमातींची मौखिक परंपरा हा या ज्ञान परंपरेचा एक मोठा समांतर प्रवाह आहे. या अलौकिक पण दुर्लक्षित लोककलेचा आणि तंत्रज्ञानाचा आधुनिक विज्ञानाच्या म्हणजेच ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ (IKS) मदतीने शोध घेण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील उच्चशिक्षण क्षेत्रातील महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे. तो विषय, भारतीय ज्ञान प्रणालीला (‘भाज्ञाप्र’- Indian Knowledge System - IKS) धरून भारतातील प्राचीन समांतर ज्ञानभंडारशी संलग्न आहे. पदवी परीक्षा करणार्या विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासाच्या विषयांच्या संदर्भात प्राचीन ज्ञान परंपरेत किती प्रगती झाली होती, प्राचीन चिंतन, संशोधन, तत्त्वज्ञान, आणि अधिक मागे जायचे तर ऋषिमुनींनी केलेले चिंतन माहिती करून देणे, त्यावर अधिक संशोधन करून ते विषय पुढे नेणे हे त्यामागचे उद्देश आहेत.
केंद्र शासनाने ‘भाज्ञाप्र’ला पुढे नेण्याचे धोरण ठेवले असल्याने, त्याला आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्याला धरून विषयवार लिखाण, अखिल भारतीय आणि प्रांत स्तरांवरील चर्चासत्रे अनेक विद्यापीठे आणि विद्वत संस्थांकडून आयोजित होत आहेत. ‘भाज्ञाप्र’ अंतर्गत येणार्या प्रत्येक विषयाला धरून अभ्यासक्रम कसे असावेत, त्यांचा विस्तार आणि शिकविण्याच्या पद्धतींवर आराखडे केले जात आहेत. सध्या तरी ‘भाज्ञाप्र’चा विस्तार बहुतेक वेळा, लिखित साहित्याला धरून केला जातो.
त्या विषयांची अगदी वेद, पुराणे, प्राचीन गणित, अर्थशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र अशी यादी अधिक पुढे नेता येईल. या सर्व विषयांचा थोडक्यात आढावा घेणारी दोन पुस्तके 1) Introduction to Indian Knowledge System : Concepts and application, by B. Mahadevan and others, PHI Learning, Delhi -110092, 2) आचार्य श्रेयस चारुदत्त कुर्हेकरांचे भारतीय ज्ञान परंपरा, ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती ही नमुन्यादाखल आहेत. कुर्हेकरांच्या विषय क्रमवारीवरून लक्षात येईल की सध्याच्या ‘भाज्ञाप्र’ला धरून विषयांत लिखित साहित्यावर भर दिला जातो आहे.
इथे मला अमेरिकेतील प्राध्यापक लिओपोल्ड फिशर आणि नंतर अद्वैैतमत संन्यासी अगेहानंद यांनी भारतीय ज्ञान परंपरेचे दोन भागात केलेले विभाजन आठवते. त्यांनी ज्ञान परंपरेलील दोन प्रवाहांचे थोरली पाती (Greater tradition )आणि धाकली पाती (Little tradition)असे वर्गीकरण केले होते. ’थोरल्या पातीत’ सर्व प्रकारचे लिखित, शिस्तबद्ध रितीने जतन केलेले, पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवण्याची परंपरा असलेले साहित्य आणि कर्मकांडे होती; तर ’धाकल्या पाती’च्या परंपरेत विशेष करून माजघरात पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेल्या प्रथांचा समावेश होता. त्यात महिलांचे अनेक उत्सव, हळदीकुंकू, सटवाईची पूजा, इ. प्रकार, काही सण आणि अगदी मुलीला न्हाण आल्यानंतर घरातील आणि घनिष्ठ संबंधातील महिला मिळून घरगुती सोहळा करत असत यांचा समावेश होता. कारण माजघरात साजरे होणारे सोहळे लिखित स्वरूपात उपलब्ध नसत. ते कसे साजरे करावे हे घराघरातील गृहलक्ष्मी ठरवत असे. त्यात घरच्या पुरुषांना मज्जाव होता.
शैक्षणिक क्षेत्रातील धाकटी पाती
लिखित साहित्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तसे पाहिले तर लिप्या प्रचारात येण्यापूर्वी सर्वच साहित्य मौखिक परंपरेने जतन केले जात असे. ते स्मरण करण्यास, सातत्य राखण्यास सोपे जावे यासाठी ते छंदोबद्ध केले जाई. त्याचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण वेदसंहिता आहेत. एकाही काना, मात्रा आणि विसर्ग उच्चाराचा बदल न होता ते हजारो वर्षे जतन केले जाऊन आज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्याच्या पाठोपाठ व्याकरण ग्रंथ, महाकाव्ये, पुराणे, विज्ञान विषयांवरील ग्रंथ इ. वाङ्मय प्रकार आले. त्यात संस्कृत, प्राकृत, जैन आणि बौद्ध इ. सर्व साहित्य ’थोरल्या पाती’त मोडतात. सध्या ’सा. विवेक’मध्ये राजस वैशंपायन हे अलीकडच्या शतकांतील काही ग्रंथकार आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाची ओळख करून देत आहेत. त्यांचाही समावेश ‘भाज्ञाप्र’त करता येईल.
त्याच हजारो वर्षांच्या काळात दुसराही एक सांस्कृतिक प्रवाह अखंडपणे वाहत होता. तो म्हणजे कौशल्याची कामे करणारे वर्ग आणि शहरी निवास तसेच संपर्कापासून दूरी बाळगून असलेले वनवासी वर्ग होते. त्यांनीही दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक क्षेत्रांत फार प्रगती केली होती. वैदिक काळापासून कौशल्याची कामे करणार्या वर्गाचे महत्त्व ’थोरल्या पाती’ने जाणले होते, स्वीकारले होते. त्यांचे उल्लेखसुद्धा वैदिक साहित्यात मोठे महत्त्वाचे आहेत. ’
’ऋग्वेदातत्वष्टा’ हा देवांचा कारागीर असून त्याल देवता समूहात मानाचे स्थान आहे. ’यजुर्वेदा’तील ’रुद्राध्यायात’ समाजातील अनेक कारागीर आणि व्यावसायिक हे ’रूद्रस्वरूप’ आहेत असे मंत्र आहेत. या सर्व कलाकौशल्यांचे काम करणार्या समाजघटकांचे संस्कृती संवर्धनात मोठे योगदान होते आणि आहे. त्यांनी प्रगत केलेली कौशल्ये आणि तयार केलेल्या वस्तू अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासून-सिंधुसंस्कृती काळापासून निर्यात होत असत. ’रामायणात’ भरत जेव्हा रामाच्या भेटीसाठी वनात निघाला, तेव्हा अयोध्यावासी त्याच्याबरोबर येणार हे लक्षात घेऊन त्याने ’राजमार्ग’ म्हणता यावे असे रस्ते बांधायला घेतले. त्याने अनेक प्रकारच्या तंत्रात निष्णात असलेल्या तुकड्या पुढे पाठविल्या. त्यांची यादी रामायणात दिली आहे. मध्ययुगात आपल्या संस्कृतीला भौतिक पातळीवर उतरवणार्या शिल्पींचे, रंगकर्मींचे ‘भाज्ञाप्र’ला केलेले फार मोठे योगदान उपेक्षित आहे.
या मंदिरांचे बांधकाम एका माणसाच्या-मुख्य शिल्पीच्या - हयातीत फार कमी वेळा पूर्ण होत असे. तेव्हा एका पिढीतून दुसर्या पिढीत ते देण्याची सुव्यवस्थित प्रणाली त्यांनी प्रगत केली होती. केवळ मंदिर बांधणीतसुद्धा कितीतरी कौशल्यांचा वापर होत असे. शतकानुशतके व्यवस्थित राहणार्या मंदिरांसाठी जमिनीची निवड करणे, आसपास उपलब्ध असलेल्या आणि टिकावू पाषाणांची निवड करणे, ते आवश्यकतेनुसार फोडून बांधकामाच्या ठिकाणी पोहोचवणे, ते तासून त्यांपासून मंदिरांच्या विविध भागांचे काम करणे, त्यातून शिल्पे तयार करताना ती शिल्पशास्त्राचे नियम पाळणे आणि कितीतरी व्यवधाने असत. त्यासाठी त्या कामांमध्ये निष्णात असलेले कारागीर पिढ्यानपिढ्या तयार होत राहण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते.
दुसरे ठळक उदाहरण दक्षिण भारतात अनेक देवळांमधून उभारलेले संगीत सुरांचे आवाज काढणारे स्तंभ आहेत. ही मंदिरे एकहाती नाहीत. असे स्तंभ उभारण्यासाठी लागणारे साहित्य, ते तासण्याचे तंत्र, इ.साठी निष्णात शिल्पी पिढ्यानपिढ्या तयार होत होते. आज ते तंत्रज्ञान पूर्णपणे लोप पावले आहे.
अशी तंत्रे केवळ वंशपरंपरेने संक्रमित होत असत हे म्हणून चालणार नाही. कारण पिता-पुत्र एकाच क्षमतेचे असतील हे गृहीत योग्य नाही. म्हणून योग्य व्यक्तीच्या निवडीचे निकष (selection criteria) असायलाच पाहिजेत. शिल्पशस्त्राचे ग्रंथ आहेत; पण ते या गोष्टींच्या फार खोलात जात नाहीत. ही माहिती परंपरेने पुढे जात होती. ती लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्याने आज तशी मंदिरे उभारायची असतील तर ती पुन्हा प्रगत करावी लागतील. ती संशोधनांती प्रगत झाली तर त्यांची उपयुक्तता केवळ मंदिरे बांधण्यापुरती मर्यादित असणार नाही; तर इतर क्षेत्रांत ती वापरली जातील.
समांतर म्हणून उदाहरण द्यायचे झाले तर अवकाश विज्ञान प्रगतीचे देता येईल. मानवाला अवकाश यानाद्वारे पाठविण्याच्या कामी येणारी तंत्रे इतर अनेक क्षेत्रात वापरली जात आहेत. कुठलेही संशोधन वाया जात नाही. पुरातन तंत्रे आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने प्रगत करताना ती अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. इथे मला एक प्रयोग सुचवायचा आहे. तो म्हणजे, दक्षिण भारतातील मंदिरातील ’सूर’ निर्माण करणार्या एखाद्या खांबाची तंतोतंत प्रतिकृती आधुनिक मोजमाप तंत्राने तयार केली आणि सूर निर्मितीसाठी त्याचे परीक्षण केले तर होण्यासारखे आहे. त्यातून जर खरोखरच अपेक्षित सूर निघाले; तर आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड सहज घालता येईल, जर नाही निघाले तर आधुनिक तंत्र कुठे कमी पडले ते तपासता येईल.
ढाक्याची मलमल आणि आजचे झिरझिरीत नायलॉनचे कापड यात गुणात्मक काय फरक आहे, यावर बहुधा संशोधन झाले असावे. मला माहिती नाही. पण झाले नसेल तर ते व्हावे. आपण अजिंठा-वेरूळमध्ये चित्रांसाठी वापरलेल्या, शेकडो वर्षे टिकलेल्या रंगांकडे आश्चर्याने पाहतो, त्याची वाखाणणी करतो. ते कसे तयार झाले? त्यावर संशोधन झाले तर भविष्यात अवकाशात वापरण्यासाठी त्या प्रकारच्या रंगांची उपयुक्तता असू शकेल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा पुन्हा शोध घेतला जावा.
इतिहास आणि समाजशास्त्रांचे नवे दालन
भारतात अस्थायी वनवासी समाज आणि नागरी स्थिर समाज हजारो वर्षे एकमेकांचे शेजारी म्हणून राहत आहेत. त्यांचे आपापसात सामाजिक आणि सांस्कृतिक आदानप्रदान होत राहिले. एक फरक इथे लक्षात घेतला पाहिजे. स्थिर समाजाचा इतिहास अनेक प्रकारच्या लिखीत माध्यमांतून उपलब्ध आहे. तसे वनवासी समाजाच्या बाबतीत नाही. फक्त काही नावारूपाला आलेली वनवासी राज्ये, जसे ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील मुकणे राज्य, नागपूर-चंद्रपूर-जबलपूर भागातील गोंड राज्ये, सोडली; तर इतरत्र वनवासी समाजांच्या संस्कृती आणि इतिहासाचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशी संबंधित काही प्राथमिक माहितीपर पुस्तकांची माहिती देतो आहे.
1. आदिवासी हलबा/हलबी जमात व भाषा : एक अभ्यास, ले. फरेंद्र कुतिरकर, विजय प्रकाशन, नागपूर, किंमत - 200 रू., पृष्ठे 134.
2. भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा, ले. नारायण भोसले, मैत्री पब्लिकेशन्स, पुणे, किंमत 350 रू, पृष्ठे 246. पुस्तकाच्या शेवटी उपयुक्त संदर्भ साधनांची यादी दिली आहे.
3. युगशिल्पी (मागोवा वडार जमातीचा) : ले. प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृ.- 232. पुस्तकात वडार जमातीचा थेट सिंधू संस्कृतीपर्यंतचा इतिहास, तिचे पूर्ण भारतभर वास्तव्य इ. विषय आहेत.
4. सातपुड्यातील भिल्ल : ऐतिहासिक आणि सामाजिक मागोवा, ले. डॉ. गोविंद गारे, काँटिनेंटल प्रकाशन, पुणे, किं. 350 रू, पृ. 328. स्वातंत्र्यसैनिक, काही पारंपरिक गीते, शासकीय अहवाल इ. उपयुक्त साहित्य दिले आले आहे.
5. मणिधर : संस्कारो और कलाओं में नाग की महिमा, नाग देवते संदर्भातील तज्ज्ञांच्या लेखांचे संकलन, मध्यप्रदेश संस्कृती परिषद, भोपाळ. भारताच्या प्रांताप्रांतातील सांस्कृतिक सर्पगाथा असे या पुस्तकाचे सार देता येईल.
वरील यादी नमुन्यादाखल दिली आहे. ‘भाज्ञाप्र’ अंतर्गत हे विषय ’धाकटी’ म्हणण्यापेक्षा ’समांतर पाती’ असे येऊ शकतात. त्यांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला पाहिजे. पदवी पातळीसाठी विविध आयामांची ओळख आणि पदव्युत्तर स्तरावर काही आयामांचा सखोल अभ्यास असे संबंधित ‘भाज्ञाप्र’चे स्वरूप असू शकते. त्यातून ‘भाज्ञाप्र’ची परिपूर्णतेकडे वाटचाल होईल.