@विद्या साठे पेंडसे, मुर्डी, रत्नागिरी - 7798209710
आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयी बदलून निसर्गाला दिलेली मोलाची साथ देता येते, हे सांगणारं हे अनुभवकथन.
मिगर्भी डोहो भरले, कुणी देखिले ना ऐकीले,
ठायी ठायी झोविरे जाले विद्युल्लतांचे,
पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे,
पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी!!
समर्थ रामदासांनी ’दासबोधात’ त्यावेळी उपलब्ध असलेल्या पाण्याचे वर्णन असे केले आहे.
पण आज परिस्थिती काय आहे?
भूजल पातळी झपाट्यानं खाली जात आहे.
महात्मा गांधींनीसुद्धा म्हटलं आहे की, ’ही वसुंधरा आपली भूक भागविण्यास समर्थ आहे.’
आज जिकडे तिकडे आपण बघत आहोतच, कचर्याचं साम्राज्य प्लास्टिक्सचे ढीग, पाण्याचे साठेसुद्धा प्लास्टिकनं भरलेले...त्यात पाणी लवकर आटणं, पाण्याचं दुर्भिक्ष, विकासाच्या नावाखाली चाललेली अनिर्बंध वृक्षतोड...
सभोवताली अशा एक ना दोन हजारो उद्विग्न करणार्या गोष्टी आपली मन:स्थिती वैफल्यग्रस्त करीत आहेत. हे सगळं बघितलं की वाटतं, या सगळ्यात आपण कुठे?...
आमच्यापुरतं आम्ही ठरवलं आहे, शहरी चकचकीत जीवनपद्धतीचं अनावश्यक अनुकरण केलं नाही तर पर्यावरणाचं अचूक संतुलन साधत आपण जगू शकतो.
घरी आम्ही भांडी विसळताना नळाखाली एक रिकामी बादली ठेवतो. ती भरली की, मागच्या अंगणातल्या झाडांना ते पाणी नेऊन ओतण्याचं काम करतो. बाथरूममधून वाहून जाणारं पाणी घरापासून 90 फूट लांबपर्यंत पाईपनं नेलं आहे. पाणी जिथे पाईपमधून बाहेर पडतं तिथे अळू, केळी यांसारखी सतत पाणी लागणारी झाडं लावली आहेत. त्यामुळे डासांचा त्रास होत नाही. नारळ, सुपारी व केळीच्या बागेला पारंपरिक पद्धतीनं पाणी न लावता ड्रीप्स आणि स्प्रिंकलर्स बसवले आहेत. त्यामुळे पाण्याची बचत होऊन आगर हिरवागार राहातो. कोणत्याही समारंभात, गावच्या उत्सवात मोठ्या संख्येनं जमलेल्या पाहुण्यांसाठी नळ असलेल्या पिंपात स्वच्छ पाणी भरून स्टीलची फुलपात्रे तिथे ठेवतो. त्यामुळे बाटल्यांचा कचरा होत नाही आणि शहरात असतात तसे अॅल्युमिनियम फॉईलनं झाकलेलं स्ट्रॉनं पाणी पिण्याचे डिस्पॉजेबल ग्लास वापरण्याची गरज भासत नाही. तसंच घोटभर पाणी पिऊन उरलेला ग्लास फेकून देण्याचा माजही केला जात नाही.
पावसाचं पाणीसुद्धा आमच्या आंब्यांच्या बागेत ठिकठिकाणी बांध घालून जिरवलं आहे. तसंच बोअरवेलमध्ये जल पुनर्भरण करत जिकडचे तिकडचे पाण्याचे स्रोत त्यात सोडले आहेत.
मला झाडांची, बागेची खूप आवड आहे. घरात जिन्नस किंवा खाऊ भरून येणार्या प्रत्येक पिशवीत मी झाडं लावते. ती झाडं कधी विकत देते, कधी फुकट वाटून टाकते किंवा हळदीकुंकू करून लुटते. सगळ्याच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये झाडं लावता येत नाहीत. मग काही पिशव्यांचा उपयोग झाडं लावलेल्या पिशव्यांखाली मुळं जमिनीत रुतू नयेत, यासाठी आधार म्हणून घालायला वापरते. काही पिशव्या देण्या-घेण्यासाठी उपयोगाला येतात. अगदी ’साप्ताहिक विवेक’ला कव्हर करून येणारी पिशवीसुद्धा कुरिअर पाठवायला किंवा पुस्तकं काळजीपूर्वक वाळवी किंवा कसर न लागता सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते.
आमच्या घरी गायीगुरं आहेत. गुरांच्या शेणापासून बनणारा गोबर गॅस आता आमच्या अंगवळणी पडला आहे. ङझॠला आम्ही हातसुद्धा लावत नाही. गायींमुळे घरी दूध, दही, ताक, लोणी, श्रीखंड, तूप आणि पनीर यांची रेलचेल असते. अशाप्रकारे आमच्या घरी दूध हा पदार्थ एक बायप्रॉडक्ट बनून जातो. असे घरगुती पदार्थ विकतच्या पदार्थांपेक्षा आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरकही ठरतात. गोबरगॅसच्या स्लरीपासून शेणखत तयार होतं. रासायनिक कोणतंही खत न वापरता सेंद्रिय खतावर घरी पिकवलेल्या अनेक भाज्या, फळं आणि कडधान्यं खर्या अर्थानं आहारातील पौष्टीक मूल्य वाढवतात.
वापरलेल्या कपड्यांपासून पिशव्या, पायपुसणी छोटी-छोटी दुपटी वगैरे अनेक प्रकार करून त्यांचा विनियोग करते. जुन्या कपड्यांचे ढीग इकडे तिकडे फेकून न देता एक चिंधीसुद्धा फुकट घालवत नाही.
बागेतल्या झाडांना कुंपण करण्यासाठीही या कपड्यांचा उपयोग होऊ शकतो.
अन्नाच्या बाबतीतसुद्धा वाया जाऊ नये यावर कटाक्ष असतो. अगदीच उरलं तर गाईला किंवा गोबर गॅसला समर्पण केलं की झालं...
या पर्यावरणपूरक विचारसरणीचा होता होईल तितका प्रचार व प्रसारही करते. एखाद्या ठिकाणी जरी त्या विचाराचं बी पडून रुजलं तरी सार्थक झाल्यासारखं वाटेल. सगळीकडे आभाळच फाटलेलं असताना हे प्रयत्न काही खूप नव्हेत...
तरीही कोटीच्या कोटी उड्डाणं करणारा हनुमान जेवढा खरा, तेवढीच रामाला सेतू बांधायला मदत करणारी चिमुकली खारसुद्धा तेवढीच खरी...
पर्यावरण सशक्तिकरणात माझा वाटा खारीचा का होईना, पण आहे...