दीपक मोरताळे, नांदेड
9422174647
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या तंत्रज्ञानाची गरज नाही, कारण त्याचे खरे उत्तर आपल्याच घरात लपलेले आहे. आपल्या घरातील रोजच्या ओल्या कचर्यापासून अतिशय साध्या पद्धतीने ‘अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम’ तयार करून आपण नद्यांचे शुद्धीकरण आणि प्रदूषणमुक्तीची एक मोठी लोकचळवळ उभी करू शकतो, याविषयीचे हे अनुभव लेखन .
गेल्या 15 वर्षांपासून मी पर्यावरण क्षेत्रात एक स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून 11 गावे, माहूर तीर्थक्षेत्र, नांदेड आणि नागपूर विद्यापीठ या ठिकाणी जलसंधारणाचे काम उभे करण्याचे दायित्व मी यशस्वीपणे पार पाडले. या सर्व कामांतून आम्ही आजवर साधारण 3,000 कोटी लीटर वाहून जाणारे पाणी थांबवू शकलो, याचा मनापासून आनंद होतो.
2020च्या सुरुवातीला एका मोठ्या वाहन अपघातात मी गंभीर जखमी झालो. तो कोरोनाचा काळ होता. अंथरुणावर असताना मी नांदेड येथील ’श्रीगुरुजी रुग्णालय’तर्फे आयोजित एका व्याख्यानाचे फेसबुक लाईव्ह पाहत होतो. त्या व्याख्यानात वक्त्यांनी श्रीगुरुजींच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग सांगितला. पायाला विंचू चावल्यामुळे श्रीगुरुजींना प्रचंड वेदना होत होत्या. अशाही परिस्थितीत ते पाण्यात पाय टाकून अभ्यास करत बसले होते. एका स्वयंसेवकाने जेव्हा त्यांना याबद्दल विचारले, तेव्हा गुरुजी म्हणाले, “वेदना माझ्या पायाला होत आहेत, पण माझ्या मेंदूचा उपयोग मी का करू नये?” हा प्रसंग माझ्या मनाला थेट स्पर्श करून गेला. माझ्याही पायाला पन्नास टाके पडलेले होते. मी विचार केला-आपणही आपल्या मेंदूचा वापर करून पर्यावरणाची एखादी मोठी समस्या सोडवावी.
13 जून 2020 रोजी नांदेडमध्ये प्रदूषणामुळे गोदावरी नदीतील संपूर्ण जलचर (मासे) मृत्युमुखी पडले. ही घटना सर्वांसाठीच धक्कादायक होती. यावर आम्ही अभ्यास सुरू केला. जगभरात यावर काय संशोधन सुरू आहे, याचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला ’अल्ट्रासोनिक तंत्रज्ञाना’बद्दल माहिती मिळाली, पण ते अत्यंत महागडे होते. हा अभ्यास करताना माझ्या अचानक लक्षात आले की, आपले पूर्वज किती हुशार होते! नद्यांच्या शेजारी मंदिरे आणि मंदिरात असणारी मोठी घंटा, हेच तर आजचे अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान आहे.
मी अभियंता (इंजिनियर) असल्यामुळे माझा कल साहजिकच मशिनरीजकडे होता. पण माझी पत्नी प्रा. डॉ. सुनंदा या सूक्ष्मजीवशास्त्राच्या (चळलीेलळेश्रेसू) प्राध्यापिका आहेत. त्यांनी मला योग्य दिशा दाखवली की, पाणी हा एक जैविक घटक आहे आणि त्याला जैविक पद्धतीनेच शुद्ध केले पाहिजे. त्यानंतर आम्ही ताकातील जिवाणूंच्या साहाय्याने ’अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम’ (अर्वींरपलशव इळे-एपूूाश) तयार केले. हे एंझाईम जुन्या पद्धतीपेक्षा 50 टक्के कमी वेळेत तयार होते आणि अत्यंत प्रभावशाली आहे. आम्ही मग आमच्या ’संत गाडगेबाबा मिशन’ संस्थेअंतर्गत नदीच्या जैविक शुद्धीकरणासाठी ’गोदावरी नदी संसद’ या उपक्रमाची एक लोकचळवळ सुरू केली.
नदी प्रेमींना हे अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम तयार करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले. चंदादीदी काबरा यांनी या प्रशिक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली. हे एंझाईम बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. ती अशी...
ताक, निर्माल्यातील फुले, फळांच्या साली, गूळ आणि पाणी यांचे प्रमाण अनुक्रमे 1:1:3:10 असे घ्यावे. हे सर्व मिश्रण एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा ड्रममध्ये 45 दिवस हवाबंद ठेवावे. डब्याचा 20% भाग वरून मोकळा असावा. सुरुवातीच्या दिवसांत तयार होणारा गॅस निघून जाण्यासाठी रोज फक्त 2 सेकंदांसाठी डब्याचे झाकण उघडावे. हा डबा नेहमी सावलीत ठेवावा. 45 दिवसांनंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. तयार झालेले ’अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम’ हवाबंद डब्यात साठवून ठेवावे. याला कुठलीही एक्सपायरी डेट नसते. अशा प्रकारे आपण घरातील फुले, फळे आणि भाज्यांच्या कचर्यापासून उत्तम बायो-एंझाईम तयार करू शकतो.
आम्ही हे तयार झालेले अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम नदीतील प्रदूषित पाण्यात टाकले. याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. पाण्यातील घाण हे बायो-एंझाईम खाऊन संपवते, ज्यामुळे पाण्याची दुर्गंधी पूर्णपणे नष्ट होते. तसेच, पाण्यातील हानिकारक विषाणू 99.9 टक्के कमी होतात. या सर्व घटकांमुळे नदीतील जैवविविधता (इळे-वर्ळींशीीळीूं) वाढण्यास मदत होते आणि नदीला विळखा घालणार्या जलपर्णीचेही निर्मूलन होते.
जून 2020 ते जून 2026 या काळात हे काम अविरतपणे सुरू आहे. या कार्याला आता सहा वर्षे पूर्ण होऊन आम्ही सातव्या वर्षात पदार्पण करत आहोत. या ’लोक संशोधनाची’ दखल घेऊन ’पर्यावरण संरक्षण गतीविधी’ने हा विषय राष्ट्रीय पातळीवरील आपल्या कार्यात समाविष्ट केला आहे. आज अखिल भारतीय पातळीवर विविध संस्थांमार्फत लाखो लोकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतातील अनेक तलाव, नद्या आणि नाले शुद्ध करण्यासाठी हे अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम अत्यंत उपयोगी ठरत आहे.
या बायो-एंझाईमच्या वापरामुळे आज आम्ही रासायनिक (केमिकल) शेतीला आणि घरातील केमिकल उत्पादनांना एक उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे जमिनीत आणि नदीत जाणारे केमिकलचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
घरातील ओल्या कचर्यामुळे निर्माण होणारा हरितगृह वायू (ॠीशशपर्हेीीश ॠरी) आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यातही या बायो-एंझाईममुळे यश मिळत आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, याद्वारे आपण 400 मिलियन टन कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो. भविष्यात हे लोक-तंत्रज्ञान ’हर्बल मेडिसिन’ (औषधी वनस्पती) क्षेत्रातही मोठी क्रांती घडवू शकते. या विषयाचे महत्त्व ओळखून विद्यापीठांनी विविध अभ्यासक्रमांमध्येही या अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम विषयाचा समावेश केला आहे.
अॅडव्हान्स्ड बायो-एंझाईम ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक जण स्वतःच्या घरात बनवू शकतो. या क्लिष्ट आणि अवघड विषयावर अत्यंत सोपे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले यश, हे केवळ आणि केवळ ’श्रीगुरुजी’ यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाले, असे मी मानतो.
लेखक हे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या पर्यावरण सरंक्षण गतीविधी देवगिरी प्रांतचे प्रांत मंडळ सदस्य आहेत.