पुणे : ”भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी पद्मश्री पतंगे सर यांनी संविधानावर लिहिलेली पुस्तके वाचणे आवश्यक आहे. त्यातून भारतीय संविधानाचे नेमके आकलन होईल,“ असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले. रविवार दिनांक 25 मे 2026 रोजी पुण्यातील सावरकर अध्यासन केंद्र येथे ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, पद्मश्री रमेशजी पतंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रांत संघटन मंत्री नितीन केळकर होते. व्यासपीठावर ‘सामाजिक गतिविधी’चे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक विलास लांडगे आणि ’समरसता साहित्य मंच, पुणे’च्या अध्यक्षा वैशाली मोहिते प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, शाम भुर्के, संघाचे पदाधिकारी आणि पुणेकर साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात योगेश सोमण म्हणाले की, ”भारतीय संविधानावर कार्यक्रम करण्यासाठी मी अभ्यास करत होतो, तेव्हा अमेरिकेची राज्यघटना, फ्रेंच राज्यघटना आणि ब्रिटिश राज्यघटना यावर पतंगे सरांनी सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेली पुस्तके अभ्यासली, त्यातून भारतीय राज्यघटनेचा आवाका समजला. पतंगे सरांची 10 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, तीही प्रत्येकाने वाचली पाहिजेत. पतंगे सरांच्या पुस्तकांमधूनच माझा आणि त्यांचा परिचय होत गेला,” असेही त्यांनी सांगितले. ’भारतीय संविधान बदलले जाणार’ अशा नॅरेटिव्हबाबत बोलताना ते म्हणाले की, ’2014 सालापासून हे नॅरेटिव्ह पद्धतशीरपणे चालविले जात असून त्याला उत्तर देणे गरजेचे आहे.’
’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाविषयी आपली भूमिका मांडताना पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले ”संविधान हा गहन ज्ञानाचा विषय आहे. भारताच्या प्राचीन परंपरेचा विचार करून राज्यघटना लिहिली गेली. भारतीय समाज रचना जाणून घेऊन प्रत्येक विषयाचे गहन चिंतन डॉ. बाबासाहेबांनी संविधान तयार करताना केले. बाबासाहेबांनी लिहिलेले भारतीय संविधान हा सामाजिक क्रांतीचा दस्तावेज आहे आणि त्यांचे हे कार्य पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संविधान राजसत्तेला अनियंत्रित होऊ देत नाही, तर तिच्यावर अंकुश घालते,” हे महत्त्व या पुस्तकातून समोर आणल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सखोल चिंतनाची विविध उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केले की,’काँग्रेस पक्षाचे सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आदी राष्ट्रीय विचार जपणार्या शीर्षस्थ नेतृत्वाला डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व हवे होते आणि त्यांनीच बाबासाहेबांना घटना समितीवर निवडून आणले.’
अध्यक्षीय भाषणात नितीनजी केळकर यांनी संघावर आक्षेप घेणार्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ”आक्षेप घेणार्यांनीच अनेक वेळा भारतीय राज्यघटना पायदळी तुडविली, पण संघाने मात्र घटनेचा नेहमीच आदर केला आहे. गेल्या 12 वर्षांत काय बदल करण्यात आले? याचे उत्तर विरोधकांकडे नाही.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ’सा.विवेक’चे प्रतिनिधी रमेश देवी यांनी पद्य सादर केले. त्यानंतर ’सा.विवेक’च्या पुणे कार्यालयाचे धनाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले.
उमा व्यास यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खाकुर्डीकर यांनी केले. सुधीर पाचपोर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि डॉ. वैशालीताई मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ’सा.विवेक’चे प्रतिनिधी रमेशमामा देवी, प्रविण शेटे, सचिन साठे, शरद शिंदे आणि राजेंद्र पंढरपुरे यांचे सहकार्य लाभले.