पनवेल : “सामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसे पोहोचावे, याचे तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवले, संस्कार दिले, जीवनाला दिशा दिली; त्याच मातृसंस्थेला आजवर तब्बल 135 कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांनी आधुनिक काळातील ‘एकलव्य’ ही ओळख अक्षरशः सार्थ ठरवली आहे. ही केवळ देणगी नाही, तर शिक्षण, संस्कार आणि गुरुऋणाप्रती असलेली त्यांची अथांग कृतज्ञता आहे. आज आपण करत असलेला हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाही; तर सामान्य माणसामध्ये दडलेल्या असामान्य शक्तीचा, जिद्दीचा आणि समाजाप्रती समर्पणाच्या भावनेचा गौरव आहे,” असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील उलवे नोड येथील सेक्टर-12मधील रामशेठ ठाकूर मैदानावर काढले.
गोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ’अभिष्टचिंतन सत्कार सोहळा’ तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था संचलित ’रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’च्या नवीन अत्याधुनिक इमारतीचा उद्घाटन सोहळा उलवे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या साक्षीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील हजारो मान्यवर, हितचिंतक, आणि जनसागराच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मान चिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे अभिष्टचिंतन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचाही गौरव केला. संयमी, शिस्तबद्ध आणि लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी, फलोत्पादन व खारजमीन विकास मंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्याचा आलेख मांडला. ”आजची उपस्थिती पाहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर मनापासून व हृदयावर प्रेम करणारे कार्यकर्ते पाहायला मिळाले. कर्तृत्व, नेतृत्व यांचा अनोखा संगम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात पाहायला मिळतो. रामशेठ ठाकूर यांच्यामुळे भाजपाचा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला,” हे ही त्यांनी अधोरेखित केले.
सत्कारमूर्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले. ”आयुष्याच्या या 75 वर्षांत अनेक बरे-वाईट अनुभव आले. अगदी गाढवावरून माती वाहून नेण्याचे कामही केले. आणि काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी लढलोसुद्धा. या भागाच्या विकासाठी अनेक आंदोलने केली. काम करत असताना गावागांवातील लोकांना सोबत घेऊन काम करत राहिलो, त्यामुळे स्वतः बरोबर लोकांचेही भले झाले. त्यातूनच या परिसरात प्रकल्प उभे राहून विकास झाला आणि स्थानिक भूमीपुत्रालादेखील त्यांचे हक्क मिळाले,” असेही त्यांनी या निमित्ताने नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ’लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष’ नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी केले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन ’जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थे’चे संचालक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.