‘मोजक्या लोकांत सुरू झालेला संघ आज विशाल झाला’ : ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे

विवेक मराठी    03-Jun-2026
Total Views |
पुणे : “भगवान बुद्धांनी अंतःप्रेरणेने सारनाथला धम्मचक्र परिवर्तन केले आणि तिथून संघ सुरू झाला. दुसरीकडे, डॉ. हेडगेवारांनी आपल्या घरी संघ सुरू झाल्याचे जाहीर केले. अगदी मोजक्या माणसांना सोबत घेऊन सुरू झालेला संघ आज एवढा विशाल झाला आहे, हे दोन्ही घटनांमधील खूप मोठे साम्य स्थळ आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. मंगळवार, दिनांक 26 मे 2026 रोजी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ’वि. का. राजवाडे सभागृहात’ पद्मश्री रमेश पतंगे लिखित ’समाज संघटनेचा वारसा आणि संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
 

rss 
 
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी उपस्थित होते. तर ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष प्रदीप तथा दादा रावत, ‘भारतीय विचार साधना प्रकाशना’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे आणि कार्यवाह काशिनाथ देवधर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते देेवी सरस्वती आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रकाशन सोहळ्याचा शुभारंभ झाला.
 
 
पुस्तकामागील आपली भूमिका मांडताना रमेश पतंगे म्हणाले, ” सामाजिक समरसता मंचाचे काम करताना खूप वाचन करावे लागते. बौद्ध बांधवांमध्ये जावे लागते. हे काम करतानाच मला संघाच्या कामाची व्याप्ती आणि खोली खर्‍या अर्थाने समजत गेली. गांधीजी समजून घेतानाही संघाची वाटचाल लक्षात येते. ’देशसेवेसाठी रोज सूत काता,’ असे गांधीजींनी सांगितले; तर ’देशासाठी रोज एक तास शाखेवर या,’ असे डॉ. हेडगेवारांनी सांगितले.” हाच विचार पुढे कसा गेला, हे सांगताना ’बुद्ध, गोरखनाथ, गुरू नानकदेव, स्वामी दयानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार अशी ही संघ परंपरा उलगडत जाते. हा सगळा प्रवास आणि महापुरुषांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचाव्यात, म्हणूनच हे पुस्तक लिहिले,’ असे ते म्हणाले.
’भारत इतिहास संशोधक मंडळाचे’ अध्यक्ष दादा रावत आपल्या मनोगतात म्हणाले की, ’आजच्या संघविचाराचे प्राचीन विचार आणि प्रबोधनयुगातील विचार असे दोन मुख्य स्रोत आहेत. आपल्याकडे वारकरी आणि धारकरी अशा दोन परंपरा राहिल्यामुळेच आपल्याला 1000 वर्षांचा मोठा संघर्ष करता आला आणि समाज टिकून राहिला. स्वामी दयानंद, सावरकर, लोकमान्य टिळक आणि डॉ. हेडगेवार या सर्वांनी वेगवेगळ्या प्रयोगांतून समाजाला एकत्र बांधण्याचे काम केले, याचा अभ्यासपूर्ण आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.’
 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भय्याजी जोशी यांनी म्हटले की, ’रमेशजींसारख्या स्वतः जमिनीवर काम करणार्‍या कर्मशील माणसाने हे पुस्तक लिहिल्यामुळे याचे महत्त्व अधिक आहे. हिंदू आणि हिंदुत्व हे सर्वकालिक आणि वैश्विक आहे, त्याला एखाद्या संप्रदायाच्या चौकटीत अडकवणे चुकीचे ठरेल. मधल्या आक्रमणांच्या काळात आपण स्वतःला संकुचित संकल्पनांमध्ये अडकवून घेतले आणि समाज विस्कळीत झाला. पण संतांनी या समाजाचे रक्षण केले आणि त्याच कामाचा पुढचा टप्पा म्हणजेच ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आहे. ’भारतमाता की जय’ म्हटले की प्रांताप्रांतांमधला संकुचितपणा गळून पडतो. संघ हा समाजापेक्षा वेगळा नसून, समाज घडवणारे एक माध्यम आहे.’
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘भारतीय विचार साधना प्रकाशना’चा परिचय संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह काशिनाथ देवधर यांनी केले, तर मिलिंद भणगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी सामूहिक ’कल्याण मंत्राने’ कार्यक्रमाची सांगता झाली..