नंदुरबारात महाराष्ट्राचे पहिले आदिवासी मिलेट प्रक्रिया केंद्र

विवेक मराठी    30-Jun-2026
Total Views |

Nandurbarat Maharashtras first tribal millet processing center
 
विकास पांढरे,९९७०४५२७६७
जगभरात आज 'सुपरफूड' म्हणून गौरवले जाणारे श्रीधान्य भारतासाठी नवे नाही; हजारो वर्षांपासून ते भारतीय कृषी परंपरेचा, संस्कृतीचा आणि आहाराचा अविभाज्य भाग राहिले आहेत. विविध हवामान, सुपीक माती आणि समृद्ध जैवविविधतेच्या बळावर भारताने ‘ज्वारी’, ‘बाजरी’, ‘नाचणी’, ‘वरई’, ‘कोद्रा’, ‘लिटल मिलेट’ सह अनेक पौष्टिक तृणधान्यांचा अमूल्य वारसा जपला आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि प्रतिकूल हवामानातही भरघोस उत्पादन देणाऱ्या या श्रीधान्यांना आज हवामान बदल आणि पोषणसुरक्षेच्या काळात शाश्वत शेतीचा आधारस्तंभ मानले जात आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्ष' म्हणून घोषित करून जगाचे लक्ष या धान्यांकडे वेधले.
 

Nandurbarat Maharashtras first tribal millet processing center 
या राष्ट्रीय कृषी वारशाचे जिवंत दर्शन घडते ते महाराष्ट्रातील नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांत. नंदुरबार हा देशातील आकांक्षित जिल्हा असून सातपुडा पर्वतरांगांतील धडगाव, मोलगी आणि आसपासच्या दुर्गम भागात ‘भगर’, ‘बर्टी’, ‘मोर’ (लिटल मिलेट), ‘कोद्रा’, ‘नाचणी’, ‘ज्वारी’ यांसारख्या पर्वतीय तृणधान्यांची पारंपरिक लागवड आजही मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषतः मोलगी परिसरात ‘ज्वारी’ आणि ‘भगरी’चे अनेक दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक वाण आजही जतन केले गेले आहेत. स्थानिक आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या जपलेल्या या वाणांमध्ये निसर्गाशी सुसंगत शेतीज्ञान आणि समृद्ध जैवविविधतेचा अनमोल ठेवा दडलेला आहे. हलक्या जमिनीत कमी कालावधीत तयार होणारी आणि अत्यंत स्वादिष्ट 'ओहवी जुवार', स्थानिकांच्या श्रद्धेचे प्रतीक मानली जाणारी 'देवमोगरा', पांढरेशुभ्र, टपोरे, गोड दाणे आणि उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असलेली 'दूध-मोगरा जुवार', लालसर रंगाची, चिकट पोतामुळे पापडांसाठी विशेष उपयुक्त आणि दीर्घकाळ टिकणारे पीठ देणारी 'चिकणी जुवार', पक्ष्यांपासून नैसर्गिक संरक्षण लाभलेली 'पाखरी जुवाई', तसेच उंच वाढणारी, भरपूर हिरवा चारा देणारी आणि गोड दाण्यांची 'जेखराळी माणिजुवाई' हे या भागातील काही वैशिष्ट्यपूर्ण ‘ज्वारी’चे वाण आहेत. याशिवाय हवामानातील अनिश्चिततेशी जुळवून घेत विकसित झालेल्या भगरीच्या काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जातीही आढळतात. अतिवृष्टीमुळे खरीपातील पिके नष्ट झाली, तरी जमीन पुन्हा तयार करून भाद्रपद महिन्यात पेरणी करता येणारी आणि केवळ दवाच्या ओलाव्यावरही भरघोस वाढणारी ‘मोर’ ही भगरीची जात शेतकऱ्यांसाठी संकटसमयी आधार ठरते. तसेच, ज्या भागात हिवाळ्यात सिंचनाची मर्यादित सुविधा उपलब्ध असते, तेथे चारा आणि धान्य या दोन्ही गरजा पूर्ण करणारी ‘पादी ही भगरीची पारंपरिक जात आजही लागवडीत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा स्थानिक वाणांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असून, त्या आदिवासी समाजाच्या पारंपरिक कृषी ज्ञानाचा आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहेत.कमी पाण्यात, अल्प संसाधनांत आणि प्रतिकूल हवामानातही तग धरून उत्पादन देणारी श्रीधान्ये ही आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा राहिली आहेत.
 

Nandurbarat Maharashtras first tribal millet processing center 
 
एकेकाळी आदिवासींचे ताट ‘भगर’, ‘नाचणी’, ‘ज्वारी’, ‘कोद्रा’, ‘मोर’ अशा पौष्टिक श्रीधान्यांनी समृद्ध असे. मात्र, बदलते हवामान, दुष्काळ, बाजारपेठेतील बदल आणि पारंपरिक पिकांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे श्रीधान्यांची लागवड हळूहळू कमी होत गेली. परिणामी, पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले हे अन्न शेतातून आणि ताटातूनही गायब झाले. त्याचे गंभीर परिणाम सातपुडा परिसरातील आदिवासी समाजाच्या आरोग्यावर झाले आणि कुपोषणाचा प्रश्न अधिक तीव्र झाला.याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा श्रीधान्यांकडे वळण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन, श्रीधान्य लागवडीचा विस्तार, शेतकरी संघटनांची उभारणी आणि गावपातळीवर आधुनिक प्रक्रिया केंद्रांची निर्मिती अशा सर्वसमावेशक उपक्रमांमधून सातपुड्यात 'श्रीधान्य क्रांती' आकाराला आली.
 
 
 
Nandurbarat Maharashtras first tribal millet processing center
 
एफपीओची स्थापना आणि आधुनिक प्रक्रिया केंद्राची उभारणी
श्रीधान्ये ही आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा आणि अन्नसंस्कृतीचा अविभाज्य भाग असली, तरी त्यांना पोषणमूल्यांसोबतच योग्य बाजारमूल्य आणि प्रक्रिया उद्योगाची जोड मिळणे आवश्यक होते. याच उद्देशाने योजक (Centre for Research and Strategic Planning for Sustainable Development) आणि हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सन २०२१ मध्ये अमोप शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) स्थापन करण्यात आली. (संचालक मंडळ - रामसिंग वळवी, चंद्रसिंग पाडवी, दिलीप वसावे, जहांगीर वळवी, मनोज तडवी, बहादूरसिंग पाडवी, धनेश वसावे, संपत वसावे, कल्पनाताई वळवी.)
 
आज या संस्थेशी २० गावांतील तब्बल ९२३ आदिवासी शेतकरी जोडले गेले असून, श्रीधान्य उत्पादनापासून प्रक्रिया आणि विपणनापर्यंतची मजबूत मूल्यसाखळी उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ODOP) उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पौष्टिक श्रीधान्ये हे प्रमुख उत्पादन म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ‘भगर’, ‘ज्वारी’, ‘बाजरी’, ‘नागली’, ‘रागी’ यांसारख्या स्थानिक श्रीधान्यांच्या उत्पादनवाढीसह प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उभारणीस नवी संधी उपलब्ध झाली. या सुवर्णसंधीचे रूपांतर विकासाच्या चळवळीत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून श्रीधान्य मूल्यसाखळी बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना मोठे यश मिळवत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आदिवासी उपयोजना (Tribal Sub Plan) अंतर्गत भारतीय श्रीधान्य (मिलेट) संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित आदिवासी श्रीधान्य प्राथमिक प्रक्रिया केंद्र नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा (मोगली) येथे २५ जून २०२६ रोजी कार्यान्वित झाले.
 
या अत्याधुनिक केंद्रामुळे सातपुड्यातील श्रीधान्यांना आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, उत्पादनाचा दर्जा, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना अधिक चांगला दर, रोजगाराच्या नव्या संधी आणि उत्पन्नवाढीचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत.
 
भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत नाबार्डच्या अर्थसहाय्याने, डीएससी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेली अमोप शेतकरी उत्पादक कंपनी लि., कंजाला ही सातपुड्यातील श्रीधान्य क्रांतीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
या प्रकल्पाला डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा (ATMA) प्रकल्प, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा, योजक संस्था, पुणे आणि शबरी वित्त व विकास महामंडळ, नाशिक यांच्या समन्वित सहकार्यामुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे साकार झाला. या संपूर्ण उपक्रमामागे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जिल्हा प्रशासनाची विकासाभिमुख भूमिका ही सर्वात मोठी प्रेरणाशक्ती ठरली
याखेरीज कोइंबतूर येथील बोर्न टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या तज्ज्ञांनी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची निर्मिती, स्थापना, चाचण्या आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या केंद्रात श्रीधान्य प्रक्रियेसाठी ११ अत्याधुनिक यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रतवारी व स्वच्छता यंत्र, मिलेट डीस्टोनर, ग्राइंडिंग, पॉलिशिंग, पॅकेजिंग यंत्रणा तसेच ऑप्टिकल कलर सॉर्टर तंत्रज्ञानामुळे काळे, पिवळे, डागाळलेले किंवा खराब दाणे अचूकपणे वेगळे करता येणार आहेत. त्यामुळे उच्च दर्जाचे, स्वच्छ आणि सुरक्षित श्रीधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.
 
श्रीधान्य मूल्यसाखळीला चालना
 
या केंद्राचा लाभ केवळ अमोप एफपीओच्या सदस्यांनाच नव्हे, तर परिसरातील सर्व श्रीधान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे श्रीधान्याचे मूल्यवर्धन, आधुनिक प्रक्रिया, साठवणूक आणि बाजारपेठेशी थेट जोडणी शक्य होईल. पुढील महिन्यापासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यानंतर भगर, बेकरी उत्पादने, प्रीमिक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, स्नॅक्स आणि इतर पोषणयुक्त मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला गती मिळणार आहे.
गावपातळीवर आधुनिक श्रीधान्य प्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही तग धरणाऱ्या श्रीधान्य पिकांच्या लागवडीला मोठी चालना मिळणार आहे. या सुविधेमुळे श्रीधान्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यांना गती मिळून शेतकरी थेट बाजारपेठेशी अधिक सक्षमपणे जोडले जातील. परिणामी, आदिवासी भागातील श्रीधान्य मूल्यसाखळी अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस नवी दिशा मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवे बळ प्राप्त होईल.
 
नंदुरबार मॉडेलची राज्यभर गरज
 
औद्योगिक विकासात महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, श्रीधान्य (तृणधान्य) प्रक्रिया उद्योगाच्या विकासाच्या बाबतीत अजूनही मोठी पोकळी आहे. नंदुरबार जिल्ह्यात उभारण्यात आलेले एफपीओ-आधारित आधुनिक श्रीधान्य प्रक्रिया केंद्र हे राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरू शकते. या धर्तीवर महाराष्ट्रातील श्रीधान्य उत्पादक जिल्ह्यांमध्ये अशाच सुविधा उभारण्याची गरज आहे.
 
राज्यातील ‘ज्वारी’, ‘बाजरी’, ‘नाचणी’, ‘कोद्रा’, ‘भगर’ यांसारख्या प्रमुख श्रीधान्य पिकांसाठी 'समूहकेंद्र (क्लस्टर)' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. किमान २० श्रीधान्य क्लस्टर विकसित करून उत्पादन, प्रक्रिया, साठवण, मूल्यवर्धन आणि विपणन यांची एकात्मिक मूल्यसाखळी उभारली, तर उत्पादनक्षमता वाढेल, गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार होतील आणि देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत महाराष्ट्राचे स्थान अधिक मजबूत होईल. याचबरोबर गावागावांत प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), उत्पादक संस्था, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना बीजभांडवल, अनुदान आणि सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
एकूणच नंदुरबारने उभारलेले महाराष्ट्रातील पहिले आदिवासी मिलेट प्रक्रिया केंद्र आदिवासी विकास, पोषणसुरक्षा, हवामानस्नेही शेती आणि ग्रामीण उद्योजकतेची नवी चळवळ आहे. नंदुरबारने दाखविलेला हा मार्ग संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारला, तर श्रीधान्यांचे सुवर्णयुग पुन्हा अवतरू शकेल आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची नवी कहाणी लिहिली जाईल.
 
कोट क्रमांक : १
मालपाडा श्रीधान्य प्रक्रियेचे नवे शक्तिकेंद्र :- रामसिंग वळवी
आदिवासी शेतकऱ्यांच्या एकी, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नांतून साकारलेले हे श्रीधान्य प्रक्रिया केंद्र सातपुड्याच्या विकासाचे नवे पर्व लिहिण्यास सज्ज झाले आहे. या केंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रतवारी, स्वच्छता, दगड वेगळे करणे (डी-स्टोनिंग), ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पॅकेजिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, धान्यातील काळे, पिवळे, डागाळलेले किंवा निकृष्ट दर्जाचे दाणे अत्यंत अचूकपणे वेगळे करण्यासाठी अत्याधुनिक ऑप्टिकल कलर सॉर्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या सुविधेमुळे हे महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक आदिवासी श्रीधान्य प्रक्रिया केंद्र म्हणून ओळखले जाईल.
 
पुढील महिनाभरात विविध मूल्यवर्धित श्रीधान्य उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल. त्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता आणि बाजारातील स्पर्धात्मकता वाढेल, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळेल. याचबरोबर स्थानिक आदिवासी महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन सातपुड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल.
— संचालक, अमोप शेतकरी उत्पादक कंपनी लि., कंजाला, जि. नंदुरबार
 
कोट क्रमांक : २
"सातपुड्यातील श्रीधान्याला आधुनिक मूल्यवर्धनाची नवी दिशा" :- राजेंद्र दहातोंडे
नंदुरबार हा देशातील आकांक्षित जिल्हा असून सातपुडा पर्वतरांगांतील डोंगराळ भागात पर्वतीय तृणधान्ये (मिलेट/श्रीधान्ये) ही कमी संसाधनांमध्येही यशस्वीपणे घेता येणारी अत्यंत महत्त्वाची पीकपद्धती आहे.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन डॉ. मिताली सेठी (जिल्हाधिकारी, नंदुरबार), भारतीय श्रीधान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद आणि विविध शासकीय विभाग यांच्या समन्वित प्रयत्नांतून मालपाडा (मोलगी) येथे अत्याधुनिक श्रीधान्य प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील श्रीधान्य उत्पादनाला प्रक्रिया, स्वच्छता, साठवणूक, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यास मोठी चालना मिळेल.
 
या केंद्राच्या माध्यमातून ‘भगर’, ‘बेकरी उत्पादने’, ‘प्रीमिक्स’, ‘रेडी-टू-ईट पदार्थ’ आणि ‘स्नॅक्स’ यांसारख्या पोषणयुक्त मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला गती मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास आणि आदिवासी भागातील पोषणसुरक्षा अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल.
– वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
 
चौकट

मिलेट प्रक्रिया केंद्र, आता तुमच्याही गावात!
आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था किंवा उद्योगासाठी अत्याधुनिक श्रीधान्य (मिलेट) प्रक्रिया केंद्र उभारण्याची इच्छा असल्यास, आधुनिक यंत्रसामुग्री, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक माहितीसाठी आजच संपर्क साधा.
संपर्क : ९५९४९६१८६७