@रामचंद्र फलटणकर, पुणे
9552550920
वाढत्या वयासोबत निसर्गाप्रती असलेली जबाबदारी विसरण्याऐवजी, वयाच्या 75व्या वर्षी पाषाण टेकडीवर 75 झाडे लावून एक अनोखा संकल्प केला. 2007पासून अखंड सुरू असलेल्या या पर्यावरण रक्षणाच्या प्रवासात ‘प्लॅस्टिक कचर्याचा पुनर्वापर’, पायी वारीतील ‘सीड बॉल्स’ आणि श्रमदानातून ‘हजारो देशी वृक्ष’ जगवण्याचे काम केले. कचराकुंडीचे नंदनवन करत, ओल्या कचर्यातून टेरेस गार्डन फुलवण्यापर्यंतची ही एक निसर्गस्नेही आणि प्रेरणादायी गोष्ट...
आयुष्य शंभर वर्षांचे असेल वा नसेल, परंतु आयुष्यात किमान 100 वृक्ष नक्की जगवायचे, असा संकल्प मी केला. याच संकल्पाचा भाग म्हणून, 2021मध्ये माझ्या वयाच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पाषाण टेकडीवर 75 वृक्ष दान करून मी एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. पर्यावरण रक्षणाच्या या प्रवासातील माझे काही अनुभव आणि प्रयोग खालीलप्रमाणे आहेत.
प्लॅस्टिक कचर्यातून जलसंधारण (मटका पद्धतीचा यशस्वी प्रयोग) : मी ’वसुंधरा स्वच्छता अभियान’ (तडअ) ग्रुपमध्ये कार्यरत आहे. प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी मी केलेला एक प्रयोग झाडांना पाणी देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. यामध्ये एक लीटर पाण्याच्या जुन्या बाटल्यांचा मागचा भाग कापून, त्या रोपांच्या बाजूला जमिनीत उलट्या पुरतो. या बाटल्यांमध्ये विटांचे लहान तुकडे आणि थोडी माती किंवा वाळू टाकली जाते. त्यानंतर बाटलीत पाणी भरले की, ठिबक सिंचनाप्रमाणे (ऊीळि खीीळसरींळेप) हे पाणी थेट रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचते. यामुळे बाष्पीभवनाने पाणी वाया जात नाही. परिणामी, पाण्याची मोठी बचत होते आणि जमिनीवरील प्लॅस्टिकचा कचराही कमी होतो, असा दुहेरी हेतू साध्य होतो.
2007पासून अविरत श्रमदान आणि वृक्षारोपण : विविध फळांच्या बियांपासून घरीच रोपे तयार करायची आणि पावसाळ्यात डोंगरावर त्यांचे रोपण करायचे, हा माझा नित्यक्रम आहे. पाठीवर पाच लीटरची आणि हातात दोन लीटरची पाण्याची कॅन घेऊन रोज डोंगरावर जाणे आणि रोपांना पाणी देणे, हा उपक्रम 2007पासून आजतागायत अखंड सुरू आहे. मोकाट जनावरांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तिथे कुंपण घातले. श्रमदानातून चर खोदून ’पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा मंत्र प्रत्यक्षात आणला. यामुळे तिथे पायवाटा, पायर्या आणि लहान-लहान जलाशय तयार झाले आहेत. काही ठिकाणी ठिबक सिंचनाची सोयही केली आहे. आज या प्रयत्नांमुळे डोंगरावर हजारो देशी वृक्ष डौलाने उभे आहेत.
पायी वारीत ’सीड बॉल्स’चा प्रयोग : गाईचे शेण आणि माती एकत्र करून मी फळबियांचे ’सीड बॉल्स’ (गोळे) तयार करतो. पंढरपूरच्या पायी वारी दरम्यान रस्त्यांचे डिव्हायडर्स, दलदलीच्या जागा, नाले आणि ओढ्यांच्या काठी मी या बियांचे रोपण केले आहे, जेणेकरून पावसाळ्यात तिथून निसर्गाला हिरवेगार रूप मिळेल.
कचराकुंडीचे नंदनवन : आमच्या सोसायटीच्या गेटसमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकला जात होता. मी माझ्या सहकार्यांच्या मदतीने तिथे वृक्षारोपण करून त्यांची जोपासना केली. आज ती जागा कचराकुंडी होण्यापासून वाचली असून तिथे सुंदर हिरवळ निर्माण झाली आहे.
ओल्या कचर्यातून टेरेस गार्डन : घरातील ओल्या कचर्यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार करून मी गच्चीवर सुंदर ’टेरेस गार्डन’ फुलवले आहे. यातून आम्हाला ताजी फळे, फुले आणि पाने तर मिळतातच; पण त्यासोबतच शुद्ध हवा आणि पक्ष्यांचा सहवासही लाभतो. पर्यावरण रक्षणासाठी मी उचललेले हे छोटेसे पाऊल, माझा हा खारीचा वाटा मी वसुंधरेला अर्पण करतो!
एक तरी झाड जगवूया,
वसुंधरेला रक्षूया!!