@ महेंद्र वाघ
7350002460

अण्णासाहेबांची सावली बनून राहिलेली कर्व्यांची गृहलक्ष्मी अर्थात आनंदीबाई (बाया) धोंडो कर्वे. बायाचे स्वतःचे जीवन अत्यंत संघर्षमय तर होतेच परंतु त्या काळातील समाजप्रवाहाच्या विरूद्ध वाटणार्या अनेक गोष्टी बायाने हिमतीने केल्या. विधवेशी केलेला पुनर्विवाह म्हणून कर्वे दांम्पत्याला समाजाची अवहलेना सहन करावी लागली खरी. पण या दोघांनीही समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य समर्पित केले. तिच्या स्मरणार्थ हिंगण्याच्या माळरानावरील तुळशी वृंदावन बायाची प्रेरकगाथा म्हणून आजही प्रेरणा देत आहे.
मुळात सात्त्विक प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती कितीही मोठ्या दुर्दशेत सापडल्या तरी त्यांची मूळ वृत्ती टिकून राहते आणि या दुर्दशेमधून त्यांना सावरणारी व्यक्ती ही त्यांचे श्रद्धास्थान बनून जाते. महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई तथा बाया यांचे उदाहरण काहीसे या प्रकारचे आहे.
देवरुखातील पावसकर जोश्यांच्या घरात दिनांक 5 जून 1863 रोजी बायाचा जन्म झाला. गोदू हे तिचे माहेरचे नाव. बाया हे लाडाचे नाव. घरी दारिद्र्य पाचवीला पुजलेले. तत्कालीन प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी तिचा विवाह झाला. तिचे पती तिच्याहून 12 वर्षांनी मोठे होते. यशोदाबाई नातू असे नवे नाव तिला मिळाले. पण दुर्दैवाने लग्नानंतर तीनच महिन्यांत गोदू विधवा झाली. काही वर्षे माहेरी राहिल्यानंतर तिची सासरी रवानगी झाली. सासरची मंडळी वागायला चांगली असली तरी सामाजिक दबावामुळे तिला केशवपनाच्या रूढीला बळी पडावे लागले. या वेळी स्वत:ची असहाय्यता तिला प्रकर्षाने जाणवली. अशा बालविधवांचे भवितव्य काय? तर काहीच नाही. रगड कष्ट आणि आनंद मात्र शून्य. प्रतिष्ठा अजिबात नाही, अवहेलना मात्र पदोपदी. असे जगणे मृत्यूपेक्षा असह्य.
मात्र अन्य बालविधवांपेक्षा बायाचे योग जरा वेगळे होते. लवकरच तिच्या थोरल्या भावाच्या आग्रहावरून तिला मुंबईला जाण्याचा योग आला, जिथे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनात तिला शिक्षणासाठी राहण्याची संधी मिळाली. इथे तिला एक निराळी दिशा मिळाली. भावाच्या बिर्हाडात धोंडो केशव कर्वे तथा अण्णांशी तिचा प्रथम परिचय झाला. कर्व्यांच्या पत्नी राधाबाई आणि मुलगा रघुनाथ यावेळी त्यांच्यासह होते. पुढे दुर्दैवाने राधाबाईंचे आकस्मिक निधन झाले. कर्वे यांनी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली.
या काळात कर्व्यांना दुसर्या लग्नाबद्दल वारंवार विचारणा होऊ लागली. या वेळेपर्यंत अण्णांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. बालविधवांची दु:खे त्यांनी डोळसपणे पाहिली होती. अशा विधवांचे जगणे बघून त्यांच्यातील हळवा मनुष्य कळवळत होता तर त्यांच्यातला सुधारक काही योजनाही करत होता. विचारांती, दुसरे लग्न विधवेशीच करण्याचा आपला निश्चय कर्व्यांनी विचारपूर्वक प्रकट केला. हाच धागा पकडून गोदूच्या वडिलांनी गोदूशीच लग्नाचा प्रस्ताव कर्व्यांपुढे ठेवला. कर्व्यांनीही तो मान्य केला. दरम्यान शारदा सदनाची शाखा पुण्यात आल्याने गोदूदेखील पुण्यातच आली होती. दिनांक 11 मार्च 1893 या दिवशी पंडिता रमाबाईंच्याच पुढाकाराने हा विवाह पार पडला. गोदू आता ‘आनंदीबाई धोंडो कर्वे’ बनली.
दुसरा विवाह ठरवून विधवेशी करण्यामागे अण्णांची संवेदना आणि सुधारकी वृत्ती होती. बायाने तर वैधव्याच्या वेदना स्वत:च अनुभवल्या होत्या. दोघांच्या संवेदना एकाकार झाल्या आणि अशा असहाय्य स्त्रियांसाठी 1896 साली कर्व्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. या कार्यात बाया खंबीरपणे आपल्या पतीसोबत उभ्या राहिल्या. एक तर दोघांचाही - त्यातही बायाचा - पुनर्विवाह तत्कालीन धारणांना चांगलेच हादरे देऊन गेला होता. त्यापायी दोघांनीही बहिष्काराचे प्रखर चटके सहन केले होते. त्यात आता दोघांनीही स्त्री शिक्षणाचे आणि विधवा पुनर्वसनाचे कार्य हाती घेतल्याने त्याचे सामाजिक पडसाद कसे उमटले असतील, याची कल्पना आपण करू शकतो. अण्णांच्या या कामात अनेक निराधार स्त्रिया आणि अनाथ मुलांचा व्याप बायाने जिद्दीने सांभाळला. छोटी-मोठी कामे करून आश्रमासाठी पैसे साठवणे, देणग्या गोळा करणे या कामी तिने स्वत:स वाहून घेतले. स्वत: सुइणीचे काम शिकून घेतले आणि पुढे अनेक गरजू मुलींसाठी त्याचा उपयोगही केला. गावोगावी फिरून अण्णांच्या आत्मवृत्ताच्या प्रती विकणे असेल, दारोदारी फिरून आश्रमातील मुलींसाठी भाऊबीज मागणे अथवा एखाद्या लग्नमंडपात उधळल्या गेलेल्या अक्षता गोळा करून आश्रमासाठी घेऊन येणे असेल - अशी कितीतरी कामे बायाने विनासंकोच आणि सातत्याने केली.
बायाने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. भयावह वैधव्य तिने स्वत:च अनुभवले होते. दारिद्रयाचे भीषण स्वरूप बालपणी पाहिले होते. मात्र या सर्व प्रतिकूलतेची प्रतिक्रिया तिने आपल्या संवेदनेने दिली. शेकडो महिला व निराधार बालकांसाठी ती आधार झाली. ‘पुनर्विवाह केलेली विधवा’ म्हणून खुद्द हिंगण्याच्या आश्रमातही समाजाकडून मिळालेली हीनतेची वागणूक तिने प्रगल्भपणे समजून घेतली आणि सर्व समाज प्रगल्भ होण्याची वाट पाहिली. त्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील, हे समजून घेण्याचा मोठेपणा तिने दाखवला, ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची विशेषता. भविष्याचा वेध घेऊन हेतूत: निराळ्या वाटेवर चालणार्या आपल्या पतीच्या पाठीशी बाया समर्थपणे उभ्या राहिल्यानेच हा मोठा प्रपंच मार्गी लागू शकला.
असाहाय्य स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वत: हालाखीत राहून शिक्षणसंस्थेचा विस्तार करणार्या अण्णासाहेबांची सावली बनून राहिलेली ही कर्व्यांची गृहलक्ष्मी दि. 29 नोव्हेंबर 1950 रोजी हिंगणे आश्रमामध्येच अनंतात विलीन झाली. तिच्या समाधीच्या ठिकाणी आज एक तुळशी-वृंदावन आहे.
बायासुद्धा अशीच होती; जणू हिंगण्याच्या माळरानावरील तुळस!
- लेखक पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत
सामग्री लेखक आहेत.