@ श्रीधर रसाळ, पिंपरी-चिंचवड
7263991178
घराच्या नळाला बसवलेल्या अवघ्या 10 रुपयांच्या एअरेटरमुळे सुरू झालेला एक वैयक्तिक प्रयोग संपूर्ण सोसायटीत ‘जलक्रांती’ घडवून गेला आहे. दृढ निश्चय आणि योग्य गणिताच्या जोरावर कोट्यवधी लीटर पाण्याची आणि लाखो रुपयांची बचत करणारा उपक्रम पर्यावरण रक्षणाचे एक बोलके उदाहरण ठरला आहे.
काहीतरी मोठे बदलण्यासाठी सुरुवात स्वतःपासून आणि खंबीरपणे करावी लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. आमच्या घरात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी मी प्रायोगिक तत्त्वावर अवघ्या 10 रुपयांचे एक ’टॅप एअरेटर’ (Tap Aerator) नळाला बसवले. ’टॅप एअरेटर’ म्हणजे नळाच्या तोंडावर बसवलेली एक छोटी जाळी असते, जी पाण्याच्या प्रवाहात हवा मिसळते. यामुळे पाण्याचा दाब (Force) तितकाच राहतो, पण पाण्याचा प्रत्यक्ष वेगवान प्रवाह नियंत्रित होतो.
माझ्या घरात पूर्वी ज्या नळातून मिनिटाला 10 लीटर पाणी वाहून जायचे, तिथे एअरेटरमुळे आता फक्त 3 लीटर पाणी वापरले जाऊ लागले. म्हणजेच तब्बल 70 टक्के पाण्याची थेट बचत!
हा यशस्वी प्रयोग पाहून मी सोसायटीतील काही सजग मित्रांना सोबत घेतले आणि हे पाण्याचे गणित सर्वांसमोर मांडले. मोहिमेच्या सुरुवातीला काही जणांनी शंका उपस्थित केल्या, विरोधात सूर लावले, पण आम्ही आमचा निश्चय डळमळीत होऊ दिला नाही. संयमाने महत्त्व पटवून दिल्यानंतर संपूर्ण सोसायटी या उपक्रमात जोडली गेली. आमच्या 192 घरांच्या सोसायटीत एकूण 768 एअरेटर्स बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. यासाठी केवळ 7,680 रुपये इतका नाममात्र एकवेळचा खर्च आला.
श्रीधर रसाळ, पिंपरी-चिंचवड
आज याचे परिणाम डोळे दिपवणारे आहेत! सर्व आव्हानांवर मात करत, आमच्या गणितानुसार या उपक्रमातून सोसायटीत वर्षाला तब्बल 1 कोटी 31 लाख लीटरपेक्षा जास्त पाण्याची अपेक्षित बचत होणार आहे. सर्वसामान्यांना प्रश्न पडू शकतो की पाणी वाचवून वीजबिल कसे काय वाचणार? तर याचे साधे गणित असे की, सोसायटीत रोज लागणारे पाणी टेरेसवरील टाक्यांमध्ये चढवण्यासाठी मोठ्या 10 HPच्या मोटारी रोज तासनतास चालवाव्या लागतात. पाण्याचा वापर कमी झाल्यामुळे या मोटारींचा चालण्याचा वेळ कमी होईल. परिणामी, मोटारीचे वीजबिल आणि पाणीपट्टी मिळून सोसायटीचे वर्षाला तब्बल 1,06,133 इतकी अपेक्षित बचत होईल!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमचा हा छोटासा प्रयत्न केवळ आमच्या सोसायटीपुरता मर्यादित नाही. अगदी लहान पातळीवर का होईना, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवून आम्ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा (PCMC) पाणी शुद्धीकरणाचा (Filtration) आणि पाणी पंप करण्याचा खर्च आणि वीज वाचवण्यास प्रशासनाला हातभार लावत आहोत.
माझ्या घरातील एका नळापासून सुरू झालेली ही छोटीशी ठिणगी आज संपूर्ण सोसायटीत एक मोठी ’जलक्रांती’ बनली आहे. वैयक्तिक पातळीवरील दृढ पाऊलही पर्यावरणावर आणि समाजावर किती मोठा प्रभाव पाडू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे!