@ शरद जयश्री कमलाकर चव्हाण
8422882614
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ‘जनजाती सुरक्षा मंच’ व ‘जनजाती विकास समिती’द्वारे रविवार, दिनांक 24 मे 2026 रोजी ‘जनजाति सांस्कृतिक समागम’ पार पडला. भारताची प्राचीन संस्कृती, सभ्यता व त्याचे मूळ रक्षक आणि वाहक असलेल्या अनुसूचित जनजाती समाजाच्या लोकसंस्कृती, परंपरा, स्वाभिमान, अस्तित्व आणि आस्थेच्या पुनर्जागरणाचा जाहीर आणि विराट उद्घोष म्हणजे हा समागम होता.
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर संपन्न झालेला ’जनजाति सांस्कृतिक समागम’ हा केवळ एक सोहळा नव्हता, तर देशातील 550हून अधिक वनवासी समूहांच्या लोकसंस्कृती, स्वाभिमान आणि अस्तित्वाचा विराट उद्घोष(गर्जना) होता. वर्षानुवर्षे प्रलोभनांना बळी न पडता आपली मूळ सनातन संस्कृती जतन करणार्या वनवासी बांधवांच्या धैर्याचा आणि शिस्तीचा हा एक जाहीर सन्मान ठरला. दुर्गम भागातून आलेल्या मातृशक्तीच्या अभूतपूर्व सहभागाने नटलेला हा कुंभमेळा, भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची आणि ’सडक ते संसद’ अशा हक्कांच्या लढ्याची सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेलेली ऐतिहासिक यशोगाथा ठरला.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जन्म जयंती वर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम देशभरामध्ये आयोजित केले जात आहेत. याच अनुषंगाने दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ’जनजाती सुरक्षा मंच’ व ’जनजाती विकास समिती’द्वारे रविवार, दिनांक 24 मे 2026 रोजी ’जनजाति सांस्कृतिक समागम’चे आयोजन करण्यात आले. देशभरातील साडेपाचशेहून अधिक जनजाती समाज (वनवासी बंधु-भगिनी) आपल्या रूढी, परंपरा, लोककला व अस्मितेचा जागर करत दीड लाखांच्या संख्येने एकत्रित आला. हा म्हणजे एका अर्थाने भारतीय सनातन परंपरेच्या अभियानासह सांस्कृतिक कुंभमेळाच होता; ज्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
या सांस्कृतिक समागमरूपी कुंभमेळ्याला भारत सरकारचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या दिवशी ’जनजाती सुरक्षा मंच’च्या प्रतिनिधी मंडळाने भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच या चर्चेच्या निमित्ताने ज्या मागण्या त्यांच्याकडे सादर करण्यात आल्या त्यांना मा. पंतप्रधान आणि आदरणीय राष्ट्रपतींनी पाठिंबा दिला. हा ’जनजाति सांस्कृतिक समागम’ जनजाती अस्मिता, अस्तित्व व भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रूपात सुवर्ण अक्षराने नोंदवला गेला आहे.
हा ‘जनजाति सांस्कृतिक समागम’ भारताची प्राचीन संस्कृती, सभ्यता व त्याचे मूळ रक्षक आणि वाहक असलेल्या अनुसूचित जनजाती समाजाच्या लोकसंस्कृती, परंपरा, स्वाभिमान, अस्तित्व आणि आस्थेच्या पुनर्जागरणाचा जाहीर आणि विराट उद्घोष होता.
या प्रसंगी मुख्य अतिथी अमित शहा यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ”देश स्वतंत्र झाल्यानंतर साडेपाचशेहून अधिक जनजाती समूह, लाखो प्रतिनिधी ज्यात संत, सामाजिक कार्यकर्ते, मातृशक्ती, युवा आणि सांस्कृतिक कलाकार, मान्यवर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्रित आले; ज्याची तुलना दीडशे वर्षांपूर्वी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी उभारलेल्या ’उलगुलान’सोबतच होऊ शकते.”
या ऐतिहासिक सोहळ्याचे संचालन व नेतृत्व ’जनजाती सुरक्षा मंचा’च्या मार्फत केले गेले होते. त्यासाठी प्रामुख्याने ’अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’सह अनेक सामाजिक, सांस्कृतिक व जनजाती संघटनांनी मदत केली.
या माध्यमातून पारंपरिक वेशभूषा, लोकगीत, नृत्य, वाद्य, सांस्कृतिक प्रतीक यांच्या माध्यमातून भारताच्या जनजाती एकतेमधील विविधतेचे भव्य दर्शन दिल्लीकरांना आणि जगाला पाहायला मिळाले.
लाल किल्ल्याच्या प्रांगणाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिलेले आहेत; परंतु स्वातंत्र्यानंतरची ही पहिली वेळ होती की भारतातील सर्व जनजाती समाज एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या अधिकाराच्या चेतनेची मशाल घेऊन लाल किल्ल्याचा परिसर प्रज्वलित करत होता.
भारतीय भूभागात सूर्याची पहिली किरणे ज्या भागावर पडतात त्या अरुणाचल प्रदेशापासून ते पूर्वोत्तरातील सर्व राज्ये अगदी दक्षिणेच्या वायनाड, तमिळनाडूबरोबरीने पश्चिमेच्या रेवा तटावरील, राजस्थानच्या वाळवंटासह पाचव्या आणि सहाव्या अनुसूचींमध्ये जी जी राज्ये येतात अशा, 40 प्रांतांतून जनजातीबहुल असलेल्या 300पेक्षा अधिक जिल्ह्यांतून आणि हजारो गावांतून एकात्मिक शक्तीचे प्रदर्शन झाल्याचे हे एक अनोखे व अनुपम उदाहरण आहे.
जरी याला ’कुंभ’ म्हटले गेले तरी हे ऐतिहासिक जनजाती समाजाचे गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेले ’सडक से संसद तक जन जागरण आंदोलना’चेच एक रूप आहे. जल, जमीन, जंगल, जन आणि पशू यांच्यासह असलेले सामूहिक जीवन, निसर्गाशी साधलेली एकरूपता, लोकज्ञान, आयुर्वेदिक परंपरा, सांस्कृतिक आत्मनिर्भरता...आज विश्व जे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, ते सर्व या जनजाती समाजाने लाखो वर्षे जपलेले आहे. त्याचेही हा समागम एक प्रकट रूप होता.
या समागमाचे विशेष अतिथी भारताचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये ’वनवासी जनजाती समाज हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे,’ हे स्पष्ट करत, ’या समूहाने गेली अनेक वर्षे भारताची संस्कृती, संरचना व सांस्कृतिक चेतना सुरक्षित ठेवलेली आहे,’ हेही अधोरेखित केले. माननीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात आवर्जून स्वातंत्र्यलढ्यातील जनजाती समाजाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ’आतापर्यंत इतिहासाच्या पानावर त्यांना म्हणावे तसे स्थान देण्यात आलेले नव्हते; परंतु वर्तमानात केंद्र सरकारने एकूण जनजातींच्या विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. विशेष करून त्यांचा सन्मान तसेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराद्वारे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सांस्कृतिक परंपरेचे संरक्षण आणि जे विमर्श, षड्यंत्र तसेच विद्वेषाच्या वाटेने चाललेले आहेत; ज्यातून या समाजामध्ये फूट पडत आहे, त्याच्या विरोधात ठोस पावले उचलून; जनजातींची विशुद्ध सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे’ त्यांनी सांगितले.
या ’सांस्कृतिक समागमा’चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, पाच स्थानांवरून जवळजवळ तीन किलोमीटर दूर अंतरावरून लाल किल्ल्यापर्यंत निघालेल्या भव्य अशा शोभायात्रांमध्ये मातृशक्तीचा असलेला लक्षणीय सहभाग.
अंगाची लाही लाही करणार्या दिल्लीच्या तप्त उन्हामध्येही सर्व जनजाती क्षेत्रांतून मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती त्यातही युवक-युवती आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचे प्रदर्शन करत, लोकनृत्ये करत, पारंपारिक गीते गात अत्यंत उत्साहाने सहभागी होणे हा शोभायात्रेचा केंद्रबिंदू ठरला. हे अनोखे प्रदर्शन ते सहज करू शकले; कारण आजही अशा दुर्गम परिसरात महिलांमुळेच जनजातींचा वारसा टिकून राहिला आहे.
या समागममध्ये उपस्थित विविध जनजातींच्या नेत्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने जनजाती समाजाचा विकास म्हणजे शहरीकरण नाही तर जनजाती समाजाचा विकास स्थानीय निवासासह, निसर्गाबरोबर राहून आणि त्यांना अपेक्षित असलेल्या रुढीपरंपरेनुसारच झाला पाहिजे, असे निक्षून सांगितले. त्याच बरोबर जे या गरीब भोळ्या जनजातींना वेगवेगळ्या मार्गाने फसवतात आणि धर्मांतरित करतात त्यांच्यावरही सरकारने लक्ष ठेवून त्यांना रोखले तर पाहिजेच; याचबरोबर त्यांच्या विरोधात कायदा केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे एकत्रीकरण केवळ जनजाती समाजापुरते मर्यादित नव्हते, तर, ‘तू मैं एक रक्त, नगरवासी-ग्रामवासी-वनवासी, आम्ही सारे भारतवासी’ यात अभिप्रेत असलेला भारताचा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद या समागमातून सिद्ध झाला.
भारताला जर विश्वगुरू बनायचे असेल; तर भारताच्या सर्व समाजाचा आणि त्यातही जनजाती समाजाचा अवश्य विचार करावा लागेल. त्यांना केवळ सोबत घेऊन चालणार नाही तर त्यांच्याकडे असलेले ज्ञान, जीवनशैली, सांस्कृतिक व जीवनमूल्य यांनादेखील केंद्रस्थानी ठेवावे लागेल, हे या समागमाने सिद्ध केले.
हे आयोजन म्हणजे एका दिवसात घडलेला कोणताही चमत्कार नसून 2006 नंतर ’जनजाती सुरक्षा मंच’च्या माध्यमातून पद्धतशीरपणे ’सडक ते संसद’ या आंदोलनाची एक भव्य प्रतिकृती आहे. यातून जनजाती समाजाचा आत्मविश्वास जागृत झाला आहे. जेव्हा लाखो जनजाती बंधू-भगिनी दिल्लीमध्ये दाखल झाले; त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी व व्यवस्थेसाठी उपस्थित असलेल्या नागर समाजासह सगळे एकाच स्वरात ’भारत माता की जय! वंदे मातरम्! जय श्रीराम! हम सब एक है!’ इत्यादी घोषणा देत होते तोे म्हणजे खर्या अर्थाने सांस्कृतिक एकात्मतेचा उद्घोष होता.
’जनजाति सांस्कृतिक समागम 2026’ने हाही स्पष्ट संदेश दिला की, ’जनजाती समाज केवळ भारताचा भूतकाळ नसून भविष्याची उज्ज्वल दिशा आहे.’
हे सर्व आयोजन यशस्वी करण्यामध्ये दिल्लीतील अनेक संघटनांचा व हजारो लोकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अनेकांनी हे आपल्या घरातीलच काम आहे या भावनेने कष्ट व सर्वतोपरी मदत केली. ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम शबरी मातेला भेटायला वनात गेले होते. ’जनजाती सांस्कृतिक समागमा’च्या रूपात तीच शबरी माता शहरात आलेली आहे; तिचे स्वागत त्याच पद्धतीने झाले पाहिजे, या उदात्त हेतूने अनेक व्यवस्था उभ्या केल्या गेल्या. 75 स्थानिक शाळांमधून मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या बंधुभगिनींची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व विषयांमध्ये दिल्ली सरकार, केंद्र सरकार, रेल्वे प्रशासन यांनी सर्वतोपरी मदत केली.
’जनजाति सांस्कृतिक समागम’साठी उपस्थितांपैकी बहुतांश जनजाती समाज हा जवळजवळ पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसत होता. आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत या सर्वांनी फक्त प्रेमच अनुभवले. पाच मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेवर जागोजागी झालेल्या पुष्पवृष्टीमुळे आणि आदरातिथ्याने सर्वजण भारावून गेले होते.
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा समागम ’चलो दिल्ली’चा नारा नव्हता. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आपापले तिकीट काढून सर्वांनी जायचे आहे, हे निश्चित झालेले होते. जनजाती समाजाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा ठरले की त्याप्रमाणे अपेक्षित सामूहिक कृती करणे. जेव्हा हे लोक लाखोंच्या संख्येत आपले जाण्याचे व येण्याचे तिकीट काढून दिल्लीत आले तो समाजासाठी आणि रेल्वे प्रशासनासाठीही आश्चर्याचा धक्का होता. भारताच्या इतिहासामध्ये इतक्या शिस्तबद्धपणाने जनजाती समाज डिलिस्टिंग ह्या प्रमुख मागणीसह आपल्या अन्य मागण्या घेऊन आला; त्याला सरकारने जो प्रतिसाद दिलेला आहे...ते पाहता लवकरच जनजाती समाजाच्या अस्मिता, अस्तित्व व विकासासाठी संविधानिक चौकटीत निश्चित ध्येयधोरण राबवली जातील अशी आशा आहे. ...आणि तीच या जनजाती सांस्कृतिक समागमाची फलश्रुती असेल.