नीट प्रश्नपत्रिका आणि लष्करी विमान - आपण नेमके कुठे उभे आहोत?

विवेक मराठी    05-Jun-2026
Total Views |
 Neet exam
 
@डॉ. अश्विनीकुमार तुपकरी
98224 35518

vivek 
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव रूजवणे आणि मूल्याधिष्ठित वैद्यकीय व्यवसायाचे संस्कार त्यांच्यावर करणे या उद्देशाने ‘सेवांकुर भारत’ ही संस्था भारतभरात कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतभरातले सुमारे 16 हजार विद्यार्थी ‘सेवांकुर भारत’शी जोडलेले आहेत. या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी नीट परीक्षाघोटाळ्यावर केलेले हे भाष्य.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्ग ठरवणारी Neet -UG परीक्षा आज केवळ एक प्रवेशपरीक्षा राहिलेली नाही; ती असंख्य कुटुंबांच्या आशा, संघर्ष, त्याग आणि स्वप्नांचे प्रतीक बनली आहे.
 
एखादा विद्यार्थी दोन-दोन वर्षे घरापासून दूर राहून अभ्यास करतो, आई-वडील आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन फी भरतात, कुटुंबातील अनेक आनंद बाजूला ठेवून मुलाच्या भविष्याकरिता झटतात आणि या सर्व प्रयत्नांवर जर प्रश्नपत्रिका फुटीची काळी सावली पडली, तर ती केवळ परीक्षेची चूक राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासाचा भंग ठरतो.
 
 
प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी लष्करी किंवा हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्याचा विचारही केला जात असल्याचे समोर येत आहे. हे समजल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहतात...
 
भारतासारख्या विशाल लोकशाही राष्ट्रात परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास इतका कमी झाला आहे का, की आता प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी सैन्यदलाची मदत घ्यावी लागेल? देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या भारतीय सैन्याला आता प्रश्नपत्रिका वाहतुकीची जबाबदारी द्यावी लागणार असेल, तर ही केवळ तांत्रिक बाब नाही; ती आपल्या नागरी व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर कबुली आहे. समाजाचा नैतिक स्तर दर्शविणारी ही घटना आहे. व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीकडे स्वातंत्र्यानंतर आपल्या शिक्षण व समाजव्यवस्थेने दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम आहे. चारित्र्यनिर्मिती भाषणाने होत नाही तर तशा व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाने, सहवासाने, संवादाने होते. या महत्त्वाच्या पैलूकडे शिक्षण व्यवस्थेने दुर्लक्ष केले आहे.
 
 
प्रश्न असा आहे की, आपण व्यवस्था सुधारत आहोत की व्यवस्थेवरील अविश्वास लपविण्याचा प्रयत्न करीत आहोत? आज देशातील विद्यार्थी अत्यंत अस्वस्थ आहेत. मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता यांवर उभ्या असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर पैशांचा, भ्रष्ट साखळ्यांचा आणि राजकीय-सामाजिक प्रभावांचा हस्तक्षेप वाढत असेल, तर सामान्य विद्यार्थ्याने नेमक्या कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवायचा? रात्रंदिवस अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याच्या मनात जर मेहनतीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची अशी भावना निर्माण झाली, तर ते राष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक लक्षण आहे.
 
 
‘सेवांकुर भारत’शी जोडलेला विद्यार्थी या परिस्थितीकडे केवळ संतापाने पाहणार नाही; तो अंतर्मुख होईल. कारण ‘सेवांकुर भारत’ विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर होण्याचे शिक्षण देत नाही, तर जबाबदार नागरिक म्हणून विचार करायला शिकवते. ‘सेवांकुर भारत’चा विद्यार्थी स्वतःला विचारेल, ‘मी यासाठी काय करू शकतो?’ हे असेच चालू राहिले तर उद्या आरोग्य व्यवस्था, न्यायव्यवस्था किंवा प्रशासनावरील लोकांचा विश्वास उडेल.
 
 
‘सेवांकुर भारत’ विद्यार्थ्यांच्या मनात संवेदनशीलता आणि नैतिकता रुजविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धात्मक नुकसान वाटत नाहीत; त्या मूल्यव्यवस्थेच्या र्‍हासाचे प्रतीक वाटतात.
 
 
ज्या वयात विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहावीत, संशोधनाची भाषा बोलावी, समाजसेवेचे ध्येय बाळगावे, त्या वयात त्यांना ’पेपर लीक’, ’माफिया’, ’रॅकेट’ आणि ’सिस्टम फेल्युअर’ हे शब्द ऐकावे लागत आहेत, ही शोकांतिका आहे.
 
 
’लष्कराची मदत घेणे’ हा तात्पुरता उपाय असू शकतो; परंतु तो मूळ समस्येवरचा इलाज नाही. खरी गरज आहे ती परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि नैतिकता पुनर्स्थापित करण्याची. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते वितरणापर्यंतची संपूर्ण साखळी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कठोर देखरेख आणि उत्तरदायित्वाच्या चौकटीत आणावी लागेल. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा जिंकला पाहिजे.
 
 
कारण राष्ट्राची खरी शक्ती रणांगणावर लढणार्‍या सैनिकांमध्ये जितकी असते, तितकीच ती प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्येही असते. जर विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, तर ते कोणत्याही राष्ट्रासाठी गंभीर संकटाचे संकेत असतात.
 
 
 
आज गरज आहे ती केवळ ’पेपर सुरक्षित’ ठेवण्याची नाही; तर विद्यार्थ्यांच्या मनातील ’विश्वास सुरक्षित’ ठेवण्याची आहे. कारण प्रश्नपत्रिका फुटल्यावर फक्त परीक्षा बिघडत नाही; तर अनेक तरुणांच्या स्वप्नांवर, कष्टांवर आणि राष्ट्राच्या नैतिक पायावर घाव बसतो.
 
 
‘सेवांकुर भारत’चा कार्यकर्ता म्हणून आम्हाला वाटते की, देशाला फक्त कुशल डॉक्टर नकोत; तर प्रामाणिक व्यवस्था उभी करणारे सजग नागरिकही हवेत. आणि त्या दिशेने समाजाने, प्रशासनाने आणि शिक्षणव्यवस्थेने आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे.