@धनंजय कुरणे
9325290079
मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.
साधारण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी टिपिकल मराठी मध्यमवर्गीय घरात नेहमी आढळून येणारी ही काही दृश्यं...
उन्हं उतरण्याची वेळ आहे...घराच्या ओसरीवर गप्पा रंगात आल्या आहेत...शेजारचे सुहृदही या मैफिलीत सामील झालेत...
किंवा
घरातल्या ’हॉल’मध्ये कुटुंबातल्या तीन (कधी चार) पिढ्या एकत्र जमल्यात आणि हास्य विनोदाला बहर आलाय...
किंवा
घरी ’पाहुणे’ आलेत अथवा ’कांद्यापोह्यांचा कार्यक्रम’ सुरू आहे..
अशावेळी घरातल्या तरुण मुलीला उद्देशून कुणीतरी म्हणतं... ’एक छानसं गाणं म्हण!’ आणि मग ती एखादं सुरेखसं भावगीत वा भक्तिगीत म्हणू लागते.. ’केतकीच्या बनी तिथे...’ किंवा ’केशवा माधवा...’ अथवा ’घाल घाल पिंगा वार्या...’ नाहीतर ’जिथे सागरा धरणी मिळते...’...झटकन अवघं वातावरण सुरेल, प्रसन्न आणि अधिकच ’घरगुती’ होऊन जातं....!
एखाद्या ’शालीन, सुसंस्कृत युवतीला’ शोभून दिसतील अशी जी मराठी गाणी चाळीसच्या दशकानंतर निर्माण झाली, त्यात ’सुमनगीतांची’ संख्या लक्षणीय आहे.
’शालीनता आणि सुसंस्कृतपणा’ ही सुमनताईंच्या व्यक्तित्वाची आणि त्यामुळेच गायकीचीही ठळक वैशिष्ट्यं! लतादीदी आणि सुमनताई यांच्या आवाजात जे विलक्षण साम्य आहे ते केवळ ’आवाजाच्या पोतापुरतं’ मर्यादित नाही; तर या दोघींच्या आवाजात अतिशय महत्त्वाचं गुणात्मक साम्यही आहे...’आवाजात मादकतेचा अथवा बाजारूपणाचा लवलेशही नाही!’ ज्याला ’विकाररहित’ म्हणता येईल असा आवाज! त्यामुळेच भावगीतं, भक्तिगीतं, भावगीतांच्या अंगानं जाणारी चित्रगीतं यासाठी सुमनताईंचा आवाज अगदी उत्तम-सुयोग्य! सुमनताईंची गाणी ऐकताना ’ॠळीश्र पशुीं वेेी’ गाते आहे असं न वाटता, ’आपल्या कुटुंबातलीच मुलगी गातेय’ असं वाटतं. त्याचं कारणही हेच असावं.
”’गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे’ ही तीन नावं सिनेमाच्या पोस्टरवर दिसली की तो चित्रपट कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र पहावा असाच असणार याची खात्री बाळगावी!”, असं पूर्वी नेहमी म्हटलं जायचं. तद्वत, ज्या रेकॉर्डवर ’सुमन हेमाडी किंवा सुमन कल्याणपूर’ हे नाव असेल ते गाणं आबालवृद्धांनी आवर्जून ऐकावं असंच असणार हे अगदी निश्चित होतं! सुमनताईंचं व्यक्तित्व आणि गायकी यातल्या अंगभूत सौजन्यामुळे उथळ, मस्तीखोर गाणी त्यांच्या दिशेला फिरकलीही नाहीत. ’भावगीतं’ हा मराठी संस्कृतीचा मानबिंदू! इथं माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, लता, आशा यांच्यासारख्या ताकदीच्या गायिका असताना आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवायचा ही साधी गोष्ट नव्हे. सुमनताईंनी हे साध्य केलं. त्यांची गाणी रसिकांच्या भावविश्वात खोलवर झिरपली आहेत. त्यांचा आणि रसिकांचा एक जिव्हाळ्याचा स्नेहबंध निर्माण झाला आहे.
संगीतकार दशरथ पुजारी आणि सुमनताई यांची भेट घडून येणं हा भावसंगीताच्या क्षेत्रातला सुवर्णयोगच! सुमनताईंचे वडील जेव्हा त्यांना घेऊन पुजारींकडे गेले तेव्हा ते एका नव्या गायिकेच्या शोधातच होते. ’नंदाघरी नंदनवन फुलले’ आणि ’सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’ ही दोन गाणी त्यांनी सुमनताईंना (त्यावेळी सुमन हेमाडी) शिकवली. पण संगीतकार, गीतकार, गायक सारेच नवीन असताना ’रेकॉर्ड काढणं’ हे जोखीमीचं काम आहे’ असं रेकॉर्ड कंपनीकडून सांगण्यात आलं. त्यावेळी ’स्वतःच काही रेकॉर्ड विकत घेण्याची’ तयारी पुजारींनी दाखवली. प्रत्यक्ष रेकॉर्ड बाजारात आल्यावर, कंपनीची भीती अनाठायी ठरली आणि त्या ध्वनिमुद्रिकेची तडाखेबंद विक्री झाली.
त्याकाळी रेकॉर्डिंग क्षेत्रात ’वसंत प्रभू-लता मंगेशकर’, ’सुधीर फडके-आशा भोसले’, ’यशवंत देव-सुधीर फडके’ अशा संगीतकार-गायकांच्या जोड्या अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. या जोड्यांच्या नव्या रेकॉर्डस् कधी बाजारात येतायत याकडे रसिक डोळे लावून बसलेले असत. या मालिकेत, ’दशरथ पुजारी-सुमन कल्याणपूर’ या सुरेल जोडीची भर पडली. या दोघांनी भावगीतांच्या खजिन्यात किमान 45 ते 50 गाण्यांची भर घातली. ’मृदुल करांनी छेडीत तारा’ या गाण्याच्या ध्वनिमुद्रण प्रसंगी आशा भोसले आणि ओ.पी. नय्यर उपस्थित होते. त्यांनी या रचनेची आणि गायकीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कारकिर्दीच्या उत्तरार्धात, संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार अशोक जी. परांजपे यांच्याशी सुमनताईंचे सूर जुळले आणि या त्रिकुटाने ’केतकीच्या बनी तिथे’, ’एकदाच यावे सखया तुझे गीत कानी’, ’नाविका रे वारा वाहे रे ’, ’वाट इथे स्वप्नातील संपली जणू’ अशी अनेक कालजयी गाणी दिली.
कुणी म्हणतात की ’सुमनताईंचा जन्म चुकीच्या काळी झाला!’ मला हा मुद्दा पटत नाही. समजा सुमनताई वीस-पंचवीस वर्षांनी जन्मल्या असत्या तर काय झालं असतं? त्यांच्या गळ्याला योग्य असं संगीत ऐंशी-नव्वदच्या दशकांत शिल्लक होतं काय? समजा, त्या दहा-वीस वर्षं आधी आल्या असत्या तरी तीस-चाळीसच्या दशकातली गाणीही त्यांच्या गायकीला साजेशी नव्हतीच. उलट, लताच्या समकालीन असून स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करणं हे अधिक आव्हानात्मक होतं. आजही अनेक रसिक असं म्हणतात की ’सुमन ही आमची सर्वात लाडकी गायिका आहे!’ असा चाहता वर्ग लाभणं ही सुमनताईंच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे.
’लताच्या आवाजाशी साम्य’ ही एक प्रकारे ’मर्यादा’ ठरली. हिंदीतले संगीतकार म्हणत, ’आमच्याकडे ओरिजनल लता असताना आम्ही झेरॉक्स का वापरावी?’ असं असूनही ’रफी-सुमन’ यांची युगुलगीतं हा हिंदी चित्रसंगीतातला एक अविस्मरणीय अध्याय ठरला आहे. निसर्गानं सुमनताईंच्या आवाजाची जातकुळी जरा जरी वेगळी ठेवली असती तरी त्यांची कारकिर्द आणखी खूपच बहरली असती हे मात्र निश्चित!
’निवृत्तीची सुयोग्य आणि नेमकी वेळ ओळखणं’ हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य! ’वाढत्या वयामुळे आपला सूर पूर्वीसारखा लागत नाही’ हे सत्य अनेक थोर गायकांना पचायला जड गेलं. सुमनताईंनी मात्र या अटळ सत्याची चाहूल लागण्यापूर्वीच गाणं थांबवलं. प्रसिद्धीच्या वलयापासून असं तडकाफडकी दूर जाणं हे त्यांच्या नि:संग वृत्तीचं द्योतक आहे.
गेल्या चार वर्षांत लता-आशा-सुमन ही आपली लाडकी त्रिमूर्ती या जगातून निघून गेली. दीदींचं ’जाणं’ खूप गाजलं. कारण त्या बरेच दिवस दवाखान्यात होत्या. आशाताईंचं ’पाऊल न वाजवता जाणं’ त्यांच्या उत्साही आणि उत्सवी आयुष्याशी विसंगत होतं. सुमनताई मात्र जशा जगल्या तशाच गेल्या. देवघरातल्या समईनं नकळत शांत व्हावं तशा...
'
निसर्गनियमानुसारच त्या गेल्या... एक दीर्घ, कृतार्थ आयुष्य जगून.. पण यापुढे ’लिंबलोण उतरू कशी’, ’ओंकार प्रधान’, ’जिथे सागरा’, ’मृदुल करांनी छेडीत तारा’ अशी अवीट गाणी ऐकताना सुमनताईंच्या नावाआधी ’कैलासवासी’ हा शब्द योजावा लागणार या भावनेनं मन अस्वस्थ होतंय, डोळ्यांच्या कडा ओलावतायत...