युग संवाद सत्याचा संवादी शोध

विवेक मराठी    13-Jul-2026   
Total Views |

book 
पुस्तकाचे नाव : युग संवाद
लेखक ः विश्राम गुप्ते
प्रकाशन ः दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पाने ः 455
मूल्य ः 700/-
प्राचीन काळापासून भारताची ज्ञानपरंपरा विकसित होत गेली ती संवादातून. जिज्ञासेपोटी उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे उपनिषदाच्या रूपाने प्रकट झाली. संवाद या प्रवाही परंपरेचा आत्मा आहे. वादाकडून संवादाकडे अशी आपली पद्धत आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी प्रश्न उपस्थित केलेच पाहिजेत. मात्र त्या प्रश्नांच्या मागे सुप्त हेतू असता कामा नयेत अशी प्रामाणिक अपेक्षा असते. दीर्घकाळ सुरू असलेल्या या संवाद परंपरेत मागील काही वर्षांपासून कलुषित भावनेने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे नकोत. प्रश्न...तेही निराधार, अपुर्‍या माहितीच्या आधारे उपस्थित करून केवळ टीका करायची आहे, सनसनाटी निर्माण करायची आहे. हे प्रमाण मागील बारा वर्षांत म्हणजे 2014नंतर अधिक वाढले आहे. ‘हिंदू धर्म’, ‘हिंदुत्व’, ‘हिंदू संघटना’ इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जातात. या पार्श्वभूमीवर विश्राम गुप्ते यांचे ‘युग संवाद’ हे पुस्तक खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून प्रश्न विचारणार्‍यांचे केवळ बुरखे फाडले नाहीत, तर त्यांच्या हिंदूविरोधी मानसिकतेचा पंचनामा केला आहे.
 
 
विश्राम गुप्ते हे ललित लेखक आहेत. त्यांच्या आजवर सहा कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. ‘युग संवाद’ हे ललित लेखन नसले तरी ललित लेखनाच्या बाजातील वैचारिक खंडनमंडन आहे. लेखकाने युग संवाद लिहिताना ’संवाद ’शैली वापरली असून विविध अकरा व्यक्तींसोबतचे हे संवाद आहेत. या अकरा संवादांची शीर्षके पुढीलप्रमाणे- ‘अंतर्यामी बदल’, ‘व्यक्तिवादातले खाचखळगे’, ‘दुभंगाची सुरुवात’, ‘बाबरी पतन ही सेक्युलॅरिझमची शोकांतिका आहे’, ‘सेक्युलॅरिझम नावाचा ढोल’, ‘फॅसिस्ट मेजॉरेटेरियन वगैरे वगैरे’, ‘हिंदुत्व, हिंदुत्वावर चौफेर हल्ले’, ‘हिंदूद्वेषाची गंगोत्री’, ‘लिबरॅलिझमचा फॅसिझम’, ‘वोकचा विकार’. ही अकरा शीर्षके वाचली की, लक्षात येते समकालीन प्रसारमाध्यमांनी व वैचारिक व्यासपीठांनी ज्या शब्दांच्या आधारे/शब्दांच्या आडून हिंदुत्वाला विरोध केला आहे त्यातील फोलपणा ‘युग संवाद’ या पुस्तकात वाचायला मिळतो. विकास दिघे ही या पुस्तकात मध्यवर्ती व्यक्तिरेखा असून ती प्रश्नांची उत्तरे देते किंवा प्रश्नांना खोडून काढते. तर निखिल, केळकर, खैरलांजे, सुनिता, रोलंड, मृणाल, पिटर अशा विविध व्यक्तिरेखा आपापल्या विचारधारा आणि धारणांसह विकास दिघेशी संवाद करतात. या सार्‍या व्यक्तींचा समान धागा एक आहे तो म्हणजे 2014मध्ये झालेले सत्तापरिवर्तन हे संकुचित विचारधारा बळकट करणारे आहे. हा धागा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडत राहतात. विकास दिघे त्यांची साधार उत्तरे देत त्यांना निरुत्तर करतो.
 
 
विश्राम गुप्ते यांनी संवाद शैलीत हे पुस्तक लिहिले असले तरी ते सप्रमाण आहे. गुप्ते यांनी परिशिष्टात एकशे तीस पुस्तकांचा परिचय करून दिला आहे, ज्या पुस्तकांच्या आधारे हे लेखन झाले. या मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की ती 2014नंतर प्रकाशित झालेली असून हिंदू विषयावर जी माध्यमातून चर्चा चालते, त्या संदर्भात ही एकशे तीस पुस्तके ठाम भूमिका मांडतात. एकूणच हिंदू विरोधी मत समूळ खोडून काढण्यासाठी आवश्यक असणारे वैचारिक आयुध म्हणून युग संवाद या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे.
 
 
‘युग संवाद’ लिहिण्यामागची आपली भूमिका सांगताना विश्राम गुप्ते म्हणतात, कुठल्याही हौशी नसलेल्या लेखकाला सत्याचा शोध हे एकमेव ध्येय खुणावत असते. ह्या सत्याची एक किंमतसुद्धा असते. ती देऊनच लेखकाला सत्याची हौस फिटवता येते. आपण सारे स्वतःला, आपल्या कुटुंबाला, राहतो त्या समाजाला आणि देशाला काहीतरी देणे लागतो. हे एक लेखक म्हणून मी मान्य करतो. हे देणे घेणारे घेतील. न घेणारे फेकून देतील. त्यांची काळजी करायची नसते हे मला जाणवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून जर एक विचारधारा असत्य राजकीय विमर्श मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करणे मी पवित्र कर्तव्य मानतो.
विश्राम गुप्ते यांनी वेगळे पाऊल उचलून स्वतःची वाट शोधली आहे. गुप्ते यांच्यासारखे असंख्य लोक या वाटेचा महामार्ग करतील इतकी अफाट ताकद या विषयात सामावली आहे. भविष्यात अशाच साहित्याची प्रकर्षाने गरज असणार आहे. हिंदू विमर्श मांडण्यासाठी नवा मार्ग खुला केल्याबद्दल लेखक प्रकाशकांचे अभिनंदन.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001